तृप्ती राणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक स्तरावर जेव्हा एखादा पुरुष १ डॉलर मिळवतो, त्याच वेळी स्त्रीला मात्र केवळ ७७ सेंट्स मिळत असतात. ‘युनायटेड नेशन्स विमेन’ची ही माहिती आणखी एका महत्त्वाच्या विषयाला चालना देते, ती म्हणजे स्त्रियांची स्वत:ची आर्थिक सुबत्ता आणि त्यासाठी अत्यंत गरजेचं असलेलं नियोजन. ते केलं तरच कदाचित ही तफावत दूर होऊ शकेल. बदलत्या परिस्थितीत आर्थिक नियोजनाचे अनेक पर्याय समोर उभे असताना स्त्रियांनी कोणत्या दिशेनं विचार करावा हे सांगणारा हा लेख..

२८ ऑक्टोबरची बातमी-

‘स्त्री क्रिकेटपटूंना पुरुष क्रिकेटपटूंसारखी सामना मिळकत लागू’. बातमी वाचून खरंच बरं वाटलं, कारण अशी फार कमी कामाची ठिकाणं आहेत, जिथे स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता समान वागणूक आणि वेतन दिलं जातं आणि ही परिस्थिती आपल्याच देशात आहे असं नाही. जागतिक स्तरावर आणि प्रगत देशांमध्येसुद्धा स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या पगारांमध्ये फरक आहे आणि तोही थोडाथोडका नाही तर ३३ टक्के (स्रोत- ‘युनाइटेड नेशन्स विमेन’). त्यातही उच्च-व्यवस्थापनाच्या पदांवर स्त्रिया खूपच कमी आढळतात. यामागची कारणं आता माहीत झाली आहेत. कमी महत्त्वाकांक्षा, घरातल्यांच्या घर आणि मुलं सांभाळायच्या अपेक्षा, नोकरीच्या ठिकाणी पुरुषांना प्राधान्य, मातृत्व अवकाश, जोडीदाराच्या नोकरी आणि त्याच्या महत्त्वाकांक्षांना प्राधान्य, इत्यादी, इत्यादी, इत्यादी!         

    ही परिस्थिती आता हळूहळू का होईना, पण बदलत चालली आहे. आताच्या काळात स्त्रिया मोठय़ा प्रमाणावर शिकत आहेत, उच्च शिक्षणही घेत आहेत. नोकरीसाठी परदेशीसुद्धा जात आहेत. महत्त्वाकांक्षा वाढल्यामुळे अनेक जणी आता उच्चपदांवर कार्यरत आहेत. इतकंच नाही तर अगदी ग्रामीण पातळीवरही अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण वाढलं आहे. या सर्व प्रगतीमुळे आजच्या कर्त्यां स्त्रियांच्या हातात पैसा खुळखुळतो आहे. याच्याच परिणामस्वरूप, शहरी आणि चांगली ‘पॅकेजेस’ मिळवणाऱ्या स्त्रियांचा स्वकमाईकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालल्याचं दिसतं आहे. लग्नापूर्वीच स्वत:ची गाडी, घर, याशिवाय ऑनलाइन खरेदी, वीकएंड ट्रिप्स, सोलो ट्रॅव्हिलग या सगळ्यात स्त्रियांचा समावेश मोठय़ा प्रमाणावर वाढताना दिसतो आहे.

 यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे केवळ कमाई नव्हे, तर गुंतवणुकीच्या क्षेत्रातसुद्धा स्त्रिया आता मागे राहिलेल्या नाही. पारंपरिक गुंतवणूक पर्यायांच्या पलीकडे जाऊन त्या जोखीम पत्करायला शिकल्या आहेत. साधारण १० वर्षांपूर्वीपर्यंत बँक व पोस्टाच्या पलीकडे न जाणाऱ्या स्त्रिया, गेल्या तीन वर्षांत शेअर ट्रेडिंग करायलासुद्धा धजावू लागल्या आहेत. शिवाय स्वत:ची स्थावर मालमत्तासुद्धा जमवू लागल्या आहेत. माझ्याकडे सल्ल्यासाठी येणाऱ्यांमध्येसुद्धा आता स्त्रियांचं प्रमाण वाढलं आहे. पूर्वी नवऱ्याबरोबर येऊन सल्लागारासमोर फर्निचरसारखी बसणारी स्त्री आता स्वत: पुढाकार घेऊन कुटुंबाचं आणि तिचं स्वत:चं वेगळं नियोजन करू लागली आहे. अर्थात हे दृश्य मुंबई, पुणे, बंगळूरु, चेन्नईसारख्या मेट्रो सिटीज्मध्ये जास्त दिसतं. कारण मोठय़ा शहरांमध्ये आर्थिक साक्षरतेबाबत भरपूर प्रचार-प्रसार केला जातो. शिवाय या विषयांवर इतर लोकांबरोबर चर्चासुद्धा करायला मिळते; पण हा बदल लवकरच सर्वत्र पसरेल या बाबतीत काहीच शंका नाही.

