पूर्वी युद्धकाळात माहिती प्रसाराची, संपर्काची माध्यमे नव्हती तेव्हा गावात भोंगा वाजला की समजायचे हा युद्धाचा इशारा… युद्धकाळात सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यायची यासाठी जशा सूचना आता मिळतात, तशा सूचना बाई त्या वेळी गाण्यांतून देत होती. समाजाला सावध करत होती…
ती म्हणायची, ‘‘झालीया भोंग्यासी असावे तत्पर, करूनिया घर भुयारात…!’’
आजच्या जागतिक युद्धाच्या काळात सर्वसामान्य माणसांच्या मनावर निरनिराळ्या प्रकारची भीती आणि दडपणे आपल्याला दिसतात. विसाव्या शतकामध्ये जगाने दोन महायुद्धे पाहिली म्हणजे १९१४ ते १९१८ पर्यंतचं पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध १९३९ ते १९४५. मी माझ्या लहानपणी अनुभवलेले दुसर्या महायुद्धानंतरचे अनुभव अतिशय दाहक आहेत.
माझा जन्म १९३९ चा. मी चार-पाच वर्षांची असल्यापासूनच्या आठवणी आहेत. आणि त्यानंतरही दीर्घकालपर्यंत स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या, मी अकरा-बारा वर्षांची होईपर्यंतच्या आठवणी आहेत. ज्या युद्धभूमीवर संहार होतो तो भाग वेगळाच. तरी त्या काळात बॉम्बहल्ला हा नवीन प्रकार सुरू झालेला होता. तोफा आणि बॉम्बहल्ला.
बॉम्बहल्ल्यांची धास्ती लोकांना फार मोठ्या प्रमाणावर होती आणि कुठलंही युद्ध झाल्यानंतर आजही आपण अनुभवतो आहोत की सर्वसामान्य माणसाला महागाईच्या झळा मोठ्या प्रमाणावर बसतात. जीवनावश्यक वस्तू दुर्मीळ होत जातात. धान्य, तेल अशा वस्तूसुद्धा मिळेनाशा होतात. हे सगळं मी माझ्या जाणत्या वयामध्ये अनुभवलेलं आहे.
धान्य बाजारामध्ये चांगल्या दर्जाचं धान्य मिळायचं नाही. तेल मिळायचं नाही. मिळालं तर ते अतिशय कमी. ज्याला आपण शिधावाटप (रेशनिंग) म्हणतो, ती शिधावाटपाची प्रथा सुरू झाली की कुटुंबामध्ये जेवढी माणसं असतील त्या प्रमाणामध्ये त्या कुटुंबाला दर आठवड्याला धान्य, तेल वगैरे जिन्नस मिळायचे. तेव्हा या शिधावाटपामुळे माणसं कशी तरी जगली; पण त्या शिधावाटपात मिळणारं धान्य आणि वस्तू या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असायच्या.
कारण आपल्या देशामध्ये निर्माण होणारं सकस धान्य युद्धभूमीवर पाठवलं जायचं किंवा ज्या ज्या देशांनी युद्ध सुरू केलं ते हे धान्य घेऊन जायचे. मला असं ऐकल्याचं आठवतंय, की माझ्या लहानपणी शिधावाटपात जे गहू वा ज्वारी मिळायचे ते अमेरिकेमध्ये जनावरांना खायला घातले जायचे. आपल्याकडचे पांढरे जोंधळे परदेशात पाठवले जायचे आणि तिकडे जनावरांना खायला घालतात ते लाल भरड जोंधळे भारतात यायचे, त्याला ‘मिलो’ म्हणायचे.
