– डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले

‘लैंगिक शिक्षण’ हा विषय कागदोपत्री बराच चíचला गेला असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत आपण समाज म्हणून खूपच मागे आहोत. डॉक्टर म्हणून काम करत असताना, लहान, किशोरवयीन आणि अगदी तरुण मुलामुलींच्या बाबतीतही घडणाऱ्या अत्याचारांची प्रकरणं बघताना हे वारंवार जाणवतं. समाजातील वाईट प्रवृत्ती बदलणं, सामाजिक मानसिकता बदलणं ही खूप व्यापक प्रक्रिया आहे, पण निदान त्यापासून बचावासाठी तरी मुलामुलींना योग्य वयापासून शास्त्रोक्त लैंगिकता शिक्षण मिळणं गरजेचं आहे; किंबहुना तो त्यांचा हक्कच आहे.

Victim education
सामूहिक बलात्कारामुळे शिक्षण सुटले, न्यायालय म्हणाले…
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

घरात पाहुणे येणारेत म्हणून पूर्वतयारी करायची असल्यानं तिनं आपल्या ४ वर्षांच्या मुलाला सोसायटीच्या ग्राऊंडवर खेळायला पाठवलं. १५-२० मिनिटांतच तीदेखील खाली पोहोचली.. पण तोपर्यंत आक्रीत घडलं होतं. त्या उच्चभ्रू सोसायटीतील २-३ किशोरवयीन मुलांनी आडोशाचा फायदा घेऊन तिच्या चिमुरडय़ाला ‘लक्ष्य’ बनवलं होतं. लैंगिक शिक्षण म्हटलं, की अनेक जण नाक मुरडतात. ‘याची आम्हाला काय गरज?’ असा प्रश्नही लोकांना पडतो. मुलामुलींच्या शिक्षणाचा विचार करताना तर आपण अतिशय साचेबद्ध विचार करतो! पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन पदवीचं वा पदव्युत्तर शिक्षण, कुठलं तरी व्यावसायिक शिक्षण आणि मग मुलांनी आयुष्यात ‘सेटल’ व्हावं, ही अपेक्षा! यात काही चुकतंय असं आपल्याला अजिबातच वाटत नाही. या पठडीतल्या शिक्षणाखेरीज आयुष्य छान जगण्याकरिता आणखीही बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते, हे आपल्या गावीही नसतं. चांगल्या सवयी अंगी बाणवण्याचं शिक्षण, नीतिमूल्यांचं शिक्षण, जबाबदार नागरिक बनण्यासाठी मूलभूत कायद्यांबाबतचं शिक्षण, समाजोपयोगी कामं करण्याचं शिक्षण, जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी कुठली तरी एखादी कला अवगत करण्याचं शिक्षण, शरीर आरोग्यसंपन्न राखण्याचं शिक्षण आणि सजीव म्हणून असलेल्या आपल्या लैंगिक इच्छेला सारासार विचारावर आधारित सामाजिक संकेतांच्या परिघाचा आयाम देण्याचं, दिशा देण्याचं शिक्षण- अर्थात लैंगिकता शिक्षण, या साऱ्यांचा आपल्या शिक्षणव्यवस्थेत अंतर्भाव हवा. मात्र शाळांमधून लैंगिक शिक्षण दिलं जावं की नाही, या विषयावर आपल्याकडे संसदेत सांगोपांग चर्चा न होता झालेला अभूतपूर्व गोंधळ आपण या विषयाबद्दल किती अनभिज्ञ आहोत याचीच साक्ष देतो.

