सिद्धी महाजन snmhjn33@gmail.com

जागतिक स्तरावर होणाऱ्या हवामानबदलविषयक परिषदांमध्ये निर्णायक काहीच न घडण्यामागे आहे ते या परिषदांना असणारं बडय़ा खनिज तेल कं पन्यांचं प्रायोजकत्व. याविरोधात आवाज उठवणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी एक चळवळ सुरू के ली. त्याच ‘पोल्युटर्स आऊट’ चळवळीची इसाबेला फलाही ही महत्त्वाची कार्यकर्ती. पर्यावरणाचा हिरवा रंग आता नुसताच समृद्धीचा द्योतक राहिला नसून, आता तो चळवळीचा,  पृथ्वीला वाचवण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या निर्णायक पावलांचा रंग बनला आहे! त्या इसाबेलाची ही कहाणी आजच्या (५ जून) ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्तानं.. 

Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

‘श्वास घुसमटत होते, जीव कासावीस होत होता,पण कोणत्या तरी भयानं माझी वाचा जणू हरवली होती. तेव्हा माझ्या तोंडातून आवाज फुटला नाही, मात्र आता फुटतो आहे. आता जगाला माझा आक्रोश ऐकावाच लागेल!’

न्यूयॉर्क शहरात सुमारे तीन लाखांच्या जनसमुदायासमोर एक १६ वर्षांची मुलगी न घाबरता बोलत होती. तिच्या डोळ्यासमोर राहून राहून तिचं घर येत होतं. तिला आठवत होत्या घुसमटून टाकणाऱ्या रात्री, जेव्हा तिला अजिबात झोप येत नसे, छातीवर सतत कसलं तरी ओझं ठेवल्यासारखं वाटत असे. तिचा दम्याचा त्रास एवढा असह्य़ होई, की रात्री-अपरात्री जाग आल्यावर आपण जणू खोल समुद्रात बुडत आहोत, असं वाटून भीती तिचा कब्जा घेत असे.

ती इसाबेला फलाही. राहाणार इंडियानापोलिस, अमेरिका. शहरातल्या हर्डिंग स्ट्रीट स्टेशन नावाच्या एका कोळशावर चालणाऱ्या विद्युत प्रकल्पाजवळ तिचं घर आहे. इंडियानापोलिस शहरातील एकूण १० विद्युत पुरवठा प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प निव्वळ कोळशावर चालतात. या प्रकल्पांचं बांधकाम गरीब वस्तीच्या जवळपास केलं जातं, कारण तिथून अतिशय कमी विरोध अपेक्षित असतो. कोळसा जळल्यावर सूक्ष्म कण, हानीकारक वायू हवेत विखुरले जातात आणि त्यामुळे हवा प्रदूषित होते. ही प्रदूषित हवा दमा आणि त्यासारख्या अनेक श्वसनविकारांना आमंत्रण देते. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या रासायनिक घटकांमुळे आजूबाजूचे पाण्याचे स्रोत दूषित होतात. हे प्रदूषण मेंदू, हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना अपाय करणारे आजार निर्माण करतंच, पण त्याबरोबरच कर्क रोग आणि क्षयासारख्या व्याधींनाही आमंत्रण देतं. यातून जन्माला येते एक असुरक्षितता, साठून राहाणारी घुसमट, तर कधी इतर समस्या. यातून जाणवते ती  सामाजिक विषमता.

