आम्ही टीव्हीसमोरचे आजोबा

‘‘टीव्हीवरच्या जाहिरातींनी उच्छाद मांडला आहे.’’ परबांनी उतरलेलं तोंड उघडलं.

‘‘टीव्हीवरच्या जाहिरातींनी उच्छाद मांडला आहे.’’ परबांनी उतरलेलं तोंड उघडलं.

‘‘आँ! मला तर कार्यक्रमांपेक्षा जाहिरातीच आवडतात.’’ ओक म्हणाले.

‘‘मी परबांशी सहमत आहे.‘एक गोळी, पोट टकाटक’ या बद्धकोष्ठावरच्या जाहिरातीत आवडण्याजोगं आहे काय?हा! ती जाहिरात ढोलढमाल पुरुषानं केलेली दाखवण्यापेक्षा, नीटनेटक्या, सडपातळ, झुळझुळीत पातळातील आकर्षक आजीवर चित्रित करायला हवी होती. हसऱ्या आजी, जाडय़ा आजोबांना गोळी देताना, प्रेमानं म्हणतात, ‘घ्या, एक गोळी घ्या. तुमचंही पोट टकाटक होईल.’’ मी परबांना पाठिंबा दिला; वरती जाहिरात आकर्षक कशी करावी याबाबत जाहिरात कंपनीला अनाहूत सल्ला दिला.

‘‘मोकाशी, पण या जाहिराती पंचाऐंशी वर्षांच्या तुम्हाआम्हा वृद्धांना लागू पडत नाहीत. या वयात मुळात भूकच लागत नाही, ‘पोट टकाटक’ गोळ्यांचा आपल्याला उपयोग काय?रात्री एक गोळी घेण्याइतपतही भूक आपल्या पोटात नसते! त्यापेक्षा, ‘एक गोळी तोंडात टाका, पोटातूनकावळे मारतील हाका.’ अशा भूक निर्माण करणाऱ्या गोळ्यांची व ती गोळी सुहास्य वदनाने देणाऱ्या आजी दाखवणाऱ्या जाहिरातीची गरज आहे.’’ ओकांनी, परब व मी यांच्यात, उत्तम समन्वय साधला.

‘‘मी खोकल्यावरची, जाहिरात दाखवलेली कोणती तरी गोळी तोंडात टाकली, वर पाणी प्यालो. असा ठसका लागला की सांगता सोय नाही! गोळी अन्ननलिकेत अडकून पडली असणार! मग मी माझ्या बुद्धीनं, चार मोठे चमचे मध चाटला, तेव्हा बरं वाटलं.’’ परबांनी स्वानुभवनकथन केलं.

मी उपदेश केला, ‘‘यापुढं मध विकत आणू नका, तो चाटूही नका. त्याऐवजी, गुळाचा मोठा खडा घ्या, तो बोटांनी चुरडा, त्यात दोन मोठे चमचे घट्ट तूप टाका. हे मिश्रण चाटा.’’ माझी ही ‘मधकृती’ मस्त, स्वस्त व माझ्या कंजूष स्वभावाला साजेशी आहे.

‘‘मोकाशी, काही तरी काय सांगता?मध तो मध.’’ परब बोलले.

‘‘परब, मोकाशी म्हणतात ते एका परीनं बरोबर आहे. भेसळीच्या खोटय़ा मधापेक्षा मोकाशींचा ‘गूळतूप मध’ बरा. परब, मध हा मानवनिर्मित नाही, तो मधमाशा तयार करतात. भेसळ करण्याची लबाडी मधमाशा अजून तरी माणसापासून शिकल्या नाहीत! उलट त्या भेसळ करणाऱ्या माणसाच्या विरुद्ध आहेत. म्हणून तर त्या माणसाला चावतात. खरा मध, मधमाशाच तयार करतात. मधमाशा पाळून, अस्सल मध मिळवता येतो, नाही असं नाही. पण या नैसर्गिक क्रियेला वेळ लागतो. हा जमाना इन्स्टंटचा आहे. मधमाशांना एवढा वेळ द्यायला माणसाकडं वेळ कुठं आहे? म्हणून माणूस, खऱ्या मधात, काकवी व इतर पदार्थ मिसळून भेसळीचं मध तयार करतात. ’’ ओकांनी मुद्दा विस्ताराने स्पष्ट केला.

ओकांच्या उत्तरातील लांबीमुळे, परब व मी यांनी होकारार्थी माना हलवल्या. परब पुन्हा मूळच्या त्यांच्या जाहिरात या विषयावर आले, ‘‘आपण तिघे एकाबाबतीत नशीबवान आहोत! डोक्यावरच्या टक्कलावर केस उगवून देण्याच्या जाहिरातींना आपण मुळीच बळी पडत नाही.’’

