‘अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती हैं।’ असा एक लोकप्रिय ‘फिल्मी’ संवाद आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात मात्र एखाद्या गोष्टीचं स्वप्न पाहण्यापासून त्याच्या पूर्तीपर्यंत प्रत्येक पायरीवर कोणत्या तरी परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागतं. आपल्या ध्येयाची जाणीवपूर्वक निवड करणं, त्याला वाहून घेणं आणि अचानक उपटलेलं एकेक आव्हान मनोधैर्य खच्ची करत असतानाही टिकून राहणं… शिवाय या प्रवासात इतरांनाही काही देण्याचा प्रयत्न करणं, हे कधी जमेल?… जर ‘सजग’ राहून जगण्याची सवय लावून घेतली तर!

सजगतेनं जगण्याचा विचार करताना बऱ्याच जणांचा एक मोठा गैरसमज असतो, तो म्हणजे अशा प्रकारचं जीवन हे सुरुवातीपासून ‘आखीवरेखीव’च असायला हवं. आणि मग अशा आखीवरेखीव, चौकटीबद्ध आयुष्याला सुरुवात करायला आपण अजून तयारच नाहीयोत, अशा सबबीखाली त्यासाठी प्रयत्न करणं टाळलं जातं. वास्तविक ‘सजगतेनं जगणं’ हा एक प्रवास, एक प्रक्रिया आहे. त्यात आखीवरेखीवपणा यायला वेळ जावा लागतो. जागरूकतेनं जगण्यासाठी संपूर्ण आयुष्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आधीच स्पष्ट दिसायला हवं अशी काही गरज नसते. रोजच्या सवयीच्या सरधोपट आयुष्याचे गुलाम होण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या निवडीच्या स्वातंत्र्याचा वापर करत एकेक पाऊल विचारपूर्वक टाकणं म्हणजे सजगतेनं जगणं. हा प्रवास करताना निष्ठा हवी, धाडस हवं. बुद्धीचं आणि मनाचं कुतूहल जागं हवं. अर्थातच प्रसंगी जोखीम पत्करणं, चुका करणं आणि त्या चुकांमधून शिकणं हाही महत्त्वाचा भाग आहेच. आपण आपलं आयुष्य कशा पद्धतीनं जगतोय, याबाबत दक्ष असणं आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक योग्य निर्णय घेणं, हा सजग जीवनाचा अत्यंत आवश्यक पैलू आहे.

हेही वाचा – ‘ती’च्या निर्णायकतेचे कवडसे

मी जेव्हा वाढत्या वयात होतो, तेव्हा स्वत:च्या आवडीनिवडींबद्दल मी स्वत:लाच प्रश्न विचारत असे. मग अभियांत्रिकी किंवा वैद्याकशास्त्र यांपैकी एकाची करिअरच्या दृष्टीनं निवड असो किंवा तंदुरुस्तीसाठी नवीन जिमची निवड असो! विशेष म्हणजे माझ्या जवळच्या लोकांनीसुद्धा माझ्या निवडीबद्दल नेहमीच उत्सुकता दाखवली. यामुळे आपल्याला नेमकं काय करायचंय किंवा काय हवंय हे ठरवता येतं. पण जसजसं वय वाढत गेलं, तशी एक गोष्ट मात्र मला निश्चित कळली, की आपल्या आयुष्याची दिशा केवळ या निवडींवरूनच ठरते असं काही नसतं. ‘झिम्मा’ या चित्रपटात एक दृश्य आहे- क्षिती जोग यांनी साकारलेली मीता ही स्त्री स्वत:च्या फळबागेच्या आवडीबद्दल आणि त्या विषयात काही करण्याच्या योजनेबद्दल भरभरून बोलते. पण शेवटी हेही कबूल करते, की ती योजना फक्त कागदावरच राहिलीय! एका जाणकार व्यक्तीनं मला ‘एखाद्या विषयाची आवड असणं’ आणि त्याला ‘वाहून घेणं’ या दोन्हीतला फरक फार छान समजावून सांगितला होता. त्यांचे शब्द माझ्या लक्षात राहिलेत- ‘जेव्हा तुम्हाला एखाद्या विषयाची आवड असते, तेव्हा त्यासाठी जेवढं तुमच्या सोयीचं, तेवढंच तुम्ही करता. मात्र जेव्हा तुम्ही त्याला वाहून घेता, तेव्हा त्यासाठी जे जे आवश्यक ते ते सर्व करता!’

