सोनिया कुट्टी
‘क्वेस्ट ग्लोबल’ने राष्ट्रीय पातळीवर स्त्रियांच्या केलेल्या एका सर्वेक्षणात्मक अभ्यासात असे आढळून आले, की केवळ २१ टक्के स्त्रिया आपल्या नैसर्गिक गर्भपात वा ‘मिसकॅरेज’विषयी कार्यालयातील व्यवस्थापक किंवा ‘एचआर’ सोबत मोकळेपणाने बोलू शकतात. यामुळे त्यांच्या नोकरी-करिअरवर नकारात्मक परिणाम होईल अशी चिंता त्यांना वाटते. इतकंच नाही तर याविषयी कोणते कायदे, नियम आहेत हेही अनेकींंना माहीत नसते. हे उत्कृष्ट कार्यव्यवस्थेचे लक्षण नाही. काय करावे लागेल यासाठी?

गेल्या दशकभरात अधिक सर्वसमावेशक आणि सहकार्यपूर्ण कार्यालयीन स्थळे निर्माण करण्याच्या दिशेने काही संस्थांनी उल्लेखनीय प्रगती केली आहे. मानसिक आरोग्य, कर्मचारी स्वास्थ्य, कामाच्या ठिकाणी असलेली लवचीकता  आणि कामातील विविधता यांसारख्या विषयांवरील चर्चा आता अधिक व्यापक प्रमाणात होत आहेत. लोकांना आवश्यक पाठबळ मिळाल्यास ते आपल्या सर्वोत्तम क्षमतेने काम करू शकतात याची वाढती जाणीव ही कार्यव्यवस्था निर्माण करण्यात आहे. मात्र, या सकारात्मक बदलानंतरही काही अनुभव असे आहेत ज्याबाबत कार्यालयीन स्थळी आजही मौन बाळगले जाते. त्यापैकी एक म्हणजे नोकरी करत असलेल्या ्त्रिरयांचे गर्भपात- ॲबॉर्शन नाही, मिसकॅरेज, ज्याला नैसर्गिक गर्भपातही म्हटले जाते.

जेव्हा बहुसंख्य स्त्रिया काम करत असलेल्या त्यांच्या कार्यालयीन संस्थेत स्वत:च्या नैसर्गिक गर्भपाता (मिसकॅरेज) बाबत माहिती देणे टाळतात तेव्हा प्रत्येक संस्थेसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपली कार्यालयीन स्थळे कर्मचार्‍यांसाठी आपण समजतो तितकी खरोखरंच मानसिकदृष्ट्या सुरक्षित आहेत का?

ही बाब अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी ‘क्वेस्ट ग्लोबल’ने ‘युगोव्ह’च्या सहकार्याने राष्ट्रीय पातळीवर सर्वात व्यापक सर्वेक्षणात्मक अभ्यास केला, ज्यात नोकरीच्या कार्यकाळा दरम्यान होणारे गर्भपात याविषयी स्त्रिया आणि पुरुषांना बोलते केले.  देशभरातील २ हजारपेक्षा अधिक स्त्रिया आणि २०० पुरुषांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला. या संशोधनातून एक ठळक विरोधाभास समोर आला आहे. समाजात गर्भपाताविषयी पूर्वीच्या तुलनेत अधिक मोकळेपणाने बोलले जाते असे यातील ७१ टक्के स्त्रियांना वाटत असले तरी, केवळ २१ टक्के स्त्रिया आपल्या गर्भारपणाविषयी आणि नैसर्गिक गर्भपाताविषयी कार्यालयातील व्यवस्थापक किंवा मानव संसाधन ( Human resources ‘एच आर’) सोबत मोकळेपणाने बोलतात वा बोलू शकतात. ४० टक्के स्त्रियांना त्या त्यांच्या झालेल्या ‘मिसकॅरेज’बाबत बोलल्यास आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाईल, अशी भीती वाटते; तर जवळपास तितक्याच स्त्रियांना त्यांच्या नोकरी-करिअरवर नकारात्मक परिणाम होईल अशी चिंता आहे. याहूनही अधिक चिंताजनक बाब म्हणजे ६० टक्के स्त्रियांच्या मते, असे काही घडलेच नाही अशा पद्धतीने, त्याला फार महत्त्व न देता काम सुरू ठेवण्याची अपेक्षा अशा स्त्रियांकडून ठेवली जाते. 

