जनांचा प्रवाह चळला..

मला आठवतं.. बऱ्याच दिवसांत भेटलोच नाही, असं म्हणत चार मित्र ठरवून एकदाचे भेटले.

दुसऱ्यांशीच नव्हे, तर स्वत:शीही माणसाचा संवाद कमी होत चालला आहे.. एक तर मोबाइल.. नाही तर दूरचित्र वाहिन्या.. नाही तर कॉम्प्युटर गेम्स.. यातच अडकून प्रत्येक क्षण वेगात सरत आहे.. त्यामुळे क्षणभराचीही उसंत मनाला उरलेली नाही.. शांतपणे कोणत्याही गोष्टीचा विचार करायची फुरसत नाही, आपल्याच मनातल्या विचार आणि भावतरंगांना निरखून आत्मपरीक्षण करण्याची सवड नाही किंवा आपल्या अवतीभोवतीच्या जगातल्या वास्तवाला भिडण्याची इच्छाही नाही.. असं काहीसं होतंय का?

परवा व्हॉटस्अ‍ॅप काही काळासाठी बंद पडला आणि हजारो लोकांना आता संवाद कसा साधावा, हा प्रश्न पडला! अनेकांनी आपापल्या घरातल्या माणसांकडे गोंधळून पाहिलं.. घरातल्या माणसांशीही बोलता येतं, याचाच अनेकांना विसर पडला होता.. क्षणोक्षणी या ‘वचावचा’ अ‍ॅपवर व्यक्त होत राहण्याची सवय जडलेल्यांचा तो सुरू होईपर्यंत जीव टांगणीला लागला..

खरंच संगणक आले आणि ‘टायपिंग’ इतिहासजमा होत चाललं होतंच, पण व्हॉटस्अ‍ॅपनं त्याला पुनर्जन्म दिला! आता प्रत्यक्ष गप्पांची गरज संपली आणि ‘आज सकाळी काय खाल्लं?’ इथपासून ते ‘उद्या काय खाणार?’ इथपर्यंत भारंभार गप्पा टाइप होऊ लागल्या. घरोघरी ‘फॉर्वर्ड’ विचारांचे पाईक तयार झाले, तर कित्येकांना फुलं, फळं, हसरा चेहरा, रडका चेहरा, चिडका चेहरा, जोडलेले हात, विजयाचं दुबोट, कौतुकाचा अंगठा अशा चित्रभाषेचा आधार घेत आदिमानवाप्रमाणेच भावनांना वाट मोकळी करून द्यायची सवय जडली. दुरावलेले जुने शाळासोबती, खूप वर्षांपूर्वीचे शेजारी, जुने सवंगडी, दूरवरचेच नव्हे तर सातासमुद्रापारचे नातेवाईक यांच्याशी घरबसल्या संवाद साधत राहण्याची संधी या संवादयंत्रांनी मिळवून दिली आणि पाहता पाहता जग संवादात वाहू लागलं!

मला आठवतं.. बऱ्याच दिवसांत भेटलोच नाही, असं म्हणत चार मित्र ठरवून एकदाचे भेटले. कुठे तरी हॉटेलात भेटू.. गप्पा मारू.. जुन्या आठवणी जागवू आणि परत भेटीचा दिवस ठरवून एकमेकांचा निरोप घेऊ, असं ठरलं. चौघं भेटले. चेहऱ्यावर कित्येक दिवसांनी एकमेकांना पाहिल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. गळाभेटी झाल्या.. जुन्या टोपणनावांनी हाकारून झालं.. आवडत्या पदार्थाची वाट पाहत मग एकमेकांकडे पाहत असताना, आता काय बोलावं, हे प्रश्नचिन्ह चौघांच्याही चेहऱ्यावर रेंगाळू लागलं.. आठवून आठवून काही तरी विषय निघत होते, पण तोच.. अगदी क्षीण, पण कानांना अतिपरिचित झालेले स्वर उमटू लागले.. चौघांनी आपल्या ‘लेकरां’ना म्हणजे मोबाइलना हातात घेतलं.. व्हॉट्सअ‍ॅपवर संवाद सुरू झाला..

‘‘फीलिंग ग्रेट! किती तरी दिवसांनी माझे जुने मित्र भेटलेत.. खूप गप्पा सुरू आहेत..’’

‘‘वा.. (पाठोपाठ कौतुकाचा अंगठा) आम्हाला मात्र भेटू नकोस!’’

‘‘भेटणारच आहे.. नक्की..’’

‘‘कुठे? कधी?’’

‘‘तू सांग! हवं तर इथंच भेटू.. हे हॉटेल काय ग्रेट आहे.. आणि बोलायला एकदम निवांत जागा आहे.. कलकलाट नाही.. इथंच भेटू..’’

