– डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले

ज्याप्रमाणे विशिष्ट परिस्थितीतील माणसं गुन्हे करायला प्रवृत्त होतात, त्याप्रमाणेच सामान्यत: विशिष्ट सामाजिक-आर्थिक-कौटुंबिक गटांमधील मुलं अधिक प्रमाणात अत्याचाराला बळी पडतात, हे संशोधनातून सिद्ध झालं आहे. बाललैंगिक शोषणाचा विचार करताना गुन्हा घडण्यासाठी गुन्हेगारी वृत्तीची व्यक्ती आजूबाजूला असणं, अतिजोखमीच्या गटातली मुलं तिच्या नजरेत भरणं आणि अत्याचार करण्यासाठी हवी ती परिस्थिती उपलब्ध होणं, या तिन्ही गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्यामुळे प्रतिबंधासाठी या सर्व पातळय़ांवर काम होणं आवश्यक आहे.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

दहा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांचा मुलगा या दोघांवरही दारूच्या नशेत असलेल्या वडिलांकडूनच अत्याचार झाल्यानं तपासणीसाठी त्यांना ‘ससून’ रुग्णालयात दाखल केलं होतं. मुलगा एका वॉर्डात, तर मुलगी दुसऱ्या. शिवाय नवराच यात गुंतलेला असल्यानं पोलिसांत प्रकरण दाखल करून मुलांची आई आपल्या वडिलांच्या सोबतीनं सगळं निभावत होती. जेमतेम पस्तिशीची, फीट/ मिरगीसाठी औषधं घेणारी सुनंदा आपल्या संसाराची राखरांगोळी झालेली हताशपणे पाहात होती. मुलांच्या भावविश्वाच्या तर चिंधडय़ाच उडाल्या होत्या. आमच्याकडे आलेली अशी प्रकरणं हाताळताना मुलांमध्ये अत्याचारविरोधी जागरूकता निर्माण करण्याची गरज अधिक तीव्रतेनं अधोरेखित होते.  

 जन्माला आलेलं प्रत्येक मूल वेगळं असतं. ते स्वत:बरोबर आपले ठरावीक गुणधर्म घेऊनच जन्माला येतं. मुलांचे जीन्स (जनुकं) त्यांच्या वर्तनाला आकार देतात. मूल वातावरणाची निवड कशी करतं, इतरांना कसा प्रतिसाद देतं, वातावरणातल्या बदलांना कुठल्या पद्धतीनं सामोरं जातं, यावर जीन्स प्रभाव टाकतात. मेंदूच्या विकासातही त्यांची भूमिका महत्त्वाची असते. याबरोबरच घरातलं, परिसरातलं वातावरण, शाळेत आणि आजूबाजूच्या परिसरातून मिळणारं शिक्षण, सामाजिक-आर्थिक परिस्थिती, पालकांकडून मिळणारं प्रोत्साहन, उपलब्ध संसाधनं यावर त्यांची पुढील दिशा अवलंबून असते. क्षमता प्रत्येक मुलात असली, तरी पोषक वातावरण सर्वाना मिळतंच असं नाही. यात पालकांच्या परिस्थितीचा, शैक्षणिक पार्श्वभूमीचा, सामाजिक स्थितीचाही प्रभाव पडतो. लहान वयात मुलांना लैंगिक अत्याचाराच्या घटनेला सामोरं जावं लागलं, तर त्यांच्या भावविश्वाला मोठा हादरा बसतो. या एका घटनेनं त्यांच्या आत्मविश्वासाला कायमचा तडा जाऊ शकतो.

