क्रीडा स्पर्धांमध्ये स्त्रियांचा सहभाग उशिराच सुरू झाला, पण वेगात पुढे गेला. १८९६ मधल्या पहिल्या ‘ऑलिम्पिक’मध्ये स्त्रियांचा सहभाग शून्य होता, तो २०२४च्या ‘ऑलिम्पिक’मध्ये ४९ टक्के म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने झाला. संसार, मुलं याचाही अडथळा स्त्री खेळाडूंनी मानला नाही म्हणून तर पन्नासच्या दशकात दोन मुलांची आई असलेल्या डच अॅथलिट फॅनी ब्लॅन्कर्सकोएन हिने एकाच ‘ऑलिम्पिक’मध्ये चार सुवर्णपदके मिळवण्याचा अचाट पराक्रम केला होता. थोडक्यात, अडखळणारी तिची सुरुवातीची पावले नंतर मात्र मुसंडी मारत धावू लागली.
खेळ हा कोणत्याही खेळाडूपेक्षा मोठा असतो, असं म्हटलं जातं. खेळाडू येतात, जातात. पण खेळ चिरंतन असतो. ही गोष्ट कितीही खरी असली, तरी काही खेळाडू त्यांच्या खेळामधील योगदानामुळे त्या खेळाला वेगळ्याच पातळीवर घेऊन जातात, हेही तितकंच खरं! अशा अद्वितीय खेळाडूंमुळे खेळाला लोकमान्यता मिळते. राजाश्रय, लोकाश्रय मिळतो. व्यावसायिक पातळीवर बघितलं, तर यामुळे प्रायोजक त्या खेळाकडे आकृष्ट होतात.
अनेक मुला-मुलींचे हे खेळाडू आदर्श बनतात आणि एक नवीन पिढी त्या खेळाकडे आकर्षित होते. पुढची पिढी ही आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभी राहते, असं म्हणतात ते उगाच नाही. अर्थात एखाद्या पिरॅमिडची भव्यता नुसत्या शिखराकडे बघून येत नाही, तर त्याच्या पायाचा विस्तार बघून येते. त्याप्रमाणे शिखरावर असणाऱ्या खेळाडूंइतकेच त्या खेळातील स्पर्धांमध्ये किती प्रमाणात खेळाडू भाग घेत आहेत ही गोष्टसुद्धा त्या खेळाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असते.
लहान मुले जशी चालायला शिकताना अडखळत पावलं टाकतात, तशी क्रीडा क्षेत्रात स्त्रियांची सुरुवात झाली. १८९६ मध्ये झालेल्या पहिल्या ‘ऑलिम्पिक’स्पर्धे’त स्त्रियांचा समावेश अजिबातच नव्हता. १९०० मध्ये पहिल्यांदा ‘ऑलिम्पिक’मध्ये स्त्रिया सहभागी झाल्या त्यासुद्धा फक्त पाच खेळांमध्ये. स्त्रिया प्रथमच सामील असलेल्या या ‘ऑलिम्पिक’मधील पहिलं-वहिलं सुवर्णपदक पटकावलं ते ब्रिटिश टेनिसपटू चार्लोट कूपर हिने. या ‘ऑलिम्पिक’मध्ये फक्त २२ स्त्री खेळाडूंनी भाग घेतला होता. एकूण खेळाडूंच्या संख्येच्या तुलनेत त्यांचं प्रमाण होतं केवळ २.२ टक्के! प्रत्येक वर्षागणिक यात वाढ होत गेली. १९८४च्या लॉस अँजेलिस येथे झालेल्या ‘ऑलिम्पिक’मध्ये हे प्रमाण वाढून २३ टक्क्यांवर गेलं, तर २०२४च्या पॅरिस ‘ऑलिम्पिक’मध्ये स्त्री खेळाडूंचे प्रमाण तब्बल ४९ टक्के म्हणजे पुरुष खेळाडूंच्या जवळपास बरोबरीने होतं.
१९९१पासून असा नियम केला गेला की, कोणताही खेळ जर ‘ऑलिम्पिक’ मध्ये समाविष्ट करायचा असेल, तर त्या खेळाच्या स्त्रियांसाठीच्या ‘ऑलिम्पिक’ स्पर्धासुद्धा अंतर्भूत व्हायला हव्यात. या नियमामुळे तसेच स्त्रियांमध्ये खेळाची आवड, त्याप्रति निष्ठा आणि व्यावसायिकता वाढीला लागल्यामुळे बरेच खेळ, जे आधी ‘ऑलिम्पिक’ मध्ये स्त्री खेळाडूंसाठी उपलब्ध नव्हते, ते ‘ऑलिम्पिक’च्या छत्राखाली येऊ लागले.
