वृषाली मगदूम
किती तरी दिवसांनी मला भेटायला आलेल्या मितवा आणि निमिषने नेहमीप्रमाणे माझ्या हातच्या जेवणाची फर्माईश केली. आईकडून जेवढी सेवा करून घेता येईल तेवढी ते करून घेत होतेच. ‘मुलं आपल्याशी साधं नीट बोलतही नाहीत…’ याने माझा जीव तुटत होता, पण ते आले होते म्हणून मोठ्या प्रेमाने त्यांच्यासाठी सर्व काही केलं. पण अखेर इथं येण्यामागचं सत्य बाहेर पडलंच…

मी कळवतेच लवकर तुम्हाला,’’ असं मुलांना सांगितल्यावर मुलं आपापल्या घरी मार्गस्थ झाली…

त्यांना निरोप दिल्यावर वसुधा ओसरीतील झोपाळ्यावर झोके घेत बसून राहिली. नीरव शांतता आतपर्यंत झिरपत गेली… मन उदास आहे. नात्यांची चिरफाड तिचं मन विदीर्ण करतंय. आपली नाळ, आपले पोटचे गोळे असे असावेत, या विचाराने तिच्या मनात काहूर माजलंय…

मितवा व निमिष माझी दोन्ही मुलं अकस्मातच घरी आले. मुलांना घेऊन आले नाहीत म्हणून मी खट्टू झाले, मुलांची असंख्य व्यवधानं दोघंही कोरडेपणानं सांगत राहिले. नातवंडांचं नितळ, निव्र्याज प्रेम, ओलावा, त्यांचं मला बिलगणं, माझ्याकडून लाड करून घेणं याला मी किती आसुसलेली असते हे दोघांनाही माहीत आहे. मितवा व निमिष सोफ्यावर बसून त्यांच्या नोकरीतील तणावाविषयी बोलत होते. मी पोहे व चहा बनवत होते. मितवा एकदाही स्वयंपाकघरात फिरकली नाही. दोघांनीही मी दिलेला नाष्टा पाहुण्यांसारखा खाल्ला.

‘एआयमुळे लोकांच्या नोकरींवर गंडांतर आलं आहे का?’ मी संभाषणात भाग घ्यायचा म्हणून बोलले. ‘‘असं काही नाही…!’’ मला यातलं काय कळतं अशा तुच्छतेनं माझ्याकडे पाहत मितवा म्हणाली. आमच्या कुटुंबातले स्नेही कानिटकरांकडे त्यांना जायचं असल्याचं दोघांनी मला सांगितलं. ‘येणार का?’ असं एकदाही त्यांनी विचारलं नाही. मी त्यांच्या खिजगणतीत नव्हते. मला घरी थांबून त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करायचा होता. पार्वती आल्यानंतर मी व पार्वतीने निगुतीनं पोरांच्या आवडीचा स्वयंपाक बनवला. पार्वती गेल्यावर मी दमून सोफ्यावर टेकले, मोठमोठ्याने आवाज करीत जोरात हसत मितवा व निमिष घरात शिरले. मागच्याच वर्षी प्रॉपर्टीवरून खडाजंगी होऊन ते एकमेकांचं तोंडही बघत नव्हते, हे सांगूनही कोणाला खरंही वाटलं नसतं.

हेही वाचा

‘‘आई भूक लागली आहे…’’ म्हणतच निमिष आत आला. मी टेबलावर मांडामांड करीत होते. मितवा सोफ्यावर पाय पसरून बसली होती. ‘मुलगे काम करत नाहीत…’ म्हणणार्‍या निमिषची मदत अपेक्षितच नव्हती. दोघांनी जेवणावर ताव मारला. माझ्या स्वयंपाकाचं कौतुक करत राहिले. असं जेवण कित्येक दिवसात मिळालं नाही म्हणत राहिले, मी बापडी इतक्या प्रेमाच्या शिंतोड्यानेही सुखावत होते. आईचं आतडं म्हणतात ते हेच असेल का? जेवणानंतर ते दोघेही आपापल्या बेडरूममध्ये जाऊन झोपले. मीही खूप दमले होते. दमून माझा डोळा लागला. थोड्या वेळानं जाग आली. झाडांना पाणी घालायला मी मागच्या आवारात आले. निमिष व मितवा कधी मागे येऊन उभे राहिले ते कळलंच नाही. ‘‘आई किती सुंदर झाडं वाढली आहेत.’’

