व्यर्थ चिंता नको रे : अस्वस्थ समाज-मन

समूहाचं वय, जमण्याचं कारण, हेतू, याच्याशी एकजीव झालेले हे शब्द कधी चुकीच्या जागी वापरले, तर पोट धरून हसवायचे; पण हे शब्द कु ठे तरी त्या समूहाला जोडण्यातदेखील मदत करायचे.

|| डॉ. आशीष  देशपांडे

समूह या संकल्पनेला माणसांच्या जगात विशेष महत्त्व आहे. आपलं कुटुंब, आपले नातेवाईक, जातबंधू यापलीकडे जाऊन समाज या व्यापक समूहाचा विचार करावाच लागेल, असे माणसांच्या समूहांचे ताणेबाणे एकमेकांत गुंतलेले आहेत. हा समाज जेव्हा त्यातील माणसांच्या सहजीवनाची जाणीव विसरतो, तेव्हा तेव्हा समाज-मन अस्वस्थ होतं. हे मन निरोगी राहण्यासाठी ‘क म्पॅशन’ (करुणा) आणि ‘एम्पथी’वर (सहभावना)आधारित समूहजीवनाची कल्पना मांडली जाते.  

शाळेत सातवीच्या शिष्यवृत्तीच्या तयारीत समूहवाचक शब्द असायचे. निर्जीव वस्तूंत मडक्यांची उतरंड, किल्ल्यांचा जुडगा, नाण्यांची चळत, जहाजांचा काफिला, विमानांचा ताफा… झाडापानांत गवताचा भारा, फुलांचा गुच्छ, आंब्यांची अढी आणि आंब्याच्या झाडांची आमराई, करवंदांची जाळी! वृक्षवल्लींनंतर प्राणिजनांत ‘गटबाजी’ व्हायची तेव्हा हत्ती, हरणांचा व्हायचा कळप; पण उंटांचा तांडा, माशांची गाथण, गाईगुरांचं खिल्लार नि पक्ष्यांचा थवा. माणसांच्या समूहाला मात्र नेमकी नावं होती. लोकांचा जमाव, पण ते साधुसंत असले तर जथा. मुलंमुली असतील तर

घोळका किंवा चमू, खेळाडूंचा संघ, प्रवाशांची झुंबड, चोर-दरोडेखोरांची टोळी, सैनिकांची पलटण. खूप मजा यायची हे शब्द लक्षात ठेवताना! त्या समूहवाचक शब्दांना ‘समूहसूचकता’ होती. समूहाचं वय, जमण्याचं कारण, हेतू, याच्याशी एकजीव झालेले हे शब्द कधी चुकीच्या जागी वापरले, तर पोट धरून हसवायचे; पण हे शब्द कु ठे तरी त्या समूहाला जोडण्यातदेखील मदत करायचे. म्हणजे तरुणाईच्या घोळक्यातलं आपलेपण, क्रिकेटच्या मैदानावरची भांडणं, गावाला जाताना रेल्वेच्या डब्यात शिरल्यानंतर मिळणारी मदत,  स-‘मोह’सूचकही म्हणायला हवं.

