सिद्धी महाजन

आपल्या आजूबाजूला अशा अनेक लहान मुली आहेत, ज्यांना पृथ्वीच्या रक्षणाची खरोखर काळजी वाटते. त्या वैयक्तिक पातळीवर पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करत आहेतच, मात्र या कामात लोक व्यापक प्रमाणात सहभागी व्हावेत म्हणून  चळवळही उभारत आहेत. गेले वर्षभर आपण या सदरातून मुलींनी हाती घेतलेल्या पर्यावरण रक्षणाच्या कहाण्या वाचतो आहोतच. अशाच रेश्मा कोसाराजू, फर्नादा बारेस, विनिशा उमाशंकर आणि आद्या जोशी यांच्या कामाविषयी..         

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

‘चिल्ड्रन्स क्लायमेट प्राइज’ (सीसीपी) हा ‘क्लायमेट अ‍ॅक्शन’ किंवा हवामानबदलाविरुद्धच्या चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा जागतिक पुरस्कार आहे. हा प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार स्वीडिश कंपनी  ‘Telge Energi’ नं प्रायोजित केला आहे. ही कंपनी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचं सक्षमीकरण करण्याचं काम करते. २०१६ पासून दरवर्षी हा पुरस्कार १२ ते १७ वयोगटातील अशा एका तरुण मुलाला किंवा मुलीला दिला जातो, ज्यानं पृथ्वीवरील जीवनमान सुधारण्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दिशेनं असाधारण पावलं उचलली आहेत. या वर्षी ३२ वेगवेगळ्या देशांतील अनेक तरुणांना पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं होतं.

नोव्हेंबरमध्ये २०२१ च्या ‘चिल्ड्रन्स क्लायमेट प्राइज’ विजेत्याची घोषणा करण्यात आली आणि अंतिम स्पर्धकांमधून कॅलिफोर्नियामध्ये साराटोगा इथे राहणाऱ्या पंधरा वर्षांच्या रेश्मा कोसाराजू हिची निवड करण्यात आली. रेश्माला हा पुरस्कार पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी जाहीर झाला आहे. ती मेहनत घेत असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ‘AI for Wildfires’.

रेश्माचं मॉडेल नक्की काय आहे, तिच्या प्रकल्पात असं काय नवीन आहे, ज्यामुळे तिला हा पुरस्कार मिळाला, हे जाणून घेण्यासाठी थोडी पार्श्वभूमी  समजून घ्यायला हवी. कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ (‘ए आय’) हा आजच्या तंत्रयुगातला परवलीचा शब्द आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक भाग म्हणजे ‘मशीन लर्निग’. मानवी तज्ज्ञ जसे आपली बुद्धी वापरून एखाद्या समस्येवर उत्तरं शोधतात, तशीच पद्धत मशीन लर्निगमध्ये वापरतात. यासाठी ‘डीप लर्निग’ या प्रणालीचा वापर केला जातो. याचं वैशिष्टय़ असं, की सर्वसामान्य पद्धतीनं एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जशी संगणकाला आज्ञावली द्यावी लागते, तशी इथे द्यावी लागत नाही, तर मिळालेल्या माहितीच्या आधारे एक विशिष्ट आकृतिबंध तयार करून त्याचा वापर करत उत्तर शोधलं जातं. अगदी स्वयंभू बुद्धिमत्ताच म्हणा ना! डीप लर्निग पद्धतीच्या आधारे संगणक माहितीचे ढीग उपसता उपसता त्यातून अगदी नावीन्यपूर्ण पॅटर्न्‍स शोधून काढतो, ज्यांचा थांगपत्ता मानवी बुद्धीलाही लागत नाही.

 रेश्मानं याचा वापर कल्पकतेनं करण्याचं ठरवलं. जंगलात अचानक लागणाऱ्या वणव्यांचा अंदाज लावण्यासाठी ‘ए आय’ वापरण्याची कल्पना तिनं मांडली. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डीप लर्निग मॉडेल तयार करण्यासाठी तिनं तापमान, हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि मातीचा कोरडेपणा यांसारख्या घटकांबद्दल गोळा झालेल्या माहितीचा वापर केला. मानवी हस्तक्षेपही लक्षात घेतला. या माहितीचा वापर करून तिचं मॉडेल एखाद्या विशिष्ट वेळी कोणत्या जंगलात वणवा लागण्याची सर्वाधिक शक्यता आहे याचा नव्वद टक्के अचूक अंदाज लावू शकतं. तसंच कोणत्या क्षेत्रात वणवे लागण्याच्या शक्यता निर्माण होतील याचंही भाकीत करतं. जंगली वणवे नैसर्गिक परिसंस्थेचाच एक भाग आहेत. सामान्य परिस्थितीत जंगली वणवे हे नैसर्गिक कारणांमुळे लागत असतात. काही प्रमाणात माणूस करत असलेली ढवळाढवळसुद्धा जंगलाला वणवा लागण्यात कारणीभूत ठरते; पण बदलत्या जागतिक हवामानामुळे, तापमानवाढीमुळे भूपृष्ठाचं तापमान वाढतं आहे. याची झळ कोरडं हवामान असलेल्या भागात बसते आणि वणवे पेटतात. सध्या याच कारणामुळे अतिशय वेगानं वाढणारं यांचं प्रमाण चिंतेत टाकणारं आहे. एका जागी पडलेली ठिणगी पेटल्यावर झरझर पसरत मोठा भूभाग व्यापणाऱ्या या वणव्यांमुळे त्या भागाचं वैशिष्टय़ असलेल्या जैवविविधतेचा नाश होतो. मोठी जीवितहानी आणि वित्तहानी होते. माणूस एक वेळ आपलं नुकसान भरून काढत पुन्हा नवं घर उभं करेल; पण जे प्राणी, पक्षी, कीटक यांचा अधिवास त्यांच्याकडून हिरावून घेतला जातो, त्यांना वाली कोण?

