‘मला पटकन वजन कमी करायचंय…’ या हट्टापायी अलीकडे ‘ग्लुकागॉन-लाइक पेप्टाइड-१’ (जीएलपी) हे इंजेक्शन घेण्याचा कल वाढलेला दिसतो. ‘जीएलपी-१’ इंजेक्शने आपल्या देशात जेमतेम एक वर्षापासून उपलब्ध झालेली असून त्यावर अजून बरंच संशोधन होणं गरजेचं आहे. मुळात ती ज्या कारणांसाठी उपयोगात आणली जातात त्याऐवजी वजन कमी करण्यासाठी वापरली जात असतील तर धोकादायक नाहीत का?

सध्या समाजमाध्यमांवर एकच चर्चा जास्त प्रमाणात ऐकू येतेय, ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या ‘ग्लुकागॉन-लाइक पेप्टाइड-१’ (जीएलपी-१) या औषधाची…

काही वर्षांपूर्वीपर्यंत फक्त वैद्यकीय जर्नल्समध्ये दिसणारी ही नावं आता विविध समाजमाध्यमांवर सहजपणे घेतली जात आहेत. ‘‘माझ्या मैत्रिणीने तीन महिन्यांत १५ किलो वजन कमी केलं!’’ डॉक्टरांनी मला हे इंजेक्शन घ्यायला सांगितलंय, हे सुरक्षित आहे का? मी सुरू करू का?’’ असे प्रश्न विचारले जात आहेत. माझं उत्तर एकच आहे, ‘‘माझा या औषधांना विरोध नाही, पण या औषधांबाबत जी महत्त्वाची चर्चा व्हायला हवी, ती होत नाही, याला विरोध आहे.

वस्तुस्थिती काय आहे?

हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की, ही औषधं वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आहेत. ‘टाइप २’ मधुमेह आणि लठ्ठपणामुळे निर्माण होणार्‍या गंभीर आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी ही औषधे उपयुक्त ठरली आहेत. ‘स्टेप ४’सारख्या मोठ्या वैद्यकीय चाचणीमध्ये (क्लिनिकल ट्रायलमध्ये) हे सिद्ध झालं आहे की, योग्य वैद्यकीय देखरेखीखाली या औषधांमुळे लक्षणीय वजन कमी होऊ शकतं, पण आधी ही इंजेक्शन्स कसं काम करतात हे समजून घेणं गरजेचं आहे. ही औषधं आपल्या शरीरातील ‘जीएलपी-१’ या नैसर्गिक संप्रेरकाची (Hormone) नक्कल करतात. ही औषधं आपल्या मेंदूला ‘पोट भरलेलं असल्याची’ जाणीव करून देतात आणि जठर रिकामं होण्याची प्रक्रिया मंदावतात. साहजिकच आपल्या आतड्यांतून देखील अन्न हळूहळू पुढे सरकतं आणि यामुळे आपल्याला भूक कमी लागते; परंतु ही एक नैसर्गिक प्रक्रिया नसून रासायनिकरीत्या घडवून आणलेला बदल आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा आपण नैसर्गिक भूक मारतो, तेव्हा त्याचा शरीराच्या इतर क्रियांवर काय परिणाम होतो, याचा विचार गांभीर्याने व्हायला हवा.

ज्या औषधांचा परिणाम आपल्या पूर्ण शरीरावर होणार आहे आणि होतो, त्या औषधाचं वितरण खूप काळजीपूर्वक व्हायला हवं. जेव्हा या औषधाला ‘अन्न आणि औषध प्रशासना’ची (FDA) ची मान्यता मिळाली तेव्हा असं ठरवण्यात आलं होतं की, ज्यांचा ‘बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय) ३०च्या पुढे आहे अशा व्यक्तीच या औषधासाठी पात्र आहेत. पण वास्तव वेगळं आहे. (‘बीएमआय’बद्दल विस्तृत माहिती मी माझं नवीन पुस्तक ‘व्हॉट, हाऊ मच अँड हाऊ टू ईट’ यात दिलेली आहे.) थोडक्यात, ‘बीएमआय’ हे एखादी व्यक्ती किती जाड किंवा बारीक आहे, हे मोजण्याचा आकडा आहे, असं आपण म्हणू शकतो. तर आपल्या देशात या ‘बीएमआय व जीएलपी-१’मुळे होणार्‍या दुष्परिणामांचं वास्तव काय हे पाहायला हवं.

