शब्द जपून वापरा!

परब व ओक या मित्रांनी पुराव्यासह मला पकडल्यावर मी नाइलाजाने म्हणालो

परब व ओक या मित्रांनी पुराव्यासह मला पकडल्यावर मी नाइलाजाने म्हणालो, ‘‘माझ्या बोलण्यात किरकोळ चुका झाल्या हे मी कबूल करतो. शेवटी चंद्रावरही कलंक आहे! ओक, तुम्ही, ‘दाता भवति वा न वा’ असे म्हणालात ना? चला, मी आज तुम्हाला कर्ण काय ते दाखवतो. आजपासून मी तुम्हाला ओळीने दोन दिवस चहा पाजतो! चैन करा. सहा रुपयांचा कटिंगचा चहा नाही, पूर्ण कप घ्या..’’

ओकांनी थेट माझ्यावर हल्ला चढवला, ‘‘मोकाशी, तुमचे जिभेवर मुळीच नियंत्रण नाही. तुमच्या जिभेचे वय त्र्याऐंशी आहे. तिने विश्रांती घ्यायची सवय करावी.’’

मी मनातून संतापलो होतो. पण काय करणार? ओकांनी माझ्या दोषावर नेमके बोट ठेवले होते. मी एकूणच खाण्याचा व त्यात विशेषत: गोड पदार्थाचा भोक्ता आहे. शिवाय मी मधुमेही असल्याने, वैद्यकीय शास्त्रानुसार मला गोड खाणे वज्र्य आहे. मी मोहापोटी गोड खातो. ही तशी किरकोळ चूक आहे; मात्र परब व ओक या पंचाऐंशी वर्षांच्या मित्रांजवळ, मी गोड खाल्ल्याबद्दल वेळोवेळी पश्चात्ताप व्यक्त करतो, ही माझी घोडचूकच होय. बस्स! यापुढे फक्त चूक करण्यावरच थांबायचे, घोडचूक टाळायची.

मी खोटय़ा मवाळपणे म्हणालो, ‘‘ओक, यापुढे मी गोड पदार्थ पूर्ण वज्र्य करणार. साखर हा शब्द लिहिणारही नाही.’’

तुकोबाभक्त परब पुटपुटले, ‘‘शब्द नाही धीर। ज्याची बुद्धि नाही स्थिर॥

तुका म्हणे पोटी। भाव आणिक जया ओठी॥ मोकाशी, ज्याची बुद्धी स्थिर नसते त्याचे बोलणे क्षणोक्षणी बदलते. त्याच्या हृदयात एक भाव असतो, ओठांवर दुसराच.’’

मी ओरडलो, ‘‘परब, तुमच्या जिभेवर तुकोबा आहेत, पण मनात मंबाजी आहे. मधुमेही माणसाविषयी तुमच्या मनात करुणा नाही.’’

‘‘थांबा, मोकाशी स्वत:ला आवरा. गोड खाण्याचे कमी करा हे मी तुम्हाला सांगतच नाही. तुम्ही गोड खाणे थांबवणार नाही हे मला माहीत आहे. सांगून उपयोग काय? जीभ सरळ बोलण्यासाठी वापरा, तिरकस, लागट बोलणे सोडा हे मला सांगायचे आहे. गोड एक वेळ बोलू नका, पण कडू टाळा आणि शेवटचा शब्द आपलाच असायला हवा हा अट्टहास सोडा.’’ ओकांनी खुलासा केला.

मी नम्रपणे म्हणालो, ‘‘ओक, बारा महिने, तीनशे पासष्ट दिवस मी तर्कशुद्ध व स्पष्ट बोलतो. मी गुळमुळीत बोलत नाही. मी हजरजबाबी असल्याने ताबडतोब उत्तर देतो. यामुळे माझ्याविषयी निर्थक गैरसमज पसरले आहेत.’’

परब म्हणाले, ‘‘ओक, तुम्ही सरळ पुरावेच सादर करा. पाप मोकाशींच्या पदरात बांधा. मोकाशी, शेवटी तुकोबांचे शब्द ध्यानी धरा. ‘ऐसी जिव्हा निकी। विठ्ठल विठ्ठल का न घोकी॥ गुंफोनि चावटी। तेथे कोणे लाभ भेटी॥ मोकाशी, देवाने चांगली जीभ दिली आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणा. चावटपणाचे शब्द बोलून, तुम्हांला काय लाभ होतो?’’

मी शांतपणे म्हणालो, ‘‘तुम्हा दोघा मित्रांचे न्यायालय अद्भुत आहे! मी लागट, तिरकस जिव्हारी लागणारे बोलतो असा आरोप तुम्ही करणार, विठ्ठल-विठ्ठल म्हणण्याची शिक्षाही मला ठोठावून मोकळे होणार. वा! मी कधीही वावगे बोलतच नाही. पुरावे द्या.’’

– ओक पुरावे देऊ लागले, ‘‘चार दिवसांपूर्वी परब व मी तुमच्या घरी आलो होतो. बाहेरून फोन आला. तुम्ही फोन घेतलात. वहिनींच्या मैत्रिणीचा फोन होता. तुम्ही म्हणालात, ‘थांबा. मी तिला फोन देतो.’ त्यानंतर तुम्ही वहिनींना काय म्हणालात, ते आम्ही दोघांनी ऐकले. तुम्ही म्हणालात, ‘घे. तुझा फोन आहे. तासन्तास, तुझी एका बाजूची बडबड ऐकायला उत्सुक असलेली तुझी ही सोशीक मैत्रीण कोण हे तू मला नंतर सांग.’’

