– डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजापुढचा ज्वलंत प्रश्न असलेल्या बाललैंगिक अत्याचारांच्या घटनांचं प्रमाण  वाढत असल्यामुळे त्याबाबत सर्वंकष प्रबोधनाची इच्छा मनात बाळगून हे सदर सुरू झालं होतं. या विषयाबद्दलची जागरूकता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनावी आणि हे गुन्हे घडूच नयेत यासाठी संवेदनशील दृष्टिकोन सामान्यजनांत निर्माण व्हावा, हीच अपेक्षा!

पुण्यातल्या गजबजलेल्या ससून रुग्णालयात अत्याचारग्रस्त मुलामुलींवर प्रत्यक्ष उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव गाठीशी असल्यानं या घटना टाळण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणं किती गरजेचं आहे हे मला कायम जाणवत आलं आहे. यातून जनसामान्यांच्या प्रबोधनासाठी ‘बाललैंगिक अत्याचार’ या विषयावर सदर लिहावं हा विचार कित्येक दिवस मनात घोळत होता. अधिकाधिक वाचकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे ही त्यामागची मुख्य प्रेरणा. याआधी मी वर्तमानपत्रांतून थोडंफार लेखन केलं होतं. मराठी-इंग्रजीतून पुस्तकंही प्रकाशित झाली होती. ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’च्या निमित्ताने ‘लोकसत्ता’शी परिचय झाला होता. त्यामुळे त्यांच्याकडेच विचारणा केली आणि ‘चतुरंग’चं व्यासपीठ माझ्यासाठी खुलं झालं.

सदराचा मुख्य उद्देश, ते का लिहावंसं वाटतं, वाचकांना त्यातून काय मिळणार आहे याबद्दल पहिल्या लेखात सविस्तर लिहिलं. सदर छापून येणार हे जाहीर झाल्यावर मी ती बातमी जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगितली. त्यांनी अभिनंदन केलं, शुभेच्छा दिल्या. काही सुहृदांनी कुठला संदर्भ/ मदत लागल्यास नक्की सांगा, असा दिलासा दिला. प्रिया साबणे-कुलकर्णी या ‘आर्क’ संस्थेसाठी काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीनं ‘तू खूप महत्त्वाचं काम करते आहेस. समाजबदलाच्या दृष्टीनं एक पाऊल नक्की पुढे जाता येईल अशी खात्री वाटते,’ अशा निसंदिग्ध शब्दांत पाठिंबा दर्शवला. वाचकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर पुढील दिशा अवलंबून होती. शासनसेवेत कार्यरत असल्यानं मला सदरासाठी वरिष्ठांची परवानगी घेणंही आवश्यक होतं, त्यामुळे तशी रीतसर परवानगी घेतली. मला वाचकांसमोर नेमकं काय ठेवायचं आहे याची स्पष्टता होती, एक दृष्टिकोन होता. वाचक हे सदर कसे स्वीकारतील, कसा प्रतिसाद मिळेल याबद्दल हुरहुर होती. पण प्रत्यक्षात हे लेख लिहिताना मलाही खूप शिकायला मिळालं, ज्ञानात भर पडली. या सदराच्या माध्यमातून एक नवीन अनुभव मिळाला, त्याबद्दल ‘टीम लोकसत्ता’चे मन:पूर्वक आभार.

नीलम गोऱ्हे, डॉ. अरुण गद्रे, दत्ताजी कोहिनकर यांनी पहिला लेख उत्तम झाल्याचं आवर्जून सांगितलं. माझा नवरा डॉ. शाम भोसले, सामाजिक कार्यकर्ती असलेली नणंद तनुजा शिपूरकर, परभणीचे मित्रद्वयी दाम्पत्य पूनम व मधुकर मोरे, हे माझे हक्काचे प्राथमिक वाचक. लिखाण झाल्यावर यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या, त्यानुसार बदल करायचे आणि पुढे जायचं हे एक ‘रुटिन’ बनलं. शिवाय काही बदल/ सुधारणा सुरूच असायच्या. मला जो अर्थ वाचकांपर्यंत पोहोचणं अभिप्रेत आहे तोच संपादकीय टीमकडून झालेल्या संपादनानंतर पोहोचतोय ना, याची खात्री करण्यासाठी सारा खटाटोप असायचा. नीलेश यांच्या समर्पक चित्रांनी लेखांना हवा तो उठाव दिला.