म्हणीही तशाच. त्या वयात साध्यासुध्या म्हणींपेक्षा इरसाल म्हणीच जास्त लक्षात राहायच्या. जुन्या म्हणींमध्ये ‘नावडतीचं मीठ अळणी, आवडतीचा शेंबूड गोड’ किंवा ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टं’. नव्यातल्या ‘आपला तो प्रोग्रॅम, दुसऱ्याचं कॉपी-पेस्ट’, ‘नावडत्या एम्प्लॉइचं कामच स्लो’, अशा कित्येक म्हणी ‘आपल्या’ समूहातल्या माणसांची आजही पाठराखण करताना दिसतात. आम्ही ‘सीकेपी देशपांडे’! लहानपणी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे पटाईतपणे बंगाल्यांसारखे मासे खाणारे ही ओळख छाती फुलवायची. कदाचित घरातली टागोरांची पुस्तकं, सत्यजीत राय यांचा प्रभाव, मिठाई आणि निर्भेळ कौटुंबिक करमणूक करणारे बंगाली दिग्दर्शकांचे त्या काळचे हिंदी चित्रपट, हे त्याला कारणीभूत असेल. पुढे ‘केईएम’मध्ये शिकताना मी आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या एका ओडिशाच्या डॉक्टरकडून काही चूक झाली, म्हणून आमच्या सीनिअर बंगाली डॉक्टरनं आमची चांगलीच कानउघाडणी केली. जवळजवळ पाऊण तास लिफ्ट, कॉरिडॉर, वॉर्ड, जिने नि शेवटी कँटीनमध्ये आमची ‘बिनपाण्यानं’ चालली होती. शेवटी तो वाचनालयात गेला नि आमची सुटका झाली. चहा पिता पिता ओडिशाचा डॉक्टर म्हणाला, ‘‘ये सब बंगाली ना ऐसेही होते हैं!’’ पुढचा पाऊण तास मी मराठी आणि तो ओरिया डॉक्टर ‘भारतीय एकात्मतेचं दर्शन घडवत’ त्या बंगाल्याला मनातल्या मनात यथेच्छ बोल लावत होतो! ‘ते’ कसे आपापल्यातच राहतात, भेटतात तेव्हा कसे बंगालीतच बोलतात, आपल्याच लोकांना मदत करतात, कॉर्पोरेटमध्येसुद्धा (त्यानं असं ऐकलं होतं!) बंगाल्यांनाच ‘फेवर’ करतात वगैरे वगैरे! आमची चूक, त्याचं अतिरेकी डाफरणं, जेवतानाही टोचून बोलत राहणं, याच्यापलीकडे मुद्दा त्याच्या ‘बांगत्वा’पर्यंत कसा, कधी नि का गेला, हे आम्हाला कधी कळलंच नाही.

पुढे व्यसनमुक्तीच्या कामासाठी काही आदिवासी पाड्यांत जायचा योग आला. त्यांच्या प्रत्येक सणसमारंभात असलेली दारू ‘पिऊ नका’ असं सांगताच, त्यांनी माझ्या ‘शहरीपणाचे’ वाभाडे काढले नि खरोखर पळता भुई थोडी केली. कोल्हापुरात ‘भटाचं पोर’ आम्हाला व्यसनांबद्दल शिकवणार होय? असा प्रश्न उभा ठाकला! माझं मानसोपचारतज्ज्ञ असणं, व्यसनमुक्तीबद्दल माझी तळमळ, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा एस.टी.-रेल्वे नि बैलगाडीचा प्रवास त्यांच्यासाठी काडीमोलाचाही नव्हता नि त्या वेळी तो माझ्यासाठी फार मोठा होता. मला वाईट वाटत होतं ते याचं, की त्यांच्यासाठी मी ‘परका’ होतो; पण ज्यांना शतकानुशतकं आपण परकं मानून, सहज जगण्यापासूनही पारखं केलेलं आहे, त्यांना काय वाटत असेल? ते अघोषित आरक्षण नव्हतं का ते? त्यातल्या बहुजनांना तर काही वाटण्याची अजूनही संधी दिलेली नाहीए.

काही दिवसांपूर्वी एक मार्मिक लघुकथा ऐकली होती. एक अमेरिकी भारतात फिरायला आला. संपूर्ण देश फिरून तो मायदेशी परतल्यावर त्याच्या भारतीय मित्रानं त्याला विचारलं, ‘‘कशी झाली सफर? कसे वाटले भारतीय?’’ त्यानं म्हटलं, ‘‘सफर तर उत्तम झाली, पण भारतीय काही भेटले नाहीत! गुजराती, तमिळ, तुळू, मल्याळी, राजपूत, बंगाली, जाट, मराठी भेटले; पण कोणीच भारतीय नाही!’’ निसर्गानं केले दोन जीव-

स्त्री नि पुरुष. आपण त्यांना धर्म-भाषा-प्रांत-जात- व्यवसाय-ऐहिक स्थिती यांनी समूहवाचक शब्दांत गुरफटलं. ‘आपण आणि ते’ची सोपी मांडणी कुटुंबकारण, समाजकारण, धर्मकारण, राजकारणात किती मोठ्या प्रमाणात दिसतेय सध्या?

