सरता संचिताचें शेष

पहिला अनुभव माझ्या मित्राच्या आईचा.. सुनंदाताईंचा. त्यांची शेगावच्या गजानन महाराजांवर श्रद्धा होती

मृत्यूचा असा स्थिरचित्तानं स्वीकार करता येतो

मृत्यूचं स्वागत करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जे काव्य स्फुरलं त्यात  ते म्हणतात, ‘‘मला लाभलेला प्रत्येक दिवस मी सत्कारणीच लावला आणि त्यामुळे जीवनाचा अस्त होत असल्याचं मला दु:ख नाही!’’ तशीच साधकांची बैठक असते. मृत्यूशी जणू चर्चा करून या जगाचा निरोप घेण्याची वेळ त्यांनी निश्चित केलेली असते. अशी काही उदाहरणं मी वाचली आणि ऐकली आहेतच, पण प्रत्यक्ष पाहिलीही आहेत. त्या मृत्यूंनी माझ्या अंत:करणावर अमीट संस्कारही केले आहेत..

समर्थ रामदास म्हणतात, ‘‘सरता संचिताचें शेष। नाहीं क्षणाचा अवकाश। भरतां न भरतां निमिष। जाणें लागे।।’’ जेवढय़ा आयुष्याचा अवधी घेऊन आपण जन्मलो आहोत, तो संपला की तात्काळ जावंच लागतं, असं सनातन तत्त्वज्ञान सांगतं. हा संचिताचा शेष कधी सरणार आहे, हे आपल्याला माहीत नसतं आणि म्हणूनच मृत्यू अनेकदा अनपेक्षित भासतो. रुग्णशय्येवर खिळलेल्या जर्जर रुग्णाला मृत्यूची चाहूल लागली असतेच, पण म्हणून मृत्यू नेमका कधी येईल, हे कुणालाच सांगता येत नाही. कधी तो ‘टळतो’ तर कधी अटळ म्हणून स्वीकारावाच लागतो.. पण तयारीचा गायक जसा रागाची मांडणी आणि विस्तार करीत सुरांच्या परमाकाशात मूळ ऊर्जेचा प्रतिभाशोध घेतो आणि त्या स्वरविहारात मैफल रंगत जाते तेव्हा ते सूरच त्याला हळूहळू अलगद समेवर आणतात आणि रसकृतार्थ अशी भैरवी सुरू होते, तसा तयारीच्या साधकांचा अंत असतो! पूर्ण आत्मतृप्तीचा स्पर्श लाभलेला!

भैरवी सुरू झाली की कानसेनांच्या श्रवणसुखाला नि:शब्द आर्ततेचा स्पर्श होतो. एकीकडे जे ऐकलं त्याचं सुख मनात मावत नसतं आणि दुसरीकडे ही स्वरसोबत संपणार, याचं दु:ख असतं.. कृतार्थ जीवन जगलेल्या साधकाचा मृत्यूही अनेकांना हाच अनुभव देतो.. त्याच्या निर्भय, निश्चिंत आणि सदातृप्त जीवनानुभवाचे संस्कार आपल्यावर झाले, याचं सुख जसं असतं, तशी हा सत्संग आता अंतरणार, याची सलही असते..

मृत्यूचं स्वागत करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जे काव्य स्फुरलं त्यात ते म्हणतात..

‘‘म्यां असतां दिवस नसे व्यर्थ गमविला,

दिवसास्ताचेंहि म्हणुनि दु:ख ना मला!’’

मला लाभलेला प्रत्येक दिवस मी सत्कारणीच लावला आणि त्यामुळे जीवनाचा अस्त होत असल्याचं मला दु:ख नाही! तशी या साधकांची बैठक असते. मृत्यूशी जणू चर्चा करून या जगाचा निरोप घेण्याची वेळ त्यांनी निश्चित केलेली असते. अशी काही उदाहरणं मी वाचली आणि ऐकली आहेतच, पण प्रत्यक्ष पाहिलीही आहेत. त्या मृत्यूंनी माझ्या अंत:करणावर अमीट असे संस्कारही केले आहेत. त्यांनी ज्या सहजतेनं जीवनाच्या अंताचं स्वागत केलं तसं आपल्याला साधावं, असं कुणालाही वाटेल; पण ते तरी सोपं आहे का?