नैसर्गिक गर्भपाताविषयीचा सार्वजनिक पातळीवरील संवाद अधिक खुला होत असला तरी कामाच्या ठिकाणी असलेल्या संस्कृतीला अजूनही बरीच वाटचाल करायची आहे. विशिष्ट विचारसरणीच्या व्यवस्थेत गर्भपाताविषयीचा सहज स्वीकार आणि त्याविषयीची संवेदनशीलता नाही. हे या निष्कर्षांवरून स्पष्टपणे दिसून येते. ‘पीपल अँड कल्चर’ म्हणजेच ‘मनुष्यबळ आणि संस्कृती’ या क्षेत्रातील आपण प्रगत धोरणे आणि ‘कर्मचारी कल्याण उपक्रम’ राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो. मात्र, या अभ्यासातील निष्कर्ष आपल्याला याची आठवण करून देतात की केवळ धोरणे तयार केल्याने विश्वास निर्माण होत नाही. कर्मचार्‍यांना जेव्हा आपल्याबाबत खरं-खोटं याचा न्यायनिवाडा केला जाणार नाही, पूर्वग्रहांचा सामना करावा लागणार नाही किंवा अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागणार नाही असा विश्वास वाटतो, या विश्वासासोबतच त्या धोरणांचा लाभ घेता येईल याची शाश्वती वाटते तेव्हाच आपल्याला खरे पाठबळ मिळाल्याची भावना ते अनुभवतात. कर्मचार्‍यांसाठीची मानसिक सुरक्षितता ही केवळ धोरणात्मक दस्तऐवजांमधून निर्माण होत नाही. ती रोजच्या संवादातून, सहानुभूतीपूर्ण नेतृत्वातून आणि ज्या कार्यालयीन संस्कृतीत संवेदनशीलतेला महत्त्व आहे, अशा वातावरणातून निर्माण होते.

बर्‍याचदा कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीतही तक्रार न करता शांत राहून काम करत राहाण्यालाच जिद्दीचे प्रतीक मानले जाते. परंतु कर्मचार्‍यांनी आपले दु:ख किंवा भावनिक वेदना दडपून ठेवाव्यात अशी अपेक्षा ठेवण्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. जेव्हा व्यक्तींना मदत मागणे शक्य होत नाही तेव्हा त्यांना एकट्यानेच सावरण्याचा प्रयत्न करावा लागतो. याचा परिणाम केवळ त्यांच्या भावनिक स्वास्थ्यावरच होतो असे नाही तर त्यांच्या आत्मविश्वासावर, कामातील सहभागावर आणि प्रभावीपणे योगदान देण्याच्या क्षमतेवरही होतो.

याचे व्यावसायिक परिणामही तितकेच महत्त्वाचे आहेत. आमच्या सर्वेक्षणातील ७८ टक्के स्त्रियांच्या मते नैसर्गिक गर्भपाताचा परिणाम कार्यालयातील काम आणि कामाच्या व्यवस्थापनावर होतो तर ७५ स्त्रियांचे म्हणणे आहे, की यामुळे दैनंदिन कामकाज सांभाळण्याच्या त्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो. जवळपास दहापैकी सात स्त्रियांच्या मते करिअरच्या प्रगतीवरही याचा दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो.