साधा श्वास घेण्यासाठी चाललेली ही धडपड आणि औषधोपचारांसाठी होणारी सामान्य माणसाची परवड इसाबेलाला अस्वस्थ करत होती. तिला याबद्दल काहीतरी करायचं होतं, मात्र आजूबाजूला असलेलं वातावरण तिच्या विचारप्रकृतीला साजेसं नव्हतं. पर्शियन-लॅटिन अशा मिश्र वंशाच्या या कुटुंबाला समाजातला वर्णद्वेष अस्वस्थ करत होता. त्यामुळे अनेक अपमानास्पद प्रसंगही अनुभवावे लागत होते. मनात दाटलेली अस्वस्थता, अनुकूल नसलेली सामाजिक परिस्थिती, या सगळ्या विरोधाभासात ती आपल्या आतल्या आवाजाला जपत होती. जिथे बाकीची मुलं आइस स्केटिंगचा आनंद घेत, तिथे दम लागत असल्यामुळे तिला स्केटिंग फिल्डवरून लवकर माघार घ्यावी लागत असे. अधेमध्ये तिचा जीव घुसमटून जाई आणि टणक बर्फाच्या मैदानावर तिचा इवलासा देह खाली कोसळे.

पण पुन्हा उठून उभी राहिली नाही ती इसाबेला कसली? हायस्कूलमध्ये गेल्यानंतर वयाच्या सोळाव्या वर्षी तिला हवी ती संधी चालून आली. इतकी वर्ष ती जे मांडू पाहात होती, ते व्यक्त करण्यासाठी योग्य असं, जगातील अतिशय मानाचं समजलं जाणारं युनायटेड नेशन्सचं व्यासपीठ तिला खुणावू लागलं. यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. २०१९ मध्ये तिला माद्रिद (स्पेन) इथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामानबदल परिषदेत भाषण करण्याची सुवर्णसंधी तिला मिळाली. ही परिषद हवामानबदलाविरोधात खंबीर उपाययोजना सुचवणारं धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेला बळ देईल, इतिहासाला कलाटणी देणारा तो क्षण असेल, असं तिलाच नव्हे, तर अनेक पर्यावरणप्रेमींना वाटत होतं. यामुळे हवामानबदलासंबंधी जागतिक पातळीवर उचलली जाणारी पावलं अधिक सक्षम होतील असं वाटलं होतं आणि अनेकांच्या आशा उंचावल्या होत्या. पण इसाबेलाचीच नव्हे, तर त्या परिषदेला उपस्थित राहिलेल्या सर्व पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांची घोर निराशा झाली. याचं कारण होतं, स्पेनमधील कारखानदारांनी या परिषदेतल्या  या चर्चासत्राचं स्वीकारलेलं अधिकृत प्रायोजकत्व. ब्रिटिश पेट्रोलियम आणि शेलसारख्या जगभरातील मातबर खनिज तेल कंपन्यांनी आपले १८०० हून अधिक प्रतिनिधी पाठवून त्या परिषदेतील निर्णयप्रक्रियेवर जणू अघोषित सत्ता दाखल केली.

इसाबेला आणि तिच्याबरोबर असलेल्या जवळपास ३०० सहभागी सदस्यांनी याविरोधात आवाज उठवण्याचा निश्चय केला. ‘‘जीवाश्म

इंधन उद्योगांच्या बडय़ाबडय़ा धेंडांनी काय हवामानबदलासंबंधी निर्णय घ्यायचे? त्यांनी त्यांना हवे तसे कायदे वाकवायचे? जागतिक आस्थापना, मोठय़ा बँका, विद्यापीठं आणि निर्णय घेणारी सरकारं या सर्वाचेच इंधन उद्योगांशी छुपे अथवा उघड असो, लागेबांधे आहेतच. मग यात सामान्य माणसाला, प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढीमुळे ओढवणाऱ्या आपत्तींमध्ये भरडल्या जाणाऱ्या समाजातील मोठय़ा घटकाला कोणतं स्थान आहे? त्याच्या मताला काही किंमत आहे की नाही? हवामानबदलाच्या संकटाच्या मुळाशी पोहोचण्यासाठी, त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यात मोठे अडथळे येत आहेत. याबद्दल अतिशय कमी प्रमाणात जागृती होत आहे. याचं प्राथमिक कारण दुसरंतिसरं कोणतंही नसून हेच आहे.’’ इसाबेलानं ‘टीन व्होग’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हे ठासून सांगितलं होतं.