‘‘आपल्या ग्रुपवरच टाक ना तसं.. आणि हो, तुझ्या मित्रांचे फोटोही पाठव.’’

‘‘हा काय डीपीच बदलतोय..’’

सेल्फी घेतलेला डीपी अपडेट झाला.. मग मोबाइल तात्पुरता खाली ठेवून आता मित्रांशी बोलू, या विचारानं त्यानं वर पाहिलं, तर त्याचे तिन्ही मित्रही वचावचा शब्द ‘टाइपण्यात’ गुंतले होते.. अर्थात तिघांच्या शब्दसंवादाचा गाभा एकसमानच होता..

‘‘फीलिंग ग्रेट! किती तरी दिवसांनी माझे जुने मित्र भेटलेत.. खूप गप्पा सुरू आहेत..’’

आपल्या तिघा मित्रांना भानावर आणावं म्हणून पहिल्यानं घसा खाकरला, पण त्या खाकरण्यापेक्षा कमी आवाजात नाडीच्या ठोक्यांप्रमाणे व्हॉटस्अ‍ॅपवर टोले पडू लागले.. आता ग्रुपवर बातमी ‘लीक’ झाली होती आणि प्रत्येकाचा संदेश थडकू लागला होता..

‘‘आपण सर्वानी भेटायचा विचार छानच आहे.. खरंच भेटू.. कित्येक दिवसांत प्रत्यक्ष भेटून गप्पा अशा झालेल्याच नाहीत..’’

त्या प्रत्येक संवादाला उत्तर देणं भागच होतं.. नुसत्या निळ्या बरोबरच्या खुणा दुसऱ्याला दिसणं बरोबर नसतं.. माणसाला शब्दातून प्रतिसाद लागतोच.. मग पुन्हा ‘टाइप’णं आलंच..

‘‘हो भेटूच.. नक्की..’’

तोच वाफांची नक्षीनर्तन करीत खाद्यपदार्थाच्या लहान लहान कढया आल्या आणि चौघांनी मोबाइल खाली ठेवले.. पदार्थ वाढले जात असताना, ‘‘काय मग? काय चाललंय सध्या?’’ असा प्रश्न कुणी तरी विचारला.. कुणी तरी सध्या काय चाललंय, याचं उत्तर देऊ लागला, पण ते स्वगतासारखंच होतं.. कारण ‘‘हुं.. हुं..’’ असं म्हणत माना डोलवत जो-तो पुन्हा आपापल्या ‘बाळा’ला म्हणजेच मोबाइलवर आलेल्या संदेशांना चिन्हांचं किंवा ‘वा’, ‘नक्की’ किंवा ‘ग्रेट’ या शब्दांची तीट लावण्यात गुंतला होता. थोडक्यात, सध्या कुणाचं काय चाललंय, हे वाचायची सवय लागलेल्यांना ऐकायची उत्सुकता नव्हती.. शेवटी सांगणाराही आपल्या तळव्यावरच्या मोबाइलकडे प्रेमानं वळला.. मग पदार्थ पूर्ण वाढून झाले तेव्हा खाण्यासाठी तरी हात मोबाइलमुक्त करावाच लागला.. पण तोही अगदी काही क्षणच.. कारण ‘कशावर ताव मारताय?’ या प्रश्नाचं सछायाचित्रासह स्पष्टीकरण करायचं होतं!

मग मोबाइल कॅमेऱ्याचा क्लिकक्लिकाट झाला. छायाचित्रं गेलीसुद्धा.. लगेच त्यावर प्रतिक्रिया आल्यासुद्धा.. त्यांना प्रति-प्रतिक्रिया दिल्या गेल्यासुद्धा.. असं सगळं सुद्धा सुद्धा झाल्यावर थोडी शुद्ध आली.. मग पुन्हा एकमेकांकडे पाहणं झालं.. ‘तो आठवतो का रे?’ आणि ‘ती आठवते का रे?’ अशी प्रश्नकोडी सोडवली गेली.. काही सुटली.. काही अधांतरीच राहिली.. मग फक्त पदार्थाचं थोडं कौतुक.. आणखी कुठे काय काय मिळतं, याचं थोडं वर्णन.. आणि त्यात परत परत हातालगत ताटकळत असलेल्या मोबाइल संदेशांना उत्तरं.. मग कुणाच्या तरी फोनवर ‘अरे अमुक वाजता भेटणार होतास ना,’ असा प्रश्न दणाणला आणि तो घाईघाईत खाणं आवरतं घेतं म्हणाला.. ‘‘जायचंय रे.. बराच उशीर झाला..’’

मग चौघांनी एकमेकांचा निरोप घेतला.. प्रत्येक जण म्हणाला, ‘‘खूप छान वाटलं भेटून.. किती तरी दिवसांनी गप्पा झाल्या.. पण मन काही भरलं नाही.. परत एकदा भेटूच.. अगदी याच इथं नक्की!’’