 २९ ऑक्टोबर २०१९ ला युरोपियन युनियननं युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिकी  देशांमध्ये लागणाऱ्या जंगल वणव्यांचा लेखाजोखा मांडणारा एकवीसावा वार्षिक अहवाल सादर केला. या अहवालानुसार २०२० मध्ये तब्बल ३,४०,००० हेक्टर एवढं वनक्षेत्र जंगली वणव्यांच्या प्रभावाखाली येऊन नष्ट झालं. २०२१ हे वर्ष वनसंपदेसाठी त्याहीपेक्षा वाईट ठरलं. हा अहवाल प्रकाशित होईपर्यंत २०२१ मध्ये ०.५ अब्ज हेक्टर एवढं वनक्षेत्र जळून खाक झालं. यातील बहुतेक वनक्षेत्र पूर्वपरिस्थितीत येण्यासाठी किती तरी वर्ष जावी लागतील.  दरवर्षी हवामानबदलाचं चित्र अधिकाधिक तीव्र होत आहे. वाढत चाललेल्या तापमानामुळे आग लागण्याचा धोका दिवसेंदिवस भयंकर तीव्र होत आहे. त्या आगी लागण्यामागे नैसर्गिक कारणं आहेतच, पण त्याहीपेक्षा वाढता मानवी हस्तक्षेप या सगळ्याला जबाबदार आहे. जागतिक पातळीवर अभूतपूर्व प्रमाणात लागणारे वणवे कधी न भरून येणारं नुकसान करत आहेत. आता हा लेख लिहीत असतानाही कॅलिफोर्नियामध्ये भयावह जंगली वणव्याचा इशारा देण्यात आला असून अनेक गावं आणि घरांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. लॉस अँजेलिसमध्ये अनेक रहिवाशांना विस्थापित होण्याची भीती सतावत आहे. कॅलिफोर्नियातील ८० टक्के भागामध्ये पडलेला आत्यंतिक दुष्काळ, हवामानातील बिघडलेलं आद्र्रतेचं प्रमाण, हे सारं मोठय़ा आपत्तीला आमंत्रण देणारं आहे. तिथे राहणाऱ्या, सदैव मास्क लावून फिरावं लागणाऱ्या रेश्माला या समस्येची झळ बसली अन् तिनं यावर आपल्या परीनं उपाय शोधला. तिच्या या प्रारूपाचं लवकरच ‘अ‍ॅप’मध्ये रूपांतर होईल आणि ते फक्त अमेरिका, युरोपमध्येच नव्हे, तर जगभरात वापरलं जाईल, असे अपेक्षित आहे.

‘चिल्ड्रन्स क्लायमेट प्राइज’च्या अंतिम यादीत प्रवेश करणारी दुसरी प्रबळ दावेदार होती सोळा वर्षांची फर्नादा बारेस. अ‍ॅमेझॉनच्या कुशीत वसलेल्या ब्राझीलमधील एका समूहाबरोबर ती काम करते. अ‍ॅमेझॉनच्या नैसर्गिक वनसंपदेचं दिवसेंदिवस नष्ट होणं, हा चिंतेचा विषय बनून राहिला आहे. इथल्या पारंपरिक आदिवासींचं याबद्दलचं ज्ञान वादातीत असलं, तरीही सरकार त्यांच्याकडे करत असलेलं दुर्लक्ष आणि पेट्रोलियम कंपन्यांचं केलं जाणारं लांगूलचालन यामुळे या अ‍ॅमेझॉनच्या आदिम रहिवाशांचं मत विचारात घेतलं जात नाही. अ‍ॅमेझॉन रहिवाशांचा आवाज ऐकला जावा यासाठी फर्नाडा ‘फ्रायडेज फॉर फ्युचर अमेझॉनिया’ या संस्थेबरोबर काम करते. ती तिथल्या आदिवासींच्या हक्कांसाठी लढते आहे.