पूर्वी आम्ही माणसं चेष्टेने ‘मेलो’ म्हणायचो. माझ्या वयाची जी ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना अजूनही याच्या आठवणी असतील. इतकंच नव्हे तर आपल्याच शेतात पिकलेल्या धान्यावर शेतकर्याची मालकी नसायची. आम्ही शेतकरी कुटुंबातले. तेव्हा आमच्या घरामध्ये जे धान्य पिकायचं ते पुण्यापासून २०-२५ किमीवरून बस, बैलगाडीतून जरी आणायचं असेल तरी जागोजागी असलेल्या पोलीस ठाण्याकडून चांगलं धान्य जप्त केलं जायचं आणि आपल्याच शेतात पिकलेलं धान्य आपल्याला मिळणं दुरापास्त व्हायचं, हे आज सांगितलं तर खरं वाटणार नाही. परंतु युद्धकाळामध्ये सर्वसामान्य माणसांना ते सगळं भोगावं लागतं.
इतकंच नव्हे तर चांगले सुती कपडेही मिळायचे नाहीत. खरं म्हणजे प्राचीन काळापासून भारत देश हा चांगलं सुती कापड आणि रेशमी कापड निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहे; परंतु त्या वेळी रोज साधे सुती कपडे मिळायचे नाहीत आणि कापडसुद्धा शिधावाटपात मिळायचं, याच्यावर आजही कोणाचा विश्वास बसणार नाही, पण हे सगळं मी अनुभवलेलं आहे. शिधावाटपात ज्याला आपण ‘मांजरपाट’ म्हणतो म्हणजेच जाडभरडं कापड किंवा कुठल्या तरी भडक रंगाचं नक्षी असलेलं अशी कापडं जे उपलब्ध असेल ते घ्यायला लागायचं.
जेवढं मिळेल तेवढंच. म्हणजे प्रति माणसी दोन वार, चार वार, वार म्हणजे साधारणपणे आज आपण ‘मीटर’ म्हणतो. मीटरने ते कापड दिलं जायचं आणि तेवढ्यातच माणसांना भागवावं लागायचं. माझ्या लहानपणी असल्या कापडाचे फ्रॉक आणि परकर-पोलके आम्ही घातलेले आहेत. महाराष्ट्रातल्या बायकांना नऊवारी साडी मिळायची नाही. तर पांढरी धोतरं मिळायची, साडेचार वारी. ही दोन धोतरं जोडून बायका नऊवारी साडी करायच्या. पांढरी साडी नेसणं हे सौभाग्यवती स्त्रियांना अशुभ वाटायचं. त्यामुळे त्या कुठल्या तरी रंगामध्ये ती साडी बुडवून नेसायच्या.
तेव्हा युद्धाच्या काळामध्ये काय काय वाईट गोष्टी घडतात आणि सर्वसामान्य माणसांना त्या जाचक होतात, याचे अनुभव मी घेतले. तरी इंग्रजांचं राज्य होतं. इंग्लंड युद्धामध्ये उतरलेलं होतं, त्यामुळे आपल्याला त्या झळा दुरून बसल्या. ज्या भूमीवर युद्ध होतं, त्या भूमीवर तर आणखी वाईट परिस्थिती असते, त्याची वर्णनं आज पाहतो आहोत. ऐकतो आहोत. कारण आज दूरचित्रवाणीची सोय झाली आहे; परंतु त्या काळात दूर राहूनसुद्धा युद्धाचे हे दुष्परिणाम खूप भोगावे लागायचे.
त्या काळात गणपती उत्सवामध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत, त्याला ‘मेळा’ असं म्हणायचे. हा मेळा म्हणजे एक कलात्मक मेळावा. त्यात गाणी असायची,
‘‘महागाईने झाला जीव बेजार,
कसा होईल सांगा ना आता संसार,
महाग झाला कपडा कसला धोतरजोडा,
आता विजार आपुला आधार..’’
पुरुष विजार का घालायला लागले? धोतर मिळेनासं झालं आणि हे कापड तीन-चार वार मिळायचं. त्यात विजार किंवा पायजमा शिवणं हे जास्त सोप्पं जायचं. म्हणून, पुरुष पायजमा वापरायला लागले. हा जो इतिहास आहे, हा एका अर्थाने, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक इतिहासाची एकमेकांत झालेली गुंतावळ आहे, हे सगळं लक्षात घेतल्याशिवाय खर्या अर्थाने संस्कृती आणि समाज लक्षात येत नाही.
