scorecardresearch

..आणि आम्ही शिकलो: आभासी दुनियेच्या हिमनगाचं टोक!

एखादा फोटो ‘डीपी’ला कसा लावायचा, ‘स्टेट्स’ कसं टाकायचं, इथपासून ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर मेसेज कसे पाहायचे, कसे पाठवायचे, ‘फेसबुक’वर आपलं अकाऊंट कसं उघडायचं, वगैरे सर्व रीतसर शिक्षण चुकतमाकत सुरू झालं.

1 teach grandmother
..आणि आम्ही शिकलो

भारती महाजन-रायबागकर

साधारण १५-१६ वर्षांपूर्वीची गोष्ट. मला औरंगाबादहून चेन्नईला रेल्वेनं जायचं होतं. जवळजवळ ३२ तासांचा प्रवास मी प्रथमच एकटी करणार म्हणून मुलाला काळजी वाटत होती. त्यामुळे मी नको नको म्हणत असताना त्यानं माझ्यासाठी मोबाइल फोन घेतला. त्याच्या मोबाइलवर त्याला माझी गाडी कुठे आहे ते कळणार होतं, म्हणून हा सारा प्रपंच! (तरी गाडीतली मी कुठे दिसणार होते!) तर अशी माझी आणि मोबाइलची तोंडओळख झाली. तेव्हाचा मोबाइल अगदी साधा. माझ्यासाठी फोन घेणं आणि फोन करणं एवढय़ाच उपयोगाचा. तरीही काय भारी वाटत होतं मला!

मला लिखाणाची हौस. सुरुवातीच्या काळात माझे लेख मी सुवाच्य अक्षरात कागदावर लिहून ते स्थानिक वर्तमानपत्रांच्या कार्यालयात नेऊन देत असे, तर परगावच्या कार्यालयांत पोस्टानं किंवा कुरिअरनं पाठवत असे. पण ते त्यांना मिळेपर्यंत मनात धाकधूक राहायची. नवकवी-लेखकांच्या मनातली घालमेल तेच जाणोत! नंतर आलं इ-मेल. पण मला टाइप करायला तरी कुठे येत होतं! खूप आधी कधी तरी शिकलेलं टायपिंग पार विस्मरणात गेलेलं. मग सूनबाई आली मदतीला. पण माझा स्पीड एवढा, की अर्ध्या तासात जेमतेम एक पान टाइप करून व्हायचं आणि क्वचित एखादं वेगळंच बटण दाबलं गेलं तर लिहिलेलं सगळं अदृश्य होऊन जायचं. मग कंटाळून मी म्हणत असे, ‘‘बाई गं, मी आपली हातानंच लिहून पाठवते, पण हे टायपिंग नको. नेहमी तुझा धावा तरी कितीदा करायचा?’’ पण तिनं प्रत्येक वेळेला पुढच्या सुलभतेसाठी मला चिकाटीनं प्रयत्न करायला लावले.

