पाचोळा..

तो वृद्धाश्रम बरेच दिवस मनातून जाता जात नव्हता..

तो वृद्धाश्रम बरेच दिवस मनातून जाता जात नव्हता.. सगळेच वृद्धाश्रम असे वस्तीपासून दूर का असावेत? लहान मुलांची भिरभिरती फुलपाखरं त्यांच्या थकल्या डोळ्यांचा विसावा का बनू नयेत? दुकानच जवळ नसल्यानं साधा मोबाइल रिचार्ज करणंसुद्धा जमू नये, इतक्या वरकरणी क्षुल्लक वाटणाऱ्या पण जगाशी तोडून टाकणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, असं कुणालाच का वाटू नये?.. पाचोळ्याला प्रेमाची सावली मिळूच नये का?

‘‘माझी नानीमावशीपण इथंच राहते.. आपण भेटायला गेलो तर तिला खूप आनंद होईल.. जाऊ या का?’’ वहिनीच्या या प्रश्नानं मी थोडा धास्तावलोच. मुळात घरातल्यांबरोबर कौटुंबिक कार्यक्रमांना जायचा मला कंटाळा. त्यात दूरच्या उपनगरात आधीच एका नातेवाईकांकडे दुपारचं गोडाधोडाचं जेवण झालेलं. डोळेही सुस्तावलेले. बाहेरचं टळटळीत ऊन गाडीतल्या वातानुकूलित  गारव्यानं जाणवत नव्हतं. पण या उन्हात या महामार्गावर ‘इथंच’ कुणीतरी नानीमावशी राहते आणि तिला भेटायचं आहे या विचाराची झळ काही सोसवत नव्हती. ही अपरिचित मावशीही अगदी दूरच्या नात्यातली आणि आजवर कधी आमच्या घरी न आलेली होती.. अर्थात हे सारं गाडीतल्या गप्पांच्या ओघात कानावर पडत होतं. मग अनेक प्रयत्नांनंतर अखेर ‘संपर्क क्षेत्र से बाहर’, असलेल्या त्या नानीमावशीला, आम्ही जवळच आहोत आणि अध्र्या तासात तिच्या भेटीला येत आहोत, असं दूरध्वनीवरून कळवलं गेलं. गाडी मग बराच काळ महामार्गावर धावत होती. अन् मग महामार्ग सोडून दाट झाडीच्या रस्त्यावर वळली. रस्ता अगदी निर्मनुष्य. दूरवर नजर टाकली तरी नावाला म्हणून एखादी टपरीसुद्धा दिसत नव्हती. ‘इथंच’ ही कुणीतरी नानीमावशी खरंच राहात असेल का? का रस्ता चुकलाय, ही शंका मनात चुकचुकली. माणूस कसा आहे पहा! तो स्वत: चुकीच्या रस्त्यानं जातो आणि चुकल्याचा दोष रस्त्याच्या माथी मारतो!

‘‘नाही नाही रस्ता अगदी बरोबरच आहे.. मी आल्ये ना मागेसुद्धा.. काहीच बदल झालेला नाही बघा.. तसंही या जंगलात कोण कशाला येऊन राहील म्हणा!’’

वहिनींच्या या उद्गारांनी या वनवासिनी मावशीबद्दलचं कुतूहल चाळवलं. असेल एखादं फार्महाऊस.. असंही वाटून गेलं.

‘‘पण नक्की हाच रस्ता आहे ना?’’ कुणीतरी विचारलंच..

‘‘अहो हो..  पाहा ती पाटीही दिसलीच की!’’

मीसुद्धा कुतूहलानं पाटी पाहिली. ‘कृतार्थ वृद्धाश्रमा’कडे! बोट दाखवत ती त्रयस्थासारखी उभी होती. ‘‘त्या वृद्धाश्रमात राहतात? का?’’, माझ्या तोंडून प्रश्न निसटला..

वहिनी हसत म्हणाल्या, ‘‘ती तिच्या मर्जीनं राहात्ये इकडे!’’ कुणी स्वत:च्या मर्जीनं वृद्धाश्रमात कशाला येऊन राहील, असा प्रश्न मला पडला. मनात उमटलेल्या या प्रश्नाचं उत्तरही कानावर पडू लागलं होतंच.

‘‘तिनं लग्न केलंच नव्हतं. एकतर अगदी उशिरा झालेली घरातली एकुलती एक मुलगी. वयात आली आणि नोकरीला लागली तेव्हा आई अन् वडिलांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. मग लग्न झालं तर यांच्याकडे कोण बघणार, असंही वाटलं असेल.. खूप सेवा केली.. त्यांची सगळी आजारपणंही काढली.. समाजसेवेचीही आवड खूप होती. कालांतरानं आई-वडील दोघंही गेले.. लग्नाचं वयही उलटलं होतं.. मग नोकरी आणि घर एवढाच परीघ उरला होता. निवृत्तीला काही र्वष उरली होती तेव्हा स्वेच्छानिवृत्तीची एक योजना आली. हिनं निवृत्ती घेतली. राहतं घर भाडय़ाचं होतं. हिनं ठरवलं की आज कुणा नातेवाईकाच्या घरी जाऊन राहताही येईल, पण म्हातारपणी काय होईल? तेव्हा प्रकृती बिघडायला लागली आणि आपण कुणाला ओझं वाटू लागलो तर काय होईल? असे प्रश्न वारंवार मनात येऊ लागले तेव्हा तिनं ठरवलं की, आपण स्वत:हून वृद्धाश्रमात जायचं! सगळ्या जवळच्या नातेवाईकांनी विरोध करून पाहिला.. समजावून पाहिलं.. पण हिचा निर्णय पक्का होता..’’