असे आणखीही पर्यावरणासाठी सज्ज असलेले शिलेदार आहेत. ‘पोकळ आश्वासनं देणाऱ्या आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अयशस्वी झालेल्या नेत्यांवर राग धरण्याची आणि त्यांची कास सोडण्याची आजच्या तरुणांपाशी भरीव कारणं आहेत. आज आपण ज्या पर्यावरण धोरणांवर चर्चा करतो, त्यांपैकी एकही माझ्या दृष्टीनं व्यवहारात उपयोगी नाहीये. माणसाला राहाण्यायोग्य अन्य जगाची स्वप्नं दाखवण्यापेक्षा याच पृथ्वीला आणि पर्यावरणाला पुनरुज्जीवित करण्यासाठी रोखठोक कृतीची गरज आहे.’ हे उद्गार आहेत गेल्या वर्षी ‘चिल्ड्रन्स क्लायमेट प्राइज’ची मानकरी ठरलेल्या तमिळनाडूतील तिरुवन्नमलै इथल्या विनिशा उमाशंकर हिचे.

२ नोव्हेंबर २०२१ रोजी ग्लासगो, स्कॉटलंड येथे ‘जागतिक हवामानबदल परिषदे’त भरलेल्या ‘अ‍ॅक्सेलरेटिंग क्लीन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन अँड डिप्लॉयमेंट’ म्हणजेच अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणाऱ्या तंत्रज्ञानातील नवोन्मेषांना चालना देण्यासाठी भरवलेल्या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेत विनीता बोलत होती. ग्लासगो येथील हवामानविषयक परिषदेत जागतिक तापमानवाढीवर एकत्रित येऊन चर्चा करण्यासाठी सर्व महत्त्वाचे नेते एकत्र आले होते. विनीतानं मांडलेल्या या मताची माध्यमांनीही दखल घेतली.

विनिशाचे शब्द पोकळ नाहीत, कारण तिचं कार्य शब्दश: सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. पारंपरिक कोळशाच्या इस्त्रीची जागा घेणारी सौरऊर्जेवर चालणारी इस्त्री वापरणारी ‘मोबाइल आयर्निग कार्ट’ ही तिची निर्मिती आहे. तिच्याबरोबर २०२० च्या ‘चिल्ड्रन्स क्लायमेट प्राइज’ची विभागून मानकरी ठरली होती मुंबईची आद्या जोशी. सतरा वर्षांच्या आद्यानं स्थापन केलेल्या ‘द राइट ग्रीन’ या संस्थेच्या माध्यमातून ती जैवविविधतेनं नटलेल्या परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी झटते आहे. तिनं ‘बायोपॉवर इंडेक्स’- म्हणजे एखाद्या भागात एखादी वनस्पती तिथल्या जैवविविधतेसाठी किती पोषक आहे, हे सूचित करणारा एक निर्देशांक बनवला आहे. त्यावर आधारित वनस्पतींचं कोष्टक तिनं तयार केलं. त्यानुसार एखाद्या भागात वनीकरण करताना कोणतीही झाडं आणून लावण्यापेक्षा, ती त्या भागाचं वैशिष्टय़ असलेल्या, त्याच अधिवासात आढळणाऱ्या विशेष वनस्पतींचं वनीकरण करून जतन करणं महत्त्वाचं मानते. त्यासाठी तिनं शाळांमधून अनेक कार्यशाळा, जनजागृती करणारी व्याख्यानं आयोजित केली आहेत. एक अभ्यासक्रमही तयार केला आहे, जो ती अनेक शाळांमध्ये राबवते.

  या आहेत आपल्या आजूबाजूच्याच लहान मुली, ज्या नेहमीचं आयुष्य जगण्याबरोबरच वसुंधरेचीही काळजी वाहात आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी त्या नवनिर्मिती करत आहेत, चळवळ करत आहेत, मतं मांडत आहेत. वेगवेगळ्या अभिव्यक्तींतून त्यांचं व्यक्तिमत्त्व आकार घेत आहे. या सगळ्यांतून डोकावते आहे, ती त्यांची लहान वयात परिपक्व झालेली समज. बदलत्या परिस्थितीनुसार बदलती समज घेऊन अनेक लहान मुलं आता पुढे येत आहेत. त्यांचं म्हणणं सर्वानी ऐकावं एवढंच त्यांचं सांगणं आहे. मोठय़ांची समज अधिक वाढवणं, त्यांची जबाबदारी बनल्यासारखं झालं आहे. त्यांना आणि आपल्याला बांधून ठेवतोय एक समान धागा- हे पर्यावरण, ही पृथ्वी. त्या पृथ्वीवर राहाण्यासाठी ही विकसित होऊ घातलेली समजच सर्वाना मदत करणार आहे.

वय छोटं असलं तरी चालेल, पण समज छोटी  नसणं महत्त्वाचं आहे, नाही का?

snmhjn33@gmail.com