१९९६ मध्ये स्त्रियांच्या फुटबॉल स्पर्धांचा समावेश अॅटलांटा येथे झालेल्या ‘ऑलिम्पिक’मध्ये प्रथमच करण्यात आला. २००० मधल्या सिडनी येथील ‘ऑलिम्पिक’ मध्ये तर स्त्रियांसाठी ‘तायक्वांदो’, ‘ट्रायथलॉन’, ‘वेटलिफ्टिंग’ आणि ‘आधुनिक पेन्टॅथलॉन’ हे सर्व खेळ समाविष्ट करण्यात आले. २०१२ मधल्या लंडन ‘ऑलिम्पिक’ने समानतेचा एक मोठा टप्पा गाठला. स्त्रियांसाठी ‘बॉक्सिंग’ स्पर्धा प्रथमच या ‘ऑलिम्पिक’मध्ये घेण्यात आल्या. जे जे खेळ पुरुषांसाठी उपलब्ध होते, त्या सर्व खेळांसाठी स्त्रियांच्यासुद्धा स्पर्धा भरवणारं हे पहिलं ‘ऑलिम्पिक’ ठरलं.
खूप जुनी परंपरा असलेल्या टेनिसमधील विम्बल्डन स्पर्धांची कथासुद्धा विशेष वेगळी नाही. या स्पर्धा घेणाऱ्या ‘ऑल इंग्लंड क्लब’ने बरीच वर्षं टोलवाटोलवी केल्यावर अखेरीस १८८४ मध्ये पहिल्यांदा स्त्रियांसाठी ‘विम्बल्डन’स्पर्धेचं आयोजन केलं. या स्पर्धेत केवळ १३ स्त्री खेळाडूंनी भाग घेतला. वार्विकशायर येथील धर्मोपदेशकांच्या मुली मॉड आणि लिलियन वॉटसन यांच्यात अंतिम फेरीचा सामना झाला. त्यात १९ वर्षीय मॉडने आपल्या बहिणीचा पराभव करून पहिलं विम्बल्डन अजिंक्यपद मिळवलं. पहिली ‘ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँड स्लॅम’ स्पर्धा जरी १९०५ मध्ये सुरू झाली असली, तरी ती केवळ पुरुषांसाठी घेतली जात असे. स्त्रियांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तब्बल १७ वर्षं वाट बघावी लागली. १९२२ मध्ये जेव्हा स्त्रियांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली, तेव्हा केवळ १४ खेळाडूंनी यात भाग घेतला होता. मार्गारेट मोल्सवर्थ हिने या स्पर्धेचं पहिलं अजिंक्यपद मिळवलं.
अमेरिकी व फ्रेंच स्त्रियांसाठीच्या ‘टेनिस ग्रँड स्लॅम’ स्पर्धांची कहाणीसुद्धा थोड्याफार फरकाने याच वळणावर जाते. आज सेरेना आणि व्हिनस या विलियम्स भगिनींची नावे स्त्रियांच्या टेनिसमधील यशस्वी कृष्णवर्णीय खेळाडू म्हणून सर्वपरिचित आहेत. परंतु अगदी १९५६ मध्ये कृष्णवर्णीय अमेरिकी खेळाडू अलथिया गिब्सन हिने ‘फ्रेंच ग्रँड स्लॅम’ ही टेनिस स्पर्धा जिंकून कृष्णवर्णीय स्त्रियांसमोर आदर्श घालून दिला.
स्त्रियांच्या अंगी मुळातच असलेला चिवटपणा, मेहनत घेण्याची तयारी, अफाट सहनशक्ती, पराभवातून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी मारण्याची उमेद अशा अनेक गुणांमुळे स्त्री खेळाडूंनी मैदानावर बाजी मारली नसती तरच नवल! १९३२ मध्ये लॉस अँजेलिस ‘ऑलिम्पिक’मध्ये अष्टपैलू असणाऱ्या अमेरिकी अॅथलिट बेब दिड्रीक्सनने अडथळा शर्यत, भालाफेक, उंच उडी या सर्व प्रकारांत पदके मिळवली. पण तिचं अष्टपैलुत्व असं की, नंतर तिने गोल्फसारख्या वेगळ्याच क्षेत्रात सातत्याने उत्तम कामगिरी केली. मुले झाल्यावर त्यांची देखभाल करून क्रीडा क्षेत्रात यश मिळवणं ही आजच्या काळातही कठीण गोष्ट मानली जाते. पण पन्नाशीच्या दशकात दोन मुलांची आई असलेल्या डच अॅथलिट फॅनी ब्लॅन्कर्स-कोएन हिने एकाच ‘ऑलिम्पिक’मध्ये चार सुवर्णपदके मिळवण्याचा अचाट पराक्रम केला होता. पण या चार सुवर्णपदकांबरोबरच एक पत्नी आणि आई म्हणून कर्तव्य पार पाडत नसल्याचे टोमणेसुद्धा फॅनीला झेलावे लागले.