‘‘खरं आहे. टक्कलावर नवे केस उगवतील? मला खरं वाटत नाही. आणि ट्रायल घ्यावी असा विचार मनात आणेल कोण? खर्च किती तर ५०-६० हजार रुपये! आणि समजा, धाडसाने एवढे पैसे खर्च केले, आपल्या टक्कलावर काळेभोर केस आले व आपल्या बायकांनी अकाली तरुण झालेला नवरा नकोम्हणून आपल्याला टाकलं तर? दोन वेळच्या अन्नाला महाग होऊन बसू! वर बाहेर कोणी भीकही घालणार नाही. आपल्या काळ्याभोर केसाकडं पाहून, कोणीही म्हणणारच की, ‘चांगले तरुण दिसता, भीक काय मागता? काम करा.’’ मी म्हणालो. ओकांनी भर घातली, ‘‘खऱ्या तरुणपणी, पूर्ण डोके भरून खरे काळे केस असताना, आपण कामाचे काय दिवे लावले हे आपल्या मनाला माहीत आहेच!’’

‘‘टीव्हीवर चुकीच्या, लबाड, फसव्या व गैरजाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. या जाहिराती बंद कराव्यात.’’ परब म्हणाले.

खरं तर मी ही जाहिरातींच्या विरुद्धच आहे, पण जाहिरातींपेक्षा मी तुकोबाभक्त परबांच्या जास्त विरोधात आहे. म्हणून मी जाहिरातींच्या बाजूने सूर लावला, ‘‘परब, देशाचा विकास व्हायला हवा ना? कारखाने व उद्योग वाढायला हवेत, माल खपायला हवा. त्याकरता जाहिरात हवी. जाहिरात म्हणजे विक्री जोरात व्हावी यासाठी पिटलेला डंका आहे. मोटार चालण्यासाठी इंजिन लागतं. जाहिरात हे उद्योगधंद्याचं इंजिन आहे. नवा, चांगला माल बाजारात आला आहे हे जाहिरात केल्याशिवाय ग्राहकांना कळणार कसं?’’

परब पुटपुटले, ‘‘नवा, चांगला माल? चांगला माल? विठ्ठल! विठ्ठल! मोकाशी, हिणकस, दर्जा नसलेल्या मालाची व माणसांची पण, फसवी व खोटी जाहिरातबाजी बोकाळली आहे. ती मला छळते. तुकोबा म्हणतात, ‘हिरे, दगड एक खाणीं। कैचे विजातीला पाणी॥ तुका म्हणे शिरीं। एक, एकाची पायरी॥’ हिरे व दगड एकाच खाणीत जन्म पावतात. ‘मी हिऱ्यांच्या खाणीतच जन्माला आलो आहे’ अशी जाहिरात दगडाने खुशाल करावी, पण हिऱ्याला जे तेज आहे, पाणी आहे ते वेगळ्या जातीला म्हणजे दगडाला थोडेच प्राप्त होणार आहे?शेवटी हिऱ्याला मस्तकावर स्थान मिळते, दगडाला पायरी बनण्याकरता मुकाट जावे लागते. जाहिरातीच्या जिवावर किती काळ जगाला फसवाल?’’

ओक म्हणाले, ‘‘परब, तुमचं म्हणणं बरोबर आहे. ‘काक: कृष्ण: पिक: कृष्ण: तु भेद: पिककाकयो:। वसन्तसमये प्राप्ते काक: काक: पिक: पिक:॥’’ मी ओकांकडे पाहत राहिलो. माझ्याकरता ओकांना मराठी या राजभाषेत यावंच लागलं. ‘‘ऐका, मोकाशी, ऐका. कावळा व कोकीळ दोघेही रंगाने काळेच, दुरून दोघांतील फरक कळून येणार नाही. पण वसंत ऋ तू आला की मंजूळ कुहू कुहू करणारा कोकीळ व कर्कश, काव काव करणारा यांच्यातील फरक सहज उघड होतो.’’ ओकांनी कावळ्याच्या कर्कश आवाजात मला अर्थ सांगितला.

‘‘पण ओक, वसंत ऋ तू येईपर्यंतच्या काळात काय?मधल्या काळात, काळ्या रंगाच्या जोरावर, कावळे आपल्याला, कोकीळ म्हणून खपवतील! त्याचं काय?’’ हा प्रश्न मी मनातच उच्चारला.

परब व ओक यांची माझ्या विरुद्ध युती झालेली होती. त्यांच्याविरुद्ध मी एकटा काय टिकणार? पण एक नक्की, तुकोबांच्या हिरा-दगडाचा संदर्भ, ओकांची कावळा-कोकीळ यावरची अन्योक्ती यावर जाहिरातबाजी शंभर टक्के मात करेल. जाहिरातबाजी अमर रहे, अजिंक्य रहे. हे मी मराठीत मांडतो आहे. सत्य मराठीत मांडलं की ते असत्य थोडंच होतं?

भा.ल. महाबळ

chaturang@expressindia.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वार्धक्यरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Senior citizen in indian television advertisement

ताज्या बातम्या