अर्चना जगदीश

धुळे-नाशिक महामार्गावर शे-दोनशे वर्षे पांथस्थांना गारवा देत, अचलपणे ऊन पावसातही हजारो प्राचीन वृक्ष उभे होते. मात्र रस्ता रुंदीसाठी त्यांची कत्तल होताना बघून अश्विनी भट यांना स्वस्थ बसवेना. त्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. अश्विनींच्या अथक परिश्रमांमुळे लोकांमध्ये याबद्दल जाणीव जागृती होते आहे, त्यामुळेच कत्तल केलेल्या वृक्षांचं यशस्वी पुनरेपण झालं आहे.

Worker dies due to suffocation in sewage tank
वसई : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
raman bhalla
काश्मीर खोऱ्यातील लढतींची उत्सुकता
Occultists who do modeling work career
चौकट मोडताना: मितूचं मॉडेलिंग

१९९०च्या दशकात महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर रस्ता म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – १७ मुंबई-गोवा हा होता. आजच्यापेक्षा लहान, समोरासमोरून दोनच वाहनं जाऊ शकतील एवढाच, खूप वळणावळणांचा. एकदा कशेडी घाट ओलांडून खेड गाठलं की, मग दोन्हीकडे सह्यद्रीचे डोंगर, गर्द झाडी, हिरव्या रंगाच्या अनेक छटा, काजू-आंब्यांच्या बागा आणि त्यात लपलेली छोटछोटी गावं, वस्त्या दिसायला लागतात. पावसाळ्यात तर हिरव्या रंगानं अगदी वेड लागतं. भारतातला सगळ्यात सुंदर, नेत्रसुख देणारा आणि कोकणाचं सृष्टिवैभव तासन्तास समोर उलगडणाऱ्यांपैकी एक होता हा हमरस्ता. आपल्याकडे जाहिरात करायची पद्धत नाही; नाही तर या रस्त्याने, ‘मोस्ट ब्युटिफूल रोड इन द रेन’ म्हणून केव्हाच पहिल्या पाचांत बाजी मारली असती.

वर्षभर या रस्त्यावर काही ना काही तरी वेगळं, नवं दिसत असतं आणि निसर्गाच्या करामती लक्ष वेधून घेत असतात. पावसाळ्यातील हिरव्या रंगाच्या हजारो छटा, मोठय़ा डोंगरावरून झेपावणारे धबधबे आणि छोटय़ा खडकांतून ओघळणारे वेगवान प्रवाह, दुथडी भरून वाहणारे ओढे-नाले आणि पऱ्हे, त्यातलं कधी लाल तर कधी शुभ्र फेसाळतं पाणी.

या रस्त्याचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा असलेले डेरेदार वृक्ष, त्यातून चिंचोळा बोगद्यासारखा दिसणारा रस्ता आणि सावली नाही तर झाडांच्या पसाऱ्यातून थेंबाथेंबानं हळूहळू झिरपणारा पाऊस! हे वृक्ष म्हणजे या रस्त्यांचं खरं प्राचीन वैभव. उन्हाळ्यात फुललेल्या आणि रंग उधळणाऱ्या सावरी, त्यांची तळहाताएवढी किरमिजी मोठी फुलं. या झाडांबरोबरच, आजूबाजूला जंगल तोडून झाल्यावर आलेले छोटे पण तरीही फुललेले केसरीया पळस, क्वचित कुंपणावर लावलेला पांगारा आणि त्याची लालचुटुक फुलं, असा रंगोत्सव म्हणजे कोकणातल्या रस्त्यांची खरी ओळख.

