निरोप.. आणि आरंभ

आध्यात्मिक लिखाण गेली वीसेक वर्ष माझ्याकडून लिहिलं जात आहे.

आध्यात्मिक लिखाण गेली वीसेक वर्ष माझ्याकडून लिहिलं जात आहे. पण ‘फॅन्ड्री’ चित्रपटावरील लेख वगळता ‘चैतन्य प्रेम’ या दीक्षानामानं अन्य काही लिखाण मला साधलेलं नाही. ‘विचार पारंब्या’ हा त्याला अपवाद! माझ्या नियमित वाचकांना हे लिखाण नेहमीच्या लिखाणाइतकं भावलं नाही हे खरं, पण जे नेहमीचं निव्वळ आध्यात्मिक सदर वाचत नव्हते ते त्या लिखाणाकडेही वळले.

सदराच्या नावातच दोन गोष्टी आहेत.. ‘विचार’ आणि ‘पारंब्या’. विचार हा सूक्ष्म असतो. विचाराचं बीज मनात पडतं आणि त्यातून जो वृक्ष निर्माण होतो त्याला चिंतनाच्या पारंब्या फुटतात. त्या पारंब्यांवरून कधी झोके घेता येतात.. कधी विचारांचा प्रवाह अधिक गतिमान होतो. आपल्या अंतर्मनातला सूक्ष्म विचार जागा करणं आणि विचारांच्या पारंब्यांवरून झोके घेत नवप्रेरणांनी मन अधिक उत्फुल्ल करणं, हा एक हेतू होताच. काही लेखांनी तो साधला, काही लेखांत तो फसलाही असू शकतो. पण एक खरं, प्रत्यक्ष जेवढं प्रकाशित झालं त्यापलीकडे वाचकांशी ई-मेलद्वारे झालेल्या पत्रव्यवहारातून विचारांचा प्रवाह वाहता होता.

आध्यात्मिक लिखाण करणाऱ्या व्यक्तीबाबत वाचकांचे बरेच गैरसमज असतात. हा माणूस साक्षात्कारी असला पाहिजे, यांच्याकडे काही सिद्धी वगैरे असली पाहिजे, आपलं दु:ख दूर करण्याची काहीतरी शक्ती यांच्याकडे असली पाहिजे, वगैरे वगैरे. वाचकांचे गैरसमज असतात ते एकवेळ परवडलं, पण लिहिणाऱ्याला जर स्वत:बद्दल गैरसमज निर्माण झाला तर काही खरं नाही! सद्गुरूंच्या कृपेनं मी एक सामान्य वकुबाचा माणूस आहे, ही माझी जाणीव कधी लोपलेली नाही. त्यामुळे मी सहसा कुणाच्या पत्राला उत्तर देत नाही. या सदराच्या निमित्तानं थोडा अपवाद झाला. काही प्रश्नांना मी उत्तरं दिली, कारण ते आध्यात्मिक वाटचालीत मलाही पडलेले प्रश्न होते.  प्रतिक्रिया बऱ्याच लेखांवर आल्या. त्यातल्या काही फार वेगळ्या होत्या, काही अगदी व्यक्तिगत, पण प्रामाणिक होत्या. काहींना जीवनातल्या नैराश्यानं आणि नकारात्मकतेनं ग्रासलेलं होतं. एकानं लिहिलं की, ‘‘मी सध्या मानसिकरीत्या खूप खचलो आहे. मला काय करावं ते कळत नाही. जीवन नकोसं झालं आहे, तरी मार्गदर्शन कराल का?’’ मी त्यांना लिहिलं की, ‘‘प्रत्येकाच्या जीवनात मानसिक चढ-उतार येतच असतात. त्यानं खचून जाऊ नये. स्वामी विवेकानंद म्हणत की, ते जेव्हा जेव्हा कष्टी होत तेव्हा आकाशातल्या काळ्या ढगांकडे पाहत. मनास सांगत की, आकाश काळ्या ढगांनी आता भरलं आहे, पण हे ढगही कायमचे राहणार नाहीत. ते सरतीलच. तसेच दु:खाचे दिवसही सरतातच. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, प्रतिकूल परिस्थिती पालटण्याची आपण धीराने वाट पाहावी आणि आततायीपणा करू नये. त्यासाठी आपली श्रद्धा असणाऱ्या सत्पुरुषावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यांचं थोडं साहित्य वाचावं आणि त्यातलं काही आचरणात आणण्याचा अभ्यास करावा. अखेर एक खरं, कितीही वाचा, कितीही सत्पुरुषांना भेटा, पण जोवर काही झालं तरी निराश होणार नाही, असा स्वत:हून मनाचा निर्धार होत नाही तोवर कोणाच्याच सल्ल्याचा काही उपयोग होत नाही. आपल्या मनाला खंबीर करणे आपल्याच हातात आहे.’’

