बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता, आणि आत एका अंधाऱ्या खोलीत अंधूक प्रकाशात ती टेबलावर पसरलेली कागदपत्रं बघत होती. तिच्याकडे बारा नावांची यादी होती. नाव, वय, आणि त्यांच्यावर असलेले आरोप… यांची यादी. ते बारा जण म्हणजे नाझी ‘गेस्टापों’च्या (नाझी जर्मनीची गुप्त पोलीस संघटना) ताब्यातील फ्रेंच क्रांतिकारी आणि ब्रिटिश एस.ओ.ई. (स्पेशल ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह) होते. ते जर फासावर गेले, तर पूर्ण फ्रेंच प्रतिरोध चळवळ (resistance movements) कोलमडून जाईल, अशी अवस्था होती. ती निर्धारानं म्हणाली, ‘‘त्यांना सोडवून आणायलाच हवं. मी ते करेन.’’ कामगिरी अजिबात सोपी नव्हती, पण ती जिद्दीनं प्रयत्न करणार होती.

कैद्यांना ठेवलं होतं त्या मोसॅकच्या तुरुंगात खूप तगडी सुरक्षा व्यवस्था होती. त्यातील लाचखोरांची माहिती काढण्यात आली. मग एका सुरक्षा सैनिकाला त्याच्या कामाची वेळ बदलण्यात आल्याचा आदेश मिळाला, आणि बाकी दोघांचे खिसे भरण्यात आले. ‘ती’ तिथं एका म्हाताऱ्या शेतकरी स्त्रीच्या वेशात पोहोचली. लंगडत लंगडत दरवाजापाशी गेली. पहारेकऱ्यानं अडवलंच. ती म्हणाली, ‘‘तुरुंगातील डॉक्टर आम्हा शेतकऱ्यांना खूप मदत करतात. माझी तब्येत खूपच खराब आहे . त्यांनी मला इथं बोलावलं आहे.’’ तिची दया येऊन तिला आत सोडण्यात आलं. लंगडतच चालणाऱ्या या म्हातारी शेतकरीण बाईचा कुणाला संशयही आला नाही, पण म्हातारीच्या तीक्ष्ण नजरेनं तिथलं बरंच काही टिपलं होतं. काही दिवसात तिनं एक योजना आखली.

कैदेत असलेला तिचा एक प्रतिनिधी जीन ब्लॉच याची पत्नी गॅबी ब्लॉच दर आठवड्यात त्याच्यासाठी घरून डबा नेत असे. गॅबीला विश्वासात घेऊन मोहिमेत सामील करून घेण्यात आलं. तिच्या डब्यातून अशा बऱ्याच गोष्टी पाठवण्यात येऊ लागल्या, ज्यातून कैद्यांना किल्ल्या बनवता येतील. पत्र्याच्या डब्याची झाकणं, माशाचे काटे, कणीक अशा साधनांचा वापर करून किल्ल्या बनवण्यात आल्या. शेवटी एक तारीख निवडण्यात आली. तुरुंगामध्ये जाणाऱ्या, कुणीही न अडवणाऱ्या धर्मोपदेशकांच्या मदतीने शेवटचा निरोप पोचवण्यात आला. १५ जुलै १९४२ च्या रात्री ठरलेल्या वेळेस पूर्ण बारा कैदी तुरुंगातून पसार झाले.

इतक्या कडक सुरक्षा व्यवस्थेनंतरही हे घडल्यामुळे जर्मन ‘गेस्टापो’ अधिकारी चवताळले होते. त्यांनी संपूर्ण शहरात शोधमोहीम सुरू केली. तिचं त्याकडे बारीक लक्ष होतं. तिला तिच्या सगळ्या साथीदारांना सुरक्षित इंग्लंडपर्यंत पोचवायचं होतं. या संपूर्ण योजनेत भयंकर मोठा धोका होता, पण ‘ती’ डगमगली नाही. तिनं त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लपण्याची व्यवस्था केली होती. तिनं काही जणांसाठी फ्रेंच पोलीस गणवेषाचीदेखील सोय केली होती. काही जणांना घनदाट जंगलात लपवून ठेवलं होतं. साधारण महिन्याभराच्या काळात एक एक करून बारा जणांना सुखरूप लंडनला पोचवण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील ही एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची अशी यशस्वी योजना समजण्यात येते.