 सध्याच्या काळात बाललैंगिक शोषण ही  सार्वत्रिक समस्या असून घरं, शाळा, अनाथाश्रम, तात्पुरत्या निवासी सुविधा, रस्त्यावर, कामाच्या ठिकाणी, तुरुंगात, कुठेही ते होऊ शकतं. मात्र हानीपासून संरक्षण, आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्याचा आणि स्वत:ची पूर्ण क्षमता साध्य करण्याचा (विकासाचा) हक्क, हे मानवी जीवनाचे मूलभूत अधिकार आहेत. मुलांचे हे हक्क अबाधित राहावेत यासाठी भारतानं १९९२ मध्ये बाल हक्कांवरील संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. शिवाय भारत सरकारनं मुलांवरील लैंगिक शोषण रोखण्यासाठीची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर निर्धारित केली आहे. गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी, निधीची कमतरता आणि समाजातील काही कुप्रथा, अंधश्रद्धा, यांसारख्या समस्यांमुळे, तसंच अत्यंत गरीब कुटुंबातले पालक उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवण्याच्या हेतूनं आपली मुलं विकतात. अनेकदा या मुलांचं शारीरिक शोषण होत असतं. मुलांवरील लैंगिक हिंसा, बाल वेश्याव्यवसाय, बाल तस्करी आणि बाल पोर्नोग्राफी यासाठी या मुलांचा वापर होतो. सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत अनेक किशोरवयीन मुलं ऑनलाइन बाललैंगिक शोषण सामग्री तयार करणं आणि विकणं किंवा पैशांच्या लोभापायी ‘लाइव्ह स्ट्रीम’ लैंगिक कृत्यांमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त होत आहेत, असं निरीक्षण आहे. ‘इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स’च्या ‘आयसीएएनसीएल’ ग्रुपनं, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन’च्या सहकार्यानं स्थापन केलेल्या ‘इंडियन चाइल्ड प्रोटेक्शन मेडिकल प्रोफेशनल्स नेटवर्क’ या अभ्यास गटाचं हे करोनाकाळातल्या परिस्थितीतलं निरीक्षण आहे. मात्र हे सर्व दखलपात्र गुन्हे असल्यानं आणि त्यामुळे मूलभूत मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्यानं याविरोधात काम होणं गरजेचं आहे. उत्क्रांतीच्या प्रवाहात आणि एकूणच जगण्याच्या शर्यतीत स्वत:चा बचाव करताना ‘सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हे सर्वमान्य सूत्र आहे. हे बाल लैंगिक शोषणाच्या बाबतही लागू होतं. जे मुळात शोषित, वंचित कुटुंबातील आहेत, ते बाल लैंगिक शोषणाला बळी पडण्याची शक्यता अर्थातच अधिक आहे. बेल्स्की आणि व्होन्द्रा यांच्या १९८९ मधील संशोधनानं बाल लैंगिक शोषणाच्या जोखमीशी संबंधित चार प्रमुख वर्ग ओळखले आहेत. यात लोकसंख्याशास्त्रीय घटक, कौटुंबिक नातेसंबंध, पालकांची वैशिष्टय़ं आणि मुलांची वैशिष्टय़ं इत्यादींचा समावेश होतो. जे ब्राउन आणि सहकाऱ्यांनी ‘चाईल्ड अ‍ॅब्युज अँड निग्लेक्ट’ या मासिकात १९९८ मध्ये मुलांशी गैरवर्तन आणि बाल लैंगिक शोषणाशी निगडित जोखीम घटकांच्या १७ वर्षांच्या अभ्यासाच्या निष्कर्षांचं विश्लेषण केलं आहे. त्यांच्या विश्लेषणानुसार खालीलप्रमाणे हाय रिस्क वा अतिजोखीम घटक बाल लैंगिक शोषणाशी लक्षणीयरीत्या संबंधित होते- 

१) लोकसंख्याशास्त्रीय घटक- कुमार वयातील मातृत्व, जैविक पालकांचा मृत्यू 

२) कौटुंबिक जोखीम घटक- आईचं असामाजिक वर्तन, आयुष्यावर थेट परिणाम करणारी नकारात्मक घटना, मुलांना दिली जाणारी कठोर शिक्षा, सावत्र वडिलांची उपस्थिती  

३) पालकत्वाशी निगडित जोखीम घटक- नकोशा गर्भधारणेतून जन्मलेली मुलं 

४) बालकाशी संबंधित जोखीम घटक- अपंग मुलं, नकोशी मुलगी 

मुलग्यांपेक्षा मुली, अपंग मुलं, जैविक पालक नसलेली मुलं आणि सावत्र पित्याबरोबर राहणाऱ्या मुलांना लैंगिक शोषणाचा धोका अधिक असतो, हे यातून लक्षात आलं. या संशोधनातला आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष असा होता, की जोखीम घटकांची संख्या जसजशी वाढत गेली, तसतसं बाल लैंगिक शोषण होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढली. कोणतेही जोखीम घटक नसताना ३ टक्के असलेलं प्रमाण, चार किंवा अधिक जोखीम घटक असल्यास २४ टक्क्यांपर्यंत वाढतं, हा यातून निघालेला निष्कर्ष धक्कादायक आहे.

