नीलिमा न्यायाधीश
मोबाइलवरून सुरुवातीला मला बटन दाबून फक्त बोलता येत होतं. तेव्हा फोनही तसेच होते. व्हिडीओ कॉल वगैरे नाही. परदेशात तिथलं एक कार्ड घेऊन तात्पुरता नंबर घेऊन तिथून मुलांशी ख्यालीखुशालीचं बोलणं केल्याचं आठवतंय. अर्थात याही गोष्टीला आता नऊ-दहा वर्ष झाली. मध्यंतरी एक छोटा फोन आला होता, ज्यात अर्धा स्क्रीन आणि अर्ध्या भागात बटणं असायची. पण त्यात काढलेला फोटो फार क्लीअर येत नसे. व्हॉटस्अॅप नसल्यामुळे तो फोटो पाठवताही यायचा नाही.
नंतर आला स्मार्टफोन. मला त्या फोनची भीतीच वाटायची, कारण नुसतं बोट लावलं तरी स्क्रीनवर काहीतरी दिसायला लागायचं किंवा कुणालातरी फोन लागायचा. मुलांनी तो वाढदिवसाला भेटच दिल्यानंतर माझं धाबं दणाणलं होतं. पण ‘फोन वापरायचाच’ असं मुलांनी बजावलं होतं, त्यामुळे थोडाफार शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला बगीच्यातल्या फुलांचे फोटो काढले आणि ते मुलांनाच विचारून त्यांना पाठवायला सुरुवात केली. व्हॉटस्अॅप ग्रुप झाले. मेसेज पाठवून बघायचा, जमला तर जमला!
मी अकरावी-बारावीला रसायनशास्त्र ‘नीट’ आणि ‘जेईई’ परीक्षांच्या लेव्हलला शिकवते. माझ्या विद्यार्थ्यांना विचारून थोडं थोडं मोबाइलबाबतीतलं शिक्षण सुरू ठेवलं. यादरम्यान माझे रसायनशास्त्राचे पेपर टाइप करायला एक मैत्रीण मिळाली होती, पण मला लॅपटॉप वापरता येत नव्हता. नोट्स काढणं वगैरे मला लिहूनच करावं लागत होतं. मग त्या मैत्रिणीला विचारून एक-दोन महिन्यात तिच्याकडे कोर्स करून मोबाइल वापरणं, लॅपटॉप वापरणं कसं सोयीस्कर करता येईल हे शिकायचा प्रयत्न केला. थोडंफार जमायला लागलं. काम होऊ लागलं.
काही वर्षांपूर्वी माझ्या ‘व्हॉटस्अॅप स्टेटस’वर माझ्या क्लाससंबंधीची एक सूचना माझ्याकडून लिहिली गेली आणि पोस्टही झाली. ती कशी ते मला कळलंही नव्हतं. ती एक दिवस स्टेटसवर राहिली आणि मला त्याच्याबद्दल लोकांचे बरेच मेसेज आले. तेव्हा कुठे मला कळलं की स्टेटसवर अशा गोष्टी टाकल्या की लोकांना ते वाचता येतं! आता मात्र मी फोटो, ईमोजी, इमेजेस हे सगळं स्टेटसला टाकू शकते आणि अगदी वेळेच्या आधी डिलिटही करू शकते. धडपडत, एक एक गोष्ट शिकत गेले. टाळेबंदीत माझे रसायनशास्त्र शिकवण्याचे क्लासेस बंद ठेवावे लागले.
एक-दीड महिना काही वाटलं नाही, पण नंतर मुलांमध्ये अस्वस्थता आली. ‘क्लास कधी सुरू होणार मॅडम?’ असं मुलं विचारू लागली. ‘झूम मीटिंगवर टय़ुशन सुरू करायची का?’ अशीही विचारणा झाली. मला हा प्रकार माहिती नव्हता. मुलगा, मुलगी, सून, जावई सगळे आपापल्या गावी. त्यांच्याशी फक्त मोबाइलवर बोलणं सुरू होते. काय करावं ते सुचेना. शेवटी विद्यार्थ्यांनाच स्पष्ट सांगितलं, की मला हे येत नाही. विद्यार्थ्यांनी खूप सहकार्य केलं. मी फक्त फोन हातात धरून कागदावर लिहून लेक्चर घेत होते. पीडीएफ करणं, मोबाइल स्टॅन्डवर लावून ब्लूटूथ हेडफोन लावून लेक्चर घेणं अजिबात जमत नव्हतं. टाळेबंदी जरा शिथिल झाल्यावर मुलगा-सून घरी आले आणि मग हे प्रयोग सुरू केले. बिचारी माझ्या टय़ुशनची मुलं! त्यांनी मला समजून घेतलं. ऑनलाइन शिकवणीची फीसुद्धा ऑनलाइन येणार होती त्यामुळे ‘गुगल पे’, ‘फोन पे’ वगैरे अॅप्स शिकावी लागली. कुणाला आपला पासवर्ड कळू न देणं, आपला ओटीपी न सांगणं, हे माहिती करून घेत गेले.
माझा अट्टहास होता, की मी मराठीतूनच व्हॉटस्अॅपवर जास्त संवाद साधीन. अजूनही मला कागदावर लिहिल्याशिवाय सरळ मोबाइलवर टाईप करता येत नाही! नुकतंच आमचं एक गेट-टुगेदर झालं. त्यात माझ्या ७५ वर्षांच्या मावसबहिणीनं आणि एका ८० वर्षांच्या मावशीनं मला सांगितलं, की त्यांना बोलून टाइप करता येतं. तेव्हा मला स्वत:चीच लाज वाटली आणि मी विद्यार्थ्यांकडून आणि माझ्या मुलांकडून जे काही शिकता येईल ते शिकायचा प्रयत्न केला.
आता तर माझी पाच वर्षांची नात मला तिचे गेम मोबाइलवर ‘इंस्टॉल’ करायला शिकवते. हा लेख पाठवायचा तर ऑनलाइनच, असं ठरवल्यानं मला लेख पाठवायलाही ठरवल्यापेक्षा एक महिना उशीर झाला! पण या सगळय़ात स्वत:मध्ये बदल घडवून आणायची तयारी असेल तर नवीन पिढीकडून कितीतरी चांगल्या गोष्टी आपण शिकू शकतो, हे दिसलं. आता यूटय़ुबवर व्हिडीओ अपलोड करणं, ओला-उबर बुक करणं, ऑनलाइन खरेदी, हे अद्याप शिकायचं आहे. नवी पिढी आपल्याला शिकवायला तयार आहे, हा खूप चांगला अनुभव मला आला. हीच माझ्या ‘स्मार्ट’ होण्याच्या प्रवासातली कमाई.