 या निष्कर्षातून वैयक्तिक अनुभव कार्यस्थळाबाहेर ठेवता येणे शक्य होत नाही हे एक महत्त्वाचे वास्तव अधोरेखित होते. जेव्हा कर्मचार्‍यांना पुरेशा पाठबळाविना भावनिक ओझे वाहावे लागते, तेव्हा त्याचा परिणाम संस्थांवरही होतो. कर्मचार्‍यांचा कमी झालेला सहभाग, घटलेली उत्पादकता आणि नोकरी सोडण्याची वाढती शक्यता असे धोके संस्थेलाही अनुभवावे लागतात.

या संशोधनातून असेही दिसून आले आहे की, अनेक संस्थांकडे ही परिस्थिती बदलण्याची मोठी संधी आहे. सर्वेक्षणातील जवळपास निम्म्या स्त्रियांनी असे मत व्यक्त केले, की गर्भपाताविषयी अधिक मोकळेपणाने चर्चा झाल्यास त्यांना मदत मागणे अधिक सोयीचे वाटू शकेल. अनेक स्त्रियांनी सांगितले की, सहकार्यपूर्ण कार्यालयीन स्थळांचा संबंध अधिक चांगल्या भावनिक आरोग्याशी, कार्यालयीन संस्थेचे मालक, वरिष्ठ यांच्यावरील अधिक विश्वासाशी, अधिक सकारात्मक कार्यसंस्कृतीशी आणि उच्च उत्पादकतेशी जोडला आहे. त्यामुळे सहानुभूतीकडे केवळ कर्मचारी लाभ म्हणून पाहता कामा नये. संस्थेच्या कार्यव्यवस्थेची अनुकूलता अधिक बळकट करणारी आणि आपल्या कर्मचार्‍यांप्रति संस्थेची बांधिलकी अधिक दृढ करणार्‍या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण क्षमता म्हणून याकडे बघितले पाहिजे.

याच वेळी, या अभ्यासाने आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणजे जागरूकता. मातृत्व लाभ कायद्याअंतर्गत गर्भपातानंतर पगारी रजेची तरतूद असतानाही सर्वेक्षणातील केवळ ३६ टक्के स्त्रियांनी या कायद्यातील तरतुदींबाबत आपल्याला पूर्ण माहिती असल्याचे सांगितले, तर प्रत्येक चार स्त्रियांपैकी एक स्त्रीला नैसर्गिक गर्भपातासाठी स्वतंत्र रजेची तरतूद अस्तित्वात आहे, याचीही माहिती नव्हती. धोरणे आणि त्याबाबतची जागरूकता यातील ही दरी संस्थांसाठी एक महत्त्वाचा धडा आहे.

कर्मचारी सहाय्य व्यवस्था तेव्हाच प्रभावी ठरतात, जेव्हा कर्मचार्‍यांना त्या अस्तित्वात असल्याची माहिती असते, त्यांचा लाभ कसा घ्यायचा हे समजते आणि ते तसे करण्यास आत्मविश्वासाने पुढे येतात. त्यामुळे या लाभांची सातत्याने माहिती देणे हे त्यांची अंमलबजावणी करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. कायदेविषयक जागरूकतेची ही दरी कमी करण्यात व्यवस्थापकांची भूमिका विशेष महत्त्वाची आहे. अनेक कर्मचार्‍यांच्या दृष्टीने कोणत्याही धोरणापेक्षा त्यांचे थेट वरिष्ठ व्यवस्थापक हेच संस्थेचा चेहरा असतात.

सहानुभूतीपूर्ण संवाद, कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकून घेण्याची तयारी किंवा एखाद्याला मोकळेपणाने बोलण्यासाठी आवश्यक अवकाश उपलब्ध करून देणे, या गोष्टी कर्मचार्‍यांच्या सावरण्याच्या प्रक्रियेवर आणि संस्थेशी असलेल्या त्यांच्या आपलेपणाच्या भावनेवर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम करू शकतात. त्यामुळे मानसिकदृष्ट्या सुरक्षित कार्यस्थळे निर्माण करण्यासाठी प्रत्येक स्तरावरील नेतृत्वाने केवळ व्यावसायिक कौशल्येच नव्हे तर सहानुभूती, भावनिक बुद्धिमत्ता आणि संवेदनशील संवाद हाताळण्याचा आत्मविश्वासही विकसित करणे आवश्यक आहे.