इथे मला आणखी एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते, ती म्हणजे स्त्रीच्या कमाईकडे कुटुंबाची गरज यापलीकडे पाहाण्याची बदललेली मानसिकता. १९५०-६० दशकातल्या बहुतांशी स्त्रिया केवळ कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून काम करायच्या; परंतु आजकालच्या स्त्रिया स्वत:ला हवी म्हणून नोकरी, व्यवसाय करतात. शिक्षण घेत असतानाच अनेकींचं कोणतं करीअर करायचं हे नक्की झालेलं असतं. त्याप्रमाणे त्यांच्या शिक्षणाचे प्राधान्यक्रमही बदलतात. त्यासाठी एकटीनं राहाणं, दुसऱ्या शहरात, परदेशात जाणं हेही आता तरुणींसाठी नवीन राहिलेलं नाही. साहजिकच या सगळय़ाचं रूपांतर आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यानंतर आर्थिक सुबत्तेत होत असतं. त्यातूनच आता आधुनिक पद्धतीचं जगणं, नवनवीन, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरणं, वीकएंडला बाहेर पडणं, पाटर्य़ा आणि गेट-टूगेदर, भटकंती या सर्वासाठी त्या पैसे आणि वेळ बाजूला काढायला शिकल्या आहेत.

 थोडक्यात काय, तर नुसते पैसे कमावणं हे ध्येय नसून त्यांचा आनंद घेता येणं हे स्त्रियांना समजायला लागलंय आणि कदाचित या कारणांमुळेच नोकरी बदलताना, न पटणाऱ्या वैवाहिक नात्यातून बाहेर पडताना, एकल पालकत्व स्वीकारताना आणि आयुष्य मनाजोगं जगताना त्यांना इतर स्त्रियांच्या मानानं कदाचित  जास्त सोपं होत असावं.

अर्थात जास्त पैसे हाताळायला मिळाले म्हणजे स्त्री आर्थिकरीत्या स्वतंत्र झाली असं म्हणायचं का? इथे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय हे मला थोडं उलगडून सांगायचंय. ‘मला माझे पैसे हवे तसे, हवे तेव्हा, कुणालाही न विचारता वापरता येतात म्हणजे मी आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र आहे,’ हा समज चुकीचा आहे. आर्थिक स्वातंत्र्य याचा अर्थ अधिक व्यापक आहे. कुणावरही अवलंबून न राहाता योग्य पद्धतीनं व्यवहार करून स्वत:ची व आपल्यावर विसंबून असणाऱ्यांची आजची आणि भविष्यातली गरज आणि हौसमौज भागवता येणं, म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. मिळालेल्या पैशांवरचा ताबा, त्याचा विनियोग, बँकेतले आणि ऑनलाइन व्यवहार, नॉमिनेशन (नामनिर्देशन), मालमत्तेसंबंधीच्या कायद्यातील तरतुदी जाणणं आणि पुढील आयुष्याची तरतूद, हे सगळंच त्यात आलं आणि हे सर्व करताना त्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळवून आणि कुणाच्याही दबावाखाली न येता जेव्हा एखादी स्त्री निर्णय घेते तेव्हा ती खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र ठरते आणि याची पुढची पायरी म्हणजेच आर्थिक सुबत्ता. फक्त नोकरीवर विसंबून न राहाता आणि आपल्या दैनंदिन गरजा पुरवण्यापलीकडे जेव्हा आपण गुंतवणूक करतो, पुढील पिढीसाठी काही तरी तरतूद करतो, मनासारख्या गोष्टींसाठी पैसा खर्च करतो तेव्हा आपण सुबत्तेचा अनुभव घेतो.

