वृद्धत्वात तारुण्य जपताना

‘सन ऑफ मिलियन पॅरेंटस्’ अशी उपाधी मिळवलेले शैलेश मिश्रा यांनी वृद्धत्वातली गरज ओळखून ‘सिल्वर इिनग’ सुरू केली. ‘१६ विरुद्ध ६०’ ही फुटबॉल मॅच, ‘बचपन आफ्टर पचपन’ हा शो, ‘कॉफी वीथ कहानी’, ‘डिमेन्शीया मॅनेजमेंट’ मिसिंग सीनियर सिटीझन’ आदी सेवा आणि उपक्रम राबविणाऱ्या, अल्प मोबदल्यात सक्षम व सुखी वृद्धत्व देऊ इच्छिणाऱ्या ‘सिल्व्हर इनिंग’विषयी.

‘सन ऑफ मिलियन पॅरेंटस्’ अशी उपाधी मिळवलेले शैलेश मिश्रा यांनी वृद्धत्वातली गरज ओळखून ‘सिल्वर इिनग’ सुरू केली. ‘१६ विरुद्ध ६०’ ही फुटबॉल मॅच, ‘बचपन आफ्टर पचपन’ हा शो, ‘कॉफी वीथ कहानी’, ‘डिमेन्शीया मॅनेजमेंट’ मिसिंग सीनियर सिटीझन’ आदी सेवा आणि उपक्रम राबविणाऱ्या, अल्प मोबदल्यात सक्षम व सुखी वृद्धत्व देऊ इच्छिणाऱ्या ‘सिल्व्हर इनिंग’विषयी.
ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेतर्फे ओळखपत्र वाटण्याचं काम चालू होतं. एका केंद्रात एका वृद्ध आजोबांना तिथल्या तरुण कार्यकर्त्यांने ओळखपत्र दिलं. आजोबा ते घेऊन वळले आणि तिथेच थबकले. अचानक त्यांच्या डोळय़ांतून अश्रू वहायला लागले. तो तरुण गोंधळला. त्याने आजोबांना हात धरून खुर्चीवर बसवलं. ‘‘आजोबा काय झालं? माझं काही चुकलं का?’’ त्याच्या प्रश्नावर गहीवरून आजोबा उद्गारले, ‘‘लेकरा, तुला ठाऊक नाही तू माझ्यासाठी केवढं मोठं काम केलंयस! तुझ्यासाठी हे फक्त एक कार्ड आहे. पण माझ्यासाठी ही माझी ओळख आहे. ‘आयडेंटिटी!’ वय वाढत गेलं तसतशी मी माझी आयडेंटिटी गमावून बसलो. बाळा आज तू ती मला परत मिळवून दिलीस!’’
काही क्षणांच्या या प्रसंगाने त्या तरुणाच्या मनात विचाराचं स्फुिल्लग पेटलं. त्याला बालपणी मनावर कोरले गेलेले आईचे शब्द आठवले, ‘‘आयुष्यात काहीतरी वेगळं, अद्भुत केलंस तरच जग तुझ्या कामाची नोंद घेईल!’’ ते वेगळं, अद्भुत कार्य कोणतं करायचं त्याची दिशा या प्रसंगातून त्याला सापडली. त्या तरुणाचं नाव शैलेश मिश्रा. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचं नाव ‘सिल्वर इनिंग्ज.’
शैलेश मिश्रा सांगू लागतात, ‘‘मी चारचौघांसारखा नोकरी करत होतो. संसार करत होतो. पण मला सतत असं वाटत होतं नोकरीत मी माझ्या वरिष्ठांना खूश करतोय. पण मी स्वत: खूश आहे का? आजोबांचा प्रसंग घडला आणि मला त्याचं उत्तर मिळालं. आज अनाथ मुलं निराधार महिला, वनस्पती, वन्य प्राणी, भटके प्राणी अगदी सर्वासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. पण जेष्ठांसाठी काम करणाऱ्या संस्था फारशा नाहीत. वयपरत्वे जेष्ठ मंडळी विकलांग होतात, परावलंबी होतात, ते आपल्या मागण्यांसाठी लढू शकत नाहीत. तर आमच्यासारख्या तरुणांनी हे काम करायला नको का? मी या कामाला सुरुवात केली आणि लोक  अनेक मागण्या करू लागले. कोणाला आईसाठी रुग्णसेवा हवी होती तर कोणाला वडिलांसाठी केअर टेकर! अनंत प्रश्न! अनेक गरजा! मग लक्षात आलं लोकांना ही माहिती देणारी यंत्रणाच उपलब्ध नाही.
