– डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले

लैंगिक अत्याचारासारखी आपत्ती बालपणात ओढवली तर कोवळय़ा मनावर खोलवर जखमा होतात. हा नकोसा अनुभव वाटय़ाला आलेलं मूल त्या भळभळत्या जखमा घेऊनच मोठं होतं. या घटना दूरगामी परिणाम करणाऱ्या असल्यानं मुळात मुलांवर असे आघात होणारच नाहीत, यासाठी आपण कायम दक्ष असणं गरजेचं आहे. शिवाय घटना घडल्यावर ती न दडपता पीडित मुलामुलीला योग्य मानसोपचार मिळणं, योग्य पद्धतीनं समुपदेशन होणं आवश्यक आहे. त्यामुळे मनावर झालेली जखम भरून येण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकेल.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन

जेमतेम आठ वर्षांचा वरद. पुण्याच्या मध्य भागातल्या एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारा. आई-वडील स्वत:च्या व्यवसायात व्यग्र. तो राहायचा त्या सोसायटीत काम करणाऱ्या एका वॉचमननंच त्याच्यावर अत्याचार केले होते. ते कळल्यावर त्याचे आईवडील पुरते गोंधळून गेले. आपल्या मुलाच्या बाबतीत असं काही विपरीत घडेल याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. वरदसाठीही हा मोठाच धक्का होता. त्यालाही दीर्घकाळ समुपदेशनाची गरज लागणार होती. 

  मूल जन्माला येतं ते स्वत:चं, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घेऊनच. त्याचं पालनपोषण करणं, योग्य ते संस्कार देणं, त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ व्यवस्थित होईल हे बघणं, हे पालकांचं आणि रक्षणकर्त्यांचं आद्य कर्तव्य मानलं जातं. हे अनेकांना पटतंही. परंतु या जबाबदारीबद्दल सजगपणे विचार केला जात नाही. मुलांच्या मनाला इजा पोहोचू नये, मूल दुखावलं जाऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणंही अनेकांच्या आवाक्याबाहेरचं असतं. खरं तर मन हा मुळात दृश्य रूपातला अवयव नाही. मनाचं अस्तित्व शरीरात कुठे दडलंय, आपल्या आहार-विहार-विचारांत त्याचं नेमकं योगदान किती आणि कसं, याबाबत बरेच मतप्रवाह आहेत. त्याविषयी परिपूर्ण माहिती मिळायलाही बराच काळ लागेल. पण मनावर आघात झाल्यावर दिसणारे विपरीत परिणाम आपल्याला मनाच्या अस्तित्वाबद्दल आणि भूमिकेबद्दल खोलात जाऊन विचार करायला भाग पाडतात.

आपली जनुकं किंवा मेंदूतली रसायनं, जबर शारीरिक आघात वा बाललैंगिक शोषणासारखे जीवनानुभव आणि मानसिक आरोग्य समस्यांचा कौटुंबिक इतिहास आपल्या मानसिक आरोग्यासाठी जबाबदार मानले जातात. मनावर होणाऱ्या या जखमांमुळे मनाच्या आरोग्याला बाधा पोहोचते. याचा त्या व्यक्तीच्या मन:स्थितीवर, विचारसरणीवर, वागणुकीवर आणि एकूणच नातेसंबंधांवर परिणाम होतो. आजच्या धकाधकीच्या, गतिमान युगात टिकाव लागायचा असेल, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण शारीरिक तसंच मानसिकदृष्टय़ा निरोगी असणं आवश्यक आहे. सारासार विचार करणं, एकमेकांशी संवाद साधणं, भावना व्यक्त करणं, उपजीविकेसाठी कष्ट करणं आणि जीवनाचा आनंद घेणं, या माणूस म्हणून असलेल्या आपल्या मूलभूत क्षमता जोपासण्यासाठीही आपलं मानसिक आरोग्य अबाधित राहणं अगत्याचं आहे. यासाठी जाणीवपूर्वक मनाची मशागत करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी पीडित मुलामुलींना वेळीच मदत करणं आवश्यक ठरतं.

