व्यर्थ चिंता नको रे : विचारांच्या भिंगऱ्या!

‘दूर यमुनेच्या काठी पाय वाजले, दिशांच्या गर्भात झाली निळी वादळे.

|| डॉ. आशीष  देशपांडे

आपल्या मनात अनंत विचार नित्या विचारांशी जोडलेल्या खास आठवणी, भावना, अनुभव असतात. जेव्हा मन तो विचार करतं तेव्हा त्याच्याशी निगडित आठवण येणारच! जितक्या भावना जास्त, तितकी त्यांची आठवण सर्वव्यापी. अशा किती तरी विचार-आठवणी-भावनांच्या भिंगऱ्या मनात सतत फिरत असतात. जेव्हा एखादी भिंगरी सर्वव्यापी बनते, तेव्हा ती कर्क श, त्रासदायक बनते. ती स्वत:हून बदलतच नाही. मग आपल्यालाच ही भिंगरी बदलण्याचं आणि मन स्थिर करत पुढे जाण्याचं तंत्र समजून घ्यायला लागतं.

यशवंत देवांनी लिहिलेली/ स्वरबद्ध केलेली/ गायलेली गाणी माझ्या कानावर फार लहानपणापासून पडली. शब्द, अर्थ नि त्याला साजेशी चाल ऐकताना ती गाणी मनात अशी काही कोरली गेली, की आजही चालीशिवाय काव्य लक्षातच येत नाही आणि जेव्हा आठवणीत येतं, तेव्हा ते फक्त सूर घेऊन येत नाही, तर त्यातली अनुभवलेली भावना लेऊन येतं.

‘दूर यमुनेच्या काठी पाय वाजले, दिशांच्या गर्भात झाली निळी वादळे.’ हे शब्द मनात येताच, कृष्णजन्माच्या ‘चैतन्याचे वारे वाळवंटात नि बासरीचा स्वर रोमारोमांत’ आपसूक आल्याशिवाय राहात नाही. जेव्हा शंकर वैद्यांच्या शब्दांत ‘वाळवंटातल्या भीषण वैराण जीवनाची’ सफर सजते, तेव्हा ‘कलणाऱ्या दिवसाबरोबर उंटांच्या पायांनी जाणारा काळही’ ऐन उमेदीतल्या आठवणींना सहजच लांबवतो नि त्यानंतरच्या रात्रीची भीती शब्दसुरांच्या अद्भुत मिलाफानं लीलया कमी करतो.

या जन्ममृत्यूच्या बेड्यातूनच ‘ईश्वर-नश्वरतेचा’ अनुभव माणसाला आला असावा, असा माझा कयास आहे नि या ‘नश्वरतेतही’ ‘ईश्वर’ शोधण्याचं सामर्थ्य माणसात आहे. या शोधात, ‘बुडणार पाप माझे किंवा तरणार पुण्य माझे, ते एकदा मलाही समजून घेऊ दे रे’ असा प्रयत्न करताना विंदा, ‘जे व्हायचे असे ते खुश्शाल होऊ दे रे’ असं लिहितात. तेच गाताना देवमास्तर ‘खुश्शाली’वर जास्त भर देतात नि  ‘हा (आश्वासक) हात फक्त माझ्या हातात राहू दे रे’चा अंतरा गाठतात. हा आश्वासक हात ज्यांच्या हाती असतो ते बालपणातली सहजता, तारुण्यातली बेफिकिरी, वयाबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या, उतारवयाची निर्णायकता (स्वत:च्या नि इतरांच्या आयुष्यातली) नि या सगळ्यांतली अनिश्चितता समजू शकतात नि त्या अनिश्चिततेतही इच्छाशक्ती अव्याहत ठेवू शकतात.

‘चतुरंग’मध्ये नुकताच प्रकाशित झालेला ‘तमाच्या तळाशी दिवे लागले’ या शीर्षकाचा लेख वाचला. आमच्या विलेपाल्र्याच्या

डॉ. अभिधा धुमटकर, हेमंत पाटील सर, सॉलिसिटर कांचन पमनानी आणि

नेहा पावसकर. स्वत:च्या अंधत्वावर मात करून डोळसांच्याही डोळ्यांत अंजन घालून दृष्टी देण्याचं अवाक् करणारं काम या चौघांनी केलंय नि स्वागत थोरात सरांनी आपल्या ‘मन:चक्षूं’नी अंधांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना फक्त मदतीचा हात दिला नाही, तर सक्षमीकरणातून मदतीची गरजच कमी केलीय. लहानपणी आंधळी कोशिंबीर खेळताना तात्पुरती केलेली डोळझाक जेव्हा नियतीच्या खलानं जन्मापासून येते किंवा अपघातानं येते, तेव्हा तिला सामोरं जाणं, हा खेळ नाही. अशात स्वत:ला सावरणं, समर्थ करणं नि दुसऱ्यांना दिशा दाखवणं, हे ज्यांना जमतं, तेच तर खरे आयुष्यातले सितारे!