पुण्यात राहणारी अनन्या अगदी तरुण. लहानपणापासून तिला मानवी शरीरातल्या प्रक्रियांचं भारी आकर्षण होतं. शरीराच्या कार्यपद्धतीतले बारकावे समजून घेत, शरीररचना आणि त्यातल्या महत्त्वाच्या इंद्रियसंस्थांविषयीची पुस्तकं वाचण्यात ती तासंतास रमून जायची. तिच्या मित्रमैत्रिणींनी करिअरच्या बाबतीतही तिनं या विषयातल्या तिच्या आजवरच्या ज्ञानाला आव्हान देणाऱ्या मार्गावर चालायचं ठरवलं.

अनन्या सर्वसामान्य घरात जन्मलेली असल्यानं कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तरी तिच्या पालकांनी तिला शिक्षणाचं आणि कष्टांचं महत्त्व पटवून दिलं होतं. आपली स्वप्नं सत्यात उतरवण्याची उमेद दिली होती. तिची शैक्षणिक प्रगती अतिशय चमकदार होती. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाबद्दल तिला अधिक कुतूहल होतं. नेहमीच ती वर्गात पहिली यायची, पण तरी तिला हे पक्कं माहित होतं, की वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणं हे एक मोठं आव्हान आहे. शैक्षणिकदृष्ट्याही आणि आर्थिकदृष्ट्याही! तिची आर्थिक स्थिती पाहून अनेकजण तिला दुसरा कुठला तरी पर्याय निवडायचा सल्ला द्यायचे, पण ती डगमगली नाही. तिनं कनिष्ठ महाविद्यालयात असतानाच मुलांच्या शिकवण्या घ्यायला सुरूवात केली, एका कॅफेमध्ये नोकरी करण्याचाही पर्याय स्वीकारला. पैसे साठवत राहिली. दिवसभराची कामं आटोपल्यावर रात्री ती बराच वेळ जागी असायची. डोळे दिवसभराच्या कष्टांनी जड झालेले असायचे, पण मनातला दृढनिश्चय सतत जागा असे!

तिनं वेगवेगळ्या ठिकाणी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. असंख्य नकार आले. प्रत्येक नकार तिच्या स्वप्नांना सुरुंग लावत होता! पण म्हणून हताश होण्यापेक्षा धैर्यानं प्रयत्न करत राहायचं तिनं ठरवलं. तिच्या शिक्षकांनी तिला शिष्यवृत्तीच्या आणखी संधींबद्दल मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे तिनं पुन्हा अर्ज केले. या सगळ्यात पुढे काय होईल याची तिला भीती वाटायची, पण म्हणून तिनं प्रयत्न सोडले नाहीत.

एके दिवशी मात्र नकाराच्या खंडीभर पत्रांबरोबर शिष्यवृत्ती मंजूर झाल्याचं एक पत्र आलं! एका नामांकित वैद्याकीय महाविद्यालयाकडून तिला संपूर्ण शिष्यवृत्ती मंजूर झाली होती. पत्र मिळताक्षणी तिच्या मनात आनंदाची आणि त्याचबरोबर भीतीचीही एक लाट येऊन गेली! अथक परिश्रमांनंतर आलेला हा क्षण साजरा केला पाहिजे, पण पुढचा प्रवास आणखी कठीण असणार हे तिला माहित होतं. वैद्याकीय शिक्षणापुढे निभाव लागणं तिला वाटलं होतं त्यापेक्षा फारच कठीण गेलं. शिक्षणातली आणि त्याचबरोबर आर्थिक आव्हानं पेलताना कित्येकदा तिच्या दृढनिश्चयाची परीक्षा बघणारे प्रसंग आले. अभ्यासक्रम अतिशय क्लिष्ट. त्यामुळे दिवसाचा बराचसा वेळ त्यात खर्च व्हायचा. तिच्या वर्गातल्या अनेक मुलांची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानं त्यांना ती चिंता नव्हती. मात्र अनन्याला रोजचा खर्च भागवता यावा यासाठी शिक्षणाबरोबर अर्धवेळ नोकरी करावीच लागायची. पण एखाद्या स्पंजप्रमाणे स्वत:मध्ये सगळं ज्ञान सामावून घेत ती प्रत्येक प्रयोगात, प्रत्येक लेक्चरमध्ये आवडीनं सहभागी व्हायची.