सी. हेन्री केम्पे या मुलांच्या शारीरिक शोषणाबद्दल जागरूकता निर्माण करणाऱ्या प्रख्यात डॉक्टरांनी १९७७ मध्ये बाललैंगिक शोषणावर ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स’मध्ये व्याख्यान दिलं होतं. या व्याख्यानामुळे बाललैंगिक शोषणाच्या विषयाकडे आधुनिक वैद्यकीय समुदायाचं लक्ष वेधलं गेलं. लैंगिक शोषणाच्या बळींची काळजी घेण्यासंबंधी, त्यांच्यावरच्या समग्र उपचारांसंबंधी (शारीरिक आणि मानसिक) एक महत्त्वपूर्ण वळण मिळालं. डॉक्टरांना त्यांच्यावर असलेल्या अतिजबाबदारीची जाणीवही काही प्रमाणात झाली. शिवाय गेल्या अनेक दशकांमध्ये झालेलं संशोधन, काही ‘उच्च-प्रोफाइल’ प्रकरणं आणि अनिवार्य रिपोर्टिगमुळे बाललैंगिक शोषणाचं व्यापक स्वरूप, त्यामुळे उद्भवणारे मानसिक परिणाम अधिक ठळकपणे समोर येण्यास मदत झाली. सद्यस्थितीत बाललैंगिक शोषणाच्या जवळजवळ ७० ते ८० टक्के प्रकरणांमध्ये मुलांच्या मनावर आघात झालेला आढळतो. त्यांच्यात मनोवैज्ञानिक लक्षणं आणि वर्तणूकविषयक समस्या दिसून येतात, हे वेगवेगळय़ा संशोधनानं आपल्यासमोर येतं. मुलांच्या चेतना, संवेदना, स्मरणशक्ती या शिकण्यासंबंधीच्या आणि पर्यावरणाच्या आकलनाच्या क्रियांमध्ये व्यत्यय येतो. मेंदूचं कार्य आणि विकासावर विपरीत परिणाम होतो. बौद्धिक क्षमतेचा विकास खुंटतो. भावनिक बधिरपणा येतो. समवयस्कांपासून दूर गेल्याची भावना बळावते. त्यामुळे सामाजिक अभिसरणास मोठीच बाधा पोहोचते. मार्टिन आणि फ्लेिमग (१९९८, रिव्ह्यू आर्टिकल) यांच्या मते, ‘बहुतेक प्रकरणांमध्ये बाललैंगिक शोषणामुळे होणारं मूलभूत नुकसान हे मुलांच्या विश्वास, आत्मीयता, नेतृत्वगुण आणि निकोप लैंगिकता या क्षमता विकसित होण्यात अडथळे आणतं’.

बाललैंगिक शोषणाला सामोरं गेलेल्या मुलांमध्ये एकलकोंडेपणा, स्वत:च्या कोषात राहणं, विशिष्ट व्यक्तीला, परिस्थितीला टाळणं, अन्न-पाणी वर्ज्य करणं किंवा अतिसेवन, झोपेत दचकून उठणं, इतर मुलांत न मिसळणं, शू-शीवरचं नियंत्रण गमावणं, अभ्यासात, नवीन गोष्टी शिकण्यात रस नसणं, चिडून प्रतिक्रिया देणं आदी लक्षणं आढळतात. थोडय़ा मोठय़ा मुलांमध्ये ‘बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ (भावनिक अस्थिरता, आत्मसन्मानाचा अभाव, असुरक्षितता, दुबळे सामाजिक बंध), ‘डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर’ (स्मृतिभ्रंश, अस्पष्ट स्वओळख), ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’ किंवा ‘कॉम्प्लेक्स पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’ या व्याधी जडू शकतात. ‘बुलिमिया नर्वोसा’सारखे खाण्याचे विकार, झोपेचे विकार, अमली पदार्थाचं सेवन, नातेसंबंध प्रस्थापित करण्यात आणि त्यात सातत्य राखण्यात अडचणी येतात. समवयस्कांवर विश्वास ठेवण्यासही ती सहजपणे तयार होत नाहीत. तीव्र स्वरूपाचं नैराश्य असेल तर अशा काही प्रकरणांमध्ये आत्महत्येचाही धोका संभवतो. मुलांची स्वत:ची मनोवैज्ञानिक पूर्वस्थिती, कौटुंबिक वातावरण आणि आघाताचा प्रकार, हे मूल त्या घटनेला कशी प्रतिक्रिया देतं यावर परिणाम करतात.

आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे प्रौढ वयातल्या व्यक्तींमध्ये दिसणाऱ्या अनेक मनोशारीरिक आजारांचं मूळ बालवयात त्यांच्या वाटय़ाला आलेल्या हिंसाचारात, लैंगिक शोषणात दडलेलं असतं. थोडक्यात, या आघातामुळे मनावर झालेल्या जखमा आयुष्यभर त्या मुलाला-मुलीला छळतात. आपण कल्पनाही करू शकत नाही, इतके खोलवर परिणाम या घटनांमुळे झालेले दिसून येतात. चिंताविकार, भयानक स्वप्नं, भीती, नैराश्य, वर्तणुकीतला बदल, शिकण्याच्या प्रक्रियेतल्या समस्या, ढासळलेला आत्मविश्वास, अयोग्य लैंगिक वर्तन इत्यादी समस्या सामान्यत: आढळतात. प्रत्यक्ष शरीरसंबंध किंवा संभोगाचा प्रयत्न झाला असल्यास किंवा बळाचा, जबरदस्तीचा वापर करून, धमक्या देऊन, आक्रमक पद्धतीनं आघात झालेला असल्यास वा तो वारंवार घडल्यास मनोविकारांची शक्यता अधिक वाढते. शिवाय मुलांचं वय, लिंग, गैरवर्तन करणारा जवळचा नातेवाईक आहे किंवा कसं, यावरही परिणामांची व्याप्ती अवलंबून असते. बालपणात लैंगिक शोषण झालेली काही मुलं पुढे गुन्हेगारी कृत्यात सामील होताना दिसतात, तर मुलींमध्ये आरोग्यविषयक समस्या अधिक प्रमाणात दिसून येतात.      

बाललैंगिक शोषणाच्या घटनांशी निगडित सामाजिक कलंक त्या कुटुंबाला आणखी अडचणीत आणतो. मुलांना पोहोचलेली मानसिक हानी त्यामुळे अधिकच वाढते. अशा प्रसंगी पालकांचा प्रतिसाद, त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. मुलांना अनुकूल प्रतिसाद मिळणं, पालकांचा आश्वासक आधार मिळणं, सुरक्षित वाटणं, यामुळे मानसिक परिणामांची तीव्रता कमी होते हे संशोधनानं सिद्ध केलं आहे. ज्याप्रमाणे लैंगिक शोषणाच्या उलगडय़ानंतर मिळणारा हा आधार मानसिक लक्षणांच्या प्रकटीकरणामध्ये भूमिका बजावतो, तसंच उपचारांच्या परिणामकारकतेवरही त्याचा प्रभाव पडतो हेही आता आपल्याला ठाऊक झालंय. त्यामुळे पालकांनी हा एक अपघात समजून, धक्का, शोक वा क्रोध व्यक्त करण्याचं टाळून या कठीण प्रसंगाला अतिशय खंबीरपणे सामोरं जाणं आवश्यक आहे.