परब म्हणाले, ‘‘वहिनी सरळ आहेत, समंजस आहेत म्हणून त्या काही बोलल्या नाहीत. पण त्यांचा चेहरा बोलला. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव तुमच्या कौतुकाचा नक्कीच नव्हता.’’

ओक दुसरा प्रसंग सांगू लागले, ‘‘आपल्या ज्येष्ठांच्या मंडळात, आपणा वृद्धांकरिता तीन गायक व एक निवेदिका यांनी गाण्यांचा कार्यक्रम विनामूल्य सादर केला. त्या कार्यक्रमात, निवेदिका थोडे जास्त बोलल्या. कार्यक्रम संपल्यावर, तुम्ही निवेदिकेजवळ जाऊन आगाऊपणे काय बोललात? तसे बोलायची गरज होती?’’

मला माझे बोलणे आठवले. मला हसू आले. मी निष्पापपणे म्हणालो, ‘‘मी त्या निवेदिकेची स्तुती केली, तिला दाद दिली. मी म्हणालो, ‘तुमचे निवेदन रसाळ होते. हा कार्यक्रम पुन्हा ठेवायला हवा. बरोबरचे तीन गायक-गायिका नकोतच! तुम्ही एकटय़ाच या, तुमच्या निवेदनात गाण्यांचा अडथळा नको.’ यात माझे काय चुकले?’’

परबांनी माझ्याकडे पाहत विठ्ठल, विठ्ठल म्हणत सुनावले, ‘‘मोकाशी, खरे व भुसारी हे निरलस कार्यकर्ते खटपट करून कार्यक्रम घडवून आणतात. तुम्ही असे काही तरी अशिष्ट बोलता! आपल्या मंडळात उद्या कोण येईल? तुकोबा सांगतात, ‘न ये वाचे अनुचित वाणी। नसो मनी कुडी बुद्धी॥’ अयोग्य बोलू नका, मनात वाईट विचार नसावा.’’

‘‘मंडळात एक तरुण वक्ता आला होता. त्याने ‘भारताची परराष्ट्रनीती’ या विषयावर अभ्यासपूर्ण व अस्खलित भाषण दिले. आपण सर्वानी त्याचे कौतुकही केले. त्या तरुण वक्त्याला दुर्बुद्धी सुचली. त्याने विचारले, ‘मी तासन्तास घडाघडा बोलू शकतो. पण बोलताना, हातांचा वापर, हालचाल कशी करावी हे मला सुचत नाही.’ मोकाशी, यावर तुम्ही वक्त्याला काय सुचवलेत?’’

जे बोलावयास नको होते, ते मी बोलून गेलो होतो! खरे व भुसारी यांनी तेव्हा सर्वासमोर माझी झडती घेतली होती. मी आगाऊपणे म्हणालो होतो, ‘‘हात स्वत:च्या तोंडावर ठेवावेत.’’ आताही मी मान खाली घातली.

ओक म्हणाले, ‘‘मोकाशी, स्वत:ला सुधारा. कुचाळकीचे शब्द उच्चारणे सोपे आहे. व्यासपीठावर चढा व व्याख्यान द्या. मग वक्ता होणे किती अवघड आहे हे समजेल. म्हंटलेच आहे, ‘शतेषु जायते शूर: सहस्रे षु च पण्डित:। वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा॥’ मोकाशी, शंभरात एखादाच शूर निघतो, हजारात एखादाच शहाणा, दहा हजारांत एखादाच वक्ता निपजतो, आणि दाता? एवढय़ा मोठय़ा संख्येतही एक दाता सापडेल की नाही याची वानवा आहे.’’

परबांनी माझे कान उपटण्याकरिता तुकोबांचा आधार घेतला, ‘‘मोकाशी, तुम्ही शब्द जपून वापरा. तुकोबा म्हणतात, ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू।। शब्दाचि आमच्या जीवाचे जीवन। शब्द वाटू धन जनलोका॥ तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्देचि गौरव पूजा करू॥’’ मोकाशी, तुम्ही वापरता ते शब्द रत्ने आहेत? तुमचे शब्द देव आहेत? मोकाशी, स्वत:ला सुधारा.’’

परब व ओक या मित्रांनी पुराव्यासह मला पकडल्यावर मी नाइलाजाने म्हणालो, ‘‘माझ्या बोलण्यात किरकोळ चुका झाल्या हे मी कबूल करतो. शेवटी चंद्रावरही कलंक आहे! ओक, तुम्ही, ‘दाता भवति वा न वा’ असे म्हणालात ना? चला, मी आज तुम्हाला कर्ण काय ते दाखवतो. आजपासून मी तुम्हाला ओळीने दोन दिवस चहा पाजतो! चैन करा. सहा रुपयांचा कटिंगचा चहा नाही, पूर्ण कप घ्या.’’

परब व ओक यांचे पुतळेच झाले. ‘भवति वा न वा’ या श्रेणीतील माझा कर्णावतार पाहून ते थक्क झाले असणार!

भा.ल. महाबळ

chaturang@expressindia.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Choose your words more carefully in speaking

ताज्या बातम्या