अध्यात्माबद्दल लोकांच्या मनात विपरीत कल्पना असतात. स्वत:ला ‘आध्यात्मिक’ म्हणवणारेच त्याला अधिक जबाबदार आहेत, हेही खरं. हल्लीच्या मुलांचा देवाधर्मावर विश्वास नाही, असंही काहीजण म्हणतात. माझा अनुभव मात्र वेगळा आहे. हल्लीच्या मुलांमध्ये श्रद्धा आहे, पण धर्माचा उदोउदो करणाऱ्या माणसांच्या वागण्यात त्या धर्माचा लवलेशही दिसत नाही तेव्हा त्यांना धार्मिकता हेच ढोंग वाटू लागतं. त्यात त्यांचा दोष काहीच नाही. त्यापेक्षा नास्तिक माणूस त्यांना जास्त प्रामाणिक वाटतो. तरीही अंतर्मनात जर खऱ्या श्रद्धेचं बीज असेल, तर तेही स्वस्थ बसू देत नाही! अशाच मनोदशेतील एका वाचकानं लिहिलं की, ‘‘मी दर पंधरा दिवसांनी आपले सदर वाचते. खरं तर ‘जैसे भ्रमर भेदी कोडे.. स्नेह देखा’ याविषयी तुम्ही लिहिलंत तेव्हापासून ते माझ्या जीवनाशी पडताळून मी माझ्यात बदल घडवून वागायला शिकले. तेव्हाच तुम्हाला कळवणार होते, पण भीती वाटली की आपण खरंच त्यांना गांभीर्याने घेत आहोत ना? या स्वत:बद्दल असणाऱ्या शंकेची. नंतरचा माईंचा लेख आणि, बाबा आणि भाऊवरचा लेख तर मला आणखीनच काही काही शिकवू लागला. पण, आजूबाजूला इतके मंडप आणि टिळे दिसत होते की या देवधर्मापासून आपण बाजूलाच राहायला हवं, या जिद्दीनं मी स्वत:ला नास्तिकतेकडे ओढत होते आणि आहे. मला नास्तिकताही नको आहे हे माहीत असूनही मन काहीतरी जाणून घ्यायला आस्तिकतेकडेही विचित्र पद्धतीनं ओढ घेत होतं. पण कोणी मंत्र घ्या म्हटले तर तेही झालं नाही. कोण सद्गुरू आपला हे तर कळायला हवं ना? खूप गोंधळ आणि विचित्र अशी तगमग चालू आहे. पण तुमच्या लेखातून बाबा बेलसरे यांच्याविषयी कळले. मग त्यांचा ज्ञानेश्वरीवरील पुस्तकाचा एक भाग मिळवला तो वाचत आहे. इथून सुरुवात तर करू, असं ठरवलं आहे. माहीत नाही पुढे काय. जप करावा तर वाटतो, पण वाटतं आपण ढोंगात तर अडकणार नाही ना?’’