यानंतर इसाबेलानं तिच्यासारखं काम करणाऱ्या हेलेना गुलिंगा आणि आयिशा सिद्दिका या दोघींबरोबर मिळून २०२० च्या सुरुवातीला ‘पॉल्युटर्स आउट’ या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. पॉल्युटर्स आऊट ही चळवळ सर्वार्थानं वेगळी आणि क्रांतिकारी आहे. हवामानबदलावर मुळमुळीत उपाय योजणाऱ्या, निर्णय प्रक्रिया सांभाळणाऱ्या भांडवलशाही असामींना ही तरुण पिढीनं लगावलेली सणसणीत चपराक आहे.

‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेंशन ऑन क्लायमेट चेंज’ (वठाउउउ) या जागतिक संस्थेनं येणाऱ्या हवामानबदल परिषदेसाठी इंधन प्रक्रिया उद्योगांकडून येणारं प्रायोजकत्व नाकारलं पाहिजे, ही ‘पॉल्युटर्स आउट’ या चळवळीची  मुख्य मागणी आहे. ग्लासगो इथे २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेली ‘उडढ 26’ ही हवामानबदलविषयक परिषद करोनाच्या साथीमुळे पुढे ढकलण्यात आली. ती २०२१ च्या नोव्हेंबरमध्ये पार पडण्याचे संकेत आहेत. आर्थिक नफा आणि जीवनशैलीत होणारे फायदे यांना अवास्तव प्राधान्य देऊन, शाश्वत विकास आणि स्थिर होऊ पाहाणाऱ्या समाजव्यवस्थेला थारा न देणाऱ्या असंवेदनशीलतेला विरोध करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ‘पॉल्युटर्स’- म्हणजे प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सर्वानीच या व्यवस्थेतून आपलं चंबूगबाळं आवरून कायमचं निघून जावं, अन्यथा त्यांना बाहेरची वाट दाखवली जाईल, अशी त्यांची घोषणा आहे.

तरुण पिढी आणि लहान मुलं यांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग असलेल्या ‘पॉल्युटर्स आऊट’ चळवळीनं जगभरातील गब्बर प्रदूषकांची नावंही मोठय़ा धाडसानं जाहीर केली. १९८८ पासून जागतिक पातळीवर होणाऱ्या कार्बन उत्सर्जनातील ७१ टक्के वाटा हा अमेरिकन एक्झॉनमोबिल कॉर्प, सौदी आरामको, रशियन गॅझप्रॉम आणि ब्रिटिश रॉयल डच शेल या बहुराष्ट्रीय खनिज तेल कंपन्यांचा आहे. अब्जावधींची उलाढाल करणाऱ्या या उद्योगसमूहांसमोर विरोधाची तलवार रोखणं सोपं नाही. मूठभर लहान मुलांसाठी तर ते अजिबात सोपं नाही. मात्र जगभरातील पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देत आहेत आणि वैज्ञानिक समुदाय त्यांचं धोरण आणि मागण्या नीट मांडण्यासाठी त्यांना मदत करत आहे, हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. तेच त्यांना बळ देतं.

आपल्या या चळवळीची व्याप्ती वाढवण्यासाठी इसाबेला शाळा सुटल्यावर किंवा रात्री-अपरात्रीसुद्धा ‘स्लॅक’, ‘झूम’ आणि ‘गूगल मीट’द्वारे जगभरातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात असते. ‘वायफाय’ची पूर्णवेळ सोय उपलब्ध नसणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ती पहाटे तीन वाजतासुद्धा फोनवर मदत करते. जनतेच्या भावना ओळखून त्याप्रमाणे मजल दरमजल करणाऱ्या या मुलीला भविष्यात राजकारणात उतरायचं आहे. सिनेटमधून निवडून येऊन २०४४ मध्ये ओव्हल ऑफिसमध्ये आपलं विशिष्ट स्थान निर्माण करणं तिचं सर्वात मोठं स्वप्न आहे. या स्वप्नाला संवेदनेची हिरवी किनार आहे, तसंच पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणारा समाज साकार करण्याची ऊर्मी आहे.

