सुजाता खांडेकर
एकटी स्त्री समाजाला ‘अलैंगिक’ (असेक्शुअल) असायला हवी असते, ती नटली-थटली की ‘हे कुणासाठी?’ असा प्रश्न उपस्थित केला जातो आणि नवरा नसेल, तर तिला पोटच्या पोरासाठीच जीवन व्यतीत करायचा सल्ला मिळतो. रोजच्या बोलण्या-वागण्यातल्या अशा गोष्टी स्त्रीची लैंगिकता आपल्या मुठीत ठेवू पाहणाऱ्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करतात. मग ती कोणत्याही जाती-धर्म-समाजाची असो! अशा स्त्रीला शरीर आणि शारीरभान येतं, तेव्हा ती त्याचा मुकाबला कसा करू शकेल? ‘अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात’ असं ती मोकळय़ा मनाने म्हणू शकेल का? ते म्हणणाऱ्या दोन खंबीर स्त्रियांची ही गोष्ट.
‘लैंगिकता’ हा शब्द एखाद्या स्त्रीनं उच्चारला, तर ते ऐकणाऱ्याच्या डोळय़ांसमोर पहिल्यांदा सवंग चित्रपटातला शरीरसंबंधाचा एखादा प्रसंग येतो, मग त्या व्यक्तीचा चेहरा कसनुसा होतो आणि ‘अभद्र’ किंवा तत्सम शब्द ओठांवर येतो- हा समाजमानसाचा क्रम आहे. कारण समाजानं लैंगिकता या संकल्पनेचा परीघच जाणीवपूर्वक बंदिस्त आणि मर्यादित करून ठेवला आहे. समस्त स्त्रियांना बंदिस्त करण्यासाठी हा उत्तम उपाय. पण लैंगिकता म्हणजे फक्त शरीरसंबंधाची क्रिया नाही. लैंगिकतेचा अर्थ शरीरभान आणि शारीरभान.
व्यक्तीचं, तिच्या नातेसंबंधामधलं, तिच्या समूह-संबंधांमधलं. या शरीर आणि शारीरभानाचा विचार, विचारसरणी, मान्यता, रिती, व्यवहार, आविष्कार, त्याला प्रोत्साहन वा अवहेलना, जिज्ञासा, स्वप्नं, घमेंड, राग-लोभ, कला, इतिहास, जाणीव-नेणीव सगळं या लैंगिकतेत आहे. त्यात नातं समृद्ध करणारा हळुवारपणा आहे आणि बलात्काराची विकृतीही आहे.
लैंगिकतेचा हा पट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याच्या अंगाअंगात विणलेला आहे. स्त्रियांच्या भावना, जाणिवा, विचार आणि व्यवहारावर पुरुषसत्तेचा अंमल आहे. साध्या, सोप्या, सुरक्षित, प्रेमळ भासणाऱ्या रीतीही वेगळय़ा दुर्बिणीतून बघता यायला हव्यात. स्त्रियांच्या लैंगिकतेचं संकोचन जीवनाच्या दैनंदिन व्यवहारातून सहज आणि बेमालूमपणे होतं, हे समजायला हवं.
हेही वाचा >>> कलावंतांचे आनंद पर्यटन : रस्ता गिळत.. अंग आदळत..
एक उदाहरण- अनिता कांबळे बीडमधल्या. दलित वर्गातल्या म्हणून गावकुसाबाहेर आणि ‘टाकलेल्या आईच्या मुली’ म्हणून गरिबीत आणि अवहेलनेतलं जगणं. तिची आजी परडी (जोगवा) मागायची. अनिता चार वर्षांच्या असल्यापासून आईबरोबर वीटभट्टीच्या कामावर जायच्या, लोकांचे गोठे साफ करायच्या, अंगण शेणानं सारवून द्यायच्या. रोजचे दोन रुपये कमवायच्या. कुणी दिलेलं आंबलेलं जेवण खायचं हा नित्यक्रम. ‘जेवण विटलेलं आहे, हे कळतच नव्हतं,’ असं अनिता सांगतात. शाळेच्या शिक्षकांच्या प्रोत्साहनानं त्यांनी जाणीवपूर्वक शिक्षण चालू ठेवलं. वयाच्या तेराव्या वर्षी लग्न झालं. दहावीची परीक्षा गर्भवती असताना दिली. बाळ झाल्यावर जेव्हा त्याला दूध पाजायची वेळ व्हायची तेव्हा आजी मुलाला महाविद्यालयात घेऊन यायची. त्यांना दोन मुलगे. ‘नापास होईपर्यंत तिला शिकवू’ असं सासूनं त्यांच्या आईला सांगितलेलं होतं, त्यामुळे नापास न होता अभ्यास करत राहणं हा अनितांचा ध्यास! ‘एम.ए.’ आणि ‘एम.एस.डब्ल्यू’ होईपर्यंत शिक्षणाचा प्रवास असाच चालू राहिला.