या अत्यंत प्रामाणिक पत्रावर मी लिहिलं की, ‘‘आध्यात्मिक ग्रंथ बरेच आहेत. ते हवे तर वाचावेत, पण माझ्या किंवा अन्य कुणाच्याही लिखाणातला जो भाग कालसंगत वाटतो आणि कृतीत आणण्यासारखा वाटतो तेवढाच आत्मसात करावा. अध्यात्माच्या नावावर आज अनेक ठिकाणी बाजार भरला आहे आणि त्यात गोंधळायलाच होण्याची भीती अधिक. त्यामुळे सद्गुरू शोधायला बाजारात जाऊ नये. कोणताही एक जप अवश्य करावा. त्याचा गवगवा केला नाही तर त्यात ढोंग नाही. श्रीगोंदवलेकर महाराज यांचा ‘प्रवचने’ हा ग्रंथही वाचनात ठेवावा. त्यातून अनेक शंका दूर होतील आणि मार्ग दिसू लागेल. बरं नास्तिक असण्यातही काहीच गैर नाही. श्रीमहाराजही म्हणत की, ‘‘ढोंगी आस्तिकापेक्षा नास्तिक बरा!’’ आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अध्यात्माच्या बाजारीकरणामुळे माणसाला नास्तिकता स्वीकारार्ह वाटते. पण आपल्या मनात जर अध्यात्म मार्गाची ओढ निर्माण होत असेल तर त्या दिशेनं पाऊल टाकावे. वर सुचवल्याप्रमाणे अभ्यास करून पाहावा.’’

देवाची भीती वाटणाऱ्या जीतची गोष्ट अनेकांना आवडली. काही वाचकांनी आपलेही अनुभव पाठवले. काहींना देवाच्या मूर्तीना येताजाता नमस्कार करीत राहण्याची सवय सोडावेसे या लेखामुळे वाटले. खरी भक्ती ही आत विकसित होते. ‘देखल्या देवा दंडवत’ करून नव्हे, हे अनेकांना पटले. प्रत्यक्ष ‘जीत’नं मात्र तो लेख आल्यावर विचारलं की, ‘‘जर मूर्तिपूजेपलीकडे खरी वाटचाल सुरू होते, तर मग या मूर्तीची गरजच काय होती?’’ त्याला सांगितलं, ‘‘मूर्तीची आणि मंदिरांची गरज नाही, असं मी कुठं म्हणालो? मूल लहान असतं तेव्हा त्याला ‘अ अननसाचा’ हेच शिकवून ‘अ’ शिकवावा लागतो. तो मोठा झाल्यावर मात्र ‘अ’ उच्चारताच लिहू शकतो! तेव्हा रूप आणि नाम हे दोन्ही सुरुवातीला अनिवार्यच असतं. एकदा नाम पक्कं झालं की रूप आपोआप मनात येतं!’’

हॉटेलातील मुलांवर लिहिलेला लेखही अनेकांना आवडला. मृत्यूविषयी लिहिलं तेही अनेकांना भावलं. एका वाचकानं कळवलं की, ‘‘आपला ‘सरता संचिताचें शेष’ हा लेख मनाला खूप स्पर्शून गेला. मागील महिन्यात अचानक माझ्या पतीचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. शेवटच्या क्षणापर्यंत हसतखेळत जीवन जगता जगता अचानक काळ थांबला. तेव्हापासून मन खूप अस्वस्थ आहे. लेख वाचून मनाला थोडा दिलासा मिळाला.’’ वृद्धाश्रमाचा लेखही अनेकांना स्पर्शून गेला. एका वास्तुरचनाकार स्त्रीनं कळवलं की, ‘‘मी असा आदर्श वृद्धाश्रम नक्कीच उभारणार आहे!’’ परदेशातून अशी विचारणा झाली की, ‘‘असा वृद्धाश्रम खरंच असेल तर मी आर्थिक वाटा उचलायला तयार आहे.’’ एका स्त्रीनं कळवलं की, मी माझ्या नात्यातल्या वृद्ध व्यक्तींकडे आता आवर्जून जात राहीन. त्यांना जमेल तसं सा करीन.

आणि मला हेच सर्वात आवडलं. आपण वाचतो खूप, पण त्यातलं थोडंसं का होईना, जेव्हा कृतीत येतं तेव्हा त्याचा आनंद खूप असतो. कारण तो विचार नुसता शाब्दिक विचार नसतो. तो अनुभव बनून समोर उभा राहिलेला असतो. अधिक जिवंतपणे!

आपला निरोप घेताना असं वाटतं की, हा नुसता निरोपच नाही, तर आपल्या आंतरिक वाटचालीचा एक आरंभही आहे. या घडीला तो छोटासा भासेल, पण कोणत्याही मोठय़ा गोष्टीची सुरुवात अगदी लहानशीच तर असते! आपल्या सर्वाना या आंतरिक वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!

(सदर समाप्त)

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chaitanya prem 2017 last marathi articles in chaturang