१० एप्रिल २००८ ला मी ज्येष्ठांसाठी वेबसाइट सुरू केली. ज्येष्ठांसाठी असणारे कायदे, सरकारी सवलती व योजना, पोलिसांची मदत, केअर टेकर व आया पुरवणाऱ्या संस्था, वृद्धाश्रम अशी सगळी माहिती त्या वेबसाइटवर दिली. त्या वेबसाइटच्या उद््घाटनाचा साधासा कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदनात ठेवला. अपेक्षा होती, जेमतेम पंधरा-वीस माणसं येतील. तेवढय़ाच लोकांच्या चहापाण्याची व्यवस्था केली आणि बघता बघता ३५० जेष्ठ मंडळी तिथे जमा झाली. एक गोष्ट मला प्रकर्षांनं जाणवली की समाजाला त्या कामाची नितांत गरज आहे आणि त्यासाठी एन.जी.ओ. स्थापन करणं गरजेचं आहे. पण एन.जी.ओ. काढायला ना माझ्याकडे पैसे होते ना सक्षम टीम! त्याच वेळी माझ्या हेसुद्धा लक्षात आलं की जेष्ठ नागरिकांचा मोठा वर्ग सोशल मीडियाचा वापर करतायत. तेव्हा त्याच माध्यमाचा वापर करून ज्येष्ठांच्या प्रश्नाला व्यापक स्वरूप द्यायचं मी ठरवलं. सोशल मीडिया अर्थात फेसबुक, ट्वीटर, ब्लॉग, वेबसाइट यांचा प्रभावी वापर करून जास्तीत जास्त ज्येष्ठांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि याच माध्यमातून देशभरातील ज्येष्ठांच्या कार्याची माहितीही मिळत गेली.’’
‘सिल्व्हर इनिंग्ज’ला सोशल साइटस्च्या माध्यमातून फक्त ज्येष्ठांपर्यंत पोहोचायचं नव्हतं तर तरुण पिढीलाही ज्येष्ठांच्या कार्यासाठी प्रवृत्त करायचं होतं. अनेक युवक जेष्ठांसाठी काम करायला उत्सुक असतात, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अशा युवा पिढीला गाठण्यासाठी ‘सिल्व्हर इनिंग्ज’चे कार्यकर्ते शाळा कॉलेजेसमध्ये फिरतात. निर्मला निकेतन, टीआयएसएससारख्या ठिकाणी बझार डे, कॉलेज डेला स्टॉल्स लावून तरुणांना या कार्याला वळवतात. ज्येष्ठांच्या समस्यांची त्यांना जाणीव करून देतात. शेवटी आजचा तरुण उद्याचा भावी ज्येष्ठ नागरिक आहे या जाणिवेतून युवा वर्गही संघटित होतो! अशा संघटित युवकांसाठी प्रशिक्षण शिबिरं घेतली जातात. ज्यामधून अतिवृद्ध, व्याधीग्रस्त, स्मृतिभ्रंशातल्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी याचं रीतसर प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण केवळ युवकच नव्हे तर नर्सेस, ब्युरोजमधील केअर टेकर्स, सोशल वर्कर्स अगदी निवृत्त नन्सनाही देण्यात येतं.
वस्तुत: ज्येष्ठ म्हणजे ज्ञान आणि अनुभवाचं भांडार! पण प्रत्येकजण मुलाबाळांना वाढवत वृद्धत्वाच्या अवस्थेला येतो आणि अडगळीत पडतो, अशा ज्येष्ठांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ‘सिल्व्हर इनिंग्ज’ त्याच्यासारख्या ‘उमंग टॅलंट शो’चं आयोजन करते. या शोमधून गायन, वादन, नर्तन, अभिनय अशा कोणत्याही कलेत ज्येष्ठ आपलं नैपुण्य दाखवू शकतात. आजवर संसार आणि करिअरच्या व्यापात स्वत:च्या छंदासाठी वेळ काढता न आलेल्या जेष्ठांमध्ये हा शो लोकप्रिय झाला आहे.
