We learned I taught my grandmother retired teacher chaturang article ysh 95 | Loksatta

..आणि आम्ही शिकलो : मी आजीला शिकवलं अन् नातींनी मला!

माझ्या लहानपणीचा एक अनुभव सांगते, चौथीत असताना आमच्या शाळेतल्या गुरुजींनी ‘प्रौढ शिक्षण मोहिमे’अंतर्गत प्रत्येकानं किमान एकाला तरी लिहायला शिकवायचं असं सांगितलं.

lekh teaching parents
..आणि आम्ही शिकलो : मी आजीला शिकवलं अन् नातींनी मला!

शशिकला शेळके देशमुख

मी एक सेवानिवृत्त शिक्षिका आहे. वय वर्ष ७०. माझ्या लहानपणीचा एक अनुभव सांगते, चौथीत असताना आमच्या शाळेतल्या गुरुजींनी ‘प्रौढ शिक्षण मोहिमे’अंतर्गत प्रत्येकानं किमान एकाला तरी लिहायला शिकवायचं असं सांगितलं. आम्ही मुलं उत्साहानं कामाला लागलो. ‘आतापर्यंत आम्हालाच सर्व जण शिकवत होते, आता आम्ही शिकवणार..’ वगैरे! मी मामांकडे राहायचे आणि मामा, मामी, आजोबा हे सर्व साक्षर होते. त्यामुळे घरी गेल्या गेल्या मी आजीचा ताबा घेतला.

 आजी आश्चर्यानं म्हणाली, ‘‘अगं, काय हे? तोंडातले दात पडून बोळकं झालं माझं आणि म्हणते, लिहायला शीक!’’ पण मी हट्टालाच पेटले. नाना प्रकारे तिला समजावून सांगितलं, तेव्हा ती तयार झाली. मग झाला अभ्यास आणि सराव सुरू. काही दिवसांनी गुरुजी शिक्षणाधिकारी साहेबांना घेऊन घरी भेटीला आले, रात्री साधारण ९ च्या सुमारास. आमच्या घरापुढे गाई-म्हशी होत्या, पायऱ्यांजवळ रांगोळी काढली होती आणि इकडे आजीकडून मी तिचं नाव लिहून घेतलं होतं- ‘सरुबाई’! साहेब खूश झाले. कदाचित त्यांना ते त्यांच्या प्रकल्पाचं यश वाटलं असावं. तर अशा प्रकारे माझी आजी माझ्याकडून शिकली. काळाप्रमाणे बदललं पाहिजे हा यशाचा मार्ग आहे. तोच कित्ता पुढे खूप वर्षांनी आमच्या बाबतीत घडला.

   आम्ही उभयता शिक्षक म्हणून निवृत्त झालो. शिक्षक म्हटलं की काटकसर हा स्थायिभाव असावा असं मला वाटतं. आमच्याकडे लँडलाइन फोनसुद्धा खूप उशिरा आला. आमच्या तीनही मुलींची लग्नं झाली. त्या काळात मोबाइल फोनचं पर्व सुरू झालं आणि मुलींचा प्रेमापोटी आग्रह सुरू झाला, की ‘मोबाइल फोन घ्याच’. काही केल्या ते आम्हाला पटेना. हो-ना करता करता घेतला एकदाचा मोबाइल फोन. मग मुलींनी शिकवणं सुरू केलं. फोन घेणं, फोन करणं, नंबर सेव्ह करून ठेवणं, सर्व ‘प्रॅक्टिकल’ त्यांनी करून घेतलं. नंतर नातींचं युग अवतरलं. इंटरनेट पर्व! नाती लहान होत्या, पण आताची पिढी तेज बुद्धीची! त्यांनी लकडाच लावला आमच्यामागे शिकण्यासाठी. ‘व्हॉट्सअ‍ॅप’चं महत्त्व समजावून सांगितलं. ‘आपले वेगवेगळे ग्रुप बनवता येतात, छान माहिती एकमेकांना देता येते, विनोदी व्हिडीओ बघता येतात, तुमचा वेळ चांगला जाईल..’ बालहट्टच तो! नातवंडं म्हणजे दुधावरची साय. त्यांच्या प्रेमळ आग्रहाला बळी पडून आम्ही व्हॉट्सअ‍ॅप चालू केलं. यांनी त्यांच्या मित्रमंडळींचा, माजी शिक्षकांचा ग्रुप बनवला. त्यात ते आनंद घेतात. मी ‘अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे’च्या ग्रुप्समध्ये सहभागी झाले, त्यामुळे कविता लेखनाचे विविध प्रकार, ललित लेखन, चित्रावरून काव्य, अभंग लेखन असे किती तरी प्रकार मला शिकायला मिळाले. त्यात सहभागी होऊन अनेक स्पर्धामध्येही सहभागी झाले. त्यात भरपूर ऑनलाइन प्रमाणपत्रं मिळाली. काही प्रथम क्रमांक, तर काही उत्कृष्ट क्रमांकाची प्रमाणपत्रं मिळाली.

नातींनी माझी प्रमाणपत्रं प्रिंटआऊट करून आणली.  इंटरनेटचा वापर कसा करावा, ‘फेसबुक’ कसं वापरावं, हे त्यांनीच समजावून सांगितलं, त्याचा अभ्यास करून घेतला. नाही म्हटलं तरी मलासुद्धा यात आनंद मिळत होता. लिंक ओपन करणं शिकले, ‘इमोजीं’चा वापर करायला शिकले. या सगळय़ामुळे ऑनलाइन कविता वाचनाचा अद्वितीय आनंद मिळाला. तरी मला अजून ऑनलाइन बँकिंग, रिझव्‍‌र्हेशन करणं, टॅक्सी बुक करणं, बिलं भरणं, पैसे ‘ट्रान्सफर’ करणं या किती तरी गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत. माझ्या शिक्षिका तत्पर आहेतच शिकवायला! माझ्या बुद्धिमत्तेच्या आणि वयाच्या मानानं त्यांनी खूप सोप्या पद्धतीनं शिकवलं. असं म्हटलं की त्या म्हणतात, ‘शेवटी आम्ही शिक्षकांच्या नाती आहोत ना!’

अगदी आताचा अनुभव- माझ्या लहान नातीचं कॉलेजमधलं ‘प्रेझेन्टेशन’ घरबसल्या आम्हाला बघायला मिळालं. काही दिवसांपूर्वी मधल्या नातीचं ‘स्कूबा डायिव्हग’ ऑनलाइन बघितलं. लंडनमधल्या नातीनं तिच्या घराचं, युनिव्हर्सिटीचं ‘लाइव्ह’ दर्शन घडवलं. मी जर हे सर्व शिकले नसते, तर या आनंदाला मुकले असते. अजून अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं हे खरंच!

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 00:06 IST
Next Story
..आणि आम्ही शिकलो : ‘एक्सेल शिट’.. ते ‘जी-पे’चा स्मार्ट प्रवास!