लैंगिकतेचं शिक्षण हे एक प्रकारचं आरोग्य शिक्षण आहे. यामध्ये मानवी जननेंद्रियांची रचना, स्त्री आणि पुरुष जननेंद्रियामधील फरक, किशोरावस्थेत होणारी शारीरिक/ जननेंद्रियांची वाढ आणि विकास, त्यामुळे शरीराच्या बाह्य़रूपात आणि वागण्या-बोलण्यात होणारे बदल, यौवनकाळात होणारे मानसिक आणि भावनिक बदल, हे बदल योग्य पद्धतीनं हाताळण्यासाठीचं मार्गदर्शन, इत्यादींचा समावेश होतो. याखेरीज मानवी पुनरुत्पादन, जबाबदार मानवी लैंगिक वर्तन आणि सामाजिक अपेक्षा, लैंगिकतेचे इतर पलू- उदा. शरीराची स्वप्रतिमा, लैंगिक अभिमुखता, डेटिंग आणि लैंगिक संबंधांमुळे उद्भवणाऱ्या जबाबदाऱ्या, लैंगिक संबंधांतून संक्रमित होऊ शकणारे रोग, गर्भनिरोधक पद्धती/ संसाधनं, या सर्व बाबींवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून होणारं निरूपण म्हणजे खरं लैंगिक शिक्षण. या अनुषंगानं लैंगिक शिक्षण म्हणजे संभोगाविषयीचं शिक्षण नसून कौटुंबिक जीवन शिक्षण वा जीवनावश्यक शिक्षणच आहे. याखेरीज कायद्याच्या अनुषंगानं लैंगिक संबंधांसाठी संमतीचं वय आणि विवाहाच्या वेळी मुलामुलींचं किमान वय, लैंगिक हिंसाचार, यांसारख्या प्रचलित कायद्यांबद्दल जाणीव-जागृतीचाही यात अंतर्भाव आहे. एकूणच मानवी सामाजिक जीवनविकासाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.

करोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या निर्बंधांमुळे व एकूणच सामाजिक अभिसरणामुळे मागच्या दीड-दोन वर्षांत आपलं जगणं आरपार बदललं आहे. इंटरनेट ही जणू अनिवार्य गोष्ट झाली आहे. टीव्ही, मोबाइलसारखी साधनं तर आपल्या हाताशी सहजपणे उपलब्ध आहेत. या साधनांशिवाय जगणं अनेकांना अशक्य झालं आहे. आज मुलं टीव्हीवर मोठय़ांसाठी असलेल्या कौटुंबिक (?) मालिका, गुन्हेगारीवरच्या मालिका आवडीनं बघतात. ‘ओटीटी’वर चित्रपट, वेब सीरिज किंवा ‘यूटय़ूूब’वरील नको ती सामग्री नियमितपणे धुंडाळतात. या माध्यमांतून व्यसनाधीनतेचा प्रसार केला जातो. वेगवेगळ्या व्यसनांचा परिणाम किशोरवयीन मुलामुलींच्या शरीरावर होत असतो. मुलींच्या शरीरावर तर खूप लवकर आणि अधिक प्रमाणात दुष्परिणाम होतात. लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमधील सर्वाधिक प्रकरणं मुलींबाबत घडतात. त्यामुळे एकूण किशोरवयीन मुलांमुलींमध्ये, खास करून मुलींना काही गोष्टींची मुद्दाम माहिती देणं, त्यांना जागरूक करणं गरजेचं ठरतं. व्यसनाधीनतेमुळे तरुणींमधील आरोग्य समस्यांचं प्रमाण वाढल्याचं निरीक्षण अनेक स्त्रीरोगतज्ञ नोंदवत आहेत. मुळात स्त्रीची प्रजननसंस्था खूप नाजूक आणि गुंतागुंतीची असते. स्त्री संप्रेरकांचा असमतोल झाल्यानं मासिक पाळीविषयक अनेक समस्या उद्भवू शकतात. शिवाय एखाद्या पार्टीला गेल्यावर प्रमाणाबाहेर मद्यपान केल्यामुळे अथवा त्यात मादक द्रव्यं मिसळलेली असल्यास मुलींची शुद्ध पूर्णपणे हरपू शकते. अशा अवस्थेत त्यांचा गरफायदा घेतला जाऊ शकतो. या पद्धतीनं बऱ्याच मुलींवर लैंगिक अत्याचार केले जातात. तसंच त्याचं व्हिडीओ चित्रणही केलं जातं. मग शुद्धीवर आल्यावर अपराधी भावनेनं वा भीतीपोटी, लोकलाजेस्तव या मुली गप्प बसतात. व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देऊन आणि त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन मुलींवर पुन्हा अत्याचार, क्वचित आयुष्यभर शोषण केलं जाऊ शकतं. याबद्दल मुलींशी मोकळेपणानं बोलायला हवं. आताच्या पिढीतील मुली खूप लवकर वयात येत असल्याचं आम्ही डॉक्टर बघतो आहोत. शारीरिक वाढ झाली असली, तरी निसर्गत: स्त्री म्हणून असलेली समज मात्र आलेली नसते. स्वत:चं रक्षण करण्याबाबतही अनभिज्ञताच असते. या अल्लड मुलींना सावज म्हणून सहज हेरलं जाऊ शकतं. अगदी बेमालूमपणे खाद्यपदार्थात किंवा शीतपेयात मिसळून ड्रग्स पाजले जाऊ शकतात वा मिठाईवर सजावट, खाद्यपदार्थावर गाíनिशग म्हणूनही भुरभुरले जाऊ शकतात. त्याला वास वा चव नसल्यानं ते ओळखणंही कठीण असतं. त्यामुळे आपण कुठे जेवतो आहोत याबद्दलही जागरूक असणंच इष्ट. गॅमा हायड्रॉक्सी ब्युटीरेट, केटामाईन इत्यादी ड्रग्सचा वापर केल्यानं कामवासना अमर्यादित स्वरूपात उद्दीपित होऊन ‘डेट रेप’सारखे प्रकार केले जातात.

