विवाह ही घटना आपल्या समाजात केंद्रस्थानी आहे आणि जवळपास अपरिहार्यही. लग्न करायचं असतं कारण बहुतांशी माणसं ते करतात म्हणून, पण जेव्हा मला ते नेमकं का करायचं आहे, हा प्रश्न येतो तेव्हा यातील ‘मला’ महत्त्वाचा ठरतो. आणि ‘का?’ सुद्धा. साहजिकच याचं उत्तर ज्याच्या-त्याच्या जवळ असायला हवं, नाही का?
विवाह हा कुटुंबाचा आरंभबिंदू. विवाह झालेले स्त्री पुरुष एकमेकांचे मैत्रीण-मित्र, सखी-सखा, प्रेयसी-प्रियकर, याऐवजी ‘बायको-नवरा’ या भूमिकेत शिरताना दिसतात. या ‘भूमिकां’ची कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या कुटुंबसंस्थेनं मुक्रर केलेल्या आहेत. मग विवाहसंस्थेत नेमकं काय अंतर्भूत आहे? पूर्वीच्या काळी या वैवाहिक जीवनाचं चित्र वेगळं होतं.
नवविवाहित दाम्पत्य, त्यातील नववधू लग्न झाल्यावर नवऱ्याच्या एकत्र कुटुंबात प्रवेश करत असे. या एकत्र कुटुंबातच त्या दोघांचा ‘संसार’ सुरू होत असे. त्यांचं वैवाहिक जीवन त्यांच्या झोपण्याच्या खोलीपुरतं मर्यादित असे. एकत्र कुटुंबाचा कुटुंबप्रमुख कुटुंबातल्या सर्वांचं ‘पालकत्व’ करत असे. त्या-त्या कुटुंबाच्या रूढी-परंपरांचं पालन, सण-समारंभांचं आयोजन, कुटुंबाचं अर्थार्जन शेती असेल, तर त्या उत्पन्नाची उस्तवार आदी. स्त्रियांचा वावर हा स्वयंपाकघर आणि बाळंतिणीची खोली एवढ्यापुरताच मर्यादित असे.
एखाद्या घरात थोडं मोकळं वारं वाहात असेल, नवरा हौशी (आणि थोडासा ‘रोमँटिक’ही असेल) तर नवरा-बायकोनं जोडीनं थोडं फिरून येणं, शेतावर चक्कर मारणं, अगदीच क्वचित त्या काळातील नाटक-चित्रपटाचा आस्वाद घेणं म्हणजे ‘सहजीवना’ची परिसीमा! ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला एक प्रसंग अजूनही स्मरणात आहे. त्यांनी लिहिलं होतं, ‘एका तिन्हीसांजेला संत दारात टांगा घेऊन आले. मला टांग्यात बसायला सांगितले. ‘‘अहो, कुठे चाललो आहोत आपण?’’ या प्रश्नावर ते काहीच उत्तरले नाहीत.
टांगा थोडासा गावाबाहेर येऊन थांबला. आम्ही दोघेही उतरलो. एव्हाना अंधार झाला होता. थोडंसंच अंतर चालून गेल्यावर त्यांनी समोर बोट दाखवलं. बघते तर काजव्यांचा लखलखाट…!’ कसं असेल ना ते दृश्य? आजही काजवे दिसले की, मला हाच प्रसंग आठवतो. अंगावर रोमांच उभं राहतं. परंतु असं अपवादात्मक सुंदर सहजीवन सोडलं तर बहुतेक सर्वांचा लग्न करण्याचा उद्देश एकच असे. एकत्र कुटुंबातल्या स्वयंपाकघराचा, संसाराचा एक भाग बनून जाणं आणि मुलं जन्माला घालणं.
औद्याोगिकीकरणानंतर चित्र बदलत गेलं. पुढील शिक्षणासाठी आणि नोकरी-व्यवसायासाठी शहरांकडे सुरू झालेलं स्थलांतर आजही चालू आहे. यात पिढ्या बदलल्या, मात्र लग्नाच्या केंद्रस्थानी कुटुंबसंस्था आणि त्यातल्या माणसांचे आचार-विचार-मूल्य-परंपरा आणि पद्धती यांचा प्रभाव अजूनही दिसतो आहे. त्यामुळे लग्न करण्याचं उद्दिष्ट अजूनही मूलत: संसार आणि मुलं हेच बहुतेकांच्या मनात असतं. उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढलं. अनेकांनी परदेशगमन केलं. पण विचारांची क्षितिजं विस्तारली का किंवा शास्त्राच्या प्रगतीबरोबर जगण्यात शास्त्रीय दृष्टिकोन विकसित झाला का? मात्र, हळूहळू प्रत्येक पुढच्या पिढ्यांमधील मुलामुलींचे, विशेषत: आजच्या ‘जेन झी’ आणि ‘अल्फा’ या पिढीतील मुलामुलींचे, स्वत:च्या स्वातंत्र्याबद्दलचे विचार वेगाने बदलत गेले.