माझा ‘केईएम’मधलाच एक सर्जन मित्र आहे. कामरान खान त्याचं नाव. त्याला एका सेवाभावी संस्थेनं मुसलमान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं होतं. कार्यक्रमात स्वत:ची ओळख करून देताना तो म्हणाला, ‘‘मी एका मुसलमान घरात जन्मलो, ख्रिश्चन शाळेत तमिळ नन्सच्या हाताखाली शिकलो, सिंधी मॅनेजमेंटच्या कॉलेजात बारावी करताना मारवाडी क्लासमध्ये मराठी आणि सरदारजी शिक्षकांकडून शिकवण्या घेतल्या, गुजराती माणसानं सुरू केलेल्या वैद्यकीय कॉलेजात शिकलो, ब्रिटिश राजाच्या नावानं असलेल्या रुग्णालयात विविध राज्यांतले रुग्ण बघत डॉक्टर झालो, पारशानं सुरू केलेल्या    कर्क रोग रुग्णालयात शल्यविशारद झालो आणि भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या रुग्णांना सध्या मी बरं करण्याचा प्रयत्न करतोय! मग माझ्या घडणीत योगदान हे कुठल्या ‘गटाचं’? नि माझा समूह कोणता?’’ आपल्यापैकी कित्येक जणांची अशीच काही कथा असेल. आपल्या घरासमोरचा रस्ता बनवणारा तंत्रज्ञ, इमारत कंत्राटदार, फळवाला, भाजीवाला, दाणेवाला, कपडेवाला, दूधवाला, पेपरवाला, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनंत गोष्टी पुरवणारे व्यावसायिक नि कंपन्या नि त्यातील काम करणारे, हे एकाच प्रदेशातले असूच शकत नाहीत. ते आपल्यासारखेच मन लावून काम करतात म्हणून आपलं घर चालतं. करोनाकाळातही देश चालतो. दंग्यांनंतरही सणासमारंभात गळाभेट होते.

सिग्मंड फ्रॉइडनं ‘असा मी, कसा मी?’ या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न शक्य आहे, हे पहिल्यांदा दाखवून दिलं. ‘सायकोअ‍ॅनॅलिटिकल थिअरी’ म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या या विचारशृंखलेत ‘इद’, ‘इगो’ आणि ‘सुपरइगो’ या तीन नवकल्पना आढळतात. मागे आपण एका लेखात त्यांची ओझरती ओळख करून घेतली होती. समाजजीवनात लोकांच्या अपेक्षा (इद), घटनात्मक पद्धतीनं (सुपरईगो), सर्वसमावेशाच्या विचारविनिमयानं पूर्ण होतात (इगो), तेव्हा समाजाचं व्यक्तिमत्त्व सुदृढ बनतं. लोकशाही सशक्त/श्रद्ध बनते. राजकारण या विचारविनिमयाच्या संवादाची पातळी ठरवतं नि सर्वसमावेशाची शक्यता. आपल्या प्रत्येकाची विचारसरणी आपला समाज किती सर्वसमावेशक असणार हे ठरवतं. ज्या परिस्थितीत लोकांच्या अपेक्षा घटनात्मक बांधणीत असूनसुद्धा पूर्ण होण्याची संधी दुरावते, तिथे ‘आपण आणि ते’ भाव वाढीस लागतो. खरा, अनाहूतपणे झालेला किंवा कपोलकल्पित अन्याय, वागणूक मनात भिंती निर्माण करतो. समाजमाध्यमं त्याला खतपाणीच पुरवतात. अफवा, वावड्या नि भूलथापा आपल्यातलंच आपलेपण कमी करतात. जसं स्वयंपाक करताना मन सुखी असलं, तर अन्न जास्त रुचकर होतं, अगदी तसंच कुठलंही काम करताना मन सुखी असलं की काम उत्कृष्ट होतं. जेव्हा काम करणारे बहुसंख्य सुखी असतात, तेव्हा देशाचा व्यवहार नि कारभार दोन्ही नीट चालतो.   