आणि हे सारं घडवून आणणारी ‘ती’ होती, ब्रिटिश एस.ओ.ई. एजंट… म्हणजे एक गुप्तहेर, व्हर्जिनिया हॉल! जर्मनांच्या भाषेत जर्मनीसाठी अत्यंत धोकादायक स्त्री! लियॉ (Lyon) मध्ये जागोजागी भिंतीवर तिचे रेखाचित्र लावण्यात आले. कुठल्याही परिस्थितीत हिला ताब्यात घ्या किंवा ठार करा, असा आदेश निघालेली ही एक लंगडी स्त्री! हो, एका पायाने अधू असलेली, आणि जर्मनांच्या भाषेत… ‘द लिम्पिंग लेडी!’

६ एप्रिल १९०६ रोजी अमेरिकेतील मेरीलँडमधील बाल्टिमोर इथे एका सधन कुटुंबात व्हर्जिनिया हॉल यांचा जन्म झाला. लहान वयातच त्यांच्या स्वतंत्र आणि धाडसी स्वभावाची चुणूक त्यांच्या पालकांच्या लक्षात आली होती. केंब्रिज आणि बर्नार्डनंतर १९२६ मध्ये पॅरिस इथून फ्रेंच, इटली आणि जर्मन भाषेचे शिक्षण पूर्ण करून त्यांना अमेरिकी दूतावासात अधिकारी म्हणून किंवा राजदूत म्हणून काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अमेरिकी राज्य विभागाच्या परीक्षाही दिल्या.

प्रत्येक वेळी एक स्त्री म्हणून त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यांनी त्यावेळचे अमेरिकी अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्याकडे फिर्यादही दाखल केली. शेवटी नाइलाजानं १९३१ मध्ये पोलंडमधील अमेरिकी दूतावासात एक लिपिक म्हणून त्या रुजू झाल्या. १९३३ मध्ये त्यांची बदली तुर्किये (तुर्की) इथे झाली असताना त्यांच्या बाबतीत एक दुर्घटना घडली. आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या तुर्कियेच्या जंगलात शिकार करण्यासाठी गेल्या असताना तारेच्या कुंपणात पाय अडकून त्या पडल्या आणि त्यांच्या स्वत:च्या बंदुकीचा ट्रिगर दाबला जाऊन त्यातील गोळी त्यांच्या पायातून आरपार गेली. जवळपासचं रुग्णालय शोधेपर्यंत बराच उशीर झाला होता.

डॉक्टरांना त्यांचा एक पाय गडघ्याखालून कापावा लागला. नशिबानं त्यांच्यावर केलेला हा मोठा आघात होता. कारण त्यानंतर त्यांना अमेरिकी परराष्ट्र सेवा अधिकारी किंवा राजदूत होण्याचं स्वप्न कायमचं विसरावं लागलं. शारीरिकदृष्ट्या विकलांग स्त्रीसाठी तिथे अजिबात जागा नव्हती. इस्तंबूलमधील डॉक्टरांनी त्यांना एक कृत्रिम, बोजड लाकडी पाय बसवून दिला, त्या पायासोबत जगणं त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारलं आणि त्याचं नाव ठेवलं, ‘कथबर्ट’. त्यादरम्यान त्यांनी त्यांची प्रशासकीय सेवेची नोकरी चालू ठेवली. नंतर मात्र त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला. १९४०च्या सुरुवातीला त्या पुन्हा फ्रान्सला गेल्या.