‘‘एवढं मोठं आवारही आईने एकदम लख्ख ठेवलं आहे,’’ निमिष. ‘‘अरे अनिकेत, पार्वती व भावना मनापासून सगळं करतात, आता या वयात मला कुठे झेपतं! बंगल्यातला काही भाग तर बंदच ठेवला आहे.’’

‘‘आम्हालाही तेच म्हणायचं आहे,’’ बोलत बोलत आम्ही घरात परतलो. ‘‘आई तुझ्या हातचा दुधाळ भरपूर साखर व चहापूड घातलेला घट्ट चहा प्यायचा आहे.’’ मितवाने फर्माईश केली. चहा घेता घेता प्रथमच समोरासमोर निवांत तिघं बसलो होतो. दोघांविषयीची साशंकता मनाला अस्वस्थ करत होती. मीच संभाषणाला तोंड फोडलं. ‘‘कानिटकर भेटले का रे? काय म्हणाले?’’ त्यावर मितवा लगेच म्हणाली, ‘‘तेच सांगायचं आहे तुला, कानिटकरांनी बंगला विकायला काढला आहे, उदय पुण्यात, महेश बंगळूरुला तर गौरी अमेरिकेत आहे. त्यामुळे पुण्यात एक फ्लॅट घेऊन दोघं राहणार आहेत व बंगला विकून आलेले पैसे तिघांमध्ये वाटणार आहेत. आत्ताच सर्व व्यवस्थित निरवानिरव केली, की पश्चात मुलांना काही समस्या नको असं म्हणत होते.’’

‘‘मितवा, आमच्यासारखेच वसईत सारं आयुष्य काढलेले कानिटकर असं उठून दुसरीकडे रुजणार का?’’ माझं वाक्य पूर्ण होतंय तोवर मितवा लगेच म्हणाली, ‘‘न रुजायला काय झालं? इतक्या लांब यायला मुलांनाही जमायला हवं ना? आमचंच बघ मी पनवेलला, हा सांगलीला. घर, मुलं, ताणाच्या नोकर्‍या. इच्छा असूनही तुला भेटता येत नाही.’’

‘‘आणि तुमच्या व्यग्र नोकरीमुळे फोनवरही आपल्याला बोलता येत नाही,’’ मी तिला म्हटलं. करोना साथीच्या काळामध्ये भयंकर परिस्थितीत यांच्या वडिलांचं, प्रकाशचं निधन झालं. इतक्या भयावह वातावरणात मीच मुलांना येऊ नका म्हणून सांगितलं, वातावरण निवळल्यानंतर सारे आले. माझं असह्य एकटेपण, नैराश्य पाहणार्‍या दाते काकूंनी मुलांना मला थोडे दिवस त्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी सुचवलं. भरपूर खलबतं होऊन निमिषबरोबर मी गेले, पण निमिषच्या बायकोचा व्यवहार पाहून थिजून गेले. माझं घरातलं वावरणं, अस्तित्वही तिला सहन होत नसे. तिची बोचरी नजर मला सहन होत नसे. दोन चिमुकल्या नातवंडांचा सहवास मला शांत करत होता, पण अखेर निमिषने मला पनवेलच्या गाडीत बसवून दिलं. मितवा सासू-सासरे, घर व नोकरी या गराड्यात होती. माझी दखल घेणं तिला गरजेचं वाटत नव्हतं. सासू-सासरे त्यांच्या बेडरूममधून नाश्ता व जेवणापुरतेच बाहेर येत. मी बळेबळेच त्यांच्याबरोबर जेवत असे. मला आश्रितासारखं वाटू लागलं, इथंही सार्‍यांना माझी अडचण वाटते, हे माझ्या लक्षात आलं. थोड्या दिवसांत मितवानंही मला वसईच्या ट्रेनमध्ये बसवून दिलं.

त्यानंतर आत्तापर्यंत आम्ही सारे फक्त नातेवाईकांच्या लग्नात, समारंभात, कार्यक्रमात भेटतो आणि हसून सारं साजरं करतो. अगदी क्वचित बदल म्हणून एक-दोन दिवस हे सर्व वसईत येतात व माझ्या हातून सर्व सेवा करून घेतात. यांना भेटायची माझी ओढच इतकी तीव्र असते की हेही मी सहन करते. आजही आठवतं, प्रकाश गेल्यानंतर नैराश्याच्या गर्तेत असलेली मी मितवा व निमिष यांचे आधाराचे चार शब्द ऐकायला आसुसलेली असायची, पण कधीही फोन केला तरी ते गडबडीत असायचे, कधी मीटिंगमध्ये, कधी बाजारात, कधी नाटकाला तर आणखी कुठे, ‘‘नंतर करते…’’ म्हणणार्‍या मितवाचा क्वचितच नंतर फोन यायचा, केला तरी अतिशय जुजबी चौकशी करायची…

‘‘कुठं लक्ष आहे आई?’’ मितवाच्या प्रश्नानं मी भानावर आले.