खरं तर आत्ता साठी-सत्तरीत असलेल्या पालकांच्या पिढीपासूनच कुटुंबसंस्थेचा केंद्रबिंदू कुटुंब आणि नातेसंबंध याकडून हळूहळू ‘स्व’कडे सरकू लागलेला होता. शहरातील माणसं चाळी, वाडे या सामायिक जगण्याकडून (community living) एकत्र कुटुंबातून ‘फ्लॅट’मधील विभक्त कुटुंबांत विखरत गेली. या पिढीतील बहुतेकांनी चांगली कमाई केली आणि साध्या, काटकसरीच्या राहणीतून चांगली बचतही केली. आपल्याला पडलेले कष्ट मुलांना होऊ नयेत म्हणून ‘तुम्ही फक्त तुमच्या शिक्षणाचं बघा’ यावर भर दिला गेला.
छोट्या कुटुंबाचं मोठ्या घरात स्थलांतर, त्यात प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र खोली – असा तो ‘स्व’ स्वातंत्र्याकडे जाणारा प्रवास. तडजोड करण्याची सवय हळूहळू कमी करत नेणारा. १९९० नंतर झालेल्या खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकारण यामुळे आपल्या जगण्याचे आयामच बदलले. कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात अनेक स्थित्यंतरं वेगाने होत गेली आणि आजही होत आहेत.
अर्थार्जनाच्या केंद्रस्थानी आलेल्या आय.टी. क्षेत्राचं उदाहरण द्यायचं, तर खेड्यांपासून शहरांपर्यंत तरुणांचा एक मोठा वर्ग येथील नोकऱ्यांमध्ये स्वत:चा जम बसवता झाला. त्यांनी आपली जीवनशैली बघता बघता उंचावत नेली. एक मोठा आर्थिकदृष्ट्या निम्नस्तर मध्यमस्तराकडे आणि मध्यमस्तर उच्च-मध्यमस्तराकडे झेपावला.
तरुण पिढीचं आपापली गावं सोडून शहराकडे आकर्षित होण्याचं, स्थलांतराचं प्रमाण अधिक वाढलं आणि तिथेच स्थिरावलं. याचं प्रतिबिंब कुटुंबाचं वैचारिक, सांस्कृतिक स्तर उंचावण्यात उमटलं का? नसावं. याची काही उदाहरणं इथे देता येतील. करोनाकाळात पुण्यात नोकऱ्या करणारी मुलं-मुली आपापल्या गावी गेली होती. लग्न झालेल्या मुली आपल्या सासरच्या गावी गेल्या होत्या. काही सासूंना वाटायचं, ‘इथे बसून काय तिथल्या ऑफिसची कामं करता येतात का? इथली कामं करा’, असं म्हणत घरातील स्वयंपाक, धुणी, भांडी, स्वच्छता… सगळी कामं सुनांना त्यांचं ‘वर्क फ्रॉम होम’ सांभाळून करावी लागत होती. काही घरी तर, ‘शनिवारी-रविवारी काही काम नसतं ना तुला? मग चल माझ्याबरोबर शेतावर’, असं म्हणत सुनांना शेतावरही काम करायला लावलं होतं!
नवरा बायकोच्या मागे उभा राहिला नाही. ‘आईला सांगून काही उपयोग नाही. ती माझं ऐकणार नाही. तू अॅडजस्ट कर’, ही त्याची भूमिका. यावर शहरी वाचकांचा विश्वासही बसणार नाही. आता लक्षात येईल की, लग्न कुणाशी करावं यावर काही विचार केला असेल वा नसेलही; पण ‘ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शेतकरी कुटुंबातल्या मुलाशी लग्न करणार नाही’, हे ठामपणे सांगणाऱ्या मुलींची संख्या का वाढत चालली आहे त्यामागे कदाचित हे कारण असू शकेल. बदललेल्या काळाने निर्माण केलेली ही ज्वलंत समस्या म्हणजे कुटुंबसंस्थेनं जे इतकी वर्षं पेरलं ते उगवलं असं म्हणायला हवं.