खेळ हा असाच एक लोकप्रिय प्रकार जो लहानथोर सर्वानाच आवडतो. खेळाच्या माध्यमातून ज्येष्ठांविषयी भावनिक जाणीव निर्माण व्हावी यासाठी ‘सिल्व्हर इनिंग्ज’ने एक अभिनय कल्पना मांडली. ‘मुंबई डिव्हिजीनल फुटबॉल असोसिएशनतर्फे ‘सिल्व्हर इनिंग’ची तरुण मुलांची टीम खेळते. मॅचेस खेळताना त्या टीममधील खेळाडू जो टी-शर्ट घालतात त्यावर ‘र३स्र्ी’ीि१ ुं४२ी’ असं छापलेलं असतं. मॅच सुरू होण्यापूर्वी मैदानावर हे खेळाडू अशी शपथ घेतात की, ‘‘आम्ही ज्येष्ठांची काळजी घ्यायला कटिबद्ध आहोत. आम्ही ज्येष्ठांवर अत्याचार करणार नाही! आणि ज्येष्ठांवर अत्याचार होऊ देणार नाही.’’ ही तरुण मुलं आणि ज्येष्ठ यांच्यामध्ये ‘१६ विरुद्ध ६०’ अशा वीस षटकांच्या क्रिकेट मॅचेस रंगल्या. त्यात ई ग्रुपमधल्या सर्व मॅचेस ज्येष्ठांच्या संघाने जिंकल्या हे विशेष! क्रीडा-कला या माध्यमांचा प्रभावी वापर करून युवा वर्गाला ज्येष्ठांच्या अधिकाधिक संपर्कात आणणं हे सिल्व्हर इनिंग्जचं खरं उद्दिष्ट. त्यासाठीची एक नवीन संकल्पना ‘कॉफी वीथ कहानी!’ ज्येष्ठांना दिलेल्या टॉपिकवर त्यांनी एक कथा सांगायची आणि त्यावर तरुणांनी अभिनय करायचा. या स्पर्धेतून ३ जोडय़ा निवडून त्यांना पुरस्कार देण्यात येतो. या स्पर्धेत पुरस्कार मिळवण्यापेक्षा या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी महिनाभर युवा पिढी ज्येष्ठांच्या सहवासात रमते. त्यांच्यात स्नेहाचा, संवादाचा पूल उभारला जातो. कार्यक्रमाच्या निमित्ताने युवक ,ज्येष्ठ आणि मधली पिढी हे प्रेक्षक म्हणून येतात. सर्वामध्ये जवळीक आपलेपणा निर्माण होतो हे महत्त्वाचं.
‘सिल्व्हर इनिंग्ज’ची आणखी एक अभिनव संकल्पना! हल्ली मुलं परगावी, परदेशी असल्याने बरेचदा घरात वृद्ध जोडपे राहात असते. जोडीदाराच्या मृत्यूनंतर दुसरी व्यक्ती एकटी पडते. त्यांना बोलायला, कॉफी शॉपमध्ये, मॉल्समध्ये अथवा नाटक सिनेमाला जायला कंपनी हवी असते त्यांच्यासाठी एक दिवसाच्या ‘जीवनसाथी’ मेळावा आयोजित करण्यात येतो. त्याशिवाय कायस्वरूपी ब्युरोचीही सुरुवात केलेली आहे. दुर्दैवाने या ब्युरोत आजवर ३० पुरुषांनी नोंदणी केलीय. पण स्त्रियांचा प्रतिसाद मात्र अत्यल्प आहे.
ज्येष्ठांसाठी ‘सिल्व्हर इनिंग्ज’द्वारे ज्या सेवा पुरवल्या जातात त्यातली प्रमुख सेवा म्हणजे ‘१२९८’ ही हेल्पलाइन! हेल्पएज इंडिया, फेसकॉम यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या या हेल्पलाइनद्वारे ज्येष्ठांना गरजेप्रमाणे त्यांच्या जवळची रुग्णालये, अ‍ॅम्बुलन्स सेवा, नर्सिग, आया, कायदेशीर मदत वगैरेची माहिती देण्यात येते. काही वेळा एकटे असणारे वृद्ध निव्वळ बोलण्यासाठीसुद्धा त्यावर फोन करतात. मनमोकळा संवाद साधतात.