सर्वात जास्त महत्त्वाच्या ठरल्या त्या वाचकांच्या प्रतिक्रिया. पुढील लेख लिहिताना प्रतिक्रियांद्वारे येणाऱ्या सूचनांची खूपच मदत झाली. विचार अधिक प्रगल्भ झाले. मी स्वत: लेखिका म्हणून घडत गेले. ‘चतुरंग’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचता आलं. एक अतिशय उत्तम आणि गरजेचा निर्णय घेतल्याचा आनंद मी अनुभवत होते. हे करत असताना गेल्या काही वर्षांत इतर लेखकांकडून मी ठरवलेल्या विषयांवर लेखन झालंय का, याचीही चाचपणी करणं गरजेचं होतं. हे सदर लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांविषयी असल्यानं सर्व वाचकांना लागू न होणाऱ्या त्यातल्या तांत्रिक बाबी टाळण्यासंबंधीच्या सूचना होत्या. त्या पाळणं थोडं अवघड असलं, तरी एकूण पुरवणीचं स्वरूप पाहाता ते स्वीकारणं भाग होतं. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आल्या. या सदराच्या निमित्तानं त्यांच्यात आपापसांत या विषयावर चर्चा सुरू झाल्याचं त्यांनी आवर्जून कळवलं. पोलिसांतही या विषयाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी या लेखमालेचा उपयोग होतो आहे, हे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (पोलीस संशोधन केंद्र, पुणे) यांनी आवर्जून कळवलं. आय.ए.एस. सोनाली पोंक्षे- वळसंगकर, नीलम माणगावे, माधुरी तळवलकर, जयप्रकाशजी दगडे, डॉ. शंतनू अभ्यंकर, डॉ. हेमंत जोशी यांच्यासह बऱ्याच मान्यवरांच्या, सुज्ञ वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. वाचकांनी सुचवलेल्या काही मुद्दय़ांचा मी जमेल तिथे माझ्या लेखनात अंतर्भाव केला. तर काही वेळा विषयाचं बंधन असल्यानं तो करू शकले नाही. पण या सदराच्या माध्यमातून बाललैंगिक शोषणाच्या अतिशय महत्त्वाच्या, पण तितक्याच गंभीर, संवेदनशील विषयाला वाचा फोडता आली. तो तळागाळापर्यंत पोहोचवता आला. त्या निमित्तानं या विषयावर किमान काही घरांत, शाळांत चर्चेला सुरुवात झाली, पोलिसांच्या चर्चासत्रांत या लेखांचं वाचन होऊन त्यांच्यात जागृती निर्माण झाली, काही पालकांना आपल्या जबाबदारीची जाणीव झाली, अत्याचार टाळण्यासाठी समाजाच्या सक्रिय सहभागाची गरज अधोरेखित झाली, अशा प्रतिक्रिया मिळत होत्या. हे या सदराचं यशच म्हणावं लागेल. बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनीही या लेखमालेची नितांत गरज असून त्यातून प्रबोधन झालं, अशी पसंतीची पोचपावती दिली. त्याबरोबर आणखी काय काय करता येण्याजोगं आहे याची यादीदेखील दिली. ही यादी माझ्या पुढील वाटचालीसाठीच्या कृती कार्यक्रमाचा भाग बनावी यासाठी मी कायम आग्रही राहीनच. 

बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या वाढत्या संख्येबरोबरच त्यांची तीव्रताही वाढल्याचं आपण बघितलं. असं असलं, तरी समाज म्हणून बलात्कारी प्रवृत्तीकडं बघण्याच्या आपल्या धारणा काय आहेत, मानवी उत्क्रांतीच्या प्रवाहात बलात्काराचं स्वरूप कसं बदलत गेलं, याचाही आढावा मी सुरुवातीच्या लेखांत घेतला. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक- ‘पॉक्सो’ कायद्याची व्याप्ती, कोणकोणत्या कृतींचा ‘पॉक्सो’मध्ये अंतर्भाव होतो, कायद्याच्या अज्ञानामुळे आणि लैंगिकता शिक्षण न मिळाल्यानं किशोरवयीन मुलामुलींमध्ये प्रस्थापित होणारे लैंगिक संबंध, त्यांचा ‘पॉक्सो’च्या पलीकडे जाऊन अधिक समग्रतेनं विचार करण्याची गरज, याबद्दलही मी माझी मतं प्रांजळपणे मांडली. गुन्हे समजून घेण्याच्या अनुषंगानं अत्याचार करणाऱ्या व्यक्तींची मानसिकता, पार्श्वभूमी, सामाजिक परिस्थिती, याबरोबरच त्यांना गुन्हे करायला उद्युक्त करणाऱ्या तात्कालिक घटना, त्या घटनांचा त्यांच्या दृष्टीनं त्यांनी लावलेला अन्वयार्थ अशा सर्वच बाजूंचा आपण थोडक्यात विचार केला. विशिष्ट सामाजिक-आर्थिक-कौटुंबिक परिस्थितीतली मुलं अत्याचाराला बळी पडण्याचं प्रमाण जास्त असल्याचंही आपण बघितलं. लैंगिक अत्याचारासारखी आपत्ती बालपणात ओढवली, तर कोवळय़ा मनावर खोलवर जखमा होत असल्यानं या घटना दूरगामी परिणाम करणाऱ्या असतात. या आठवणी, त्याचे मनावर कोरले गेलेले व्रण, आयुष्यभर त्या मुलाला-मुलीला छळतात. मुलाच्या वाढीवर आणि सर्वागीण विकासावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मुळात मुलांवर असे आघात होणारच नाहीत, यासाठीही आपण दक्ष असणं गरजेचं आहे हे आपण पाहिलं. कायदा अधिक बालकेंद्री झाला असला, तरी समाज म्हणून आपल्याला अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे हे समजून घेतलं. अशा घटनांना आळा घालण्यासाठी, भविष्यातले संभाव्य गुन्हे टाळण्यासाठी हे प्रयत्न आवश्यक आहेतच. त्याखेरीज घटना घडल्यावर पोलीस ठाण्यात प्रकरणाची तात्काळ नोंद करणं का आवश्यक आहे, वैद्यकीय तपासणीची योग्य पद्धत, या प्रकरणांमधला महत्त्वाचा दुवा असणाऱ्या प्रयोगशाळेतल्या विविध चाचण्यांचं महत्त्व, न्यायवैद्यकीय अहवालाचं महत्त्व याबद्दलही सखोल माहिती आपण घेतली. प्रत्येक मुलाला आणि कुटुंबीयांना समुपदेशन सुविधा उपलब्ध होणं अत्यावश्यक असल्याचं मी या सदरातून पुन:पुन्हा मांडलं.   

  करोनाच्या काळातले न्यायप्रविष्ट ‘पॉक्सो’ खटले, समिलगी नातेसंबंध आणि पॉक्सो, किशोरवयातल्या मुलामुलींसाठी लैंगिकता आणि नैतिकता शिक्षणाची सांगड घालणाऱ्या विशेष कार्यक्रमाची गरज, अशी प्रकरणं हाताळण्यात पोलीस, रुग्णालयं, न्यायव्यवस्था यांच्या भूमिका, साक्षीदार म्हणून डॉक्टरांची भूमिका, पुण्यासारख्या ‘स्मार्ट सिटी’तही बलात्कारपीडित स्त्रिया आणि मुलामुलींना सर्व सुविधा एकाच छत्राखाली पुरवणाऱ्या ‘वन स्टॉप सेन्टर्स’ची वानवा, त्यांची आत्यंतिक निकड (पोलीस कक्षातील ‘भरोसा सेल’ तसंच महिला व बालकल्याण विभागाच्या संकेतस्थळानुसार कागदोपत्री पुण्यात दळवी रुग्णालयात ‘वन स्टॉप सेन्टर्स’ सुरू असली, तरी प्रत्यक्षात ती उषा मेहरा आयोगानं केलेल्या शिफारशींच्या जवळपासही न जाणारी, अतिशय तोकडय़ा, प्राथमिक स्वरूपाची आहेत) यांचा प्रकाशित लेखांत शक्य तिथे जरूर उल्लेख केला आहे.

हे सदर समाप्त करताना वाचकांना एकच विनंती आहे, गेले सहा महिने आपण ज्या सामाजिक बांधिलकी, समाजभान, लिंगसमानता, लैंगिकता शिक्षण, सामाजिक पालकत्व, सजगता या बाबींबद्दल बोललो, त्या केवळ शब्दकोशात बंदिस्त न राहाता, आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनाव्यात. आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात लहान मुलांची सुरक्षितता ही आपली प्राथमिकता बनावी, ते आपल्या जीवनातले परवलीचे शब्द बनावेत.

बाललैंगिक शोषणाच्या समस्येचं व्यापक स्वरूप समजल्यानं या घटना टाळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत. गुन्ह्यांना प्रतिबंध करणं ही एक चळवळ बनावी. त्यासाठी सगळय़ांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं नितांत गरजेचं आहे. त्या दृष्टीनं होणारे सर्व लहानमोठे प्रयत्न सदर लिहिण्याचा उद्देश सफल झाल्याचे द्योतक आहेत असंच मी समजेन..

nalbaleminakshi@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vednecha hunkar author dr minakshi nalbale bhosale sensitive attitude ysh
First published on: 25-06-2022 at 00:08 IST