पहिला अनुभव माझ्या मित्राच्या आईचा.. सुनंदाताईंचा. त्यांची शेगावच्या गजानन महाराजांवर श्रद्धा होती; पण घरात येशू आणि मेरीमाईचीही तसबीर होती. तिचीही त्या समरसून पूजा करीत. नामस्मरणात त्या सतत आहेत, असं जाणवत असे. मी जेव्हापासून त्यांना पाहत होतो तेव्हा त्या बरेचदा आजारीच असायच्या. घराबाहेर सहसा पडत नसत; पण स्वभाव अतिशय शांत, सात्त्विक. त्यांना कधी चिडलेलं किंवा कपाळाला आठय़ा घातलेलं मी पाहिलं नव्हतं. घरातल्या कामात त्यांचा महत्त्वाचा आधार झालेल्या सविताताईंना एक दिवस त्या म्हणाल्या, ‘‘सविता, उद्या मला जायचं आहे, तेव्हा सकाळीच सगळं लवकर आवरून घे बरं का!’’ सविताताईंना थोडं आश्चर्य वाटलं की, या घराबाहेर सहसा पडत नाहीत, मग उद्या कुठं जायचं आहे एवढं? बहुधा डॉक्टरांकडे वगैरे जायचं असेल, अशी स्वत:ची समजूत करून घेत त्यांनी फार खोलात जाऊन काही विचारलं नाही. दुसरा दिवस उजाडला. सकाळी यांनी सगळ्यांच्या मागे लागून पटापट आवरायला लावलं. त्यानंतर काही वेळातच त्या उभ्या उभ्या खाली कोसळल्या. माझा मित्र, त्याचे वडील सर्वानी धाव घेतली. थरथरत्या हातानं मित्राचे वडील डॉक्टरांना दूरध्वनी करू लागले तेव्हा यांनी सांगितलं, ‘‘फोन करू नका. मी निघाले आहे.’’ पुढे कुणी काय काय करावं, हेसुद्धा त्यांनी सुचवलं!

मृत्यूचा असा स्थिरचित्तानं स्वीकार करता येतो, हे या घटनेनं मी अनुभवलं. अशाच होत्या उषाताई. त्यांच्या शरीराला अनंत व्याधी जडल्या होत्या. व्याधींइतकेच उपचारही त्यामुळे गुंतागुंतीचे झाले होते. ठरावीक दिवसांनी रुग्णालयात जाऊन तपासण्या करून घ्याव्या लागत. तेवढंच बहुधा घराबाहेर जाणं होत असावं. त्यांच्या सद्गुरू ज्ञानमार्गी होत्या. त्यांच्याकडून ग्रहण केलेलं ज्ञान उषाताईंनी जीवनात उतरवलं होतं, याचा प्रत्यय मला अनेकवार आला. ‘‘या ज्या व्याधी जडल्या आहेत, त्या देहाला आहेत, मला नव्हे,’’ असं त्या सांगत. शरीर धडधाकट असताना हे सांगणं खूप सोपं आहे. सगळं काही असताना, सर्वस्व गेलं तरी चालेल, हे बोलणं खूप सोपं आहे.. सर्वस्व सोडा, आपल्या भौतिकात थोडी जरी घट झाली तरी किती तगमग होते! त्यामुळे अनंत व्याधी भोगत असताना स्थिरचित्तानं ‘जो भोग आहे तो देहाला, मला नव्हे,’ हे सांगणं आणि तशी पक्की धारणाही असणं खूप कठीण. मी त्यांच्याकडे अधेमधे जात असे आणि माझ्यावर त्या मातृवत् प्रेम करीत असल्यानं स्वत:च्या हातानं साग्रसंगीत स्वयंपाकही करीत मला खिलवत. मी त्यांना एकदा म्हणालो, ‘‘आधीच तुम्हाला एवढा त्रास आहे, त्यात माझ्यासाठी आणखी त्रास कशाला घेता?’’ तर हसून म्हणाल्या, ‘‘जो त्रास आहे तो देहाला, मला नव्हे! त्या देहासाठी सर्व उपाय सुरू असताना जर तो त्रास मला वाटू लागला तर मी स्वत:ला देहच मानू लागले, असं नाही का होणार? मग मी सद्गुरूंकडे राहून काय शिकले हो?’’