आपण एरवी म्हणतो की, ग्रामीण भागातील मुलामुलींना संधी मिळत नाही. ही एक बाजू झाली; पण नोकऱ्यांनिमित्त शहरात वास्तव्यास आलेल्या असंख्य मुलामुलींशी बोलताना हे जाणवतं की, त्यांची आर्थिक जीवनशैली उंचावली असली तर विचारांची खोली वाढलेली नाही. एक मोठा तरुण वर्ग, बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंड, अफेअर्स, हॉटेलिंग, सोशल ड्रिंकिंग, रील्स, पार्लर्स, मॉल्समध्ये फिरणं, ऑनलाइन खरेदी… असं एकूणच छानछोकीचं, वरवरचं आयुष्य जगण्यात मश्गूल दिसतो.
काही महत्वाचं वाचणारे, त्यावर प्रगल्भ चर्चा करणारे, स्वत:ला सर्जनात्मक, रचनात्मक उपक्रमात गुंतवून घेणारे कमीच दिसतात. मग त्यांच्या विचारांची बैठक तयार होणार तरी कशी? जे स्वत:ला जाणीवपूर्वक घडवत असतात ते कुठेही राहिले तरी नवनवे प्रयोग करून, भरीव काम करून दाखवतात. त्यांची संख्या तुलनेने फार कमी. मग विवाहसंस्था, कुटुंबसंस्था विचारांनी पुढे जातील कशा? आता तर लग्न करण्याचा उद्देश प्रचंड पैसे खर्च करून खूप थाटामाटात लग्न करणं आणि त्यात मिरवण्याची हौस पुरी करणं हा आहे की काय असं वाटावं असं सार्वत्रिक चित्र आहे. विचारपूर्वक केलेली साधी लग्नं अगदी अपवादात्मक!
एकूण काय तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर वेगाने बदलणाऱ्या जगात आपल्या जगण्याचा, संसार करण्याच्या पद्धतींचा, पोत पूर्ण बदलला हे कुणीही अमान्य करणार नाही. घरकाम सोपं करणाऱ्या अनेक सोयीसुविधा निर्माण झाल्या. आपण दोन मुलांवरून एक मूल किंवा मूलच नको किंवा लग्न तरी हवे का? इथपर्यंतचा प्रवास केला. मग संसार आणि मुलं यात फार अडकायचं नाहीये तर मग लग्न करण्याचं (किंवा न करण्याचं) उद्दिष्ट नेमकं काय, याबद्दलचा कोणता शास्त्रीय विचार आपल्याला करावासा वाटतो आहे का?
विवाहसंस्थेत लग्न का करायचं या उद्दिष्टाची जाणीव अंतर्भूत असणं जरुरीचं नाही का? विवाह करणं गरजेचं असणं हा एक विचार आहे; पण मला तो नेमका का करायचा आहे, हा एक स्वतंत्र, वेगळा विचार आहे. ‘तुम्ही लग्न का केलं?’, किंवा ‘लग्न करताना काय उद्दिष्ट मनात होतं?’, या प्रश्नावर फार कमी जणांना विचार केलेलं मुद्देसूद उत्तर देता येतं. ही प्रथा-परंपरा आहे, सगळेच करतात, पालक,कुटुंब-समाज यांचा आग्रह असतो, इथपासून संसार करताना सुखदु:खात कुणाची तरी सोबत हवी, इतकी ढोबळ उत्तरं देण्यापर्यंत मर्यादित विविधता असते.
विवाह ही जर एका वैवाहिक जीवनाच्या दीर्घ प्रवासाची सुरुवात असेल आणि त्याआधी विवाह ठरण्याचा प्रवास मैत्री, सख्य, प्रेम आणि मग विवाह असा असेल, तर तो एकमेकांना एकमेकांचे अनुरूप ‘साथीदार’ बनण्याचा आत्मविश्वास देणारा नसेल का? लग्न ठरण्याआधीचा हा प्रवास एकमेकांना जाणून, समजून घ्यायला मदत करेल. आपण एकमेकांच्या सुयोग्य अपेक्षा पूर्ण करू शकणार का, हे तपासायला मदत करेल. एकमेकांच्या सहवासात आल्यावर आपण एक समाधानी सहजीवन उभं करू शकणार का? याची पडताळणी करेल. पण त्यासाठी मुळात सहजीवन म्हणजे नेमकं काय हे समजूनही घ्यायला हवं. आणि हेच तर लग्नं करण्याचं मुख्य उद्दिष्ट हवं! संसार आणि मुलं हा त्या सहजीवनाचाच एक भाग आहे, फक्त उद्दिष्ट नव्हे.
