पिल्लू..

पाऊस कोसळत होता आणि मुलं शाळेतून आली नाहीत म्हणून मी काळजीत होते

‘‘पाऊस कोसळत होता आणि मुलं शाळेतून आली नाहीत म्हणून मी काळजीत होते..’’

एक क्षणाचा विराम घेत नंदिनीताई  सांगू लागल्या.. थोडय़ा वेळानं मुलगी आली आणि तिच्या पाठोपाठ छोटा अथर्व. तिच्या चेहऱ्यावर थोडा फणकारल्याचा तर त्याच्या चेहऱ्यावर भांबावल्याचा भाव होता.

‘‘उशीर का झाला?’’ असं मी काहीशा रागातच विचारलं.

मुलगी म्हणाली, ‘‘अगं, याच्यामुळे झालाय उशीर.. हा येणाऱ्या-जाणाऱ्या रिक्षांमागे धावत होता.’’

मी अधिकच आश्चर्यमिश्रित रागानं अथर्वकडे पाहिलं. तो निरागसपणे म्हणाला, ‘‘अगं आई, एका आजींना नं खूप लांब जायचं होतं.. त्या किती प्रयत्न करत होत्या, पण एकही रिक्षा थांबत नव्हती. मलाच वाईट वाटलं. पाऊस पण पडत होता ना.. मग मीच रिक्षा दिसली की धावत तिला थांबवायचा प्रयत्न करायचो आणि विचारायचो..पण कुणी थांबतच नव्हतं!’’

नंदिनीताई म्हणाल्या, ‘‘भर पावसात वेगानं धावणाऱ्या रिक्षांमागे ओरडत पळणारं माझं पोर डोळ्यांसमोर आलं तेव्हा आई म्हणून मला थोडा रागच आला होता, पण थोडय़ा वेळानं वाटलं तो वागला त्यात काहीच चुकीचं नव्हतं.’’

हा प्रसंग ऐकून मलाही खूप बरं वाटलं. दुसऱ्यासाठी आपणही काही करायला पाहिजे, हे न सांगता छोटय़ा अथर्वलाही समजलं होतं. लहानपण असंच असतं अनेकदा.. निरागस, सहज प्रेमळ, निष्कपट.. एखाद्या आलिशान गाडीत असतं एक लहानसं मूल आणि त्या गाडीच्या काचांवर टकटकत असतो भीक मागणारा हात.. त्या हातातही असतं एखादं लहानसं मूल.. ही दोन्ही मुलं एकमेकांकडे हसऱ्या नजरेनं पाहात असतात. त्यांची ती नजरेची बोली विलक्षण निरागस असते. आर्थिक, सामाजिक फरकाचा स्पर्शही त्यांच्या मनाला झालेला नसतो. दोघांमधला समान धागा असतो तो केवळ निरागसतेचा..  हे सगळे गुण विरत गेले की समज आली, असं म्हणतात!

त्यामुळे मला मात्र लहान मुलांमध्ये मिसळून जायला आवडतं आणि मुलंही मला त्यांच्यात सामावून घेतात.

महाविद्यालयीन शिक्षण सुरू होतं तेव्हा मी लहान मुलांसाठी एक संस्था सुरू केली. तिचं नावही होतं त्यांना त्यांचं वाटेल असं.. ‘फनी क्लब’! संस्था म्हणजे सगळा हौशी मामलाच होता. त्यात मुलांबरोबर मूल होऊन बागडायचा आनंद मात्र भरपूर मिळायचा. क्लबचं मासिक शुल्क होतं अवघं दोन रुपये! आम्ही आठवडय़ातून तीनदा जमायचो. खेळ, गोष्टी, गाणी, गप्पा असं स्वरूप असायचं. वाचनालय हेही एक आकर्षण होतं आणि मुलांना पुस्तकं घरी न्यायला मिळायची. मे महिन्याच्या सुट्टीत दररोज एक कार्यक्रम व्हायचा. कार्यक्रम म्हणजे स्पर्धाच भरपूर असायच्या आणि त्यांची बक्षिसं काय होती? तर पन्नास पैसे, पंचवीस पैसे आणि पंधरा पैसे! बरं ही ‘अवाढव्य’ रक्कम लगेच मिळायची नाही. प्रत्येक सदस्याचं एक खातं असायचं त्यात ती जमा व्हायची आणि क्लबच्या वाढदिवशी म्हणजे