मला यावरून आठवण झाली ती प्रेरणाताईंची! त्यांनाही अशाच अनंत व्याधी जडल्या होत्या आणि त्यांच्या घरी मी जात असे तेव्हा त्याही सारं इतकं साग्रसंगीत करीत, की या दिवशी ही ताकद येते कुठून, याचं घरच्यांनाही आश्चर्य वाटे. माझ्या आयुष्याची गाडी उताराला लागली आहे, असं त्या स्वत:च सांगत. मी गेलो की दिवसभर गप्पा रंगत आणि त्या अध्यात्म, गोंदवलेकर महाराज आणि सद्गुरूंभोवतीच केंद्रित असत; पण जरा कुठे कुणी गप्पांचा रोख बदलायचा प्रयत्न केला की त्या अडवत. म्हणत, ‘‘आपण फक्त महाराजांवर बोलू या!’’ एका विषयावर मात्र चर्चा बरेचदा व्हायची, तो विषय म्हणजे मृत्यू! पण त्या चर्चेवर कोणत्याही भीतीची सावली कधीच पडली नाही. त्यांना एकदा म्हणालो, ‘‘तुमच्या माध्यमातून गुरुजी आम्हा सर्वाना शिकवत आहेत.’’ त्यांनी आश्चर्यानं विचारलं, ‘‘काय शिकवत आहेत?’’ मी म्हणालो, ‘‘आपण मृत्यूवर चर्चा करतो तेव्हा आम्ही जणू मानतो की, आम्ही धडधाकट आहोत. आम्हाला इतक्यात मृत्यू यायचा नाही. तुम्ही तर मृत्यूच्या सावलीतच आहात.. पण कुणी सांगावं? तुमच्या आधी मीच मृत्यूच्या जवळ जाईन!’’ त्या हसून म्हणाल्या, ‘‘पण यात शिकवण काय आहे?’’ मी म्हणालो, ‘‘तुम्ही व्याधिग्रस्त असताना तुम्हाला नेमकं काय ऐकलं पाहिजे ते कळतंय.. आणि आम्ही धडधाकट असल्याच्या तोऱ्यात नको ते वायफळ बोलण्यात, नको ते वायफळ ऐकण्यात आणि करण्यात हातचा वेळ आम्ही कसा सहज वाया घालवत आहोत!’’

उषाताईंचंही अगदी तसंच होतं! देहाच्या पाठीशी मरण लागलं आहे, त्यामुळे जे सद्गुरूंनी सांगितलंय ते कृतीत आणण्याच्या पाठी मी लागलं पाहिजे, असं त्या म्हणत. त्या काळी दूरध्वनी हा खरोखरच दूर असायचा. प्रत्येकाच्या हाताच्या तळव्याला तो चिकटला नव्हता. त्यामुळे संपर्क कमी असायचा. त्यात उषाताईंच्या घरी रंगकाम सुरू झालं आणि पर्यायी घरी सगळ्यांचा मुक्काम हलला. या ना त्या कारणानं त्यांच्याकडे जाणं होत नव्हतं. त्यात दोन-तीन महिने उलटले आणि अचानक कळलं की, उषाताई गेल्या!

मला धक्काच बसला. त्यांच्या घरी गेलो तेव्हा पती आणि मुलानं शेवटचा प्रवास कसा झाला ते सांगितलं..

पती म्हणाले, ‘‘तुमची भेट व्हावी, अशी फार इच्छा होती. प्रयत्नही खूप केले, पण संपर्क काही झाला नाही, तेव्हा म्हणाली, ‘जाऊ  दे.. मी नंतर भेटणारच आहे..’ त्या दिवशी दुपारीच आम्ही बाहेर पडलो. तिनं काही खरेदी केली आणि तिच्या आवडत्या रंगाची साडीही घेतली. मला म्हणाली, ‘ही उद्याच वापरायला काढायची आहे. कुणाला देणार सांगा?’ मी म्हणालो, मला काय माहीत? तर फक्त हसली. मग सगळ्या मैत्रिणींच्या घरीही जाऊन आली..’’

मुलगा म्हणाला, ‘‘दुसऱ्या दिवशी रुग्णालयात नियमित तपासणीसाठी जायचं होतं. तर सकाळी लवकर उठून आंघोळ केली, साधना केली. मला आश्चर्य वाटलं, कारण नेहमी रुग्णालयातून आल्यावर आई स्नान करीत असे. मग आजच असं का, हा प्रश्न मला पडला असतानाच हातात साखरेचा डबा घेऊन आली. प्रत्येकाच्या हातावर साखर ठेवली. का कोण जाणे आम्ही नमस्कारही केला तिला. रुग्णालयात गेलो. सर्व तपासण्या उत्तम झाल्या. प्रकृती चांगली आहे, असं डॉक्टरही म्हणाले. तर हिनं त्यांना विचारलं, ‘डॉक्टर, असं किती दिवस चालणार?’ डॉक्टरांनी आश्चर्यानं विचारलं, ‘म्हणजे काय?’ तर हसून म्हणाली, ‘म्हणजे हेच की या घडीला प्रकृती चांगली आहे.. घरी जाताच ढासळते.. आता हे थांबायला नको का?’ डॉक्टर तिच्याकडे अगम्य नजरेनं पाहत असतानाच ती नुसतं हसली आणि क्षणार्धात प्रकृती इतकी ढासळत गेली की उपचारांसाठी धाव घ्यायला डॉक्टरांना क्षणाचीही संधी मिळाली नाही! आईनं देहाचा निरोप घेतला.. अगदी सहज.. डॉक्टर म्हणाले, ‘तुमच्या आईने आम्हाला फसवलं.’ आदल्या दिवशीच तिनं स्वत: आणलेली साडी तिला नेसवली तेव्हा लक्षात आलं ती म्हणाली होती, ही साडी उद्याच वापरायला काढायची आहे! म्हणजे तिनं आम्हालाही फसवलं.. आपला मृत्यू कळूही दिला नाही!’’