तोच दूरवर वृद्धाश्रमाची एकमजली काटकोनी वास्तू दिसू लागली. उन्हं उतरली होती. अचानक पावसाळी हवेमुळं अंधारूनही आलं होतं. त्यात ती वास्तू उगाच अधिकच उदासवाणी वाटू लागली. आमची गाडी आवारात शिरली तोच लक्ष गेलं तळमजल्याची काटकोनी बाल्कनी पूर्ण भरून गेली होती. कठडय़ापाशी अनेक आजी-आजोबा येऊन उभे होते आणि आमच्या गाडीला आणि आम्हाला कुतूहलानं न्याहाळत होते. नानीमावशीही समोर आल्या. साठीच्या जवळपास पोहोचलेल्या मावशी आजही उत्साहात होत्या. त्यांनी हसतमुखानं स्वागत केलं आणि आम्ही त्यांच्या खोलीत गेलो. एका खोलीत दोघी, अशी पद्धत होती. बाजूच्या खाटेवर पडलेल्या आजींना फारसं ऐकू येत नव्हतं आणि सुरुवातीची काही मिनिटं सरताच त्यांचा आम्हाला न्याहाळण्याचा उत्साहही ओसरला असावा. पहुडल्या पहुडल्या त्यांना झोप लागली. माझी नजर व्हरांडय़ात गेली. काटकोन रिता झाला होता.

‘‘एवढे सगळे मगाशी का जमले होते?’’

माझ्या या प्रश्नावर नानीमावशी म्हणाल्या, ‘‘अहो इथं कुणी फारसं फिरकतही नाही. त्यामुळे कुणाकडे कुणीतरी आलंय.. कुणाला का होईना पण कुणीतरी भेटतंय, याचं अप्रूप वाटतं सगळ्यांना. इथला फोन मुख्य सामायिक खोलीत आहे. मगाशी मी बोलले ना तिथूनच. त्यावरून बातमी पसरली की मला भेटायला कुणी येतंय! कित्येकजणी तर चांगल्या साडय़ा नेसूनही तयार झाल्या! चांगल्या रंगाच्या साडीमुळे का होईना आलेल्या बायांचं लक्ष जाईल.. डोळ्यानं का होईना आपल्याकडे पाहून तात्पुरत्या मायेनं हसतील! तेवढंच बरं वाटेल.. आणि हो, मनाच्या कोपऱ्यात एक उत्सुकता आणि वेदनाही असते.. बहुधा आपल्याला जसं सोडायला गाडी आली होती तसंच या गाडीतूनही कुणाची थरथरती पावलं उतरतात का, याची!’’

‘‘कसं काय सोडतात लोक यांना इथं..’’ आमच्या कोंडाळ्यातून आलेल्या प्रश्नावर मावशी म्हणाल्या, ‘‘प्रत्येक गोष्टीला दोन बाजूही असतात बरं का.. काही घरात सगळेच म्हातारे किंवा आजाराशी झुंजणारे उरले असतात.. कोण कुणाचं करणार? मग जे वयानं अधिकच म्हातारे झाले आहेत त्यांना इथं यावं लागतं.. काही वृद्धही अतिशय विक्षिप्त असतात. त्यांना इथं सांभाळणं महाकठीण काम असतं.. काही झालं नसलं तरी सतत प्रकृतीच्या तक्रारी करायच्या, हेकटपणे भांडत बसायचं.. वाटायचं यांच्या घरच्यांनी शक्य तेवढं सहन केलंच असेल ना?.. पण हो काही गोष्टी मनाला भेगा पाडतातच बघा..’’

मावशींनी दोन वृद्ध बहिणींची परिस्थिती सांगितली. त्यांचा वडिलोपार्जित जुना वाडा शहराच्या मध्यवस्तीत होता. अखेर बिल्डरला पुनर्विकासासाठी त्यांनी तो दिला. त्यांना तिथं प्रशस्त दोन सदनिका मिळणार होत्याच, पण त्या बांधून होईपर्यंत पर्यायी जागा त्यांना देणं करारानुसार बंधनकारक होतं. एके दिवशी त्यांच्या सामानसुमानासकट बिल्डर त्यांना इथं घेऊन आला आणि त्यांची वृद्धाश्रमात भरती झाली! या सर्व ‘उदात्त’ कार्यात राष्ट्र घडवू पाहणाऱ्या संघटनेच्या एका ज्येष्ठ ‘सेविके’चा मोठा सहभाग होता, ही सर्वात धक्कादायक गोष्ट! नानी म्हणाल्या, ‘‘आता त्यांना हक्काची जागा तरी मिळेल की नाही कोणास ठाऊक. कोणत्या कागदावर काय सह्य घेतल्या हेसुद्धा त्यांना समजलं नाही. आता बिल्डर ना तोंड दाखवतो ना फोन उचलतोय!’’

