सुलभा आरोसकर
दृष्टिहीन व्यक्तींचा संघर्ष मोठाच. पण त्यांना समजून घेऊन त्यांना त्यांच्या प्रवासात स्वत:च्या डोळसपणानं वाट दाखवणारा सांगाती, जोडीदार मिळाला तर?.. दृष्टिहीनत्वाला मागे टाकू पाहाणाऱ्या लढवय्यांना भक्कम साथ देणाऱ्या डोळसांची ही गोष्ट. ‘ २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२२’ या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडय़ानिमित्तानं.

‘‘दार्जिलिंगचं बर्फाच्छादित कांचनगंगा शिखर. त्या पांढऱ्याशुभ्र बर्फावर उगवत्या सूर्याची पडणारी प्रकाशशलाका. त्यातून परावर्तित होणाऱ्या रुपेरी, सोनेरी छटा. निसर्गदेवतेचं हे विलोभनीय दृश्य अलकानं असं शब्दांकित केलं, की माझ्या अंत:चक्षूंपुढे ते हुबेहुब उभं राहिलं! चेरापुंजीला ५,००० फूट खोल दरीत ‘संमटुंग’ नदी वाहाते. ती पार करण्यासाठी त्यावर झाडाच्या मुळांचा पूल केला आहे. तो माझ्या हाताला धरून ओलांडण्याचा आनंद तर तिनं मला दिलाच, पण नदीच्या तळाशी असलेल्या जैवीक संपत्तीमुळे पाण्याच्या बदलत्या भासणाऱ्या लाल, पिवळय़ा, हिरव्या रंगांची उधळण नुसती ऐकूनही ते सौंदर्य अनुभवण्याचा आनंद तिनं मला दिला.’’ स्वत: दृष्टिहीन असणारे आणि सर्वतोपरी मदत करून दृष्टिहीनांचं, दिव्यांगांचं जीवन फुलवायचा जणू विडाच उचललेले हेमंत पाटील सांगत होते.

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video

आयुष्याच्या संध्याछायेतलं अलका आणि हेमंत पाटील यांचं हे सहजीवन. ते ऐकताना अलकाताईंचं आयुष्य समरसून जगणं मनाला भावलं आणि त्यांच्या आयुष्यात डोकावण्याचा मोह अनावर झाला. ‘चतुरंग’मध्येच (१६ ऑक्टोबर २०२१) हेमंत यांच्या संघर्षांची गोष्ट आपण वाचली आहे. पण त्यांच्या सहजीवनाविषयी आणखी फार काही जाणून घेण्यासारखं आहे कारण त्यात सर्वात महत्त्वाचा वाटा आहे तो त्यांच्या डोळस पत्नी अलका पाटील यांचा. भुसावळस्थित बाघुडदे या गरीब कुटुंबातल्या अलका सर्वात मोठय़ा. अनेक अडचणींमुळे शिक्षण कमी. माहेरी भरपूर हुंडा घेण्याची प्रथा. वडिलांचा भार कसा हलका करावा हा प्रश्न अलकांना सतावत होता.’’ त्याच वेळेस हरहुन्नरी, हुशार, ‘बी. फार्म.’ झालेल्या, पण अपघातानं दृष्टी गेलेल्या हेमंत यांचं स्थळ कुणीतरी सुचवलं. विचार न करता आणि त्यांना न पाहाताच डोळस अलका बोहल्यावर चढायला तयार झाल्या. लग्नाच्या दिवशी वरवेषातल्या रुबाबदार हेमंतना पाहून ‘प्रथम तुज पाहता’ अशी त्यांची अवस्था झाली असली, तरी तत्क्षणापासून आयुष्यभर सावलीसारखी साथ द्यायचं त्यांनी पक्कं केलं.