खूप कमी पशांत इंटरनेट उपलब्ध झाल्यानं उद्भवलेली आणखी एक मोठी समस्या म्हणजे लहान वयात मुलांना लागणारं पॉर्नोग्राफीचं व्यसन. मुलं तासंतास कॉम्प्युटरसमोर (आणि अर्थातच मोबाइलसमोर) बसू लागली आहेत. पालकांचं लक्ष नाही असं बघून बरोबरीच्या किंवा मोठय़ा मुलांच्या ‘मार्गदर्शना’खाली पॉर्नोग्राफी बघण्याचा नाद लागणं सोपं झालंय. असे व्हिडीओ बघून नकळत्या वयातली मुलंसुद्धा लैंगिक कृती करायला प्रवृत्त होऊ शकतात. खरं तर पॉर्नोग्राफीमध्ये बऱ्याचदा अमानवी आणि अशास्त्रीय गोष्टी दाखवल्या जात असल्यानं, त्या आभासी जगातल्या गोष्टी खऱ्या आहेत असं मानल्यास, खऱ्या आयुष्यात या मुलामुलींचा भ्रमनिरास होऊ शकतो. त्यांचं भावी काळातलं लैंगिक आयुष्य सुरुवातीपासूनच अडचणीत सापडू शकतं. त्यामुळे पालक म्हणून आपली जबाबदारी अधिकच महत्त्वाची ठरते.