मी विचारलं, ‘‘काहीजण असाहाय्यतेनं इथं येतात.. तुम्ही इथं येण्यामागे ती असाहाय्यता नव्हती. मग तुम्ही स्वत:हून आलात तेव्हा वृद्धाश्रमात पाऊल टाकताना कसं वाटलं होतं?’’

भूतकाळात हरवत नानी म्हणाल्या, ‘‘माझ्या गाठीला चांगला पैसा होता. त्यामुळे कुणावर तरी आपण अवलंबून आहोत, या भावनेचं ओझं नव्हतं. शरीरात ताकदही होती. त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांबरोबर मीसुद्धा स्वेच्छेनं बरीच कामं करीत असे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही मी त्यांच्यातलीच एक वाटत असे. आता मात्र जाणवतंय की शरीराची साथ पूर्वीसारखी नाही.. पुढे काय होईल कोण जाणे!’’

तो वृद्धाश्रम नंतरही बरेच दिवस मनातून जाता जात नव्हता.. सगळेच वृद्धाश्रम असे वस्तीपासून दूर का असावेत? लहान मुलांची भिरभिरती फुलपाखरं त्यांच्या थकल्या डोळ्यांचा विसावा का बनू नयेत? दुकानच जवळ नसल्यानं साधा मोबाइल रिचार्ज करणंसुद्धा जमू नये, इतक्या वरकरणी क्षुल्लक वाटणाऱ्या पण जगाशी तोडून टाकणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, असं कुणालाच का वाटू नये? असे अनेक प्रश्न मनात येत होते. त्यांना फार वेगळ्या मार्गानं वाचा फुटली.

‘अभंगधारा’ या माझ्या सदराचा समारोप जवळ आला होता. त्यातला भावुक हृदयेंद्र, ज्ञानोपासक ज्ञानेंद्र, योगमार्गाची ओढ असलेला योगेंद्र आणि काहीसा खटय़ाळ आणि गंभीर आध्यात्मिक चर्चाना कोपरखळ्या मारणारा कर्मेन्द्र या व्यक्तिरेखांच्या रोजच्या गाठीभेटी संपणार, याचं मलाही दु:ख होत होतं. तोच ‘कर्मेन्द्र’ या व्यक्तिरेखेनं एका अभिनव वृद्धाश्रमाची कल्पना ‘सुचवली’! ‘अभंगधारा’चा तो सार्थ समारोप होता. त्यात सुचवलेला आणि आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण राहू शकणारा वृद्धाश्रम हा शहराच्या मध्यवस्तीत होता. त्या तीन मजली वास्तूच्या तळमजल्यावर दवाखाना, औषधविक्री केंद्र, केशकर्तनालय, वाचनालय व सायबर कॅफे आणि किरकोळ विक्रीचे दुकान तसेच एक छोटे सभागृह असणार होते. पहिल्या मजल्यावर आणखी एक सभागृह तसेच पाळणाघर होते.. आणि वरचा मजला वृद्धाश्रमाचा! या वृद्धांना वाटलं तर पाळणाघरात जाऊन दिवसा ‘नातवंडां’शी खेळता येईल. त्यांना पाढे, श्लोक, कविता शिकवता येतील. छोटय़ा सभागृहात पाककलेच्या, विणकामाच्या शिकवण्या घेता येतील. एखादे आजोबा किंवा आजी उत्तम गणित, संस्कृत वा इंग्रजीही शिकवतील. मोठय़ा सभागृहात गाण्याच्या मैफली, व्याख्यानं, छोटे नाटय़प्रयोग यांचा आस्वाद घेता येईल.. दुकानं, सभागृहं आणि पाळणाघर यातून वृद्धाश्रमाला स्वत:चे उत्पन्न मिळेलच. वृद्धांच्या अंगभूत कौशल्याचा आणि ज्ञानाचा समाजाला लाभही होईल आणि मुख्य म्हणजे एकाकी आयुष्याची तीव्रता कमी होईल. खरंच असा वृद्धाश्रम का साकारू नये, अशी कल्पना हे सदर वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आली. या कल्पनेचं बी तर पेरलं गेलंय, कधी तरी अंकुरेलच!

एका वृद्धाश्रमाबाहेर लावलेल्या पाटीचं छायाचित्र कुणीतरी पाठवलं होतं.. त्यावर लिहिलं होतं, ‘खाली पडलेल्या सुक्या पानांवरून जरा हळुवारपणे जा.. कारण एकेकाळी कडक उन्हात आपण त्याच्याच सावलीत उभं राहिलो होतो!’

चैतन्य प्रेम

 chaitanyprem@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chaitanya prem loksatta chaturang marathi articles part