तर जुने मित्र असोत.. आप्त असोत.. की आणखी कुणी असो.. एकमेकांना भेटूनही ‘संवाद’ काही घडत नाही.. कारण बोलक्या संवादाची सवयच खुंटत चालली आहे का? या सर्व आधुनिक माध्यमांनी जग जवळ आलं आहे, संपर्क वाढला आहे, पण संवाद आटला आहे.

दुसऱ्यांशीच नव्हे, तर स्वत:शीही माणसाचा संवाद कमी होत चालला आहे.. एक तर मोबाइल.. नाही तर वाहिन्या.. नाही तर कॉम्प्युटर गेम्स.. यातच अडकून प्रत्येक क्षण वेगात सरत आहे.. त्यामुळे क्षणभराचीही उसंत मनाला उरलेली नाही.. शांतपणे कोणत्याही गोष्टीचा विचार करायची फुरसत नाही, आपल्याच मनातल्या विचार आणि भावतरंगांना निरखून आत्मपरीक्षण करण्याची सवड नाही किंवा आपल्या अवतीभोवतीच्या जगातल्या वास्तवाला भिडण्याची इच्छाही नाही.. असं काहीसं होतंय का?

एकीकडे संवाद आटत आहे.. ओळखीतल्या परिघात शाब्दिक संपर्क वाढत आहे.. पण असं म्हणावं तर दुसरीकडे नको इतका ‘संवाद’ उतूही जात आहे.. आपल्या बौद्धिक, मानसिक, भावनिक आणि हो.. धार्मिक पातळीची शंका यावी इतका..

माझ्या मनात काही चित्रं उमटत असतात, पण ती कॅनव्हासवर उतरवण्याएवढी कुवत  नाही! एक चित्र असं होतं.. की विमानात बसलेला, पण त्या विमानापेक्षा अधिक वेगानं ज्याचं मन धावतंय असा, एक आलिशान कार्यालयात दिमाखात खुर्चीत बसलेला, वैज्ञानिक उपकरणांनी भरलेल्या प्रयोगशाळेत कुणी एक शास्त्रीय संशोधनात गुंतलेला.. पण या सर्वाची वेशभूषा अगदी आदिम काळातली आणि त्यांचे चेहरे?.. हिंस्र पण कधी भावहीन, तर कधी भावशोधक आदिमानवासारखे. काळ कितीही झपाटय़ानं प्रगत झाला तरी माणूस काही प्रगत होत नाही.. तो द्वेष, क्रोध, मत्सर, काम अशा त्याच्या आदिम भावनांच्या सोबतीनंच जगत असतो, हे सत्य कॅनव्हासवर उतरवणारे.. थोडं आजूबाजूला पाहिलं तरी जाणवेल की, एकीकडे संवाद आक्रसत असताना एक आक्रमक संवाद सर्व मर्यादा पार करून सुरू झाला आहे! हा संवाद सुरू करणारे, पेटवणारे आणि धगधगता ठेवणारे तुमच्या-आमच्यातच आहेत.. याच सर्वात मोठय़ा लोकशाही देशातले आणि प्राचीन भरीव संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या देशातलेच आहेत! समाजमाध्यमांचा सराईत वापर करणारी, सफाईदार जगणारी ही माणसं जेव्हा एखाद्याच्या मतावर, एखाद्या बातमीवर, एखाद्या लेखावर ज्या पद्धतीनं व्यक्त होतात ते पाहिलं तर त्यांच्या शिवराळ आणि ओंगळ भाषेची कुणालाही शिसारी यावी!

समर्थ रामदास यांची एक ओवी होती..

जनांचा प्रवाह चालिला। म्हणजे कार्यभाग आटोपला। जन ठायीं ठायीं तुंबला। म्हणजे खोटा।।

म्हणजे लोक जर दुरावू लागले, तर कार्यालाच ओहोटी लागते आणि लोक जर एकाच जागी साचून राहिले तरी काही साधत नाही!

आज याच ओवीत बदल करून म्हणावेसे वाटते की, ‘‘जनांचा प्रवाह चळला, म्हणजे कार्यभाग आटोपला!’’

भाषेच्या दृष्टीनं लोक असे पातळी सोडून व्यक्त होऊ लागले आहेत की खरं ध्येयही दुरावत चाललं आहे.. या एकाच चिखलकोंडीत हे व्यक्त होणं असं अडकून आहे की समाजाच्या भावी वैचारिक वाटचालीची चिंताच वाटावी..

मग वाटतं.. संवाद आटतोय, हे एक वेळ परवडलं.. विखारी, विषारी संवादापेक्षा मौनावस्था कधीही चांगली.. निदान तिनं आत्मसंवादाची शक्यता तरी बळावेल..

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विचार पारंब्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Technology deteriorate the quality of human interaction