आता अखेरची आठवण आहे माझ्या लहानग्या गुरुभगिनीची.. सुजाताची! महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात ती राहायची. गुरुजींसोबत आम्ही काही जण तेथे अधेमधे जात असू. तिथल्या लोकांची गुरुजींवरची श्रद्धा खरोखर चित्तावर खोलवर संस्कार करणारी होती. ज्या घरात गुरुजी उतरायचे तिथं सगळ्या गुरुबंधूंची गर्दी असायची. दिवसभराचं जेवण-खाण, चहा-पाणी त्याच घरात व्हायचं. गुरुजी जे बोलत तोच शुद्ध सत्संग असे. तो कधी सुरू होईल आणि कधी तो प्रवाह थांबेल, याचा काही नेम नसे. एका लहानशा खोलीत चाळीसेक जण गुरुजींसमोर बसत आणि सत्संगाच्या अमृतधारेत डुंबत. हा सत्संग कधी रात्री दोन-अडीचपर्यंतही चालायचा. तिथं मांडी ठोकून पहिल्या रांगेत मी बसत असे आणि माझ्या शेजारी असायची सुजाता! सुजाता व्याधिग्रस्त होती. तिचे हात आणि चेहरा सतत वेडावाकडा हलत असे. तोंडातून लाळ गळत असे. ती पुसायला हातात रुमाल घेऊन ती बसत असे आणि तो बरेचदा माझ्या हातालाही लागत असे. तिला नीट बोलताही यायचं नाही. तिचे उच्चार समजायचेच नाहीत. ती काय बोलत आहे, हे केवळ तिच्या आईलाच कळत असे. तिची आकलनशक्तीही तिच्या वयाच्या मुला-मुलींप्रमाणे नाही, असं मला वाटत असे. त्यामुळे इतरांसारखी तीसुद्धा रात्री दोन-अडीचपर्यंत बसून राहायची तेव्हा मला वाटायचं, हिला काय कळतंय गुरुजी काय सांगताहेत ते? कशाला इतका वेळ बसून राहायचं? यायचं, दर्शन घ्यायचं आणि आल्या पावली परत जायचं!

पण सुजाता हटली नाही! प्रयत्नपूर्वक थोडं थोडं करीत गुरुजींचं एकोणिशे पानी ‘रामायण’ तिनं वाचून काढलं. गुरुस्थानी उत्तर प्रदेशातही जाऊन आली. रोज नेमानं जपही करायची. गुरुजींशिवाय अन्य गप्पा कुणाला मारूच द्यायची नाही. ही सर्व अंतर्यात्रा कुणाला उमगलीच नव्हती फारशी..

ती आजारी पडत गेली.. मग ‘तो’ दिवस उजाडला.. वडील कामगार संघटनेच्या कामात सकाळपासून व्यग्र असायचे. त्या सकाळीही त्याच गडबडीत ते असताना हिनं त्यांना थांबवलं आणि वचन मागितलं की, गुरुजींचा मार्ग कधी सोडणार नाही! घरातल्या प्रत्येकाकडून तेच वदवून घेतलं. मग गुरुजींना दूरध्वनी केला. ‘मी आनंदात आहे,’ असं सांगितलं. त्यांचे आशीर्वाद घेऊन ती नित्याच्या जपाला बसली आणि जप करता करता अलगद ऐलतीर सोडला!

‘इतके तासन्तास सद्गुरूंसमोर बसून हिला काय कळतंय,’ असं मला वाटायचं.. तिच्या अगदी शेजारी बसूनही मला ते कळलं नव्हतंच! एवढंच नाही, तर तिच्यासारखं सद्गुरूंसमोर बसूनही त्यांच्याकडून तिनं जे ग्रहण केलं तेसुद्धा मला कळलं नव्हतं.. मग ते जगण्यात उतरण्याची गोष्ट तर दूरच..

असं वाटतं.. सुजातासारखीच बुद्धी व्हावी.. समर्थ म्हणतातच ना- ‘प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचळ भजनलीळा लागू दे आस तुझी!’.. जगासारखं आकलन नसावंच.. कारण जन्माला येऊन खरं काय साधायचं आहे, हे ज्याला कळलं त्याच्याच जगण्यातले इच्छा-अपेक्षांचे अर्धविराम विरले.. जगणं पूर्ण झालं.. सुजातासारखं!

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विचार पारंब्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Poetry that inspired swatantryaveer savarkar to welcome death

ताज्या बातम्या