तेव्हा महागाईचे वर्णन करणारी गाणी मोठ्या प्रमाणावर बायकांची आहेत, पुरुषांची नाहीयेत. हे लक्षात घ्या. यातल्या एक अतिशय महत्त्वाच्या गाण्यासाठी मी हा मुद्दा घेतलेला आहे. हे गाणं काय आहे? आज आपण माध्यमांद्वारे पाहतो, इराणमध्ये, इस्रायलमध्ये किंवा ज्या ठिकाणी युद्ध होतं, तिथल्या नागरिकांसाठी काही सूचना दिलेल्या असतात.
जर तुमच्या शहरावर किंवा तुमच्या घरावर बॉम्ब हल्ला झाला, तर तुम्ही काय काळजी घ्यायला हवी? घरामध्ये त्या बंकरमध्ये जाऊन कसं बसायला हवं, पाण्याची साठवण कशी करायची, घराबाहेर उजेड पडू द्यायचा नाही, अशा सूचना आजसुद्धा त्या देशामध्ये नागरिकांना दिलेल्या आहेत. यासंबंधीची महाराष्ट्रातील स्त्रियांची गाणी आहेत, बॉम्बहल्ला व्हायचा इशारा आला की नागरिकांना सावधान करण्यासाठी शहरांमध्ये मोठा भोंगा वाजत असे. या वेळी बाई गाण्यातून व्यक्त झाली.
नागरिकांनो सावध व्हा. घरचे दिवे बंद करा. घराबाहेर प्रकाश पडू देऊ नका. आपले प्राण कसे वाचवावेत, आपल्याजवळ कुठल्या वस्तू ठेवाव्यात, जीव रक्षणासाठी काय काय असावं, याविषयीच्या सगळ्या सूचना बाईच्या गाण्यातून दिलेल्या आहेत. तसं एक गाणं आमच्या घरामध्ये, परंपरेने पाठ झालेलं… आमची आई, आत्या हे गाणं म्हणायच्या… युद्धकाळामध्ये नागरिकांना दिलेल्या सूचना यातून समजतात.
‘‘झालीया भोंग्यासी असावे तत्पर, करूनिया घर भुयारात…
वाजविता भोंगा नका सोडू जागा शिस्तीनेचि वागा सदोदित…
रात्रीच्या वेळेला किरण दिव्याचे,
बाहेर घराच्या पाडू नका…
बादली घमेले, खोरे पहार
सार्याच या वस्तू शिडी आणि दोर, कंदील तयार काडपेटी
या सार्या समोर ऐशा ठेवा
तुमच्या जीवाचे होईल रक्षण,
हल्ल्याचा हो क्षण, येईल जेव्हा,
न कळे तुम्हाला पुसा पोलिसांना स्वयंसेवकांना झडकरी…’’
अशा प्रकारच्या सूचना असलेली गाणी मोठ्या प्रमाणात होती. युद्ध झालं की सामान्य माणसांना जो त्रास होतो, त्याच्या कथा या महायुद्धाच्या काळातच नव्हे, आत्ताच्या काळातच नव्हे, तर जुन्या काळापासून म्हणजे, आपल्या इतिहास, पुराणांमध्येसुद्धा त्याचे दाखले मिळतात. पुराणांमध्ये, जे देव आणि राक्षस, यांचे युद्ध होई, त्याला ‘देवासुर संग्राम’ असं म्हणत असत.
म्हणजे देव आणि असुर, राक्षस यांच्यामध्ये ज्या लढाया व्हायच्या, त्या वेळेस सामान्यांचे किती हाल होत असत, त्याची वर्णनं त्या काळातही केली गेलेली आहेत. सांगायचं तात्पर्य असं की, जसजसा काळ बदलतो तसतसं ज्याला आपण लोकसाहित्यातलं लोकमन म्हणतो ते लोकमन बदलतं, आणि ते लोकांचं मन, साहित्यातून व्यक्त होतं, लोकसाहित्य म्हटलं की ते फक्त मौखिकच असतं, तोंडोतोंडी चालत आलेलं असतं, हा समज पूर्णपणे खरा नाही.