सासरी मुंबईत प्रथमच आल्यामुळे गोंधळलेल्या या नववधूला सासरच्यांनी खूप प्रेमानं सामावून घेतलं. हेमंत ‘बी. फार्म.’ असल्यामुळे औषध दुकानासाठी परवाना मिळत होता. मात्र लोकांच्या मनाशी, जीवाशी खेळ नको असं म्हणत तो त्यांनी घेतला नाही. लवकरच सरकारकडून त्यांना स्टॉल मिळाला आणि तिथे १५० हून अधिक वस्तू ठेवून व्यवसाय सुरू केला. दरम्यान हेमंत यांचं शिक्षण सुरू असल्यामुळे (त्यांनी बी.ए,-मानसशास्त्र आणि समाजशास्त्रामध्ये एम.ए. केलंय. याशिवाय अनेक अभ्यासक्रम पूर्ण केलेत.)ते रात्री ७-८ वाजता स्टॉलवर येत. त्यामुळे दिवसभराची लढाई अलकाताईंची. सुरुवातीला त्यांना खूप भीती वाटत असे. मात्र दोघांनाही शून्यातून जग निर्माण करायचं होतं ना! हेमंत यांनी शिक्षण घ्यायला आणि अलकाताईंनी आर्थिक बाजू भक्कम करायला सुरुवात केली. हेमंत पैशांचा योग्य विनियोग करत तो गुणकार पद्धतीनं वाढवत होते. त्याचं सुयश म्हणजे १९८६ मध्ये त्यांचा स्वत:चा ‘झेप’ बंगला दिमाखात उभा राहिला.

यथावकाश हेमंतना ‘नॅब’मध्ये (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड) मध्ये उच्चपदावर नोकरी मिळाली. संसारात स्थिरता आली आणि त्याचबरोबर घरात बाळाचीही चाहूल लागली. आपल्या मुलावर उत्तम संस्कार, त्याची शैक्षणिक प्रगती हे सारं इतर सर्व जबाबदाऱ्यांबरोबर अलकाताईंनी उत्तम निभावलं. मुलगा अभियंता झाला. यथावकाश तो चतुर्भुज होऊन त्यालाही जुळय़ा मुली झाल्या. या सर्व प्रवासात सासू-सासरे, दीर-जाऊ या सर्वाची उत्तम साथ त्यांना मिळाली. नातींच्या बाललीलांमध्ये हेमंत आणि अलका उभयता न्हाऊन निघत असतानाच अचानक काविळीचं निमित्त होऊन मुलगा गेला. घर पूर्णपणे कोलमडलं; पण एकमेकांना साथ देत ते दोघंही परत उभे राहिले. या सर्व प्रवासात तरुण वयापासून हेमंत यांनी सुरू केलेल्या आपल्या दृष्टिहीन आणि अपंग बांधवांसाठीच्या सेवायज्ञात अलकाताईंची पूर्ण साथ असते. लग्न करताना त्यांनी पूर्णत: डोळसपणे दृष्टिहीन हेमंत यांना स्वीकारलं होतं ते त्या आजपावेतो निभावत आहेत!