उपनिषदांमध्ये म्हटल्याप्रमाणे-

इशव्यस्यम् इदम् सर्वम् यत् किंच जगत्यम् जगत। येन त्यक्तेन भूंजिथा मा ग्रह कास्यवित धनम्।।

या सतत बदलणाऱ्या जगातल्या प्रत्येक चल-अचलावर ‘ईश्वरी’ स्पर्श आहे नि तो स्पर्श समजण्यासाठी आपल्या नि इतरांच्या मोजक्या गरजांची जाणीव नि सहजीवनाची नेणीव, त्यासाठी तर्पणाची भावना नि हव्यासाला वेसण आवश्यक आहे. ‘क म्पॅशन’ आणि ‘एम्पथी’वर आधारित ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ यात साने गुरुजींना हेच तर सांगायचंय. गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे ‘Nature can provide for everyone’s needs, but not for everyone’s greeds!’ जेव्हा जेव्हा समाजाला याचा विसर पडून, हव्यासापोटी, सहजीवनाची जाणीव अव्हेरून ‘ते आणि आपण’ हा दुजाभाव अंगीकारला, तेव्हा तेव्हा ‘समाज-मन’ अस्वस्थ झालेलं आहे.

भारताचा जगाच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हणजे सम्राट विक्रमादित्यांचा काळ. उज्जैन राजधानी आणि कालिदास राजकवी. चीनमधील ‘हून’ साम्राज्य, सिंथियन-पर्शियन, ग्रीक आणि रोमन साम्राज्यं आपल्या अवतीभवती होती; पण या सगळ्यांत आपलं वेगळेपण उठून दिसतं, ते कालिदासाच्या कलाकृतींत. ‘शाकुंतला’त माणूस आणि चल-अचलाबद्दलचं त्याचं नातं; कादंबरीत फुलांचं वाऱ्यासमोर नतमस्तक होणं, झाडांचा फुलांच्या सड्यातला त्याग, कडेकपारीतनं वाऱ्याचा येणारा आवाज, पोपटांचा आपली भाषा बोलायचा आटोकाट प्रयत्न, – सगळीकडे कवी कालिदास सहजीवन, सहवास, समूहजीवन रेखाटतात.

‘कुमार-संभव’ खंडकाव्याच्या वेळी सिंथियन साम्राज्याची अतिक्रमणं सुरू झाली होती. हिंदू राजे स्वत:त रममाण झाले होते. एकमेकांशी नि निसर्गाशी असलेला समन्वय ढळला होता. कालिदास सत्ताधाऱ्यांना आक्रंदून सांगत होते, की ‘आपल्या नाशाचं कारण आपल्यात आहे. समन्वयापासून, चांगल्यापासून दुरावा, ‘सत्’पासून फारकत, स्वत:च्या ऐहिकतेत हरवणं, ‘Paradise lostl..  पण ‘कुमार-संभव’ तर आशादायी आहे. म्हणजे

It is about paradise regained!   राजकवी कालिदास उत्तर काय सांगतात? सति- म्हणजे ‘सत्’चा आत्मा- अपमान, अवहेलना, दु:ख, तपश्चर्येतनं शिवाला- म्हणजे ‘चांगदेवाला’- चांगल्याच्या आत्म्याला जिंकते. त्यांच्या अभूतपूर्व मीलनातून सती म्हणजे ‘सत्य’, चांगल्याच्या म्हणजे शिवाच्या पाशांत उन्मुक्त होते नि अमानुषतेपासून वाचवणारा ‘कुमार-संभव’ होतो.

ट्रंप (डोनाल्ड ट्रंप) यांनी ‘ट्विटर’वर ऐकीव माहिती पसरवून अमेरिकन काँग्रेसवर हल्ला घडवून आणण्याच्या खटल्यात चाललेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य नि अफवा पसरवणं याबद्दलचे तर्कवितर्क, ते सॉक्रेटिस, प्लेटो यांच्या काळातही चाललेच होते आणि पुढेही चालूच राहतील; पण तोपर्यंत हाती आलेल्या माहितीच्या सत्यासत्यतेची पडताळणीही आपल्यालाच करायची आहे नि समाजातल्या ‘चांगदेवा’लाही जागवायचं आहे!

dr.deshpande.ashish@gmail.com  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vyarth chinta nako re author dr ashish deshpande unhealthy society mind akp

ताज्या बातम्या