सुषमा पोंगुर्लेकर
माझं वय आता ८७ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात मी वाढले. आमच्या गावी कधी टेलिफोन बघितलाही नव्हता. ‘एस.एस.सी.’ झाल्यानंतर मी नर्सिगचा डिप्लोमा घेण्यासाठी मुंबईत आले. नर्सिग प्रशिक्षण पूर्ण करून पश्चिम रेल्वे इस्पितळात परिचारिका म्हणून नोकरीस लागले. तिथं ३३ वर्ष नोकरी करून ग्रेड १ ऑफिसरच्या पदावरून १९९३ मध्ये निवृत्त झाले. त्या वेळी आमच्याकडे फक्त महानगर टेलिफोन निगमचा फोन होता. नंतर कॉर्डलेस फोन आले.
घरात त्यानंतर मुलीनं डेस्कटॉप संगणक घेतला. पण मी मात्र त्यापासून दूरच होते. काही वर्षांनी १९९८ मध्ये मोठय़ा मुलीकडे अमेरिकेत जायचा योग आला. तिकडून ई-मेल करता यावं म्हणून मी महत्प्रयासानं ई-मेल करायला मुलीकडून शिकले. त्यात फक्त ई-मेल पत्ता घालायचा, संदेश टाइप करायचा व ‘सेंड’चं बटण दाबायचं, एवढंच असल्यामुळे ते मला सहज जमलं. मग अमेरिकेतून माझ्या घरी दुसऱ्या मुलीला, काही मैत्रिणींना ई-मेल पाठवू शकले आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला.
घरात माझ्यासाठी पहिला मोबाइल फोन आला माझ्या वयाच्या ७८ वर्षी. हा आताच्या फोनच्या तुलनेत साधा फोन होता. त्यावर फोन करणं आणि घेणं सहज शक्य होतं. तरीही बऱ्याच वेळा नाटक-सिनेमाला गेल्यावर अचानक फोन वाजायला लागला तर काय करावं हे कळायचं नाही. गोंधळून जायला व्हायचं. मग तो ‘सायलेंट मोड’वर करता येऊ लागला.
एक दिवस मुलगी स्मार्टफोन घेऊन आली आणि मला म्हणाली, की ‘हा फोन वापर’. मला काय बोलावं हेच कळेना. मनात आलं, की मी हा वापरू शकेन का? आणि सुरुवातीला तसंच झालं. हा फोन साध्या मोबाइलपेक्षा बराच वेगळा. स्क्रीनवर स्पर्श करून करायच्या गोष्टी मला कळायच्या नाहीत आणि त्या शिकवायला मुलांना कंटाळा यायचा. परत परत मोबाइलमधलं तेच तेच विचारावं लागायचं. मुलगी ऑफिसमधून आल्यावर थकलेली असायची, तरी मी तिच्या सारखी मागे लागून माझं समाधान होईपर्यंत तिला विचारत राहायचे. कधी ती शिकवताना चिडली तर खूप वाईट वाटायचं, आत्मविश्वास जायचा. पण मी तिच्या मागे असायची. सारखं मी तिला त्रास देतेय असं वाटायचं. आता मी सूचना लिहून ठेवते आणि अडलेल्या गोष्टी तिला विचारते. पण तिच्यामुळे मी एवढंतरी शिकले.
फोन करणं, फोन घेणं, मेसेज पाठवणं आणि त्यानंतर व्हॉट्सअॅप मी शिकून घेतलं. वयाच्या ८४ व्या वर्षी बऱ्याच व्हॉट्सअॅप ग्रुप्सची सदस्य झाले. त्यात कुटुंब, मैत्रिणी, ऑफिसमधले जुने सहकारी यांच्याशी संपर्क ठेवता येऊ लागला. मोठी मुलगी आणि नातीकडूनसुद्धा मी बऱ्याच गोष्टी शिकले. आता मी सर्व मैत्रिणींना फोन करू शकते, गप्पा मारते. त्यातून दूर राहूनही त्यांची खुशाली कळते. याशिवाय मी फोन करून फार्मसीमधून औषधं मागवू शकते. भाजी, वाणसामान मागवते. रुग्णालयात फोन करून अपॉइंटमेंट घेते. स्वयंपाकाच्या रेसिपींचे व्हिडीओ बघून ते करू शकते. टीव्हीवरच्या बघायच्या राहिलेल्या मालिका त्यांच्या अॅपवर बघू शकते. सकाळी रेडिओ लावते. भजनं ऐकून मन प्रसन्न होतं. अमेरिकेत राहात असलेल्या नातवंडांशी व्हिडीओ कॉलवर गप्पा मारणं जमतं. माझी पणतीसुद्धा छान गप्पा मारते माझ्याशी! तिच्या जन्मापासून ते आता ती
४ वर्षांची होईपर्यंत तिचं मोठं होणं मला फोनवरच व्हिडीओंमधून बघता आलं. नुकतीच मी यूटय़ूब वापरून मला आवडणाऱ्या गोष्टी ऐकू-बघू लागले आहे. या व्हिडीओंमधून बरीच माहिती मिळते,आणि वेळ चांगला जातो. म्हातारपणात विरंगुळा म्हणून स्मार्टफोनचा खूप उपयोग होतोय. काही जरी अडलं तरी पूर्णपणे येईपर्यंत मला चैन पडत नाही. मग त्याचा ध्यास लागतो. एखादी न येणारी गोष्ट शिकून घ्यायचीच असं मी ठरवते. आठवी इयत्तेपासून मी घरापासून दूर राहून शिक्षण केलं आहे, त्यामुळे मी आता काहीही करू शकते असा विश्वास आहे! माझ्या मोबाइल शिकण्यात सहभागी माझ्या कुटुंबीयांचे आभार. तरीही ज्येष्ठ नागरिकांना घरी येऊन स्मार्टफोन वापरायला शिकवण्याची सेवा कुणी सुरू केली तर उत्तम.