ज्या परिस्थितीत बहुतांश लोक गर्भगळीत होतील, अशा परिस्थितीत असा कोणता ‘हात’ या ‘कर्म’श्रीमंतांना तारून नेत असेल? मानसशास्त्रात याबद्दल काही विचार केला आहे. आपल्या मनाची स्थिती घरातल्या टीव्हीसारखी असते. पूर्वी टीव्ही बंद करताना जी वाहिनी चालू होती, तीच पुन्हा टीव्ही लावल्यावर लागायची. बघायची तर बघा, नाही तर बदला, असा साधा नियम होता. ‘सेट टॉप बॉक्स’ आल्यापासून जेव्हा जेव्हा आपण तो बॉक्स चालू करतो, तेव्हा तेव्हा त्यावर ती सेवा पुरवणाऱ्या कं पनीची जाहिरात असते किंवा घोड्यावर बसल्यासारखं तार सप्तकात किंचाळत काही तरी विकायचा अघोरी प्रयत्न असतो! बॉक्स बंद करताना तुम्ही कुठल्याही वाहिनीवर असलात तरीही! त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर रिमोट हातात घेऊन वाहिनी बदलण्याशिवाय पर्याय नाही. मग तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही वाहिनी लावा. कंटाळा आला की ती बदला नि हवी असेल ती दुसरी लावा, पण पुन्हा बॉक्स सुरू करताना परत लागणार ती कर्णकर्कश जाहिरातबाजीच! आयुष्य जेव्हा सहज चालत असतं, तेव्हा ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’चा अनुभव येत राहतो. रामरगाड्यात उसंत मिळताच, तेच ओळखीचे सूर पुन्हा मनात येतात, जिथे सोडले होते तिथेच! जुन्या टीव्हीसारखे. पण जेव्हा अचानक आयुष्याला, ‘जायेंगे कहाँ सूझता नहीं, चल पड़े मगर रास्ता नहीं’ सारखं वळण येतं, तेव्हा मात्र मन ‘सेट टॉप बॉक्स’सारखं ‘कर्कश’ विचारांतच गुंतून पडतं. ती घटना, स्थिती, अनुभव आणि त्याचा/तिचा आपल्यावर होऊ शकणारा परिणाम/ आघात ‘विचारांच्या कढीला भावनांच्या चुलीवर’ ठेवतात. भावनांची चूल विचारांना ताववते नि चटके देणारेच विचार मनात आणत राहते.

 त्या वेळी आपल्या मेंदूमनात नक्की काय होत असेल? संकटक्षणात जीव वाचला, की आपण ‘आता पुढे काय?’चा विचार करायला लागतो. अजून काय वाईट होऊ शकतं? नि ते मी कसं टाळू शकतो? हा विचार स्वाभाविक नि जरुरीचाच आहे. त्या वेळी आपल्या भावना नि विचार यांचं एक चक्र मनात सुरू होतं. मन स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतं. त्याला कारण असतं मेंदूतल्या ‘लोकस सिर्यूलिअस’ या जागेत तयार झालेलं ‘नॉरएड्रनॅलिन’ हे रसायन. या रसायनामुळे भावनेच्या मेंदूत आच भरते नि तो धगधगत राहतो. एकाच वेळी अनेक गोष्टींचं भान राखू शकणारा विचारी मेंदू, भावनेच्या धगीखाली, चटके देणाऱ्या विचारांपासून सुटका करू शकत नाही. साधारणपणे ही ‘नॉरएड्रनॅलिन’ची धग प्रत्येक मेंदूत कालांतरानं कमी होते. काहींत लवकर होते, काहींना वेळ लागतो, तर काहींमध्ये ती धग पुन:पुन्हा धुसफुसत राहते.