४ ऑगस्टला ती एकरकमी दिली जायची. ती रक्कमही १०-२० फार तर ३० रुपयांपुढे जायची नाही, पण त्यामुळे व्हायचं असं की प्रत्येक स्पर्धेत मुलं हिरिरीनं सहभागी व्हायची आणि आपल्या खात्यात किती पैसे जमा होतात, हे पाहून खुशीत असायची. महत्त्व पैशाला कमी आणि स्पर्धेत सहभागी होण्याला जास्त असे. मे महिन्यात धमाल असे. स्पर्धाबरोबरच कधी दंतवैद्य येत, कधी डॉक्टर येत, कधी कथा सांगणारे शिक्षक येत. मुलं त्यांच्याशी खूप गप्पा मारत. आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यासाठी मुलं कधी कधी मोठय़ा माणसांना सुचणार नाहीत, असे प्रश्नही विचारत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘आजची बातमी’ म्हणून एक पाच मिनिटांचा कार्यक्रम असे. त्या दिवसाच्या महत्त्वाच्या बातमीचा आधार घेऊन वेगळीच शास्त्रीय किंवा ऐतिहासिक माहिती दिली जात असे. म्हणजे समजा एखाद्या विमानाचा मोठा अपघात झाला असेल, तर मुळात विमानांचा शोध कसा लागला, पहिली प्रवासी विमान सेवा कोणत्या देशानं सुरू केली अशासारखी माहिती दिली जायची. कला, क्रीडा, संगीत, साहित्य, विज्ञान या विषयांना स्पर्श केला जात असे. देशभक्तांच्या कथा ऐकताना मुलं तल्लीन होत. सदस्यांची संख्या साधारण ३०-३५ होती आणि दर भेटीत मुलांना खायला देणं शक्य नव्हतं, पण तरी मुलांच्या ओंजळीत मावेल इतका खाऊ  देण्यासाठी शक्कल निघाली ती आरती आणि राष्ट्रगीतानं समारोप करण्याची. आरतीसुद्धा देवांची नव्हे तर वीर सावरकर यांनी रचलेली ‘जय देव जय देव जय जय शिवराया,’ ही शिवाजी महाराजांची आरती असे. क्लबचा भार मुलांनीच उचलावा, असा विचार मनात आला आणि सांस्कृतिक, अर्थ, शिक्षण आणि क्रीडा असे विभाग तयार झाले. कार्यक्रमांचं नियोजन, आर्थिक नियोजन, वाचनालयाची देखभाल, सदस्यांच्या खात्यातील जमा नोंदी आणि इतर हिशेब ठेवणं या सगळ्या गोष्टी मुलंच करू लागली. यामुळे पैशाचं महत्त्व कळलं, आहे त्या पैशात कार्यक्रम कसे करावेत, हे कळलं. मुलांच्या कल्पनाशक्तीतून कार्यक्रमांची आखणी होऊ  लागल्यानं अनेक भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरल्या. त्या कामातही संघटित वृत्ती वाढावी आणि कामांवर सर्वाचं लक्ष राहावं म्हणून दोन ‘पक्ष’ निर्माण झाले. त्यांच्यात ‘निवडणूक’ व्हायची. जिंकणारा पक्ष वर्षभर सर्व सूत्र सांभाळायचा आणि ‘विरोधी’ पक्ष त्यांच्या कामावर लक्ष ठेवायचा! कुणाला वाटेल, इतक्या लहान वयात या मुलांवर राजकीय संस्कार कशाला, तर आपल्या क्लबची प्रगती हे समान उद्दिष्ट ठेवून ही मुलं ज्या एकोप्यानं काम करायची ना ते संस्कार खऱ्या राजकारणातही दिसत नव्हते.

मे महिन्यात सदस्यांच्या घरी सुटीसाठी आलेल्या पाहुण्या बालदोस्तांनाही सहभागी होता यायचं. मे महिन्यातच महिनाभराच्या कार्यक्रमांच्या समारोपाची जंगी ‘पार्टी’ असायची आणि पन्नासेक मुलांसाठी माझी आई एकहाती खाद्यपदार्थ रांधायची. तेव्हा त्यात विशेष वाटत नसे, पण पुढे मी स्वत:चा स्वयंपाक स्वत: करू लागलो तेव्हा तिनं आनंदानं स्वीकारलेल्या कष्टांची कल्पना आली.