  आता आपण वळू या मोठय़ा प्रश्नाकडे- की मुळात स्त्रीला आर्थिक सुबत्तेची गरज आहे का? तर याचं उत्तर- ‘हो आहे!’ पुरुषांबरोबर शर्यत लावायची म्हणून नाही, तर स्वत: कमावलेल्या पैशाला योग्य रीतीनं सांभाळण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठीही. वर म्हटल्याप्रमाणे तरुण मुली आता घरापासून दूर राहून शिक्षण आणि नोकरी करतात. तेव्हा त्यांना स्वत:चे पैसे नीट सांभाळता आणि ते वाढवता आलेच पाहिजेत. शिवाय लग्न झाल्यानंतरसुद्धा कुटुंबाची आर्थिक घडी नीट बसवताना तिनं तिच्या जोडीदाराबरोबर सल्लामसलत करून योग्य निर्णय घ्यायला हवेत. अलीकडे लग्न न करणाऱ्या तरुणींचंही प्रमाण वाढतंय. त्यांना तर अधिकच सतर्क राहून स्वत:साठी निर्वाह निधी जमवायचा आहे. विशिष्ट वयापर्यंत नोकरी, व्यवसाय केल्यानंतर निवृत्तीनंतरचं आयुष्य समाधानानं घालवता येणंही महत्त्वाचं आहे. आयुष्यभर कमावलेल्या इस्टेटीचा आनंद घेता येणंसुद्धा महत्त्वाचं नाही का? 

शिवाय काहींच्या बाबतीत घटस्फोट, एकल पालकत्व, वैधव्य यांसारख्या परिस्थितींतून बाहेर पडून पुन्हा हिमतीनं स्वत:चं आयुष्य सावरायचं आहे. या सर्व कारणांमुळे स्त्रीला आर्थिक सुबत्ता गरजेची आहे. आर्थिक सुबत्तेचा संबंध स्त्रीच्या मानसिक परिस्थितीशीसुद्धा असतो. आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी असलेली स्त्री नाही म्हटलं तरी जास्त खमकी असते, ठाम असते. आर्थिक परावलंबत्व हे अनेकदा मानसिक दडपणाचं आणि भावनिक अस्थैर्याचंसुद्धा कारण होतं. अनेक स्त्रिया आर्थिक परावलंबित्वामुळे अनेक वर्ष कौटुंबिक त्रास सहन करत राहातात. ‘मी हे घर सोडलं किंवा हा नवरा सोडला तर माझं कसं होणार?’ या प्रश्नाचं उत्तर तिला सापडत नाही. कधी कधी तर असंही लक्षात येतं, की जागरूक नसलेल्या स्त्रियांकडे जरी व्यवस्थित पैसे असले, तरीसुद्धा त्या चुकीच्या सल्ल्यांमध्ये फसतात आणि आहे ते गमावून बसतात. वारसा हक्क कायद्याच्या बाबतीतसुद्धा स्त्रियांना पुरेशी माहिती नसल्यानं त्यांची फसवणूक होते.    

आर्थिक सुबत्तेसाठी नक्की काय करावं? या प्रश्नाचं उत्तर खूप सोप्पं नसलं तरी अशक्य नक्कीच नाहीये. मुळात आपले पैसे आपण कसे मिळवायचे, कसे वापरायचे, कुठे गुंतवायचे, भविष्यातल्या खर्चाची तरतूद कशी करायची, कर्ज आणि कराचं व्यवस्थापन कसं करायचं, आपले वारसा हक्क कसे वापरायचे, या सगळय़ाशी ते निगडित आहे. हा विषय इतक्या सहजासहजी इथे नाही समजावता येणार; परंतु तरीसुद्धा या खाली दिलेल्या टिप्स वाचकांच्या फायद्याच्या ठरतील अशी अपेक्षा आहे: नोकरीच्या ठिकाणी आपल्याला योग्य पगार मिळतोय का, त्यात योग्य ती वाढ होतेय ना, हे वेळोवेळी तपासणं आणि त्या अनुषंगानं पुढचे निर्णय घेणं.