आमचा हा अभ्यास अखेरीस एका साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या निष्कर्षाकडे निर्देश करतो. कार्यालयीन स्थळे खर्‍या अर्थाने सर्वसमावेशक  निर्माण करणे म्हणजे केवळ प्रगत धोरणे लागू करणे नव्हे, तर कर्मचार्‍यांना जेव्हा त्यांची सर्वाधिक गरज असेल, तेव्हा ती धोरणे वापरण्यास पुरेसे सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक गर्भपातानंतर आजही जवळपास दहापैकी नऊ ्त्रिरया मौन बाळगणे पसंत करतात तेव्हा ही बाब ‘एचआर’ आणि व्यावसायिक नेतृत्वासमोरील जबाबदारी स्पष्ट करते. आपल्याला अशी कार्यस्थळे उभारावी लागतील जिथे सहानुभूती हा नेतृत्वाचा अविभाज्य भाग असेल, कार्यव्यवस्थेत मानसिक सुरक्षिततेची हमी असेल आणि कोणत्याही कर्मचार्‍याला वैयक्तिक दु:खाचा सामना एकट्याने करावा लागणार नाही. जिथे प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व मान्य केले जाते, त्यांना आवश्यक पाठबळ मिळते आणि आपली प्रगती करण्यासाठी सक्षम बनवले जात आहे, असे वाटेल तेव्हाच आपण खर्‍या अर्थाने अशी कार्यस्थळे उभारली आहेत असे म्हणता येईल.

क्वेस्ट ग्लोबल उपक्रम

या निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर ‘क्वेस्ट ग्लोबल’ने या विषयाला थेट सामोरे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. ‘युअरदोस्त’च्या (मानसिक आरोग्यासाठी काम करणार्‍या ‘युअरदोस्त’च्या) भागीदारीत ‘क्वेस्ट ग्लोबल’ने एक उपक्रम सुरू केला असून त्यामध्ये २४ तासांची हेल्पलाइन, सहकार्‍यांमधील परस्पर सहाय्य गट, एच.आर. आणि व्यवस्थापकांसाठी प्रशिक्षण तसेच जनजागृती ‘वेबिनार’ यांचा समावेश आहे. ही सर्व साधने भारतभरातील सर्व संस्था आणि व्यक्तींसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामधून एखाद्या संस्थेची परिवर्तन घडवून आणण्याची आणि स्वत:च्या ‘कॉर्पोरेट’ परिसराबाहेरही व्यापक पातळीवर सहाय्य उपलब्ध करून देण्याची दीर्घकालीन बांधिलकी अधोरेखित होते.

‘क्वेस्ट ग्लोबल’तर्फे आम्ही सर्व संस्था आणि वाचकांना कामाच्या ठिकाणी गर्भपाताभोवतीचे मौन तोडण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन करतो.  www. breakthesilence. in  या बेबसाइटला भेट देऊन अधिक समंजस, सहानुभूतीपूर्ण आणि सर्वसमावेशक कार्यस्थळांच्या निर्मितीसाठी सुरू झालेल्या या चळवळीत सहभागी होण्याचे आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत. ही केवळ एक मोहीम नाही. ही एकात्मता, कार्यालयीन संस्थेचे पाठबळ आणि दीर्घकालीन बदलासाठीची हाक आहे. (लेखिका ‘क्वेस्ट ग्लोबल’मध्ये ‘पीपल अँड कल्चर’ विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष असून त्या बदल व्यवस्थापन, प्रतिभा विकास आणि संस्कृती उभारणी याविषयीच्या अभ्यासक, तज्ज्ञ आहेत.)