असे अनेक क्षण आले, जेव्हा हा ताण तिला असह्य झाला. आठवडाभर परीक्षा आणि कामही, अशी अत्यंत त्रासदायक कसरत झाल्यानंतर एका रात्री तिला वाटलं, की पुरे आता! पण पुढच्याच क्षणी आपण हे सगळं का सुरू केलं होतं याची तिला आठवण झाली- मानवी शरीराला अधिक सखोलतेनं समजून घेण्यासाठी, गरजूंना मदत करण्यासाठी आणि काही तरी जगावेगळं करून दाखवण्यासाठी! थकवा आलेला असतानाही पुन्हा सगळा धीर एकवटत नव्या जोमानं तिनं अभ्यास सुरू ठेवला.

काही वर्षांनंतर अनन्या विशेष योग्यतेसह उत्तीर्ण झाली. पुढे नामांकित डॉक्टर झाली. तिचा प्रवास केवळ स्वप्नपूर्तीपुरता मर्यादित नव्हता. दुर्गम ठिकाणी नि:शुल्क वैद्याकीय शिबिरं आयोजित करण्यात ती पुढे असे. तरुण विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा धैर्यानं आणि कुतूहल जागं ठेवून करायला तिनं वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. तिनं आपली स्वप्नं पूर्ण केलीच, पण तिच्या आसपासच्या कित्येकांच्या जीवनावर ती नकळत सकारात्मक परिणाम करत राहिली. अनन्याच्या गोष्टीतून एखाद्या गोष्टीची केवळ आवड असणं आणि त्याला वाहून घेणं, यातला फरक स्पष्ट होतो. म्हणजेच सजगतेनं जगण्यात जीवनातल्या अनिश्चिततेला धैर्यानं आणि चिकाटीनं सामोरं जाण्याचा समावेश असतो. आपल्याला भीती वाटतेय हे माहीत असूनही तिचा निर्धारानं सामना करत पुढे जाणं हा तो धडा आहे. समोर आलेल्या पर्यायांची निवड जाणीवपूर्वक करणं आणि आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असणं यामुळे कुठलेही अडथळे पार करत आपलं उद्दिष्ट गाठता येतं.

हेही वाचा – हवा सन्मान, हवेत अधिकार!

धैर्य ही गोष्ट कोणत्या मंत्रानं साध्य होत नाही! धैर्य म्हणजे केवळ भीतीचा अभाव नव्हे, तर भीती वाटत असूनही पुढे पाऊल टाकणं म्हणजे धैर्य. एखाद्या गोष्टीची भीती वाटत असूनही त्या दिशेनं चालत राहणं. या प्रवासात गरज पडेल तेव्हा आवश्यक त्या क्षमता आपल्यामध्ये निर्माण होतीलच, आवश्यक ती मदत या ना त्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध होईलच, याची खात्री बाळगत आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करणं. या प्रक्रियेत धैर्य आपोआप निर्माण होतं. प्रतिकूलतेला, अनिश्चिततेला आणि आपलं मनोबल खच्ची करणाऱ्या कोणत्याही गोष्टीला भीक न घालता पुढे जात राहण्याची ही क्षमता आहे.
सजगतेनं जगण्याचा प्रयत्न करताना अनन्याप्रमाणेच आपल्या जीवनातल्या अपरिचित क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी आवश्यक धैर्य अंगी बाणवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करणारा भविष्यकाळ आकार घेईल. त्याचा तुमच्या सभोवतालच्या जगावरही सकारात्मक परिणाम होईल.
आधी म्हटल्याप्रमाणे ‘सजगतेने जगणं’ ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या निवडीचं मूल्यमापन करण्याची, अनुभवातून शिकण्याची, आपली सर्वार्थानं वाढ आणि विकास होत असताना त्याला अनुसरून पुढे मार्गक्रमण करण्याची प्रक्रिया. अशा दृष्टिकोनामुळे केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर इतरांच्याही जीवनात सकारात्मक आणि समाधानकारक बदल घडून येतात.

या सगळ्याचा सारांश काय, तर सजगतेनं जगणं म्हणजे आपली उत्सुकता वाढवणाऱ्या गोष्टींची निवड करणं. ध्येयाशी एकनिष्ठ राहणं आणि अज्ञाताला सामोरं जाण्याचं धैर्य बाळगणं. आव्हानं आणि अनिश्चितता असली तरी आपल्या जाणीवपूर्वक कृती आणि निर्णयांनी आपण आपलं नशीब घडवू शकतो! केवळ यशस्वीच नव्हे, तर अधिक अर्थपूर्ण आणि परिणामकारक जीवन घडवू शकतो!

sanket@sanketpai.com