मीना कुलकर्णी

माझी साठी उलटल्यानंतर मोबाइल फोन माझ्या हातात आला, तोही साधा छोटाच. तोपर्यंत नेहमी घसघशीत मोठा टेलिफोन रिसिव्हर उचलायची सवय. त्यामुळे मोबाइलवर फोन आला की तो घेणं म्हणजे कसरतच वाटायची. फोन कानापर्यंत नेईस्तोवर ३-४ वेळा उलथापालथा व्हायचा आणि बंद व्हायचा. त्या नंबरवर ‘कॉलबॅक’ करावा म्हटलं, तर बॅलन्सचं टेन्शन असे!

Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

तेव्हा ‘व्हॉट्सअ‍ॅप’ नसल्यामुळे ‘एसएमएस’ पाठवावा लागायचा. मग इंग्रजी लिपीतून मराठी संदेश! नंबर फिरवण्यासाठी बारीक अल्फाबेट्समध्ये लिहिलेलं नाव वाचताना जाड भिंगाचा चष्मा लागायचा. त्या मोबाइलचे रिंगटोनही विचित्र असत. लहान बाळाचं ‘टय़ँहा टय़ँहा’, कुत्र्याचं भुंकणं, मांजरीचं ‘म्याँव म्याँव’.. मी मात्र दारावरच्या घंटीसारखा खणखणीत रिंगटोन ठेवला होता. त्यामुळे फोन वाजला की घराच्या पाठीवर कुठेही ऐकू यायचा!

मैत्रिणींच्या आग्रहाखातर मी स्मार्टफोन घ्यायचं ठरवलं. मुलानंच मला तो भेट दिला. मग व्हॉट्सअ‍ॅपवर मैत्रिणी, नातेवाईक, कामवाली, पेपरवाला, इस्त्रीवाला, दूधवाला सगळे जमा झाले. सुरुवातीला मराठी टायिपग येत नव्हतं. ‘ऐश्वर्य’, ‘श्रद्धांजली’ हे किंवा इतर लांबलचक शब्द लिहिताना चिडचिड व्हायची. या फोनमध्येही कुणाचा फोन आला, की स्क्रीनवर भलतीकडेच ‘टच’ व्हायचं. फोन बंद केला तर तिकडून गैरसमज. कुणी फोन केलाय हेही कळायचं नाही. सारखं तरी कुणाला विचारायचं? व्हिडीओ कॉलवर तर मला अजिबात बोलायला जमायचं नाही. म्हणजे असं, की बोलताना त्या व्यक्तीकडे पाहून बोलायला हवं ना! पण कोपऱ्यात दिसणाऱ्या स्वत:च्याच फोटोकडे पाहून बोललं जायचं. करोनाच्या टाळेबंदीच्या काळात ‘झूम’वर फॅमिली गप्पा सुरू असत, तेव्हा मी लवकर उरकून ‘बाय-टाटा’ करायचे! मैत्रिणींनीच मला ‘फेसबुक’ काढून दिलं. त्यात मैत्रीच्या विनंत्या आल्या, की त्यावर ‘पुष्टी करा’/ ‘हटवा’ असे पर्याय दिसायचे. ‘हटवा’ शब्द कसा तरीच वाटायचा. त्या अनधिकृत टपऱ्या आहेत का हटवायला! मग मी काहीच प्रतिसाद देत नसे; परंतु ‘व्हॉट्सअ‍ॅप’मध्ये मी फारच गुंतत गेले. मैत्रिणींशी गप्पा संपायच्याच नाहीत. मग गॅसवर पातेलं ठेवलंय त्याचंही भान राहायचं नाही. दूध उकळून जाऊन दुधाचे पाट वाहायचे, आमटी घट्ट गोळा व्हायची.. रोजची पूजेची वेळ अनियमित व्हायला लागली. कधी कधी वादावादी, भांडणं, गैरसमज होऊ लागले. मग मात्र मी सावध झाले.