नंतर हातात आला स्मार्टफोन. ही जणू काही अलिबाबाची गुहाच! ‘खुल जा सिम सिम’ म्हटलं की कल्पनातीत दुनिया आपल्यापुढे उघडणारी. पण पुन्हा तोच प्रश्न, की हे वापरायचं कसं? बटणं दाबताना मनात भीती.. मोबाइल बिघडणार तर नाही? चुकून दुसऱ्याच व्यक्तीला तर मेसेज जाणार नाही?.. नंतर नुसता स्पर्शानं चालू होणारा मोबाइल हाती आला. आता तर मनाचा आणखी गडबड गुंडा! वेगवेगळी अ‍ॅप्स, व्हिडीओ पाहायचं यूटय़ूब, मराठीतून गोष्टी ऐकण्याचं अ‍ॅप, गाण्यांचं वेगळं अ‍ॅप.. ‘हे घेऊ का ते घेऊ, दुकान उचलून का नेऊ?..’ या कवितेतल्या लहान मुलासारखी माझी गत झाली. कधी लहानगा नातू, तर कधी नात माझ्यासाठी शिक्षकाची भूमिका करायला आनंदानं तयार झाले. ही आजची पिढी जन्मापासूनच तंत्रज्ञान शिकून येते की काय न कळे! मग फोटो कसा काढायचा, एखादा फोटो ‘डीपी’ला कसा लावायचा, ‘स्टेट्स’ कसं टाकायचं, इथपासून ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर मेसेज कसे पाहायचे, कसे पाठवायचे, ‘फेसबुक’वर आपलं अकाऊंट कसं उघडायचं, वगैरे सर्व रीतसर शिक्षण चुकतमाकत सुरू झालं. एक दिवस माझ्या कविता आणि लेख वाचून माझ्या मुलीच्या मैत्रिणीनं मला साहित्यिक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जॉइन करून घेतलं. तोपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि इतरांशी मेसेजची देवाणघेवाण करण्यापुरतं, इथपर्यंतच माझ्या समजुतीची धाव होती. हा समूह जॉइन केल्यानंतर मात्र मला लिखाणासाठी खूप वैविध्यपूर्ण विषय मिळू लागले आणि एखाद्या विषयावर लिहिण्याचं आव्हान पेलताना ते उत्कृष्ट व्हावं या उद्देशानं मी एखाद्या परीक्षेसारखीच तयारी करू लागले.

एकदा हाताचं बोट मिक्सर चालवताना त्यात सापडलं. मोबाइलसाठी त्याच बोटाची गरज. आता आली का पंचाईत! लिहिल्याशिवाय तर चैन पडेना. पुन्हा एकदा सूनबाईचा धावा केला आणि तिनं मला ‘व्हॉइस टायपिंग’ची जादूची किल्ली बहाल केली. त्यामुळे वेळेची बचत तर झालीच, पण हाताची बोटं दुखणंही बंद झालं. त्यापुढची पायरी म्हणजे फेसबुक आणि ब्लॉग. पण फेसबुकबद्दल एवढी मतमतांतरं ऐकायला मिळायची, की मी अकाऊंट उघडल्यानंतरही किती तरी वर्ष ते वापरतच नव्हते. ब्लॉगवरसुद्धा काही लिहिलं नव्हतं. पुन्हा सूनबाईनंच मला सावधगिरी बाळगून स्वत:चं पेज उघडायला आणि त्यावर आपलं लिखाण समर्पक फोटो निवडून त्यासह पाठवायला शिकवलं. मला जरा हटके  चित्रपट आणि लघुपट पाहायची आवड आहे. ते मोबाइलवरून टीव्हीवर ‘कास्ट’ करून कसं पाहायचं, याबद्दल मुलानं मार्गदर्शन केलं. मग घरबसल्या हव्या तशा करमणुकीचा एक छानसा मार्ग मला गवसला.

पुस्तकं वाचण्याचीही मला खूप आवड. पण वयपरत्वे पुस्तकाचं प्रत्यक्ष वाचन कमी झालं. मग गोष्टी ऐकण्याचं अ‍ॅप वापरून फक्त कानांचा उपयोग करून मी किती तरी पुस्तकं ऐकण्याचा आनंद उपभोगला. यूटय़ूबवरचे छोटे छोटे व्हिडीओ बघून माझ्यातली कला-छंद जोपासायला उपयोग झाला. गाण्यांची अ‍ॅप्स वापरून आता मी माझ्या आवडीची जुनी-नवी गीतं आरामात ऐकू शकते. तसंच दूरदूरच्या साहित्य स्पर्धामध्येही सहजगत्या भाग घेऊन बक्षिसं मिळवण्याचा मार्ग सापडला. हा लेखसुद्धा ठरवल्यानंतर लगेच लिहून झाला तो या मोबाइलच्या कृपेमुळेच! मोबाइलच्या आभासी दुनियेचा खजिना म्हणजे हिमनगासारखा आहे. वयाच्या सत्तरीत या हिमनगाचं एवढंसं टोक वापरतानादेखील मला दिवस अपुरा पडतोय! पर अभी तो इतना ही काफी हैं!

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 00:07 IST

संबंधित बातम्या