दहाएक दिवसांपूर्वी शॉर्ट सर्किटमुळं माझं घर पेटलं. ते पेटलं म्हणेपर्यंत, शेजारचं बाबूचंही घर समोरून पेटलं. दोन्ही घरं समोरून पेटलेली पाहिल्यावर, बाबू दु:खानं व्याकूळ झाला व दोन्ही घरांसमोरच्या रस्त्यावर बेशुद्ध पडला आणि सारं काही कायमचं विसरला.. एकाकी पडला.

‘‘महालेंच्या घरी जायला हवं. गावाकडच्या मोठय़ा बंधूंना ते उपचारासाठी घेऊन आले आहेत.’’ ओकांनी सुचवलं.

‘‘महालेंना मोठे बंधू आहेत? मी प्रथमच ऐकतो आहे.’’ परब म्हणाले.

‘‘ते गावी होते. पत्नी – मुलगा – सून आपल्याला सोडून गेले म्हणून त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे. महाले त्यांना घेऊन आले.’’ ओकांनी महिती पुरवली.

मी गलबललो. म्हातारपणी काय किंवा तरुणपणी काय, पत्नी-मुलगा-सून कायमचे सोडून गेल्यावर आपण एकटे स्वत:ला कसे काय सावरणार? बायको मुलांसकट फक्त महिनाभर माहेरी गेली तर माझी दुर्दशा उडे. चहा घेतला रे घेतला की हॉटेलवाला पैसे मागतो! बरं, घरी आपला आपण चहा करावा तर ते काम सोपे नाही. एक चहा करायचा तर दहा वस्तू व चार व्यवधानं सांभाळावी लागतात. बरशेनची शेगडी, लायटर, पातेलं, गाळणं, चमचे, दूध, पाणी, सांडशी, चहा, साखर, कपबशी या साऱ्यांना एकत्र आणायचं, वरती शेगडीची योग्य वेळी पेटवापेटवी व विझवाविझवी करणं आलं. सांडासांड, लवंडा-लवंड होतेच होते. कळस म्हणजे आपला चहा भिक्कार होतो. बायकोनं केलेल्या उत्तम चहात मी, चार नसलेल्या खोडय़ा सहज काढू शकतो; पण स्वत: केलेला भिक्कारडा चहा मुकाट प्यावा लागतो! विचारान्ती मी कळवळून म्हणालो, ‘‘आपण गेलंच पाहिजे. मी चार

फळं विकत आणतो.’’ ओक व परब यांच्याकडून हिशेबानं त्यांच्या हिश्शाचे पैसे मागायचे नाहीत हे मी नक्की केलं. मी चांगलाच गलबललो होतो!

आम्ही महालेंच्या घरी पोहोचलो. ओक व परब यांनी महालेंचे हात हातात घेतले. जास्त आपुलकी दाखवण्याकरिता मी महालेंना मिठी मारली. महालेंचे मोठे बंधू बाबूराव कॉटवर डोळे मिटून पडले होते. त्यांच्या अंगावर दहा-बारा ठिकाणी पट्टय़ा चिकटवल्या होत्या. महालेंनी सांगायला प्रारंभ केला, ‘‘हे माझे मोठे बंधू बाबूराव. घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. बाबूराव कसेबसे बाहेर पडले. खूप भाजले आहेत. दोन्ही घरं समोरून पूर्ण पेटली.’’

बाबूराव ओरडले, ‘‘शंभू, मी भाजलो हे सांगू नको. मी पाहता पाहता ठीक होईन. सुलभा, मोहन, मानसी, श्री हे सारे त्या आगीत जळाले. हे सांग. तुझ्या घराला प्रथम आग लागली हे सांग. तुझं घर वाचवायला मी गेलो. मग माझंही घर पेटलं. माझी पत्नी, मुलगा, सून, नातू माझ्या डोळ्यांसमोर जळाली. याला तू जबाबदार आहेस.’’

शंभुराव महालेंनी माघार घेतली. ते म्हणाले, ‘‘बाबू, सारी चूक माझीच आहे. याला मीच जबाबदार आहे.’’

‘‘शंभू, घरं जळाली याचं मला दु:ख नाही. मी समर्थ आहे. दोघांची घरं मी पुन्हा उभारीन; पण गधडय़ा, माझ्या बायकोचं, मुलगा, सून, नातवंडं यांचं काय? त्यांना तू परत आणशील?’’ डोळे मिटलेल्या बाबूरावांनी धारदार आवाजात विचारलं.

महाले म्हणाले, ‘‘मी प्रयत्न करीन.’’

बाबूराव कडाडले, ‘‘मूर्ख! महामूर्ख! आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्यांना तू परत आणणार? शंभू, मृत्यू हा शेवट असतो. या जन्मी मी आता एकटा पडलो रे!’’

‘‘बाबू, तू एकटा नाहीस. मी तुला एकटा पडू देणार नाही. वहिनींचा फोन आल्या आल्या मी तुला ताबडतोब उपचाराकरिता इकडं घेऊन आलो ना?

‘‘वहिनींचा फोन आला? सुलभा आगीत जळाली. ती कशी फोन करेल? गाढवासारखं बोलू नकोस. गेले कित्येक दिवस, ‘आगीत कोणी जळालं नाही, सर्व सुखरूप आहेत’ हेच खोटं मी ऐकतो आहे.’’

महालेंनी माघार घेतली, ‘‘नाही, सुलभावहिनी नाहीत, समोरच्या कट्टींच्या सुनेनं फोन केला.’’