अनादिकाळापासून स्त्रीचं रूप त्यागमूर्ती, प्रेमस्वरूप.. संयम, धैर्य यांचा मेळ असलेली, प्रसंगी दुर्गामाताही होणारी,असं रेखाटण्यात आलं आहे; पण विवाहितेच्या जीवनात तिचा पती जेव्हा सर्वार्थानं पाठीशी उभा राहतो, तेव्हा तिच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं मोकळं आकाश मिळतं. नलिन पावसकर असंच उत्तुंग व्यक्तिमत्त्व. तरुण वयातल्या एका प्रसंगानं नलिन यांना अंतर्मुख केलं. त्यांना एक घटना कळली ती अशी, की एकदा खरेदीस निघालेले आई-वडील आपल्या अंध मुलीला कारमध्ये बसवून मॉलमध्ये गेले. ते परत आले तेव्हा ती मुलगी बाहेर येऊन एका गटारात पडली होती. हे ऐकून नलिन हेलावून गेले. दृष्टिहीनांच्या या हतबलतेनं त्यांनी मनात एक खूणगाठ बांधली, ती कायमची. ‘पी.डब्ल्यू.डी.’मध्ये नोकरी करत असताना विक्रीकर विभागाचं नाव उजळवणाऱ्या रत्नप्रभा नाईक या अंध तरुणीचं नाव त्यांनी ऐकलं होतं. खेळाची आवड रक्तात भिनलेल्या रत्नप्रभांचं बुद्धिबळ, ज्युडो, पोहणं, अॅथलेटिक्स, गोल-बॉल, गिर्यारोहण अशा सर्वच खेळांमधलं प्रावीण्य त्यांना समजलं होतं. जेव्हा ते दोघं प्रत्यक्ष भेटले तेव्हा रत्नप्रभांच्या व्यक्तिमत्त्वानं नलिन प्रभावित झाले. अंधत्व झुगारून देऊन कर्तृत्व गाजवणाऱ्या या तरुणीला आपण साथ दिलीच पाहिजे, हा निर्णय पक्का झाल्यावर घरातल्या (पान ४ वर) (पान १ वरून) सर्वाचं मन वळवून त्यांनी रत्नप्रभांना आपली अर्धागिनी म्हणून घरी आणलं. १९९५ पासून त्यांचं सहजीवन सुरू झालं आणि रत्नप्रभांची नेहा झाली. निर्भीड नेहांची जीवननौका पतीची सर्वार्थानं साथ मिळाल्यामुळे दर्यापार पोहोचली. बुद्धिबळ स्पर्धेत राष्ट्रीय विजेतेपद, लंडन स्टेफर्ड येथे अंधांसाठी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाचवं स्थान, राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक असे एकेक गड सर करतानाच त्यांनी स्वत:चेही अनेक विक्रम मोडले. नलिन हे नि:स्पृह मनानं त्यांना साथ देत होते, त्या नसताना घर उत्तम सांभाळत होते. तशातच एक जीवघेणं संकट उभं राहिलं. नलिन यांना मोठा अपघात झाला. शरीरात २६ फ्रॅक्चर्स होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, तरी ते दोन-अडीच र्वष अंथरुणाला खिळून होते. तेव्हा नेहा यांनी त्यांना भक्कम साथ दिली. परिणामस्वरूप ते पुन्हा आपल्या पायांवर उभे राहिले. अपघातात बाहेरच्या जगाला पारख्या झालेल्या नलिन यांचं मन खूपच हळवं झालं होतं. त्यांच्या मनात येई, ‘इतर सर्व दिव्यांगांच्या जीवनाची दाहकता मला आता समजतेय. नेहा हे सर्व लीलया पेलतेय. पण ज्यांना कुणीच नाही त्यांचं काय?’ नलीन एक भव्य स्वप्न पाहात होते. त्यांना वाटे, की नेहांचं खेळातलं नैपुण्य, नेतृत्वगुण आणि लढवय्या वृत्तीचा उपयोग इतर दिव्यांग क्रीडाप्रेमींना झाला तर? नेहा यांना त्यांचं हे स्वप्न समजताच २००३ मध्ये ‘ऑल इंडिया अंध-स्त्री-हित असोसिएशन’

(AIASHA) या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. घरातल्या गरजा कमी करून येणारा पैसा तिथे सत्कारणी लावायला त्यांनी सुरुवात केली. नलिन यांना भरभर चालता येत नाही, शिवाय ते फार वेळ उभे राहू शकत नाहीत अशा परिस्थितीतही संस्थेची बरीचशी कामं ते मनापासून पार पाडतात. येणाऱ्या प्रत्येक दिव्यांग क्रीडाप्रेमीचं, त्यांच्या घरातल्या सर्वाचं समुपदेशन करून, शंका दूर करून त्यांना निर्भय करत असतात. हा नुसता ‘बोलाची कढी बोलाचा भात’ नसतो. त्या सर्वाची गिर्यारोहण मोहीम असो किंवा कुठे खेळाची टीम घेऊन जाणं असो, नलिन त्यांच्याबरोबर जातात.

