पूर्वी जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य नव्हतंच. त्यामुळे कित्येकांनी मनासारखं सहजीवन नसलं तरी संसार निभावले; मात्र अनेकदा तडजोड करत रेटलेल्या या संसारात आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारायला ही पिढी मागे पडली; पण ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा’ यानुसार वैवाहिक नात्याकडे अधिक जाणीवपूर्वक बघणं, ते सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करणं आणि विवाह संस्था बळकट करण्याला हातभार लावणं यासाठी कुटुंबातील ज्येष्ठांनी पुढच्या पिढीला सजग करायला हवं…

एके काळी निमशहरी आणि ग्रामीण भागात (काही प्रमाणात आजही) लग्न ठरण्या-ठरवण्यात मध्यस्थ हे कळीची भूमिका बजावत असत. आता मात्र शिक्षण आणि पोटापाण्यासाठी तरुण पिढी जशी इकडे-तिकडे पांगली, तसं कुटुंब/परिचितांच्या ओळखीतून किंवा मध्यस्थांमार्फत होणार्‍या विवाहांपेक्षा विवाह मंडळातून ठरणार्‍या विवाहांची संख्या खूप वाढली. विवाह जमवण्याची संधी देणारे अनेक ॲप्स, पर्याय उपलब्ध झाले. पालकांनी ‘स्थळ’ बघण्यापासून आता अशा ॲप्सवर मुलामुलींनी स्वत: नावनोंदणी करून, वर/वधूची माहिती वाचून, स्वत:च  संपर्क साधणे अशी मोठी श्रेणी, विविधता उपलब्ध झाली.

आधी पालकांसमोर ‘बघण्याचा’ कार्यक्रम होण्याऐवजी, ‘आधी आम्ही भेटून, बोलून बघतो…’, इथपर्यंत काही प्रमाणात प्रगती झाली. मात्र, मला लग्न करायचं आहे की नाही, कधी करायचं आहे, कुणाशी करायचं आहे, कसं करायचं आहे आणि प्रत्यक्ष लग्न (यात लग्नाचा खर्चही आला) अशी अथपासून इतिपर्यंत स्वत:च्या लग्नाची जबाबदारी सर्वस्वी स्वत: घेणारी मुलंमुली फारच कमी. भले ती कितीही शिकलेली वा कोणत्याही हुद्यावर देशापरदेशात काम करणारी असोत. अलीकडे माझ्या बघण्यात काही लग्नं अशी झालेली आहेत आणि पालकांनी ती आनंदाने स्वीकारली देखील आहेत. येणार्‍या काळात ही संख्या वाढेल ही अपेक्षा करायला हवी.

प्रेमविवाहांचं प्रमाण पूर्वीपेक्षा वाढलं असलं तरी ठरवून केलेल्या लग्नांपेक्षा ते अजूनही बरंच कमी आहे, असं चित्र आहे. त्याप्रमाणात प्रेम प्रकरणांचं अर्थात अफेअर्सचं प्रमाण मात्र खूप वाढलं आहे. मात्र लग्न त्याच मुला/मुलीशी होईल असं अजिबातच नाही. ‘‘ प्रेमप्रकरण टाइमपास असतो… लग्न ही वेगळी गोष्ट…’’ असं मला नुकतंच एका चर्चेत काही मुलामुलींनी सांगितलं. ‘‘का बरं असं? काय फरक करता या दोन्हीत तुम्ही?’’ या प्रश्नावर बहुतेकांनी फक्त खांदे उडवले. काहींनी, लग्न ठरवण्यात शेवटी पालकांचं म्हणणं कसं महत्त्वाचं असू शकतं, असा युक्तिवाद केला. ‘‘मग ही अफेअर्ससुद्धा पालकांना सांगून करता का? त्यांना चालतं का ते?’’ यावर, एकमेकांकडे बघून हसत, ‘‘त्यांना कोण सांगतं?’’, असं काहींचं उघड उत्तर होतं तर काहींचं मौनातून! विचारपूर्वक केलेल्या परिचयोत्तर विवाहांचं किंवा विवाहपूर्व समुपदेशन करून लग्न केलेल्यांचं प्रमाण अत्यल्प आहे. पत्रिका बघण्याचं गारुड अजूनही बहुतेकांच्या मनावर आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा नव्या पिढीतही अभाव आहे.