भारतातील वास्तव

ज्यांचा ‘बीएमआय’ फक्त २४ किंवा त्यापेक्षा कमी आहे, जे वैद्यकीय निकषांनुसार या औषधांसाठी पात्रच नाहीत, असे लोक औषधांच्या दुकानातून ही ‘जीएलपी-१’ची औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकत घेत आहेत, असं आढळून आलं आहे. कोणतंही समुपदेशन नाही, भविष्यात काय होऊ शकतं याची माहिती नाही आणि हे औषध थांबवायचं असल्यास काय काळजी घ्यायची याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातंच असं नाही. केवळ ‘कॉस्मेटिक’ फायद्यासाठी किंवा समाजमाध्यमांवरील ‘इन्फ्लुएन्सर्स’च्या सल्ल्याने हे ‘वेट लॉस इंजेक्शन’ घेतलं जातंय. हे प्रकरण एवढं वाढलेलं दिसतंय, की हल्ली लग्न ठरल्यावर मेहंदी आणि मेकअप कोण करणार ते ठरवण्याआधी वधू-वर आपल्याला किती महिन्यात किती किलो वजन कमी करायचंय, आणि त्यासाठी किती इंजेक्शनं घ्यावी लागतील हे आधी ठरवताहेत. हा कल अत्यंत धोकादायक आहे. कारण वजन कमी करण्यासाठी उपयोगात येणारी ‘जीएलपी-१’ इंजेक्शनं आपल्या देशात जेमतेम एक वर्षापासून उपलब्ध झालेली असून त्यावर अजून बरंच संशोधन होणं गरजेचं आहे.

एकदा सहज गप्पा मारताना मी म्हटलं, एवढे दिवस, शहरात मद्यपान करत किंवा फोन बघत गाडी चालवणार्‍या व्यक्तींमुळे अपघात व्हायचा धोका असायचा, पण हल्ली ही ‘जीएलपी-१’ इंजेक्शन घेणार्‍या व्यक्तींना होणार्‍या हायपोग्लायसिमीया (रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होणं) आणि त्यामुळे येणारी बेशुद्धी याची भीती वाटायला लागली आहे. वजन कमी होण्यासाठी सेवन करत असलेल्या औषधाचे परिणाम आपण नीट समजून घेत नसल्यामुळे इतरांच्या जिवावरसुद्धा बेतू शकतात. यापेक्षा आणखी काय गंभीर असू शकतं? या औषधांचे जे भावी दुष्परिणाम होऊ शकतात याविषयी पुरेशी चर्चा होत नसल्याची खूप खंत आहे.

दुष्परिणाम : नाण्याची दुसरी बाजू

कोणतेही नवीन औषध घेताना रुग्ण डॉक्टरांना विचारतात, ‘‘याचे काही दुष्परिणाम नाहीत ना?’’ अगदी साधी जीवनसत्त्वाची गोळी घेतानासुद्धा विचारतात. मग या ‘जीएलपी-१’ इंजेक्शनच्या दुष्परिणामांविषयी खोलवर चर्चा आणि मांडणी का होत नसावी?

१. स्नायूंचं नुकसान : SURMOUNT आणि STEP 1 संशोधनानुसार, या औषधांमुळे जे वजन कमी होतं, त्यापैकी २५-३९ टक्क्यांपर्यंत स्नायूंचं वजन कमी होतं, केवळ चरबी नाही. भारतीय आहारात आधीच प्रथिनांची (protein) कमतरता आहे, अशात स्नायू गमावणं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि चयापचय प्रक्रिया (metabolism) मंदावते.

२. गंभीर जोखीम : स्वादुपिंडाचा दाह (Pancreatitis), पित्ताशयाचे आजार आणि हायपोथायरॉईडीझम, गॉइटर सारखे संभाव्य धोके आहेत.

३. ‘ओझिम्पिक फेस’ (Ozempic Face) आणि त्वचेचं आरोग्य : झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे चेहर्‍यावरील नैसर्गिक चरबी (subcutaneous fat) निघून जाते. यामुळे त्वचा सैल पडते, डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात आणि व्यक्ती अकाली वृद्ध दिसू लागते. हा केवळ शारीरिक बदल नसून याचा मानसिक आरोग्यावर आणि आत्मविश्वासावरही मोठा परिणाम होतो.

४. मानसिक आरोग्यावरील परिणाम : काही रुग्णांमध्ये या औषधांमुळे नैराश्य किंवा अस्वस्थता (Anxiety) वाढल्याचं दिसून आलं आहे. अन्नाशी असलेलं आपलं नातं हे केवळ ऊर्जेशी संबंधित नसून ते आनंदाशीही जोडलेलं असतं. जेव्हा औषधामुळे अन्नाबद्दलची ओढ पूर्णपणे नष्ट होते, तेव्हा त्याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक समाधानावर होतो.

औषधं बंद केल्यावर काय?

महत्त्वाचं म्हणजे ही औषधं तुमची भूक कमी करतात, पण तुमच्या मधुमेहाचं किंवा लठ्ठपणाचं मूळ कारण सुधारत नाहीत. जेव्हा तुम्ही हे इंजेक्शन घेणं थांबवता, तेव्हा काय होतं? ‘स्टेप’ (हृदयाच्या तंदुरुस्तीचं मूल्यांंकन करणारी) चाचणीतील निष्कर्ष सांगतो, की हे औषध बंद केल्यानंतर एका वर्षात कमी केलेल्या वजनापैकी दोनतृतीयांश वजन परत येतं. म्हणजेच तीन महिन्यांत बारा किलो वजन कमी केलं, तर पुढच्या वर्षांत आठ किलो वजन वाढणार. याला ‘यो-यो इफेक्ट’ म्हणतात. वारंवार वजन कमी होणं आणि पुन्हा वाढणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तवाहिन्यांसाठी अत्यंत घातक ठरू शकतं. औषध बंद केल्यावर भूक पुन्हा त्याच तीव्रतेने परत येते, ज्याला ‘हंगर रिबाऊंड’ म्हणतात. पण या काळात शरीरातील कमी झालेले स्नायू (Muscle mass) परत मिळवण्यासाठी व्यायामशाळेत जी प्रचंड मेहनत आणि प्रथिनांचा आहार हवा असतो, तो न मिळाल्यास शरीर पूर्वीपेक्षा अधिक कमकुवत आणि ‘थुलथुलीत’ होतं. तुम्ही म्हणाल, खाऊ आम्ही प्रथिनं! पण मुळात तुम्ही जर भूक मारण्याचं औषध घेत आहात तर तेही किती खाऊ शकणार?