कोकणात फिरत असताना नेहमीच लक्ष वेधून घेणारे वृक्ष म्हणजे पांढऱ्या-कबऱ्या खोडाची सालटी निघालेले उंच सरळसोट वाढलेले कुडाळ-झाराप रस्त्यावरचे दोन्ही बाजूंनी रस्त्यावर सावली धरणारे अर्जुनाचे वृक्ष. कोकणात गेल्या पंचवीस वर्षांत फिरत असताना अनेक ठिकाणी हे अर्जुन वृक्ष दिसले आणि त्यांनी घर केलं मनात. त्यामुळे नेहमी मुंबई-गोवा रस्त्याच्या कुडाळ-झाराप-सावंतवाडी असं जाताना प्रथम आठवण होते ती या अर्जुनांची आणि ते दिसले की, आहेत जागेवर, तुटले नाहीत म्हणून बरं वाटायचं. पण आता हा मुंबई-गोवा महामार्ग चौपदरी होतो आहे आणि गेल्या महिन्यात तिथून जाताना दिसलं की इथले अर्जुनाचे वृक्ष आता शेवटच्या घटका मोजताहेत, काही धारातीर्थी पडले आहेत, त्यांच्या भव्य कलेवरांनी मन झाकोळून टाकलं. फक्त अर्जुनच नाही तर इतरही हजारो डेरेदार प्राचीन वृक्ष धारातीर्थी पडले आहेत आणि रस्त्याचं वैभव नाहीसं झालं आहे.

महावृक्षांच्या कमानीतून जाणारा नेत्रसुख आणि गर्द सावली देणारा रस्ता कुणाला आवडणार नाही? पण आता असे रस्ते कोकणच काय सर्वत्र नाहीसे होत चालले आहेत. महामार्गावरची झाडं आता तुटणारच म्हणून सर्वसामान्य लोक उसासे टाकतात आणि वेग वाढवत पूर्वीच्या झाडांच्या कमानी आणि रस्त्यांच्या आठवणी विसरून जातात.

पण नाशिकच्या अश्विनी भट यांना मात्र महामार्गावर वाढणाऱ्या वाहनांसाठी आणि विकासासाठी होणारी वृक्षांची कत्तल सहन होत नाही. ब्रिटिश काळात दळणवळण सुधारण्यासाठी रस्त्यांचं जाळं विणलं गेलं आणि त्याचबरोबर रस्त्यांच्या दुतर्फा वड, पिंपळ, करंज, कडुनिंब, सावर, अर्जुन अशी शेकडो-हजारो झाडंही लावली होती. मात्र त्या काळी वाहतूक मर्यादित होती आणि वाहनंही खूप कमी होती, पण गेल्या दोन तीन दशकात रस्ते रुंदीकरण अपरिहार्य झालं आहे. त्यासाठी अशा प्राचीन झाडांची कत्तल होणं नित्याचेच आहे. भारतात अनेक चांगले पर्यावरणपूरक कायदे असूनही मोठी मोठी जंगले तुटतात तिथे रस्त्याकडेच्या झाडांची काय पाड!

धुळे नाशिक महामार्गावर शे-दोनशे वर्ष रस्त्याला आणि पांथस्थांना गारवा देत, ऊन पाऊस आणि काळाचा महिना अनुभवत असे हजारो प्राचीन वृक्ष उभे होते. मात्र रस्ता रुंदीसाठी त्यांची कत्तल होताना बघून अश्विनींना स्वस्थ बसवेना. त्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. सरकारकडे ही कत्तल थांबविण्यासाठी दाद मागणं, वनखात्याची मदत मिळवण्याचा प्रयत्न करणं आणि नाशिकच्या नागरिकांना यासाठी जागं करणं हे सगळं करायला त्यांनी २००६-२००७ पासून सुरुवात केली. रस्त्यासाठी झाडं तोडावी लागतात आणि रस्ते मोठे झाले पाहिजेत हे मान्य असलं तरी तोडलेल्या झाडांचं लाकूड होऊ नये आणि त्यांचं पुनरेपण व्हावं, त्यांना उचलून नव्या जागी वाढण्यासाठी बंदोबस्त केला जावा आणि त्यासाठी महापालिका, रस्ते विकास महामंडळ तसंच राज्य शासनाने जागा आणि निधी उपलब्ध करून द्याव्यात अशा रास्त मागण्या होत्या त्यांच्या. नुसती पत्र, विनंत्या, समोरासमोर चर्चा करूनही शासन नमलं नाही. मग शेवटी अश्विनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कायद्याचा आधार घ्यावा लागला, आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला. अर्थात नुसतं आंदोलन, रास्ता रोको अशा गोष्टींनी तिढा सुटणार नव्हता. पर्याय शोधणेही गरजेचं होतं.