स्वत:चे पैसे किती, कधी आणि कशासाठी वापरले जातात याची व्यवस्थित नोंद ठेवून त्यानुसार स्वत:चा आर्थिक आराखडा तयार करणं. स्वत:च्या हौसे-मौजेसाठी पैशांची योग्य ती तरतूद करणं. गुंतवणूक पर्यायांची कसून चौकशी करून, जोखीम आणि परतावे समजून व्यवहार करणं. वारसा हक्क आणि घटस्फोट कायद्यातल्या तरतुदी समजून घेणं.  संपत्तीचे सगळेच अधिकार दुसऱ्याला  न देणं.  योग्य विमा (आरोग्य आणि आयुर्विमा) कवच घेणं.  कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट वाचणं आणि समजून घेणं.  बँकेत स्वत:चं एक वेगळं खातं ठेवणं.  मोबाइल आणि इंटरनेटवरून होणाऱ्या व्यवहारांची नीट माहिती ठेवणं. वेळोवेळी आपल्या मिळकत, खर्च, कर्ज, इस्टेट आणि भविष्यातल्या गरजांचा आढावा घेणं.  

वरील सर्व आव्हानं, स्त्रीची स्वत:ची आर्थिक सुबत्तेची गरज, सहज मिळणारी माहिती, गुंतवणूक सल्लागार आणि नवीन तंत्रज्ञानामुळे होणारी सोय या सर्वाची योग्य सांगड जर वेळीच घालता आली, तर स्त्रीच्या आर्थिक गंगाजळीत नक्कीच वाढ होईल. भले मग ती कमी काळ नोकरी करो किंवा गरजेनुसार पूर्ण वेळ वा अर्धा वेळ नोकरी करो अथवा नवऱ्याच्या पश्चात मिळालेल्या संपत्तीचं नियोजन करून पुढचं आयुष्य व्यतीत करो; पण योग्य मिळकत, आर्थिक नियोजन, कर व्यवस्थापन, गुंतवणूक आणि त्यातून निर्माण होणारी सुबत्ता हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे आणि तो तिनं मिळवला आणि उत्तम प्रकारे वापरला पाहिजे. मुख्य म्हणजे आजही अगदी जागतिक पातळीवरही स्त्री आणि पुरुषांमध्ये जी आर्थिक असमानता आहे, ती काही प्रमाणात तरी कमी करण्यासाठी स्त्रीने स्वत:हून पावलं उचलायला हवीत.

अर्थात त्यासाठी खूप मेहनत आणि काळाची प्रतीक्षा करावी लागणारच आहे. कारण स्त्री-पुरुषांमधली आर्थिक असमानता दूर होण्यासाठी जागतिक स्तरावरून बदल होणं गरजेचं त्यासाठी त्या पातळीवर आर्थिक धोरणं बदलण्याबरोबरच मानसिक पातळीवरही मोठय़ा प्रमाणात बदल होणंही आवश्यके आहे. येणारा काळ हा काही सोपा नाही. बदलणारी कुटुंबव्यवस्था, वाढणाऱ्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून निर्माण होणारं आर्थिक-मानसिक-भावनिक अस्थैर्य हे सर्व पेलायची ताकद जर हवी असेल, तर डोळे आणि कान नीट उघडून, जमेल तितका विचार करून निर्णय घेणं हे आलंच. तेव्हा स्त्रियांनो, स्वत:च्या अर्थ स्वातंत्र्याची जबाबदारी ही तुमची आहे, कारण यात सगळय़ात जास्त फायदा हासुद्धा तुमचाच आहे आणि अशा स्त्रियांना पुढे आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांनीसुद्धा या गोष्टीची दखल घेऊन त्यांना यश मिळवून देण्यात संपूर्ण कुटुंबाची प्रगती आहे हे लक्षात घ्यायला हवं. स्त्रीचं आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र होणं, ही काळाची गरज आहे, मात्र तिच्याकडे आर्थिक सुबत्ता येणं, ही तिच्या बदलत्या काळाची गरज आहे.

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका सनदी लेखापाल असून सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत)

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women economics global level united nations women planning ysh
First published on: 12-11-2022 at 00:14 IST