हा क्लब आता अस्तित्वात नाही, या क्लबमध्ये चिवचिवाट करणारी पिल्लंही आता मोठी झाली आहेत.. आपापल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत. पण काही ‘पिल्लां’ना मी आजही विसरू शकत नाही.

लहान मुलांचा क्लब बंद झाला, पण या क्लबमुळे लहान मुलांचं मन कसं असतं, त्यांच्या मनाला स्पर्श करेल अशा भाषेत त्यांच्याशी संवाद कसा साधावा, त्यांचे हट्ट कसे स्वीकारावेत आणि त्यांना कसं समजवावं, याचे संस्कार माझ्या मनावर झाले. लहान मुलांशी नजरेच्या प्रेमळ भाषेनं सहज संवाद साधता येतो, हेही मला या मुलांच्या सहवासातूनच उमगलं. पुढे वय वाढूनही मुलांपेक्षा मूल असलेल्या गतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी संबंध आला तेव्हा त्या जुन्याच संस्कारांवर मी विसंबलो. जणू सर्वच मुलांचं भावविश्व मी जाणत होतो.

दोन-तीन तासांसाठी ही मुलं ‘शाळे’त यायची. आल्या आल्या इतकं निर्मळ हसायची की डोळे पाणावायचे. नुसती दृष्टादृष्ट झाली तरी तेच ते शुद्ध निरागस हसू उमलायचं. पुढचे दोन-तीन तास हे जणू वेगळ्याच वातावरणात नेऊन सोडायचे. शब्दांशिवाय संवाद साधण्याची कला शिकवायचे. ते दोन-तीन तास त्या मुलांच्या पालकांसाठीही किती मोलाचे होते हे आधी कळलं नव्हतं. मुलांसाठी काम करणाऱ्या या संस्थेत काम करत होती ती ‘मोठी’च माणसं. त्यामुळे मोठेपणाचे सगळे गुण म्हणजे हेवेदावे, स्वार्थ, परस्पर विरोध हे सारे शिरकाव करू लागलेच. त्यामुळे शाळाच बंद पडते की काय, अशी शंका यायला लागली. हे शंकेचं वादळ घोंगावत असतानाच एकदा रस्त्यात शाळेतल्या मुलाची आई भेटली. मुलगा सोबत होताच. म्हणाली, ‘‘शाळा बंद होऊ  देऊ  नका हो..’’

मला काय बोलावं सुचलं नाही. मी म्हणालो, ‘‘मी सेवा म्हणून फक्त येतोय. ना माझा संस्थेशी संबंध आहे, ना शिक्षकांशी. मी काय करू शकणार?’’

ती माऊली सचिंत चेहऱ्यानं म्हणाली, ‘‘हा शाळेत जातो ना तेवढेच दोन-तीन तास आम्ही घरात निश्चिंत असतो. अगदी शांतपणे झोपतोसुद्धा! नाही तर जरा काही आवाज झाला तरी वाटतं याला काही झालं तर नाही? माझीच नाही शाळेतल्या प्रत्येक मुला-मुलीच्या घरी हीच स्थिती आहे.’’  मला काय बोलावं सुचेना. शब्द अशा वेळी किती असाहाय्य होतात.. मी उगाच त्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणालो, ‘‘निरागस लहान मुलासारखा आहे हा..’’

ती माउली ताड्कन म्हणाली, ‘‘बालपण चांगलंच असतं हो.. पण ते आयुष्यभरासाठी लांबणं हा शाप असतो.. आमचं म्हातारपण थोपवता आलं असतं तरी एक वेळ हा शाप आनंदानं स्वीकारता आला असता!’’

मी नि:शब्द झालो. तो मुलगा मात्र माझ्याकडे आणि आईकडे त्याच निरागस डोळ्यांनी पाहात होता. ती दृष्टी मला आरपार हलवून गेली.

लहानपणी कांगारूंचं चित्र बघून मजा वाटायची. पोटात पिल्लाला जपणारी कांगारूआई किती गोड वाटायची.. आता वाटतं पिल्लू असलं म्हणून काय झालं.. त्या पिल्लाला जन्मभर पोटाशी कवटाळून जगावं लागत असेल तर?

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विचार पारंब्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi articles on what is childhood