फिगर स्केटिंग, जिम्नॅस्टिक हे क्रीडाप्रकार अंगभूत लवचीकता, नाजूकपणा यामुळे स्त्री खेळाडूंना विशेष शोभून दिसतात. तीसच्या दशकात स्वित्झर्लंड येथे झालेल्या हिवाळी ‘ऑलिम्पिक’ स्पर्धांमध्ये १५ वर्षीय सोनिया हेनीए या कोवळ्या मुलीने फिगर स्केटिंग या प्रकारात नावीन्यपूर्ण कल्पना वापरल्या. बॅले नृत्यप्रकारातील विविध मुद्रा आणि सफाईदार गिरक्या यांचं मिश्रण तिने आपल्या सादरीकरणात खुबीने पेश केलं. तिच्या या कल्पनेमुळे हा खेळ लोकप्रिय व्हायला हातभार लागला. ऑस्ट्रियाच्या गेरलिंड काल्टन ब्रूनर हिने जगातील सर्वोच्च १४ पर्वतशिखरे सर करून एक वेगळीच उंची गाठली! ८००० मीटर्सहून उंच असणारी ही सर्व शिखरे तिने ऑक्सिजनच्या मदतीशिवाय पादाक्रांत केली हे विशेष.
काही स्त्री खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात इतकी चमकदार कामगिरी करून दाखवली की तशी कामगिरी करून दाखवणं पुरुषांनाही जड गेलं. १९२६ मध्ये न्यूयॉर्कच्या गर्ट्रुड एडर्ले हिने इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली स्त्री होण्याचा मान मिळवला. तिने ५६ किलोमीटर्सचे हे अंतर १४ तास ३१ मिनिटांत पार केलं. या कामगिरीची खासियत अशी की, हा वेळ त्या काळच्या पुरुषाच्या सर्वोत्कृष्ट वेळेहून जवळपास दोन तासांनी कमी होता. कधी कधी पुरुषांशी स्पर्धा करण्याच्या प्रयत्नांत गमतीशीर प्रसंगसुद्धा घडत असत.
१९६७ मध्ये धावपटू कॅथरीन स्विट्झर, बोस्टन मॅरेथॉन ही प्रतिष्ठेची शर्यत पूर्ण करणारी पहिली स्त्री खेळाडू ठरली. वास्तविक बोस्टन मॅरेथॉनमध्ये त्या काळी स्त्री खेळाडूंना प्रवेश नव्हता. त्यामुळे या शर्यतीचे पंच कॅथरीनला शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी अक्षरश: धावपळ करीत होते. पण कॅथरीन होती जातीची धावपटू. तिने पंचांना अक्षरश: सळो की पळो करून सोडलं आणि शर्यत पूर्ण केली. अखेर १९७२ पासून स्त्रियांना या स्पर्धेत अधिकृत प्रवेश देण्यात आला.
१९६४ मधल्या टोकियो ‘ऑलिम्पिक’मध्ये सोव्हिएत जिमनॅस्ट लॅरिसा लॅटिनिना हिने सहा पदके मिळवून आपल्या कारकीर्दीतील पदकांच्या खात्यात एकूण १८ ‘ऑलिम्पिक’ पदके जमा करण्याचा विश्वविक्रम केला. कोणत्याही पुरुष अथवा स्त्री खेळाडूला इतकी ‘ऑलिम्पिक’पदके गोळा करता आली नव्हती. २०१२ पर्यंत लॅरिसाचा हा विक्रम अबाधित राहिला. अमेरिकी जलतरणपटू मायकेल फेल्प्सने २०१२ मध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केला. अजूनही लॅरिसा दुसरं स्थान टिकवून आहे. १९७६ च्या मॉन्ट्रियाल ‘ऑलिम्पिक’मध्ये रुमानियाच्या नादिया कोमेन्सीने ‘ऑलिम्पिक’ जिम्नॅस्टिक स्पर्धांत सर्वप्रथम दहात दहा गुण मिळवण्याचा केलेला पराक्रम सर्वश्रुत आहे.