वयात येताना मुलामुलींना एकमेकांचं आकर्षण वाटणं साहजिक आहे. हे नसíगक आहे. समवयीन मित्रमत्रिणींचे ग्रुप असले, तरी एकाशी वेगळं नातं जोपासण्याची ही वेळ नाही, हे त्यांना स्पष्टपणे सांगायला हवं. तुमचं शरीर तुम्हीच जपायचं आहे. लैंगिक संबंधांबाबतच्या जबाबदारीची समज येण्यापूर्वीच कोणत्याही व्यक्तीशी लैंगिक संबंध म्हणजे स्वत:च्या शरीराशी प्रतारणा आहे. याचे शरीरावर, तसंच समाजमान्यता नसल्यानं आणि बऱ्याचदा मोठय़ांपासून चोरून, लपवून अशा पद्धतीचे संबंध ठेवले जात असल्यामुळे मनावरही खूप दूरगामी परिणाम होऊ शकतात हे मुलांना आवर्जून सांगायला हवं. हल्ली अगदी लहान वयातच किशोरवयीन मुलं नातेसंबंधांत अडकल्याचं आपण आपल्या अवतीभोवती पाहतो. बऱ्याच वेळा त्यांच्यावर संबंधित जोडीदाराकडून लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला जातो. कधीकधी केवळ टीव्हीवरच्या सीरिअल्स आणि चित्रपटांमध्ये दाखवलंय, त्याचं अनुकरण करायचं म्हणून या गोष्टी केल्या जातात. यातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यास परिस्थिती अतिशय गंभीर वळण घेऊ शकते. परस्पर सहमतीनं शरीरसंबंध झाले असले, तरी त्याला कायद्याची मान्यता नसल्यानं आणि कायद्यानुसार हा बलात्कार मानला गेल्यामुळे वयानं लहान असलेला (अठरा वर्षांखालील) मुलगाही कायद्याच्या कचाटय़ात सापडू शकतो. अशा स्थितीत पुढे त्याच्या आयुष्याला कुठलं वळण लागेल हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे आपल्या मुलांशीही याबाबत बोलणं आता गरजेचं झालं आहे. अठराव्या वर्षांनंतर कायद्याची भीती नसली, तरी फेसबुक वा ‘इन्स्टा’वर झालेल्या जुजबी ओळखीनंतर वा केवळ थ्रिल म्हणून शारीरिक संबंध ठेवणंदेखील चुकीचं आहे. त्यातून अनेक मनोशारीरिक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य वेळेपर्यंत मनाला लगाम घालणंच उत्तम, हे तरुणाईला पटवून द्यायला हवं. यासंबंधी काही चुका झाल्यास पालकांकडे येऊन त्या कबूल करण्याचा विश्वास पालकांनी मुलांमध्ये निर्माण करायला हवा. अन्यथा मुलांचं आणि परिणामी पालकांचंही पुढचं आयुष्य नको ते वळण घेऊ शकतं. लैंगिकतेबद्दलची सगळी शास्त्रोक्त माहिती आपण होऊन आधीच मुलांना दिली, तर परिस्थितीत नक्की फरक पडू शकेल.

पालकांकडून आणि तज्ज्ञांकडून पुरेशी माहिती न मिळाल्यानं मुलांचं या विषयाबद्दलचं कुतूहल आणि नवीन अनुभव घेण्याची जिज्ञासा वाढीस लागते आणि ते लैंगिक संबंध अनुभवायचा प्रयत्न करतात. दुर्दैवानं आपल्या समाजात ही माहिती मुलांना न देण्यातच धन्यता मानली जाते. याखेरीज समवयस्कांचा दबाव, तसंच विविध दृक्-श्राव्य माध्यमांद्वारे होणारं लैंगिकतेचं सवंग दर्शन मुलामुलींना लैंगिक जीवन लवकर सुरू करण्यासाठी उद्युक्त करतात. किशोरवयीन मुलं शारीरिकदृष्टय़ा शरीरसंबंधांसाठी तयार असली, तरी या विषयाला असलेले मानसिक व सामाजिक कंगोरे, तसंच त्यातून उद्भवणाऱ्या  जबाबदाऱ्या लक्षात घेता लैंगिक जीवन सुरू करण्यासाठी योग्य वयापर्यंत थांबणं, त्यासाठी आवश्यक संयम ठेवणंच व्यवहार्य आहे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. लैंगिक संबंध हे जबाबदार सामाजिक वर्तन म्हणून अपेक्षित असल्यामुळे लैंगिक शिक्षण ही केवळ पालकांची जबाबदारी म्हणून घराच्या चार भिंतींत सीमित, बंदिस्त ठेवण्याऐवजी ती शाळा, शिक्षक व एकूणच समाजानंही नेणतेपणानं स्वीकारणं आवश्यक आहे. मुलांनी भीतीपोटी, कुठल्याही आमिषापोटी वा ईष्य्रेपोटी लैंगिक संबंध ठेवू नयेत, हेदेखील त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. हाही लैंगिक शिक्षणाचा मोठाच पलू म्हणता येईल. कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीनं केलेले लैंगिक संबंध म्हणजे बलात्कार. या अनुषंगानं लैंगिक छळ आणि मोठय़ा प्रमाणावर घडणाऱ्या बाललैंगिक अत्याचारांचा प्रतिबंध कसा करायचा याचीही माहिती मुलांना देणं आवश्यक आहे.