मुळात, विवाह ही मानवनिर्मित संकल्पना आहे. विवाहसंस्था ही या संकल्पनेची चौकट. विवाहसंस्था ही प्रजोत्पादनासाठी कौटुंबिक, सामाजिक मान्यता मिळालेली कायदेशीर व्यवस्था आहे. या प्रजोत्पादनातून कुटुंबाची निर्मिती होते. कुटुंबसंस्था ही कुटुंब या संकल्पनेची चौकट. मानव सोडून दुसऱ्या कुठल्याही जाती, प्रजातीत लग्नं नाहीत. त्यामुळे अशा काही संस्थाही नाहीत. त्या सर्व जाती, प्रजाती निसर्गनियमाने चालतात. आपण निर्माण केलेलं लग्नही निसर्गाच्या दृष्टीने प्रजोत्पादनासाठी नर-मादीचं एकत्र येणं/मीलन आहे. आपल्या शरीर,मन आणि मेंदूची रचना एकमेकांमध्ये विचार आणिभावनांची देवाणघेवाण होत राहण्यासाठी पूरक आहे.
अशा नियमित पती-पत्नी संवादांमधून दोघांमध्ये भावनिक आणि वैचारिक बंध निर्माण होऊन त्याची परिणती लैंगिक सहजीवन तृप्तीचं होत जाण्यात होते. आनंदाचा उच्चतम बिंदू गाठणाऱ्या (orgasam) उत्कट प्रणयात, क्रियाकलापात, मेंदूतून अनेक प्रकारची उपयुक्त संप्रेरकं स्रावत असतात. त्यातील ‘ऑक्सिटोसिन’ दोघांमधले बंध, पर्यायाने त्यांच्यामधील नातं दृढ करत असते. हीच वैवाहिक जीवनातील – साथसंगत, सोबत. अर्थपूर्ण सहवास. एकमेकांचं प्रियकर-प्रेयसी बनत केलेला वैवाहिक जीवनाचा उभयतांना समृद्ध करणारा, नात्यात नित्य नावीन्य शोधणारा सहप्रवास. दोघांनाही भावनिक-वैचारिकदृष्ट्या संपन्न करणारा.
मुळात लग्नाचं हे उद्दिष्ट असेल तरच वैवाहिक जीवनात एकमेकांसोबत घालवायचा वेळ हा रोजच्या जगण्यातला प्राधान्यक्रम असणार. मगच त्यासाठी जाणीवपूर्वक वेळ काढला जाणार. अशा भावनिक-वैचारिक संवाद करण्याच्या क्षमता आणि अनुरूपता आपल्या दोघांमध्ये आहेत का, हा जोडीदार निवडीचा एक महत्त्वाचा निकष असणार.
साहचर्याचा हा विचार, प्रत्यक्षात त्यासाठी प्राधान्य देण्याची इच्छा, जर लग्न करतानाच नसेल तर मेंदूला भावनिक सुरक्षितता व स्थैर्य देणाऱ्या प्रेमबंधांची भावना (sense of bonding) आणि आपुलकीची भावना ( sense of belonging) निर्माण होणार कशी? त्या नात्यात सुरक्षित, स्थिर वाटणार कसं? नात्यातील नावीन्य, वैविध्य टिकून राहणार कसं? या सगळ्या गोष्टी वैवाहिक नात्यावर खोलवर परिणाम करत असतात. त्यामुळे लग्नाचं उद्दिष्ट, विवाह संस्थेतील विवाहितांचा वैवाहिक जीवनाचा प्रवास समृद्ध, संपन्न होत जाणं हा आहे.
विवाहसंस्था सशक्तपणे टिकून राहण्यासाठी या महत्त्वाच्या निकषाची जाणीव विवाह करणाऱ्यांना, त्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांनाच हवी.
●vankulk57 @yahoo.co.in