‘‘मग तसं नीट बोलता येत नाही? मूर्ख, महामूर्ख! बरं, तुझे ते डॉक्टर येतात व माझ्याशी गप्पा मारतात. अवांतर प्रश्नच जास्त विचारतात. त्यांना सांग की, अंगावरच्या पट्टय़ा बदला व जा. मला त्याच त्याच आगीच्या प्रसंगावर पुन:पुन्हा बोलायचं नाही. दोन्ही घरं समोरून पूर्ण पेटलेली पाहिली व मी बेशुद्ध पडलो. आता मी झोपतो, दमलो.’’ बाबूराव बोलायचे थांबले. त्यांचे डोळे मुळातच मिटलेले होते.

स्वयंपाकघरातून एक बाई आल्या. त्यांनी खुणेनं सांगितलं, ‘आता मी इथं थांबते. तुम्ही तुमच्या मित्रांना घेऊन जेवणाच्या खोलीत जा.’

त्या बाईंनी बाबूरावांच्या कपाळावरचा आपला हात थोपटत ठेवला. आम्ही उठलो. महाले सांगू लागले, ‘‘आई व आम्ही दोघं भाऊ. मोठा बाबू, मी धाकटा शंभू. बाबू माझ्याहून पाच वर्षांनी मोठा. मी दहा वर्षांचा असताना आमचे वडील वारले. बाबूनं मॅट्रिक झाल्या झाल्या शाळेत नोकरी धरली. नोकरी करता करता तो बीए झाला. इंग्रजी व गणित हे दोन विषय त्याचे हातखंडा होते. त्यानं शिकवण्या करून खूप पैसे मिळवले. त्यानंच मला शिकवलं. मुंबईत ब्लॉक घेताना बाबूनंच मला मदत केली. गावी आमचं दोन खोल्यांचं वडिलार्जित घर होतं. ते घर पाडून बाबूनं तिथं शेजारी शेजारी दोन प्रशस्त घरं बांधली. एक बाबूचं, एक माझं. बाबू म्हणतो म्हणून माझं. त्या घराकरिता मी एक पैसाही खर्च केला नाही. घरांचे कर, दुरुस्त्या सर्व बाबूच पाहतो. अधूनमधून कमीजास्त पाहुणे आले तर बाबू माझं घर वापरतो व पत्रानं मला कळवतो, ‘शंभू, तुझ्या घराचा मला खूप उपयोग झाला.’ बाबूचा माझ्यावर जीव आहे. आपल्या धाकटय़ा भावाचं घर शेजारी आहे याचा त्याला आनंद वाटतो. दहा-एक दिवसांपूर्वी, रात्री दीड वाजता शॉर्ट सर्किटमुळं माझं घर पेटलं. बाबूला जळल्याचा वास आला. तो आपल्या घरातून बाहेर पडला, कुलूप उघडून शेजारच्या माझ्या घरात शिरला. दोन्ही घरे, गावाकडच्या जुन्या पद्धतीची, लाकडी, खांब, तुळया, वासे अशी जास्त करून लाकडाचा वापर केलेली. माझं घर पेटलं म्हणेपर्यंत, शेजारचं बाबूचंही घर समोरून पेटलं. दोन्ही घरं समोरून पेटलेली पाहिल्यावर, बाबू दु:खानं व्याकूळ झाला व रस्त्यावर बेशुद्ध पडला. त्याला भाजलंही होतं; पण वहिनी, पुतण्या वगैरे सारे जळत्या घरात अडकले; मात्र ते सारे घराच्या परसूकडच्या मागच्या दरवाजातून बाहेर पडले.’’

ओकांनी विचारलं, ‘‘म्हणजे बाबूरावांच्या पत्नी, मुलगा, सून, नातू हे सर्व सुखरूप आहेत? जिवंत आहेत?’’

‘‘पूर्णपणे खुशाल आहेत, पण बाबूच्या मेंदूनं ते आगीत जळाले हेच गृहीत धरलं आहे. ‘मी बघते, तुम्ही बाहेर जा’ असं ज्यांनी आपल्याला सांगितलं त्या माझ्या सुलभा वहिनी, बाबूच्या पत्नी. बाबूच्या मेंदूवर उपचार करून त्याला जगात परत आणण्याकरिता मी बाबूला व वहिनींना मुंबईत घेऊन आलो आहे. बाबू मला म्हणजे शंभू या त्याच्या धाकटय़ा भावाला छान ओळखतो. डॉक्टर सत्नीकर हे मानसोपचारतज्ज्ञ आहेत. ते रोज येतात.’’

मी विचारलं, ‘‘म्हणजे बाबूरावांच्या मेंदूला पत्नी, मुलगा, सून हे सारे सुखरूप आहेत हे अद्याप समजलेलंच नाही. ते त्यांच्या बाबतीत असेच एकाकी राहिले तर?’’

‘‘बाबू मला वडिलांप्रमाणे आहे. त्यांच्या तोंडून मी, ‘मूर्ख, महामूर्ख’ हे शब्द जन्मभर आनंदानं ऐकेन. सेवेकरिता अनोळखी सुलभावहिनी, या नर्स आहेतच.’’

परबांनी महालेंना थोपटलं. ते म्हणाले, ‘‘महाले, सर्व नीट होईल. ‘विठ्ठल, विठ्ठल’ म्हणत राहा.’’

बरोबर आणलेली फळं मी महालेंच्या हाती दिली; खरं तर मला ती त्यांच्या पायांवर वाहायची होती.

भा.ल. महाबळ chaturang@expressindia.com