‘‘मी व निमिष आज ठरवून तुझ्याशी काही निर्णायक गोष्टी बोलण्यासाठी आलो आहोत. कानिटकरांकडे आम्ही गेलोच, पण इथल्या काही बिल्डरकडेही आम्ही जाऊन आलो. आपल्या बंगल्याची किंमत काढली. कानिटकर दहा कोटी रुपयाला बंगला व आसपासची जागा विकत आहेत. बिल्डरच्या अंदाजानुसार, आपल्याला बंगला व सर्व मोकळी जागा विकून पंधरा कोटी मिळतील. तू इतक्या लांब एकटीनं राहू नये, असं आम्हाला वाटतं, पुण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सोसायटी आम्ही पाहून आलो आहोत, सर्व सुविधांनी युक्त घरच आहे ते. तुझ्या वयाच्या लोकांच्यात तू रमशील, आम्हीही आहोतच. आपण तिथं एक फ्लॅट घेऊ व उरलेले पैसे आम्हाला वाटून दे. आता आम्हा दोघांनाही पैशाची अतिशय गरज आहे. तुझ्या पश्चात मिळून काय फायदा? तोपर्यंत आम्ही ज्येष्ठ नागरिक होऊन जाऊ,’’ असं म्हणत मितवा जोरात हसली.

मी एक शब्दही बोलले नाही, खूप वेळ स्तब्धता होती, ‘‘आई आम्ही वकिलांशी बोललो आहोत, आज तुझी संमती असेल तर पुढची कागदपत्रं लगेच बनवू, लवकर सांग, हे सर्व तुझ्या पश्चात आम्हालाच तर मिळणार आहे ना. आम्ही न भांडता वाटून घेऊ, पण आता वाटणी केलीस तर अधिक सोयीचं आहे.’’ दोघंही म्हणाले. पण मी शांत राहिले. थोड्या वेळाने म्हणाले, ‘‘कळवते लवकरच तुम्हाला.’’ ते सांगितल्यावर ते लगेचच जायला निघाले.

पाठमोर्‍या मुलांना निरोप देत मी घरात शिरले. या मुलांनी एका शब्दानेही त्यांच्या वडिलांच्या पश्चात मी काय करते, कशी राहते याची विचारपूस केली नाही. दोन गाड्या, दोन मोठे फ्लॅट, ऐशआरामात जगणार्‍या यांच्या गरजाचा भस्मासुर पुरवणं माझ्या नीतिमत्तेत बसत नाही. गेली दोन वर्षं मी ‘आमचं घर’ या वृद्धाश्रमात जाते, मला जमेल, झेपेल तशी मदत करते. शेजारीच असलेल्या अनाथ मुलांच्या आश्रमात जाते. त्यांना गोष्टी सांगते. गाणी शिकवते. खूप रमलेय मी तिथं. या टप्प्यावर जीवन सार्थकी लागल्यासारखं वाटतं. वीस वर्षांपूर्वीचा हा वृद्धाश्रम आता मोडकळीस आला आहे. जागा भाड्याची आहे. वर्षा व संदीप या अनाथ मुलांनी एकमेकांना साथ देत त्यांच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी या सामाजिक कामात स्वत:ला झोकून दिलं आहे.

निमिष, मितवाच्या जाण्यानंतर माझं विचारचक्र वेगाने फिरू लागलं, एका आठवड्यात मी दाते, कानिटकर यांची मदत घेत अनेक निर्णय घेतले. माझा बंगला व पूर्ण आवार ‘आमचं घर’ या संस्थेच्या नावावर केलं. मी हयात असेपर्यंत मी इथंच राहणार होते. वर्षा व संदीपला कागदपत्रं दाखवल्यानंतर आनंदाने ते ढसाढसा रडले, माझ्या मिठीत शिरत वर्षा म्हणाली, ‘‘आई पस्तीस अनाथ मुलांना व पंचवीस ज्येष्ठांना आज तुम्ही हक्काचं घर देऊन त्यांची ‘माउली’ झालात…’’

vamagdum@gmail.com