तरुणांमध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढत असलं तरी मनाने आणि शरीराने (लैंगिक नातं या अर्थानी) घटस्फोटितच असलेल्या पण अनेक कारणांस्तव नाईलाजानं एका छताखाली राहणार्‍या, विशेषत: चाळिशी-पन्नाशी किंवा त्या आसपासच्या वयातील जोडप्यांचं प्रमाणही लक्षणीय आहे. या वयोगटांमध्ये छुप्या विवाहबाह्य संबंधांचं प्रमाणही आहे, हे आपला समाज सहज मान्य करत नसला, तरी कोणतेही समुपदेशक सहज सांगतील. आधी यासाठी मदतीस आलेली समाजमाध्यमंच आता तंत्रज्ञानाच्या दुधारी शस्त्रामुळे धोकादायक झाली आहेत. किती तरी वेळा तर आजची ‘टेक्नोसॅव्ही’ पिढीच फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचं वस्त्रहरण करते!… त्याअर्थी खासगी असं काहीही उरलेलं नाही, हे अनेकांच्या अजून लक्षात आलेलं नाही. त्यातून घडणार्‍या महाभारतामुळे मग ती ‘बे घडी गंमत’ अतिशय महाग पडते. आता तर मनातील हा संशय तपासून पाहायला करायला व्यावसायिक सेवाही उपलब्ध झालेल्या आहेतच. गेल्या २५ वर्षांतला विवाह आणि कुटुंब संस्थेचा हा प्रवासही दुर्लक्षण्याजोगा खचितच नाही! कुटुंब न्यायालयाच्या आकडेवारीत घटस्फोटांच्या वाढत्या संख्येच्या यादीत हा वर्गही आहे. यांनी संसार निभावले, पण मनात जोडीदार आणि सहजीवनाबद्दल खूपसे असमाधान, अपूर्णता आणि वंचिततेची भावना घेऊन. पण त्याचवेळी माध्यमांनी जग जवळ आणल्याने दोन समानशील माणसं आपली अतृप्ती भरून काढण्यासाठी एकमेकांजवळ येऊ लागली, असंही घडत गेलं.

या पिढीतील, विशेषत: स्त्रियांना, पुरुषप्रधान व्यवस्थेत आपल्यावर अन्याय झाला असं वाटत आहे; परंतु स्वत:च्या  विचारपूर्वक जोडीदार निवडीची, लग्नाच्या  निर्णयाची जबाबदारी तेव्हा आपण स्वत: का घेतली नव्हती, याबद्दल कुणीच बोलत नाही. ‘‘मला नव्हतं गं हे करायचं, पण आईबाबांपुढे काही चाललं नाही’’, असे दोषारोप तेवढे होतात. परंतु, विवाहामुळे मांडला गेलेला संसार करताना, समांतरपणे स्वत:ची वाढ करत, स्वओळख बळकट करत, आत्मभान कमावायचं असतं ही जाणीव, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे आणि नंतर स्त्री चळवळीनं सातत्यानं देण्याचा प्रयत्न केला असला, तरी फार कमी स्त्रियांमध्ये हे झिरपलेलं दिसतं. त्यामुळे आपल्यावर अन्याय आपणही करून घेत असतो, याचं भान अजूनही पुरेसं आलेलं दिसत नाही. अर्थात आपल्या आई-वडिलांचं वैवाहिक नातं ते बाहेर काहीही दाखवत असले तरी आतून निरोगी नाही, पोखरलेलं आहे (हल्लीची पिढी त्याला ‘डिसफंक्शनल मॅरेज’ म्हणते), हे समजण्याइतके ते ‘स्मार्ट’ झाले आहेत. असा अन्याय आपण स्वत:वर होऊ देणार नाही, हे वाटणार्‍यांची संख्याही वाढते आहे. थोडक्यात, इथून पुढच्या वैवाहिक नात्यात उभयपक्षी समतेचा भाव आणि समानतेचं वर्तन नसेल तर वाढत्या घटस्फोटांचा दोष फक्त  हल्लीच्या मुलामुलींना देणं कितपत योग्य होईल? कारण दोष देऊन काहीच बदलत नाही. आपल्याला कुटुंब आणि विवाह संस्थेचा सुकाणू असमानतेच्या पारंपरिक विचारांकडून, सहिष्णू, समन्वयी, सर्वसमावेशी आणि ‘माणूस’ म्हणून एकमेकांचा सन्मान करणार्‍या नवविचारांच्या हाती द्यायचा आहे का, हा प्रश्न आहे. नाहीतर स्वत:च्या जोडीदाराबद्दल, त्याच्या बरोबरच्या वैवाहिक नात्याबद्दल नाखूश असूनही आता मुलामुलींना तरी त्यांच्या जोडीदार निवडीसाठी जाणतं करायचं सोडून, त्यांच्या लग्नाची सूत्रही आपल्या हाती ठेवण्याचा अविवेकीपणा पालकांकडून होताना दिसतो.

पालक आणि मुलं-मुली यांच्यामध्ये वैचारिक समन्वय नसेल, परस्परांवर विश्वास नसेल, आपली मतं न लादण्याचा उचित विवेक नसेल, तर तरुण पिढी बदलत्या काळाने आणि समाजमाध्यमांनी त्यांच्यासमोर आणलेले वेगवेगळे पर्याय शोधणार. प्रयोग करणार. कारण त्यांना आधीच्या पिढ्यांच्या वैवाहिक नात्यांमध्ये आपणही आवर्जून अनुसरावं असं  फारसं काही दिसत नाहीये. दुसरं, नवीन पिढ्या समाजाच्या दबावाला सहज झुकणार्‍या नाहीत. त्या जुन्या पिढ्यांइतके अनुभवीही नाहीत. त्या अर्थानं आपल्या वैवाहिक नात्याकडे अधिक जाणीवपूर्वक आणि प्रामाणिकपणे बघणं, ते सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करणं आणि विवाहसंस्था बळकट करण्याला हातभार लावणं ही जबाबदारी कुटुंबसंस्थेतील ज्येष्ठांची अधिक नाही का? त्यांनी ही संस्था दीर्घकाळ अनुभवलेली आहे आणि  तिच्यातील गुण-दोष त्यांना आकळले आहेत; म्हणजे अशी निदान अपेक्षा आहे. आपल्या मुलांसमोर त्यांच्या घरच्यांचाच आदर्श असणार आहे.