उत्साही नेहा यांनी एका वर्षी सर्व दृष्टिहीनांना वैष्णवदेवीला घेऊन जायचं ठरवलं. २६ जणी निघाल्या. त्यांच्याबरोबर नलिन एकटे डोळस. त्यांना स्वत:ला वैष्णवदेवीच्या देवळाचा डोंगर चढणं अवघड.. तरी ते चढून गेलेच. वरती दर्शनासाठी पोहोचले असता एक स्त्री खालीच राहिल्याचं लक्षात येताच ते स्वत: परत खाली उतरून गेले आणि तिला वर घेऊन आले, देवीचं ‘दर्शन’ घडवलं. या ट्रिपमध्ये त्यांच्याबरोबर जपान, पाकिस्तान इथल्या भक्तांचाही समावेश होता. या संस्थेच्या माध्यमातून दोघांनी दहा हजारांच्या वर खेळाडूंना नवसंजीवनी दिली आहे. एक हजारच्या वर स्पर्धक आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आहेत. ‘ज्योतसे ज्योत जगाते चलो..’ हाच संदेश दोघं जगाला देत आहेत. नैपुण्य नेहांचं असलं, तरी नलीन यांचाही त्यात सिंहाचा वाटा आहे. आणखी कोणतं स्वप्नं पाहाताय का, असं विचारताच ते म्हणतात, ‘‘ज्येष्ठ, गरजू आई-बाबातुल्य लोकांसाठी प्रेमाचं निवासस्थान काढायचं आहे. आता मुलगा हाताशी आलाय. शिक्षण सांभाळत तो घरात मदत करत असतो. त्यामुळे हे शक्य होईल, असं वाटतं.’’ या सर्वानाही उदंड आयुरारोग्य लाभो, हीच प्रार्थना.

असे अनेक नवकोट नारायण अनेकींचे लामणदिवा झाले आहेत! कविता, सोनल, नफिसा,अनिता अशा किती तरी दृष्टिहीन तरुणींना उच्चशिक्षित, धडधाकट पतींनी अर्धागिनी म्हणून स्वीकारलं आहे, त्यांना मानाचं स्थान दिलं आहे. अर्थात स्त्रियाच नव्हे, इतरही अनेक दृष्टिहीन, दृष्टीबाधित लोक आयुष्यात घोंघावणाऱ्या वादळाला निर्भीडपणे भिडत असतात. शरीरातील इतर चार अतिसूक्ष्म संवेदनाक्षम ज्ञानेंद्रियांचा उपयोग करून आपली जीवननौका दर्यापार नेत असतात.

मात्र सामान्य माणसं नेत्रदान करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतात. चाळीस र्वष नेत्रदानाचा हिरिरीनं प्रचार करणारे श्रीपाद आगाशे सांगतात, की संपूर्ण जगात जवळजवळ पाच कोटी दृष्टिहीन आहेत. त्यातील २५ टक्के व्यक्ती एकटय़ा भारतात आहेत. यातल्या ३० लाख लोकांना नेत्ररोपण म्हणजेच पारपटल बदलल्यानं ( कॉर्निआ) दृष्टी मिळू शकते. ज्यांच्या पारपटलातून प्रकाशकिरण जाऊ शकत नाहीत, पण डोळय़ांच्या नसा, रेटिना वगैरे भाग चांगल्या स्थितीत आहेत, त्यांनाच नेत्ररोपणाचा उपयोग होऊ शकतो. दरवर्षी एक ते दीड लाख तरी नेत्रदान होणं आवश्यक आहे. मात्र आपल्याकडे २५ ते ३० हजार नेत्रदान होतात. नेत्रदान हे १ ते ८० वर्षांपर्यंतच्या व्यक्ती करू शकतात. काही वृद्धांचं पारपटल उपयोगी पडू शकतं. त्याला रक्तगटाचं बंधन नाही. मात्र विषाणूंपासून होणारे रोग, कावीळ, रेबिज, एड्स असे काही आजार असल्यास त्यांचं पारपटल उपयोगी पडत नाही.