 मनात अनंत विचार नि त्या विचारांशी जोडलेल्या खास आठवणी, भावना, अनुभव असतात. जेव्हा मन तो विचार करतं तेव्हा त्याच्याशी निगडित आठवणी, भावना, अनुभव येणारच! जितक्या भावना जास्त, तितकी त्यांची आठवण सर्वव्यापी. लक्षात घ्या, अशा किती तरी विचार-आठवणी-भावनांच्या भिंगऱ्या मनात सतत फिरत असतात. जेव्हा एखादी भिंगरी सर्वव्यापी बनते, तेव्हा ती ‘सेट टॉप बॉक्स’सारखी कर्णकर्कश बनते. ती स्वत:हून बदलतच नाही. त्यासाठी ही भिंगरी बदलण्याचा रिमोट समजून घ्यायला लागतो.

 वर उल्लेख के लेल्या डॉ. अभिधा, हेमंत सर, कांचनजी किंवा नेहाताई यांच्या मेंदूत अशाच विविध भिंगऱ्या फिरल्या असणार; पण मेंदूतली ‘नॉरएड्रनॅलिन’ची धग त्यांना कमी करणं जमलं. त्यांच्यावरील लेखातून आपण काय समजू शकतो? डॉ. अभिधांनी जोपासलेली शिकण्या-शिकवण्याची आवड, इतिहासच नाही, तर विविध भाषांचीसुद्धा, त्यांना कुतूहल, ज्ञान, ज्ञानार्जनात मिळणारा आनंद, तो आनंद दुसऱ्यांना देतानाचं समाधान, या सर्वांतून होणारा समाजसंपर्क, संपर्कातून होणारी मैत्री/ संवाद/ नाती, या सगळ्यातून होणाऱ्या नवीन विचार-अनुभव-भावनांच्या भिंगऱ्या! नेहाताईंनी मैदानी, बैठे खेळ, गिर्यारोहण यांसारख्या क्षेत्रात केलेला शास्त्रशुद्ध प्रवास, त्यातील नावीन्य, बारकावे, सराव पद्धती शिकण्यासाठी दाखवलेली जिद्द, शिस्त, मिळणारं ज्ञान, ज्ञानार्जनातून नि कौशल्यवृद्धीतून मिळणारा आनंद, तो दुसऱ्यांना देण्यातला आनंद, त्यातून वाढणारा समाजसंपर्क नि वाढणाऱ्या भिंगऱ्या! हेमंत सरांनी फुटपाथवरच्या व्यवसायांबद्दल सविस्तर माहिती काढून, मेहनत, लाघवी भाषा नि लोकांच्या गरजांचा अभ्यास करत, त्यांचा ग्राहक वर्ग वाढवत नेला, स्वत:चं घर बांधलं नि मग पुढे शिक्षण घेत अंध मुलांना अध्यापन नि स्वयंरोजगाराचे धडे दिले. पुन्हा एकदा ज्ञान, ज्ञानार्जन, शिकण्या-शिकवण्याची तयारी, वाढता समाजसंपर्क नि वाढणाऱ्या भिंगऱ्या! सॉलिसिटर कांचनजींनीसुद्धा कायद्याच्या अभ्यासात कंपनी, वारसा हक्क, जमीन कायद्यांत विशेष प्रावीण्य मिळवलंच, पण बदलत्या जगात बौद्धिक स्वामित्व कायद्यांची वाढती गरज ओळखून नवीन शिकत राहायची तयारीही दाखवली. अंध व्यक्तींचे प्रश्न कायदेशीर पद्धतींनी सोडवून त्यांनी न जाणो किती अंधांना मदत केली असेल नि पुढेही करत राहतील. या सगळ्या कामांत पुन्हा वाढत्या भिंगऱ्या आल्याच.

थोडक्यात, संकटक्षणाच्या भिंगरीतून सुटका व्हायची असेल, तर आपल्याला या सिताऱ्यांकडून काही शिकलं पाहिजे. नवीन शिकणं-शिकवणं, एकटेपण घालवण्यासाठी समाजसंपर्क वाढवणं, स्वत:चं स्वास्थ्य जपणं नि जे करतोय ते निष्ठेनं, श्रद्धेनं करत राहणं. यशवंत पारखींच्या शब्दांत, ‘प्राक्तनाचा खेळ सारा ना कुणाचा दोष हा, पेरिले ते ये फळाला चाखणे आले पहा। पापण्या ओल्या न होता भोगण्याचा मंत्र दे, दु:ख दे देवा परंतु सोसण्याचे धैर्य दे’. ‘बीहेव्हिअरल अ‍ॅक्टिव्हेशन प्रोग्रॅम’ म्हणून शास्त्रात प्रचलित हा प्रयत्न समुपदेशनाइतकाच उपयोगी असतो, असे काही निष्कर्ष सध्या हाती आले आहेत.