ज्या वेळेला माणसांना लिहिता यायला लागलं, त्या वेळेस माणसांनी ते लिहून ठेवायलाही सुरुवात केली. बायकांनी केली आणि पुरुषांनीही केली, ज्या पुरुषांना लिहिता येत नव्हतं त्यांना लिहिता येणार्या पुरुषांनी मदत केली, उदाहरणार्थ, शाहिरी परंपरेमध्ये निरनिराळे पोवाडे असत. जुन्या जमान्यातले किंवा निरनिराळ्या प्रकारची गाणी, कूट सवाल-जबाबांची गाणी, आणखी बर्याच गोष्टी आहेत या ज्यांना लिहिता येत होतं, ‘कलगी तुरा पक्षाची भेदिके…’ त्यांच्याकडून लिहून घेऊन शाहिरांनी ते जतन केलेले आहेत. तसंच या गाण्यांचंही आहे. त्यामुळे सगळे लोकसाहित्य हे मौखिकच असतं असं नाही, त्याला लिखित स्वरूपही आहे.
दर काळामध्ये बदल थोड्याफार फरकाने येत गेला. जात्यावर दळण दळणार्या बायकांना लिहिता येत नव्हतं, त्यामुळे ते मौखिक राहिलं, पण पुढे त्याची संकलनं बरीच झाली, आणि ती बरीचशी स्त्रियांनी केलेली आहेत. त्यामुळे लेखन सुरू झाल्यावरसुद्धा बायकांनी लिहिलेलं आहे आणि हे लोकमनाचे आवाज आहेत, आता याला लोकगाणी किंवा लोकगीतं का म्हणायचं, तर त्यात गाणं रचणार्या बाईचा किंवा पुरुषाचं नाव नाही, ती नाममुद्रा नाही. एकाच व्यक्तीची नाममुद्रा नसल्याने लोकसाहित्यासाठी ‘अपौरुषेय वाङमय’ असंही म्हटलं जातं.
हे युद्धाचं जे गाणं आहे ते मला सध्याच्या काळात जास्त महत्त्वाचं वाटतं, की आज लोकांना ज्या सूचना द्याव्याशा वाटतात किंवा जी परिस्थिती आहे, ती प्रत्येक युद्धाच्या काळात उद्भवत असते आणि राज्यकर्त्यांनी आपल्या प्रजेला त्या संरक्षणाच्या सूचना दिलेल्या असतात आणि त्या मला या लोकगीतांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. किंवा स्त्रियांच्या बाबतीतही जसे बदल झाले, तसे तसे बदल गाण्यांमधून येतात, जसे ओव्यांच्या मधून येतात तसे… तेही प्रतिबिंबित झालेले आहेत.
त्यामुळे काळ बदलला की त्याचं प्रतिबिंब हे त्या काळातल्या साहित्यामध्ये उमटतं, कथांमध्ये उमटतं, कवितांमध्ये उमटतं आणि कधीकधी ती कथागीतं असतात, म्हणजे गीतांमधून सांगितलेली कथाही असते, त्याचीही आपण काही उदाहरणं नंतर पाहू.
थोडक्यात, हे ‘झालीया भोंग्यासी असावे सादर…’ हे गाणं आजच्या काळालाही किती अनुरूप आहे त्याचा आपल्याला अनुभव येईल आणि त्याच्यासाठी हा महत्त्वाचा भाग आहे, असं मला वाटतं. काळानुसार लोकमन बदलतं आणि लोकमनानुसार त्याचं साहित्य बदलतं हा याचा अर्थ आहे. म्हणूनच ते लोकसाहित्य असतं.
uchaturang@expressindia.com