मात्र बहुतेक प्रकरणांमध्ये मुलामुलींना असा प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी आपल्यावर झालेल्या गैरप्रकाराबद्दल पालकांना वा इतर व्यक्तींना माहिती दिल्यावर त्याच्याकडे कानाडोळा, दुर्लक्ष केलं जातं. मुलालाच दोष दिला जातो किंवा त्याच्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला जातो. त्यामुळे मूल अधिकच भांबावून जातं. अशा कसोटीच्या काळात ‘घडलेल्या घटनेत तुझी काहीही चूक नाही, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आमचं तुझ्यावर प्रेम आहे,’ असा आधार मुलाला/ मुलीला मिळाला, तर मूल आणखी काही महत्त्वपूर्ण माहिती, तपशील स्वत:हून उघड करेल. शिवाय या प्रसंगातून त्याला लवकर सावरायला मदत होईल. मात्र काही मुलांसाठी हा अनुभव त्रासदायक आणि लज्जास्पद असू शकतो. योग्य प्रतिसाद न मिळण्यास, पालकांबद्दल विश्वास न वाटल्यास वा जवळच्या व्यक्तीला इजा करण्याची धमकी देऊन गुन्हा केलेला असल्यास मूल त्याबद्दल माहिती देणं टाळू शकतं. अशा वेळी मुलामुलींच्या वर्तनात काही बदल आढळल्यास समुपदेशकांची मदत घ्यावी. त्यामुळे मूल बोलतं होण्यास मदत होऊ शकते. नेमकं काय घडलंय हे स्पष्ट होण्यासाठी काही वेळा समुपदेशकांकडून विविध खेळांचा, आकृत्यांचा, बाहुल्यांचा वापर केला जातो.

बाललैंगिक शोषणाच्या घटनांसंबंधी जाणवणाऱ्या आणखी काही अडचणी म्हणजे प्रत्यक्ष साक्षीदारांच्या अभावामुळे या प्रकारांबाबत असणारी एकूणच गुप्तता आणि साशंकता, मुलांची असहाय्यता, बऱ्याच वेळा कुटुंबातल्या आणि अधिकारपदावरच्या व्यक्तींकडून होणारं लैंगिक शोषण, कुटुंबाच्या इभ्रतीला बसणाऱ्या धक्क्यामुळे गुन्हा नोंदवण्यात केली जाणारी टाळाटाळ, मुलांकडचा शब्दसंपदेचा अभाव,  मुलाला/ मुलीला फूस लावून, भरीस पडून शोषण करणं. शिवाय ‘मोठय़ा व्यक्तींना नकार देणं आपल्या संस्कृतीत बसत नसल्याची’ शिकवण मिळालेलं मूलं काही वेळा त्रास होत असला तरी मूग गिळून गप्प बसतं. मग मनावर झालेल्या जखमांचे परिणाम विपरीत वर्तनातून प्रकट होतात. अशी घटना कोणाच्याही बाबतीत घडू शकते. यावेळी तोल ढळू न देता आलेल्या प्रसंगाला धीरानं सामोरं जाणं आवश्यक आहे. मुलांवर विश्वास दाखवणं गरजेचं आहे. शिवाय अत्याचाराच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, इतर मुलांवर त्या आरोपीकडून अत्याचार होणार नाहीत, याबाबतही काळजी घेणं अनिवार्य आहे.

मुलांना या धोक्याबाबत शिक्षित केल्यास, या परिस्थितीत काय करायचं याचं प्रशिक्षण दिल्यास घटना लवकर उघडकीस येईल आणि मुलांवर वेळेत उपचार करणं शक्य होईल. शिवाय आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेबद्दल सारासार विचार करून योग्य निर्णय घेणं, जवळची व्यक्ती असली तरी दुष्कृत्य करायचा प्रयत्न केल्यास त्याला ठामपणे नकार देणं, हेदेखील मुलामुलींना शिकवायला हवं.

शरीरावर झालेली जखम भरून येते तेव्हा त्याचा व्रण शरीरावर राहतो. हा निसर्गनियम मनावरच्या जखमेलाही लागू होतो. मात्र हा अदृश्य स्वरूपाचा असल्यानं आपल्या नजरेसमोर येत नाही. वेगवेगळय़ा मनोशारीरिक लक्षणांच्या रूपात तो प्रकट होतो. हा घाव जितक्या लवकर भरेल, जितका हा व्रण अंधूक, धूसर होईल, तितक्या लवकर मूल सावरेल. त्याच्या जीवनावश्यक क्षमता विकसित होतील. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यास मुलांच्या कोवळय़ा मनावर उमटलेले ओरखडे मुलांचं पूर्ण आयुष्यच व्यापून टाकतील. हे टाळण्यासाठी मुलांना प्रशिक्षित आणि सक्षम करणं ही काळाची गरज आहे.

nalbaleminakshi@gmail.com