‘डिमेंशिआ मॅनेजमेंट सíव्हस’ ही अशीच एक उपयुक्त सेवा! संस्थेचे कार्यकर्ते डिमोंशिआ वा स्मृतिभ्रंश असणाऱ्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना त्या व्याधीची माहिती देऊन अशा रुग्णांना हाताळण्याचं प्रशिक्षण देतात. त्यांच्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ, डॉक्टर, समुपदेशक यांचा सल्ला शिबीर आयोजित केलं जातं. तसंच आठवडय़ातून एकदा त्यांच्या घरी जाऊन त्या रुग्णाकडून त्यांच्या मेंदूला चालना देणारे खेळ व व्यायाम करून घेतले जातात. गरीब व गरजू रुग्णांना ही सेवा विनामूल्य पुरवण्यात येते. परदेशात असा रुग्ण हरवला तर तिथली ‘सिल्व्हर अ‍ॅलर्ट सिस्टीम’ तात्काळ कार्यशील होते. ज्येष्ठांचे घडय़ाळ, बुट, लॉकेट यामध्ये सेट केलेल्या ‘जीपीआरएस’ सिस्टीमद्वारे त्यांना पटकन शोधता येते. आपल्याकडे ही सोय नाही. म्हणून ‘सिल्व्हर इनिंग्ज’ने ब्लॉग, फेसबुक या तंत्रज्ञानाचा वापर करून ‘मिसिंग- सीनिअर सिटीझन अलर्ट’ सेवा सुरू केली आहे. हरवलेल्या व्यक्तीची पोलिसांत तक्रार दाखल केली की त्याची कॉफी, फॉर्म व फोटो संस्थेला द्यायचा ही माहिती फेसबुकवर शेअर केली जाते. आजवर अनेक हरवलेल्या जेष्ठांचा या आधारे शोध घेण्यात आला आहे.
‘ए-वन स्नेहांजली’ हा प्रकल्प हे संस्थेचं आणखी एक विशेष कार्य! डिमेंशिआ, पार्कीसन, अतिवृद्ध ज्यांची मुलं परदेशी आहेत असे एकाकी वृद्ध अशांसाठी एक बंगला भाडय़ाने घेण्यात आला आहे. शैलेश मिश्रा म्हणतात, ‘‘आम्हाला बेड, भाजी, भजन देणारी संस्था उभी करण्यात रस नाही. आम्हाला अल्प मोबदल्यात सक्षम व सुखी वृद्धत्व देण्यात अधिक रस आहे.’’
‘सिल्व्हर इनिंग्ज’च्या कार्याची दखल घेत युनोतील ज्येष्ठांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या समित्यांमध्ये या संस्थेची नोंद झाली आहे. त्या समितीच्या सभेमध्ये भारतातील ज्येष्ठांसाठी किती काम चालतं हे रंगवून सांगणाऱ्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या समोरच शैलेश मिश्रांनी प्रत्यक्षात या कार्यात किती त्रुटी आहेत ते विशद करून वस्तुस्थिती समितीच्या निदर्शनास आणून दिली.
‘आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या संस्थात्मक कार्यक्रम मालिकेचा ज्येष्ठ नागरिकांवरील ११ वा भाग पूर्णत: ‘सिल्व्हर इनिंग्ज’ने तयार केला होता व ज्येष्ठांसाठी निर्मिलेला ‘बचपन आफ्टर पचपन’ शो घराघरांत लोकप्रिय झाला. रायफल शूटिंग, रॅपिलग असे साहसी खेळ करणाऱ्या ज्येष्ठांवरील आकर्षक स्टोरीज व ज्येष्ठांच्या समस्यांची सकारात्मक बाजू मांडणारा हा शो भारतातील अनेक भाषांत भाषांतरीत झाला आहे.
ज्येष्ठांसाठी विविध कल्पना राबविणाऱ्या ‘सिल्व्हर इनिंग्ज’चे प्रणेते शैलेश मिश्रा यांना ‘सन ऑफ मिलियन पेरेंटस्’ या शब्दांत गौरवण्यात आलं आहे. ते म्हणतात, ‘‘वृद्धत्व हा शाप नसून तो अनुभव व कर्तृत्व यांचा अभिशाप आहे. त्यांना यथायोग्य मान मिळायलाच हवा.’’
संपर्क – सिल्व्हर इनिंग्ज, अरेना ्र्र,
प्लॅट नं. ८०१ / ८०२, पुनम गार्डन,
एस. के. स्टोन जवळ, मीरा रोड, मुंबई ७.
ई-मेल- sailesh@silverinnings.com
silverinnings@gmail.com
भ्रमणध्वनी-९९८७१०४२३३, ९८१९८१९१४५

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: While preserving youthness in old age