या इंजेक्शनमुळे आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ यांची गरजच लागणार नाही, साहजिकच याला त्यांच्याकडून विरोध होणारच, असा आरोपाचा सूरसुद्धा ऐकू येतो, पण हे समजून घेणं गरजेचं आहे की, जसं आपण कुठल्याही आजाराचा उपाय करताना त्याचं पथ्य पाळतो तसंच ही औषधं घेतानासुद्धा पथ्य पाळलं पाहिजे. इथं फरक फक्त एवढाच की, एरवी काय वर्ज्य करायचं ते पथ्यात सांगितलं जातं, या बाबतीत काय काय नक्की खाल्लं पाहिजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कोणतीही औषधं घेताना आपण त्यांचा विचार करतो तसा याचाही करायला हवं. ताईच्या लग्नात मला ५० किलोऐवजी ४५ किलो व्हायचं आहे, म्हणून मी ‘जीएलपी-१’ इंजेक्शन घेते अशी उद्दिष्टं नसावीत, एवढीच कळकळून विनंती आहे.

काय बदलण्याची गरज आहे?

त्यामुळे डॉक्टरांनाही मला सुचवावंसं वाटतं, त्यांनी (जे तसं करत नसतील त्यांना) ‘प्रि्क्रिरप्शन’वर हे औषध लिहून देताना त्यांच्या दुष्परिणामांविषयी आणि ‘एक्झिट प्रोटोकॉल’वर (इंजेक्शन घ्यायचं थांबवल्यावर घ्यायची काळजी) याविषयीही चर्चा करावी. रुग्णाला हे स्पष्ट सांगायला हवं की, हे इंजेक्शन म्हणजे पर्याय नसून ते केवळ एक साधन आहे. मुख्य काम हे आहार आणि व्यायामालाच करावं
लागणार आहे.

त्यामुळे हे इंजेक्शन घेऊ इच्छिणार्‍यांसाठीही मला सुचवावंसं वाटतं की, स्वत:ला विचारा, मी खरोखर या निकषात बसतेय का? की मी केवळ संयम नसल्यामुळे हा मार्ग निवडतेय? तुमच्या शरीराला यंत्र समजू नका. त्याला नैसर्गिक पद्धतीने दुरुस्त होण्याची संधी द्या. लक्षात ठेवा, शिस्त ही इंजेक्शन घेऊन आत्मसात करता येत नाही. जर तुम्ही औषध सुरू असताना खाण्याच्या सवयी बदलल्या नाहीत, तर औषध बंद होताच तुम्ही पुन्हा त्याच चक्रात अडकाल.

औषध प्रशासनालाही सुचवावंसं वाटतं की, ‘प्रि्क्रिरप्शन’शिवाय या औषधांच्या विक्रीवर कडक नियंत्रण असायला हवं. त्याच्याशिवाय ऑनलाइन औषध विक्रीही होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

थोडक्यात काय, शाळा आणि महाविद्यालयांपासूनच विद्यार्थ्यांना ‘आरोग्य’ म्हणजे केवळ वजनाचा आकडा नसून ती शारीरिक क्षमता आणि मानसिक उत्साह आहे, हे शिकवलं जाणं आवश्यक आहे. सडपातळ दिसणं आणि निरोगी असणं यातला फरक आपण विसरत चाललो आहोत.

समाजमाध्यमांवरील ‘फोटोशॉप’ शरीरांच्या मागे धावणं थांबवून आपल्या स्वत:च्या शरीराची गरज ओळखली पाहिजे. वजन कमी करणं हा प्रवासाचा शेवट नसून तो एका निरोगी जीवनशैलीची सुरुवात असायला हवी. ‘जीएलपी-१’सारखी औषधं विज्ञानाची प्रगती दर्शवतात, पण विज्ञानाचा वापर शहाणपणाने केला नाही तर तो शाप ठरू शकतो. ही औषधं वाईट नाहीत, पण ती ‘जादूची कांडी’सुद्धा नाहीत. आपल्याला ‘त्वरित परिणामां’पेक्षा आरोग्यदायी भविष्याबद्दल बोलण्याची अधिक गरज आहे. तुमच्या आजूबाजूला दिसतो असा ट्रेंड? याबद्दल तुमचं काय मत आहे? मला नक्की कळवा.

amita@amitagadre.com