लैंगिक शोषणाचा मुलग्यांपेक्षा मुलींना जास्त धोका असल्याचं या संशोधनात सातत्यानं दिसून आलं आहे. शिवाय, जैविक पालकांबरोबरच्या नातेसंबंधात दुरावा आल्यास मुलींच्या लैंगिक शोषणाच्या जोखमीत वाढ होते असंही यातून दिसून आलं.  आजूबाजूला असुरक्षित वातावरण असल्यास आणि पालक अर्थार्जनासाठी/ कामाच्या निमित्तानं घराबाहेर पडत असल्यास मुलामुलींच्या लैंगिक शोषणाची जोखीम वाढते. ज्या पालकांचं त्यांच्या स्वत:च्या बालपणात शोषण झालं होतं, ते त्यांच्या मुलांवर अत्याचार करण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. मात्र त्यांचं वेळेत समुपदेशन झालं, उपचार मिळाले, तर या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी होते, असाही निष्कर्ष काढला गेला. याखेरीज पालकांमधील व्यसनाधीनता, अमली पदार्थाचं सेवन, वैवाहिक जीवनातील विसंवाद, पालकांमध्ये दीर्घकालीन शारीरिक वा मानसिक आजार, मोठय़ा आकाराचं कुटुंब, पालकांवरील अतिरिक्त ताणतणाव, त्यांचे एकमेकांशी ताणलेले संबंध, पालकांचं प्रेम, वात्सल्य न लाभणं, एकल पालकत्व, मुलाच्या जन्माच्या वेळी आईचं किंवा दोन्ही पालकांचं वय कमी असणं, पालक अशिक्षित असणं, गंभीर शारीरिक वा मानसिक आजार, चिडखोरपणा, आक्रस्ताळेपणा, ‘अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर’सारख्या समस्या, हीदेखील अत्याचाराला बळी पडण्याची काही कारणं आहेत. 

ओळखीतल्या किंवा कुटुंबातल्या व्यक्तींकडून मुलांचं लैंगिक शोषण होण्याचं प्रमाण ६० ते ७० टक्के इतकं आहे. मुलांचं लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशानं कुटुंबाबाहेरील किंवा नात्यातल्या व्यक्तींनी मुलांशी मैत्री करणं, कधी कधी कुटुंबातल्या इतर व्यक्तींशी भावनिक संबंध स्थापित करणं, मुलामुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं, (विशिष्ट प्रसंग नसताना) मुलाला वारंवार, सहेतुक (लैंगिक शोषण करण्याच्या हेतूनं) भेटवस्तू देणं, अशा मार्गाचा अवलंब केला जातो. याला ‘ग्रुमिंग’ म्हणतात. मुलांची तस्करी, बाल वेश्याव्यवसाय किंवा बाल पोर्नोग्राफीची निर्मिती यांसारख्या विविध बेकायदेशीर व्यवसायांमधल्या सहभागासाठी अल्पवयीन मुलांना प्रलोभन दाखवण्यासाठी ग्रुमिंगचा वापर केला जातो. मात्र काही संस्कृतींत या गोष्टी नजरेआड केल्या जातात. अगदी सामान्य समजल्या जातात. घरातल्या, नात्यातल्या व्यक्तीकडून मुलाचं/ मुलीचं शोषण झाल्यास, कुटुंबाच्या इभ्रतीला धोका पोहोचू नये म्हणून या घटना दाबण्याचाच प्रयत्न केला जातो. शिवाय अधिकारपदावरील व्यक्तीला मुलांचं शोषण करण्याचा हक्कच आहे, असंही काही जण गृहीत धरतात. बाल लैंगिक शोषणामुळे मुलांच्या विश्वास, आत्मीयता आणि निकोप लैंगिकता या क्षमतांच्या विकासावर विपरीत परिणाम होतो. कौटुंबिक सदस्यांद्वारे, विशेषत: पालकांकडून होणाऱ्या लैंगिक शोषणामुळे अधिक गंभीर आणि दीर्घकालीन मानसिक आघात होऊ शकतो. त्यामुळे या घटना टाळण्यासाठी सातत्यानं प्रयत्न व्हायला हवेत.