या व्यवस्थांमध्ये आपल्यावर अन्याय झाला अशी भावना असेल तर तो का झाला या प्रश्नाला सजगपणे भिडायला हवं. आता आपल्या मुलामुलींनी तरी  लग्नानंतर असा अन्याय एकमेकांवर करू नये यासाठी आपल्याला पालक म्हणून मुलांमुलींना सजगपणे कसं वाढवता येईल, याचा विचार कुटुंबसंस्थेतील विविध घटकांनी अधिक करायला हवा, असं आपल्याला वाटतं का? बर्‍याचशा बाजारू माध्यमांच्या हस्तक्षेपात, सुजाण, विवेकी पालकत्व प्रभावी करणं ही आजच्या कुटुंबसंस्थेची खरी कसोटी आहे, असं वाटतं. अगदी अलीकडच्या काळापर्यंत लग्न हा समाज आणि कुटुंबाचा विषय होता. त्यामुळे लग्न करताना जात, धर्म, प्रतिष्ठा, पैसा, मालमत्ता, देणी-घेणी या बाह्य /ठोस गोष्टी केंद्रस्थानी राहिल्या, आजही आहेत. परंतु, वैवाहिक नातं आणि त्यातील भावना या अमूर्त आहेत. या भावनांची दखल घेण्याऐवजी, लग्नानंतर सहवासाने प्रेम होतंच असं लग्नं जुळवणार्‍यांना कसं काय वाटतं बरं? त्यांचं स्वत:चं तरी तसं झालं का? नसेल, तर मग आपल्या मुलांनी म्हटलं,  ‘‘तू तर अखंड नाराज असतेस बाबांवर (किंवा बाबा तुझ्यावर)’’; यावर, ‘‘पण संसार केला ना आम्ही व्यवस्थित; तुमचं काही कमी नाही ना केलं?’’, हा मुद्दा ढालीसारखा का बरं पुढे येतो? कबुली कशाचीच का बरं द्यायची नसते? सारखे मुखवटे का घालायचे असतात?

तसंच, आधी मैत्री, मग प्रेम आणि त्यासाठी भावनिक अनुरूपता बघण्याचा निकष, जोडीदार निवडताना तरुण पिढीत का बरं नसतो? लग्नानंतर तशी अपेक्षा मात्र असते! पालकांचे जाऊ द्या, पण मुलामुलींनी हे समजून घेतलं नाही तर त्यांच्या आवडीनिवडी, स्वप्न, भावनिक साहचर्याच्या रास्त अपेक्षा, याचा बळी जाण्याची शक्यताच अधिक नाही का? आता स्त्रियाही आर्थिकदृष्ट्या सबल आणि स्वावलंबी होत असताना वैवाहिक नात्यात एकमेकांना बांधून ठेवणारं, प्रेमासाठी पोषक वातावरण बनवणं हे आजच्या कुटुंब आणि विवाह संस्थेचं आणखी एक आव्हान आहे, असं वाटतं. तरुण पिढीलाही विवाह संस्थेला नवीन पर्याय बघताना या ‘प्रेमभावने’ ला विश्वासात घ्यावं लागेल.

वैवाहिक नातं आणि त्यातील भावना या अमूर्त आहेत. या भावनांची दखल घेण्याऐवजी, लग्नानंतर सहवासाने प्रेम होतंच असं लग्नं जुळवणार्‍यांना कसं काय वाटतं बरं? त्यांचं स्वत:चं तरी तसं झालं का? नसेल, तर मग आपल्या मुलांनी म्हटलं,  ‘‘तू तर अखंड नाराज असतेस बाबांवर किंवा बाबा तुझ्यावर’’; यावर, ‘‘पण संसार केला ना आम्ही व्यवस्थित, तुमचं काही कमी नाही ना केलं?’’, असा बचाव का बरं पुढे येतो? कबुली कशाचीच का बरं द्यायची नसते? सारखे मुखवटे का घालायचे असतात या पिढीला? आता स्त्रियाही आर्थिकदृष्ट्या सबल आणि स्वावलंबी होत असताना वैवाहिक नात्यात एकमेकांना बांधून ठेवणारं, प्रेमासाठी पोषक वातावरण बनवणं हे आजच्या कुटुंब आणि विवाह संस्थेचं एक मोठं आव्हान आहे.

 vankulk57@yahoo.co.inमागच्यास ठेच पुढचा…  | vandana-kulkarni-chaturang-article-marriage-institution-changing-trends-youth-relationships-parenting-advice