त्या आधीही काही काळ त्या पॅरिसमध्ये होत्या, आणि तेव्हाच फ्रान्सबद्दल त्यांच्या मनात खूप जिव्हाळा उत्पन्न झाला होता. त्या फ्रान्समध्ये असतानाच जगभरात अस्थिरता निर्माण झाली, आणि दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं. त्यावेळी फ्रान्समध्ये प्रतिरोधक चळवळीनं जोर पकडला होता. चळवळीतील क्रांतिकाऱ्यांना मदत म्हणून त्यांनी अँब्युलन्स चालकाचं काम करायला सुरुवात केली. जखमी सैनिकांना इस्पितळात नेऊन पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली. मे १९४० मध्ये जर्मन सैन्यानं फ्रान्समध्ये घुसखोरी केली आणि बऱ्याच भागावर वर्चस्व निर्माण केलं. तेव्हा फ्रान्स सोडून स्पेन मार्गे त्या इंग्लंडला पोहोचल्या. तिथं ब्रिटिश गुप्तचर विभागातील अधिकारी जॉर्ज बेलोस यांनी त्यांच्यातील धाडस आणि एका लंगड्या पायासोबतही जिद्दीनं काम करण्याची ताकद ओळखली. एक गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी ही अत्यंत योग्य स्त्री आहे हे त्यांनी जाणलं होतं. त्यांना असेच धाडसी हेर हवे होते.

त्याच काळात विन्स्टन चर्चिल यांच्या पुढाकारातून हेरगिरी करणं आणि नाझीव्याप्त युरोपमध्ये प्रतिरोध चळवळीस गती देणं या उद्देशानं एस.ओ.ई. (स्पेशल ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह) या गुप्त संस्थेची स्थापना करण्यात आली होती. १९४१ मध्ये एस.ओ.ई.प्रमुख निकोलस बॉडिंग्टन यांनी जॉर्ज बेलोस यांच्या शिफारशीवरून व्हर्जिनिया यांना एस.ओ.ई.मध्ये सामील करून घेतलं. इथं जगातील सर्वात धाडसी महिला गुप्तहेर बनण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला होता. फेब्रुवारी १९४१ मध्ये जंगलातील एका गुप्त जागी त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. गोरिला युद्ध तंत्र, वायरलेस तंत्रज्ञान, आणि स्वसुरक्षा यावर त्यांनी कठोर प्रशिक्षण घेतले.

सप्टेंबरमध्ये त्यांना जर्मनव्याप्त फ्रान्स म्हणजेच विची फ्रान्स (Vichy france) मध्ये पाठवण्यात आलं. त्याच देशात, जिथून त्या अस्थिर वातावरणामुळे निघून आल्या होत्या. तिथं त्या ‘न्यूयॉर्क पोस्ट’साठी पत्रकार म्हणून काम करू लागल्या. अर्थातच ही त्यांची वरवरची ओळख होती, कारण एका साध्या स्त्री पत्रकाराकडे कुणाचं लक्ष जाण्याचं कारण नव्हतं. खरा उद्देश आणि खरं काम काही वेगळंच होतं. फ्रेंच क्रांतिकारी चळवळीतील सदस्यांना त्यांच्या कामात मदत करणे, त्यांना लपण्यासाठी जागेची व्यवस्था करून देणे, हत्यार पोचवणे, गुप्त संदेश पोचवणे अशा अनेक जबाबदाऱ्या त्या पार पाडू लागल्या. त्यावेळी अमेरिका प्रत्यक्ष रूपात युद्धात सक्रिय नव्हता.

अशावेळी एक अमेरिकी स्त्री, तीदेखील एका पायाने अधू असणारी… गुप्तहेर म्हणून इतकी सक्षम असेल अशी शंका जर्मन अधिकाऱ्यांना अजिबातच आली नाही. त्यांचा शोध तगड्या, प्रशिक्षित पुरुष गुप्तहेरासाठी होता. जगाच्या दृष्टीनं असणारं दौर्बल्य व्हर्जिनिया यांनी स्वत:तील सामर्थ्य सिद्ध करण्यास वापरलं. त्यांच्या शारीरिक व्यंगालाच त्यांनी नाझी विरुद्ध हत्यार म्हणून वापरलं. काय होतं ते असामान्यत्व, वाचूया १४ फेब्रुवारीच्या अंकात.

अपर्णा देशपांडे | adaparnadeshpande@gmail.com