या अनुषंगानं आर.एम. होम्स आणि एस. टी. होम्स यांनी २००२ मध्ये बाल लैंगिक गुन्हेगारांच्या मनोवैज्ञानिक प्रोफाइलच्या आधारावर केलेल्या पुढील वर्गीकरणातील वैशिष्टय़ांचाही उपयोग संभाव्य पीडित बालकांचं संरक्षण आणि बाल लैंगिक अत्याचारविरोधी प्रबोधन करण्यासाठी करून घेता येईल. या वर्गीकरणानुसार काही गुन्हेगारांना प्राधान्यानं लहान मुलांमध्येच लैंगिक स्वारस्य असतं, तर इतर काही जण तणावपूर्ण परिस्थितीत पर्याय म्हणून मुलांचा वापर करतात. नैतिकदृष्टय़ा अविवेकी गुन्हेगार कायम लैंगिक व्यवहारांबाबत विचलित आणि एकूणच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. तर काही जण प्रौढांशी शारीरिक संबंध ठेवण्यात मानसिकदृष्टय़ा पुरेसे सक्षम नसल्यानं आपली गरज शमवण्यासाठी मुलांवर अत्याचार करतात. मुलं निरागस असतात आणि सहज गळाला लागतात, याचा फायदा उठवला जातो. काही दु:खी आणि हिंसक प्रवृत्तीच्या व्यक्ती ओळखीतल्या मुलांपेक्षा अनोळखी मुलांना लक्ष्य करतात. ‘पिडोफिलिया’ या विकारानं ग्रस्त प्रौढ किंवा किशोरवयीन तरुण लैंगिकदृष्टया लहान (प्रीप्युबसंट) मुलांकडे आकर्षित होतात. हे आकर्षण असलेल्या व्यक्तीला ‘पिडोफाइल’ म्हणतात. मात्र, सर्वच पिडोफाइल्स मुलांच्या लैंगिक शोषणात गुंतलेले नसतात. विशेषत: समुपदेशनानं आणि उत्तेजित अवस्थेत आवेग नियंत्रण कसं करायचं याचं ज्ञान मिळाल्यास संभाव्य गुन्हा टाळता येतो.

कुठलाही गुन्हा घडण्यामागे गुन्हेगाराची मानसिकता (प्रेरणा), तो विचार अमलात आणण्यासाठी त्यानं केलेली पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष गुन्ह्याची कृती यांचा समावेश होतो. बाल लैंगिक शोषणाचा विचार करताना गुन्हा घडण्यासाठी गुन्हेगारी वृत्तीची व्यक्ती आजूबाजूला असणं, अतिजोखीम गटातील मुलं तिच्या नजरेत भरणं आणि अत्याचार करण्यासाठी हवी ती परिस्थिती उपलब्ध होणं, या तिन्ही गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्यामुळे प्रतिबंधासाठी या सर्व पातळय़ांवर काम होणं आवश्यक आहे. आतापर्यंत आपण गुन्हेगारांच्या मानसिकतेचा, पार्श्वभूमीचा विचार केला. प्रस्तुत लेखात मुलांशी आणि त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीशी संबंधित घटकांची माहिती घेतली आहे. त्यामुळे पुढील काळात ‘हाय रिस्क’ गटांतल्या मुलांवर आपले प्रयत्न केंद्रित झाले, तर थेट प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढल्यानं ते अधिक फलदायी ठरतील असं वाटतं.

nalbaleminakshi@gmail.com