नेत्रदान करणं कठीण नाही, हेही आगाशे आवर्जून सांगतात. त्यासाठी केवळ जवळच्या नातेवाईकांना सांगून ठेवणं पुरतं. नेत्रदानाचा फॉर्म अगोदर भरण्याचीही गरज नाही. फॅमिली डॉक्टरांचं मृत्यू प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत नेत्रदान होणं आवश्यक आहे. डोळय़ाच्या इतर भागांच्या समस्येमुळे अंधत्व आलं असेल, पण ज्याचं पारपटल चांगलं आहे, अशी दृष्टिहीन व्यक्तीही नेत्रदान करू शकते.
आगाशे सांगतात, की श्रीलंकेसारखा छोटा देश २५ देशांना पारपटल पुरवतो. त्यात भारताचा समावेश आहे. ‘‘लोकांचा गैरसमज आहे, की तिथे सक्ती करतात, परंतु ते चूक आहे. ‘श्रीलंका आय डोनेशन सोसायटी’ याची सतत जनजागृती करत असते,’’ असं ते सांगतात. आपल्या देशात नेत्रदानाचा प्रसार वाढवण्यासाठी नेत्रपेढय़ांची जिथे सोय नाही तिथे ती होणं आवश्यक आहे. त्यासाठी रोटरी, लायन्स यांसारख्या संस्थांनी पुढाकार घेतला तर ते फार चांगलं होईल. जिल्हा रुग्णालयांतून नेत्रपेढय़ा कार्यरत व्हायला हव्यात. डॉक्टर जेव्हा मृत्यूचा दाखला देतात, तेव्हा त्यांनी मृताच्या नातेवाईकांना विनंती केली, तर खरा प्रचार होऊ शकेल. ज्यांना नेत्ररोपणातून दृष्टिलाभ झाला आहे अशा व्यक्तींनी व त्यांच्या नातेवाईकांनी पुढे येऊन सर्वाना सांगितलं, तर लोकांना नक्कीच पटेल, असं आगाशे म्हणतात.समाज स्वास्थ्य सुंदर, निरोगी, आनंदी, प्रसन्न राहावं असं आपल्याला जेव्हा अंतर्यामी वाटेल, तेव्हाच मानवतेची ज्योत अंधारातही विश्व निर्माण करून यशाची वाटचाल सुखकर करेल.

दृष्टी कोणत्या कारणांमुळे जाऊ शकते आणि ती न जाण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी, ते लक्षात घेणं महत्वाचं आहे. जन्मत:च मोतीबिंदू, काचिबदू असेल आणि त्यावर योग्य वेळी योग्य उपचार केले नाहीत तर दृष्टी जाऊ शकते. म्हणून मूल जन्मताच त्याची दृष्टी नीट स्थिर होण्याकडे जाणिवपूर्वक लक्ष देणं गरजेचं असतं मूल जन्मल्यानंतर एका महिन्यातच ते नीट बघायला लागतं. समजा एखाद्याला मोतीबिंदू असलाच, तर अगदी तिसऱ्या महिन्यातसुद्धा बाळाला भूल देऊन शस्त्रक्रिया करून घेता येते. शाळेत घालताना मुलाचे डोळे आवर्जून तपासून घ्यावेत, कारण दोन्ही किंवा एका डोळय़ाची नजर अधू असू शकते. त्या वेळी योग्य चष्मा, डोळय़ांचे व्यायाम करून घेतल्यानं दृष्टी सशक्त होते.