  पण नवीन भिंगऱ्यांना स्थिरावण्यासाठी सकस आहार नि व्यायामाची जशी गरज असते, तशीच छंद, कलांचीही! संगीतात सूर, ताल, लय यांचा अनोखा मेळ असतो. लेहऱ्यावर तबलजीनं गाठलेल्या समेनं जाणत्यांच्या मनात जे मोहरून उठतं, ते मेंदूच्या स्वास्थ्यासाठी तितकंच उपयुक्त असतं, जितका नर्तकानं दाखवलेला भाव किंवा मुद्रा. चित्र, शिल्पाकृती, नाट्य, काव्य या सगळ्यांतच मनाला भिडण्याची जी ताकद आहे, कल्पनाविश्वाच्या भराऱ्यांत घेऊन जाण्याची शक्ती आहे, त्यामुळेच युगानुयुगं कलाकार नि कलाकृतींना आपल्या सगळ्यांच्याच मनांत विशेष महत्त्व आहे. आज करोनामुळे या सगळ्यांवरच अडचणींचा आगडोंब उसळलाय. आज त्यांना जेवढी आपली गरज आहे, त्यापेक्षा जास्त आपल्याला समाजस्वास्थ्यासाठी त्यांची गरज आहे.

खेळ शरीरासाठी चांगले, हे बहुतेक सर्वांनाच माहीत असतं; पण जर मी म्हटलं, की शाळेतल्या वर्गापेक्षा जास्त मैदानावर आयुष्याबद्दल शिकायला मिळतं, तर ते वावगं ठरणार नाही. खेळाचे नियम शिकणं, पाळणं, त्या नियमांच्या परिघात दुसऱ्यांवर कुरघोडी करणं, जिंकायच्या धडपडीत खेळताना एकमेकांना सावरणं, मदत करणं, हरल्यानंतर ‘का हरलो’ याचा विचार करणं नि दुसऱ्या दिवशी पुन्हा जोमानं खेळण्याची आतुरतेनं वाट पाहणं, यापेक्षा आयुष्यात शिकायचं ते काय असतं?  मायकेल जॉर्डन हा अमेरिकेतला बास्केटबॉलपटू. अविश्वसनीय कोनांतून बास्केट वेधण्यात त्याचा हातखंडा होता. विजेसारखी चपळाई, ‘डिफेन्स’च्या खेळाडूला स्तिमितच नाही, तर स्तंभित करणारं पदलालित्य नि तोल आणि शरीराच्या कुठच्याही ‘पोझिशन’मधून त्याच्या हातातून निघालेला बॉल निमूटपणे बास्केटमध्येच जायचा, अशी त्याची चाहत्यांमधली ओळख! तो म्हणायचा, ‘मी कोर्टवर स्वत:ला साधा ले-अप घेताना, पेनल्टी घेताना, ३ पॉइंटर घेताना, अगदी साधा पास करताना किंवा घेतानाही पुन:पुन्हा अपयशी होताना पाहिलंय. या अपयशांतच माझ्या यशाचं रहस्य आहे!’

परिस्थितीवर मात करण्यासाठी दर वेळी परिस्थितीशी सतत दोन हात करायला लागतात असं काही नाही. काही वेळा आपली दु:खं बाजूला ठेवून काही तरी आगळंवेगळं, आवडीचं केल्यानंही दु:खाचा विसर पडतो. मंगेश पाडगावकर म्हणतात ना,

‘मी मजला विसरावे, बुडुनी सुरातच गावे,

बासरी न दूर सखे, ती माझ्या अंतरी,

दूर आर्त सांग कुणी छेडिली आसावरी,

पारिजात कुसुमेही उधळली मनावरी’

ईश्वरापासून नश्वरापर्यंतचा आपला प्रवास कसाही असो, पण त्याला इच्छाशक्तीची साथ मात्र सदोदित मिळो, याच दिवाळीच्या शुभेच्छा!

dr.deshpande.ashish@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vyarth chinta nako re author dr ashish deshpande article special memories associated with thoughts akp

ताज्या बातम्या