‘स्टार वॉर्स’ या प्रसिद्ध सायफाय मालिकेमधली ‘प्रिन्सेस लेया’ ही इसाबेलाची खास आवडती व्यक्तिरेखा आहे. का? याचं उत्तर तिच्या लढाऊ वृत्तीत मिळतं. भल्यामोठय़ा अन्यायकारक राज्यासमोर ताठ मानेनं उभी राहिलेली ही राजकुमारी, सिंड्रेला किंवा एरियलसारखी सुंदर बाहुली नाही, तर एका सेनेची प्रमुख आहे, अन्यायाविरुद्ध उभी राहाणारी रणरागिणी आहे. म्हणूनच तिचा जीव कासावीस झाल्यावर ती खचून न जाता पुन्हा जोमानं उभी राहिली. स्वत:पुरतं समस्येचं उत्तर शोधून न काढता आपल्या विचारप्रक्रियेचा फायदा तिनं सर्वाना होऊ दिला. तिनं स्वत:चा आवाज ओळखला आणि तो जगाच्या कानाकोपऱ्यात प्रतिध्वनित केला.

लहानपणी दम्याची उबळ येऊन कासावीस होणारी, थकून बर्फाच्या मैदानावर कोसळणारी, तरीही पुन्हा उभी राहाणारी ही मुलगी आज अनेकांची प्रेरणा बनली आहे. मोकळा श्वास घेऊ पाहाणाऱ्या जेमतेम अठरा वर्षांच्या इसाबेलाला जीवाश्म इंधन उद्योगापासून सर्व गॅस पाइपलाइन बंद पडलेल्या हव्या आहेत. आर्थिकीकरण जीवाश्म इंधन कंपन्यांकडून पर्यावरणाकडे वळवायचं आहे. तरुण पिढीला निर्णयप्रक्रियेत स्थान द्यायचं आहे आणि पर्यावरणविघातक बडय़ा उद्योगांची निर्णयप्रक्रियेवर असलेली सार्वभौम सत्ता मोडीत काढायची आहे. अमेरिके चे अध्यक्ष बायडनप्रणित नवीन पर्यावरण धोरणाच्या आखणीत त्यांना ‘टेबल सीट’ हवीय, अर्थात सहभाग घेण्याची इच्छा आहे.

गेल्या काही काळापासून मिळणारे धोक्याचे इशारे पाहाता २०२१ हे ‘मेक ऑर ब्रेक’ म्हणजे सकारात्मक काहीतरी बनवा, अथवा सगळं विसकटून जाताना पाहात राहा, अशी तंबी देणारं वर्ष ठरलं आहे. आजचा ‘जागतिक पर्यावरण दिन’ (५ जून) सावध होण्याच्या पुढची पायरी सजग होण्याची आहे, हे सर्वाना जाणवून देत आहे. डोळ्यांना दिसत असणाऱ्या परिणामांमुळे वातावरण बदलाबद्दल काहीशी जागरूकता दिसून येत आहे. जगभरातील चळवळींचा आदर्श घेऊन महाराष्ट्रात सांगली-कोल्हापूरसारख्या भागात एखादा विद्यार्थी संप करण्यासाठी रस्त्यावर उभा राहातो. कुठे कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याबद्दल पावलं उचलली जात आहेत. हिरवा रंग नुसताच समृद्धीचा द्योतक राहिला नसून, आता तो चळवळीचा, मत स्वातंत्र्याचा आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या निर्णायक पावलांचा रंग बनला आहे!

ग्रीन इज द न्यू ब्लॅक!