बाळाच्या डोळय़ांत काजळ, गाईचं तूप, तेल वगैरे काहीही घालू नका. महत्वाची गोष्ट म्हणजे, जे पालक तंबाखू खातात त्यांनी टय़ूबमधला चुना वापरू नये. अपघातानं जरी टय़ूबमधला चुना बाळाच्या डोळय़ात गेला, तर बाळ अंध होऊ शकतं. खरं तर अशा चुना टय़ूबचं उत्पादनच बंद व्हायला हवं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुमेह. तो दोन प्रकारचा असतो. लहानपणी मधुमेह असेल, तर दृष्टी कमी होऊ शकते किंवा पूर्णही जाऊ शकते. अगदी वयाच्या चाळिशीनंतर होणारा मधुमेह नियंत्रित नसेल तरीही दृष्टी जाऊ शकते. त्यासाठी प्रत्येक वर्षी डोळय़ांची तपासणी आवर्जून करायला हवी. डोळय़ाला मार लागला तरीही मोतीिबदू होऊ शकतो. सल्फा बुफेनसारख्या औषधांची काहींना अॅलर्जी होऊ शकते. यासाठी खूपच जागरूकता हवी. डोळय़ांच्या बुबुळावर जखम होऊन पांढरा डाग पडला तरी दृष्टी जाऊ शकते. अशा आजारांवर नेत्रदान हाच उपाय. तसंच डोळय़ाच्या पाठीमागच्या पडद्याचे आजार असतील तर योग्य वेळी उपचार केल्यास अंधत्व येत नाही. सध्या ‘टी.बी.’वर एक विशिष्ट औषध डॉक्टरांना कधी कधी द्यावं लागतं. त्याचा क्वचित एखाद्याच्या दृष्टीवर अगदी अंधत्व येण्यासारखाही परिणाम होऊ शकतो, म्हणूनच अशा गोळय़ा चालू असतील तर नजरेवर अगदी बारीक लक्ष हवं. परिणाम जरा जरी दिसला तरी औषध बंद करायचं एवढी दक्षता पालकांनी घ्यायला हवी. डोळा हा नाजूक अवयव असल्यानं त्याची सतत काळजी घ्यायलाच हवी. – डॉ. तात्याराव लहाने, नेत्ररोगतज्ज्ञ

‘लो व्हीजन रिहॅबिलीटेशन म्हणजे एखाद्याची अधू दृष्टी कशी उद्दीपित वा निर्दोष करता येईल यावर भर देणं. वेगवेगळय़ा भिंगांवर आधारित टेलिस्कोप, हातात धरायची प्रकाश असलेली भिंगं, मॅग्निफायिंग चष्मे, वगैरे साहित्याचा वापर करायला इथे शिकवलं जातं. कॉम्प्युटरमधले मोठे फॉन्ट वापरणं शिकवलं जातं. कधीकधी दृष्टी अधू नसते, तर मेंदूत संवेदना पोहोचत नसते. तेव्हा वेगवेगळय़ा योजना वापरून दृष्टीसंवेदना उद्दीपित केली जाते. अती मंद असलेल्या दृष्टीचा जास्तीत जास्त वापर करून अशा दृष्टीबाधितांना जगण्याचा आनंद दिला जातो. – सुधा हुजूरबाजार तुंबे ,‘लो व्हीजन रिहॅबिलीटेशन स्पेशालिस्ट, लोटस आय हॉस्पिटल’

मुदतीपूर्वी जन्मलेल्या बाळांमध्ये विशेषत: जी बाळं १२५० ग्रॅमपेक्षा कमी वजनाची जन्मतात, त्यांच्यात ‘रॅटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’ हा डोळय़ांचा आजार बऱ्याचदा दिसून येतो. त्यांना गरज वाटल्यास योग्य प्रमाणात प्राणवायू उपचार पद्धती दिली जाते. त्या वेळेस त्यांचे डोळे सतत तपासले जातात. अंधत्व टाळण्यासाठी जरूर असेल तर लगेच लेझर ट्रीटमेंट केली जाते. नवजात बाळावर बारकाईनं लक्ष ठेवलं जातं. कधी कधी नवजात बालकांना कावीळ होते. तेव्हा त्यांना प्रखर दिव्याच्या प्रकाशझोतात ठेवलं जात. त्या वेळेस बाळाचे डोळे ‘आय पॅडस् ’नं झाकले जातात. सध्या व्यवस्थित जागृती झाल्यानं, ज्ञान असल्यानं या गोष्टी केल्या जातात. – डॉ. पूजा ठाकूर ,लहान मुलांच्या डॉक्टर-निओनॅटोलॉजिस्ट

(नेत्रदानविषयक अधिक माहितीसाठी-श्रीपाद आगाशे – ९९६९१६६६०७)
sulabha.aroskar@gmail.com