‘ऑनलाइन रीचार्ज’ करायच्या भानगडीत मी कधी नाही पडले. रकमेच्या जागी चुकून चार शून्य दाबली गेली, तर जन्मभराचं ‘नेट पॅक’ व्हायचं, अशी मला धास्ती वाटे. कारण एकदा ‘एटीएम’मधून पैसे काढताना असं झालं होतं. चुकून रकमेत एक शून्य जास्त दाबलं गेलं आणि ३ हजारांऐवजी ३० हजार झाले. वेळेत कळलं म्हणून बरं! एटीएम मशीनवर माझा स्पीड एवढा कमी असे, की बाहेरचा माणूस दार ठोठवायचा. मग भंबेरी उडायची! ती प्रक्रिया पार पाडून घरी येईपर्यंत मी दमून जायचे, पण तरी एकटीच ते काम करायचं ठरवलं होतं. जरा मोठय़ा स्क्रीनवर सिनेमे, नाटकं पाहाता यावीत, लेख लिहिता यावेत, म्हणून मुलीनं मला मोठा टॅब घेऊन दिला; पण त्यावर मराठी लिपी नव्हती. मग मी तो नातवाला अभ्यासाला देऊन टाकला. एकदा पेपरमध्ये वाचलं होतं, की एक ९७ वर्षांच्या आजी संगणक कसा लीलया हाताळतात. वाटलं, आपणही शिकावं. मुलाची काही कामाची कागदपत्रं तयार करून द्यावीत, त्याचंसुद्धा काम जरा हलकं होईल.. पण संगणकावर मोठा टाइप हवा असेल तर हे दाबा.. कधी कधी माऊस तिसरीकडेच राहून नुसताच हात फिरायचा.. मग त्याचा नाद दिला सोडून.

असा हा अडथळय़ांचा प्रवास! पण एक एक करत मी मुलाकडून, मैत्रिणींकडून आणि सतत वापरत मी स्वत:च असं सगळं शिकले. हा अनुभव मला खूपच शिकवून गेला. जागरूकता, चपळता, आकलन, बरंच काही अंगवळणी पाडण्यासाठी प्रयत्न करू लागले. मग स्मार्टफोन कुटुंबातला झाला. मराठी टायिपग, गूगल, यूटय़ूब सहज हाताळू लागले. सामान्य का होईना, पण इंग्रजीचं ज्ञान असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मी स्वत: शिकले. टूर पॅकेज, पिकनिक स्पॉट्स बघणं, कॅब बुक करणं जमू लागलं. नकाशा पाहता येऊ लागला. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही प्रवासाची भीती राहिली नाही. अशी प्रवासाची वेळ आली तर अडून राहणार नाही, इतका आत्मविश्वास आला. आता माझं वय ७५ च्या पुढे आहे, पण तंत्रज्ञान आत्मसात करताना नवीन पिढीबरोबर चालण्याची क्षमता आली. करोनामध्ये हा मोबाइल माझा सख्खा सोबती झाला. आताशा असंही मनात येतं, की तंत्रज्ञानात गरुडझेप घेताना काही बाबतींत ऐकणं, वाचन, पाहणं यात दिखावा, पोकळपणा आला आहे. मोबाइलमुळे एकमेकांची गरज भासेनाशी झाली आहे. रोबो माणसासारखी सेवा करेल, पण त्याला माणसाचे अश्रू नाही पुसता येणार! प्रत्यक्ष संवाद नाही, तर तणाव कसे दूर होणार? संगणकानं विकासाचा आलेख खूप उंचावला; पण संस्कार, आजी-नातवंडांमधला संवाद, जवळीक यातल्या अनेक गोष्टी मोडीत निघाल्या. मोबाइलवर सगळं तयार मिळतं, पण एखादा स्वत:च्या लेखणीतून उतरलेला प्रसंग, कविताच हृदयात उतरते. अर्थात नाण्याच्या दोन बाजूंसारखे सगळय़ाचे फायदे-तोटे आहेतच. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपमुळे नवं क्षितिज आमच्यासारख्यांना मिळालं; पण दुसरीकडे वाचनसंस्कृती मागे पडत चाललीय असंही वाटतं. सारांश काय, तर आधुनिकतेचा योग्य वापर केला, तर प्रवाहाची साथ सुटणार नाही आणि किनाऱ्याची साथही सुटणार नाही!