किंबहुना योग्य वयात वैज्ञानिक दृष्टिकोनातून लैंगिक शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलामुलीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि सुसंस्कृत समाज म्हणून आपली जबाबदारीदेखील. मुलांना योग्य माध्यमांतून लैंगिकता शिक्षण मिळाल्यास ती अधिक संवेदनशीलपणे वागतील आणि भविष्यात अधिक जबाबदार नागरिक बनतील. शिवाय त्याचे इतरही अनेक फायदे अपेक्षित आहेत. उदा. मुलांना चोरटय़ा मार्गानं, अपूर्ण व चुकीची माहिती देणाऱ्या ब्लू-फिल्म्ससारख्या माध्यमांकडून लैंगिक शिक्षण घेण्याची गरज भासणार नाही.  लैंगिक संबंधांमुळे निर्माण होणाऱ्या जबाबदाऱ्यांबद्दल त्यांना शिक्षित केलं जाणार असल्यानं ते त्यांची नसíगक इच्छा, क्रेझ हाताळण्याचा मार्ग शोधतील. साथीदारांच्या दबावाला- ‘पीअर प्रेशर’ला बळी पडून गरकृत्य करण्यास धजावणार नाहीत. मुलं त्यांच्या लैंगिकतेचं योग्य व्यवस्थापन करण्यास शिकतील.  त्यांना जोडीदाराशी एकनिष्ठ राहण्याचं महत्त्व कळल्यानं ती आपोआप वेश्यागमन/ एकाहून अधिक लैंगिक जोडीदारांपासून दूर राहतील आणि एचआयव्ही/ एड्ससारख्या लैंगिक संबंधांद्वारे संक्रमित होणाऱ्या आजारांपासून सुरक्षित राहतील. अस्सल स्त्रोतांद्वारे शास्त्रीय माहिती मिळाल्यानं मुलं खोटय़ा जाहिराती आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून होणाऱ्या फसवणुकीला बळी पडणार नाहीत. यामुळे समाजाचाही मोठाच फायदा होईल.

तथापि हा बदल घडवून आणण्यासाठी लैंगिकता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी मुलांचे प्रश्न हाताळण्यासाठी आपलं ज्ञान व कौशल्यं यांच्याबरोबरीनं शंकानिरसनासाठी दृक्-श्राव्य साधनांचा सुयोग्य वापर करणं आवश्यक आहे. मुलामुलींना शिक्षित करण्यासाठी मोहन देस यांची ‘रिलेशानी’ ही कार्यशाळा, लीना मोहाडीकर, विठ्ठल प्रभू, प्रसन्न गद्रे, शंतनू अभ्यंकर, ज्योत्स्ना पडळकर, वैशाली देशमुख यांचं साहित्य आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन यांचा लाभ घेता येईल. मुलामुलींना आपली लैंगिकता योग्य पद्धतीनं हाताळण्याचा आत्मविश्वास मिळेल. जननसंस्थेच्या आरोग्याची आणि मुलांच्या मानसिकतेचीही काळजी घेतली गेल्यानं जीवनाला योग्य दिशा मिळेल. लैंगिकतेचं समाजभान मिळेल!

nalbaleminakshi@gmail.com