महाराष्ट्रातल्या अनेक पर्यावरणप्रेमींना वृक्ष वाचविण्यासाठी अथक धडपड करणाऱ्या अश्विनी भट माहीत नसतील कदाचित, पण नाशिकच्या यशस्वी वृक्ष पुनरेपणाबद्दल मात्र त्यांनी नक्की ऐकलं असेल. सरकार आणि बांधकाम खात्यावर दबाब आणण्याबरोबरच अश्विनी यांनी पुनरेपणाचा अभ्यास केला, त्यातले अनेक तज्ज्ञ अश्विनी यांच्या शब्दाखातर नाशिकला प्रत्यक्ष पाहणीसाठी येऊन गेले. शिवाय रुंदीकरणासाठी नक्की किती झाडं तोडली जातात हे समजलं पाहिजे हाही आग्रह अश्विनी यांनी आणि नाशिक नागरिक कृती समितीने धरला. त्यासाठी त्यांना उच्च न्यायालयापर्यंत जावं लागलं. मग कुठे मोजणी आणि तोडली आहेत त्याच जातीची झाडं लावणं आणि पुनरेपणाची शक्यता तपासून बघणं याचा विचार होऊ  लागला. रस्त्याकडेच्या झाडांची कत्तल आणि त्याबद्दलची सरकारी पातळीवरची उदासीनता याची हजारो उदाहरणं आहेत आपल्याकडे.

आपली ढासळणारी प्रकृती आणि आर्थिक मदतीचा अभाव अशी अनेक निराश करणारी कारणं असूनही अश्विनी यांना  झाडांची काळजी स्वस्थ बसू देत नाही. नाशिकचे विक्रम फाळके, ऋषिकेश नाझरे, राजेश पंडित हे सगळे सुहृद आणि त्यांचं कुटुंब यांनी मात्र त्यांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. तिच्यासाठी जबाबदारी घेणं आणि फक्त काळजी करणाऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष काम करणं महत्त्वाचं आहे. ध्येय म्हणून तिनं ते स्वीकारलं आहे. अश्विनींसारखं कुणी तरी आपल्या ध्येयासाठी वेडं होत, पाठपुरावा करत राहतं. म्हणूनच हळूहळू का होईना बदल होण्याची शक्यता वाढते हेही तितकंच खरं!

अश्विनींच्या अथक परिश्रमांमुळे लोकांमध्ये याबद्दल जाणीव जागृती होते आहे, नव्या विकासासाठी महामार्ग रुंदीकरण करताना काही प्राचीन सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्वाची, गावाचं वैभव असलेली झाडं तुटू नयेत यासाठी काही करता येईल का, मोठय़ा रस्त्यासाठी झाडं तोडण्याऐवजी रस्ता त्याच्या दोन्ही बाजूंनी नेता येईल का असाही विचार सुरू झाला आहे. सिन्नर भागात महामार्गावरच्या ९९ वृक्षांचं यशस्वी पुनरेपण झालं आहे. यासाठी खर्चही फार येत नाही. पण अशा कामासाठी पुढे येणाऱ्या लोकांची, रोपलागवडीच्या पलीकडे जाऊन पर्यावरणासाठी जाणीवपूर्वक काम करणाऱ्या कंपन्यांची संख्या नगण्य आहे ही अश्विनी यांची खंत आहे.

सगळ्या ठिकाणी पुनरेपण करता येणार नाही आणि सगळ्या कायद्याच्या लढाया त्या जिंकणारही नाहीत. पण एकदा चांगल्या कामाचा ध्यास घेतला की, परिणामांची पर्वा करायला, थांबायला माणसाला आवडत नाही. म्हणूनच अश्विनी यांचा महावृक्ष वाचविण्याचा लढा आजही सुरू आहे.

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com