‘ऑलिम्पिक’मध्ये कोणत्याही पुरुष अथवा स्त्री खेळाडूने जिम्नॅस्टिकमध्ये नोंदवलेली ही त्या वेळेपर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. टेनिसमध्ये विम्बल्डन, फ्रेंच, अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन या ग्रँड स्लॅम स्पर्धांना विशेष महत्त्व असतं. १९८८ या एका कॅलेंडर वर्षात स्टेफी ग्राफने चारही ‘ग्रँड स्लॅम’ स्पर्धा तर जिंकल्याच पण त्या वर्षी असणाऱ्या ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकून ‘सोनेरी ग्रँड स्लॅम’चा विक्रम केला. एका कॅलेंडर वर्षात अशा सर्व स्पर्धा जिंकण्याचा विक्रम कोणत्याही पुरुष किंवा स्त्री खेळाडूला अजूनही मोडता आलेला नाही. हंगेरीची स्त्री बुद्धिबळपटू ज्युडिथ पोल्गार हिने बुद्धिबळाच्या पटावर अनेक प्रथितयश पुरुष खेळाडूंना धूळ चारली आहे. त्यात विश्वनाथन आनंद याच्यासकट तब्बल ११ आजी-माजी विश्वविजेत्यांचा समावेश आहे.
कित्येक वर्षं उत्तमोत्तम स्त्री खेळाडूंचा मुख्य स्राोत अमेरिका हाच होता. गेली काही वर्षं मात्र चीनने या क्षेत्रातही मुसंडी मारली आहे. दोन्ही देशांच्या पदक विजेत्यांच्या यादीत स्त्री खेळाडूंचा मोठा वाटा असतो. २०२४ मध्ये पॅरिस येथे झालेल्या ‘ऑलिम्पिक’मध्ये अमेरिकेच्या एकंदर पदकांपैकी ६५ टक्के पदके स्त्री खेळाडूंना मिळालेली होती. खऱ्या अर्थाने महासत्ता बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या चीनने क्रीडा क्षेत्र दुर्लक्षिलं नाही. या त्यातील स्त्रियांच्या सहभागाला तर नाहीच नाही. ही बाब आपण नक्कीच लक्षात घ्यायला हवी. या ‘ऑलिम्पिक’मध्ये त्यांनी ५० पदके मिळवली. त्यातली १८ सुवर्णपदके होती. त्यासाठी लहान वयात मुलांची प्रतिभा हेरून, त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन चीनने हे साध्य केलं आहे.
एखादा खेळ विशिष्ट देशात मूळ धरण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. पहिली स्त्री बुद्धिबळ विश्वविजेती वेरा मेंचिक हिचं बालपण रशियात गेल्यावर ती नंतर ब्रिटनला राहू लागली. पुढे विश्वविजेती म्हणून वेराला मॉस्कोमध्ये एक स्पर्धा खेळायला आमंत्रित केलं गेलं. तिला बघून सोव्हिएत स्त्रियांनी बुद्धिबळ खेळण्यास प्रोत्साहित व्हावं असा रशियाच्या राज्यकर्त्यांचा उद्देश होता. लवकरच निर्माण झालेल्या सोव्हिएत स्त्री विश्वविजेत्यांच्या लाटेमुळे आपण कल्पना करू शकतो की तो उद्देश किती सफल झाला! वेराला बघून पुढच्या वर्षीच्या सोव्हिएत स्त्रियांच्या स्पर्धेत जवळपास पाच हजार स्त्रिया उतरल्या होत्या.
खेळाडूंना खेळासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांबरोबरच प्रसिद्धी, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक कमाई अशी अनेक परिमाणे खेळाच्या विकासासाठी आवश्यक असतात. काळानुसार स्त्रियांसाठी क्रीडा क्षेत्रात खूप सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तरी अजूनही पुरुष खेळाडूंच्या तुलनेतील भेदभाव, असमान आर्थिक कमाई, क्रीडा क्षेत्रातील अधिकारांच्या जागांवर स्त्रियांचा अभाव अशी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर आहेत.
येत्या काळात ही समानता क्रीडा क्षेत्रात वेगाने दिसेल अशी आशा करायला हरकत नाही.
●gokhale.anupama@gmail.com