वयाच्या २६ व्या वर्षी जोडीदाराचं निधन झाल्यानंतर अनिता यांच्या नावापुढे विधवा हे ‘लेबल’ लागलं. सांत्वनासाठी नातेवाईक, शेजारपाजार आला होता. अनिता सांगत होत्या, ‘‘लोक म्हणाले, दु:ख करू नकोस. तुला तर आता दोन नवरे आहेत. त्यांचं सगळं बघायचं. त्यांच्यासाठी जळायचं!’’ मुलगे असलेल्या स्त्रीचं असं सांत्वन करण्याची पद्धत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि अनेक जातींमध्ये आहे. हे सर्वमान्य, सहज आणि विनासंकोच बोलले जाणारे सांत्वनपर शब्द आहेत. स्त्री विधवा झाल्यावर तिला असं सांगण्याचा मथितार्थ काय? तर नवऱ्याची संपूर्ण सेवा हेच स्त्रीचं कर्तव्य. तिचं सगळं आयुष्य त्याच्याभोवती, त्याच्या स्वास्थ्याभोवती घुटमळतं. आणि नवरा गेल्यावर फक्त मुलांच्या दिमतीत जळायचं एवढाच याचा अर्थ. हे सर्वमान्य सांत्वन स्त्रियांच्या लैंगिकतेसंदर्भात बेमालूमपणे काही निर्देश करतात. या सांत्वनात काळजी, समर्पण आणि त्याग यांचं व्यवस्थित मिश्रण आहे. स्त्रियांचा त्याग, त्यांचा सासरी सर्वाना सुखी ठेवण्याचा हरप्रयत्न, स्वत:च्या इच्छाआकांक्षाचं दमन, स्वत:कडे संपूर्ण दुर्लक्ष, या सगळय़ाचं उदात्तीकरण यात आहे. स्त्रियांचं शरीर म्हणजे प्रामुख्यानं मूल तयार करणारं यंत्र मानल्यामुळे स्त्रियांच्या इच्छा, आनंद, सुख, या गोष्टी निमित्तमात्र आहेत, मुख्य विचार करण्याची बाब नाही. दुर्दैवानं हे जागोजागी दिसतं.
हेही वाचा >>> ‘‘हो, स्त्रियाही शिकारी होत्या..’’
आधी म्हटल्याप्रमाणे स्त्री जशी नवऱ्यासाठी त्याग करते, तसाच त्याग आता तिनं मुलांसाठी करायचा, हा या सांत्वनाचा अर्थ. यातला मुख्य मुद्दा पुरुषांची सेवा, त्यांच्यासाठी त्याग, संपूर्ण समर्पण आणि चोवीस तास त्यांची ‘काळजीवाहक’ राहण्याचा आहे. तिला कसलं दु:ख आहे, काय हवंय, ती कशाला मुकली आहे, तिच्या इच्छा- आकांक्षा काय, तिला पुढचं जीवन कसं जगायचं आहे, अशा प्रश्नांची दखलसुद्धा इथे नाही. आणि बारकाईनं पहिलं, तर यात एक गृहीत आहे, की तिला (आता तर- म्हणजे नवऱ्याच्या पश्चात) काही इच्छा असूच शकत नाहीत. असायलाच नकोत! मुलांना ‘नवरा’ म्हणण्यात स्त्रियांच्या लैंगिकतेचा प्रश्न पूर्णपणे झाकून टाकला गेला आहे. नवरा नसलेली स्त्री समाजाला ‘अलैंगिक’ (असेक्शुअल) असायला हवी असते. यात तिच्या इच्छा-आकांक्षांच्या समर्पणाचं उदात्तीकरण आहे.
अनिता आणखी एक गोष्ट सांगतात. त्या १२-१३ वर्षांच्या झाल्या तेव्हाच त्यांचे काका मुद्दाम घरी येऊन आईला सांगून गेले, ‘‘ही मोठी झाली. भाजून टाका’’. ‘भाजून टाका’ हा ‘लग्न करून टाका’ यासाठी वापरला जाणारा शब्द! तो कसा प्रचलित झाला असेल? तो काय सांगतो? काय दर्शवतो? वाक्यप्रयोगांची अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. अशा भाषेतच स्त्रियांना त्यांच्या शरीरापासून तोडण्याची ताकद आहे. अशासारख्या भाषेला, वाक्यांना जातवर्गाचं बंधन नसतं. सर्वच स्तरात ते सापडतं.
अनितांचा आणखी एक अनुभव. तसा सार्वत्रिकच आहे. नवऱ्याच्या निधनानंतर त्या घाबरत घाबरतच कामासाठी घराबाहेर पडल्या. मुलींच्या, बायकांच्या गळय़ात मंगळसूत्र लोंबकळत नसलं, तर बहुसंख्य पुरुष एका वेगळय़ाच, ‘विशेषाधिकारा’नं पछाडतात! बीडमधल्याच अर्चना नागरगोजे यांच्या भाषेत ‘कोणीही यावं आणि बचक मारावं’ असं त्यांना वाटतं. अनिता घराबाहेर पडल्यावर कुंकू लावायच्या, मंगळसूत्र घालायच्या आणि घरी आल्यावर सासूला आवडणार नाही म्हणून मंगळसूत्र पर्समध्ये टाकून टिकली पोटावर चिटकवायच्या. ही रीत, ही भीती, हा विशेषाधिकाराचा गंड, यातलं शल्य, यातून तयार झालेला व्यवहार, व्यवहाराचे झालेले प्रघात, सगळय़ाचा संबंध लैंगिकतेशी, त्यातल्या विचारसरणीशी आहे.
हेही वाचा >>> निसर्गकन्यकांचा गणेश!
एकल स्त्रियांबरोबर काम करताना अनिता आज या स्त्रियांना स्वत:पासून तोडणाऱ्या रूढी, भाषा, धारणा, मान्यता यांच्याबद्दल जागरूक करणं आणि त्या बदलायचा प्रयत्न करणं, यासाठी साथ देत आहेत. विधवा, परित्यक्ता स्त्रियांनी केसांत गजरा माळणं, पाहिजे ते कपडे घालणं, ऐटीत मीटिंगला जाणं, कब्बडी खेळणं, स्त्री-पुरुष सहकाऱ्यांना मागच्या सीटवर बसवून स्कूटर चालवणं, पुनर्विवाह करणं.. मनाला आनंद आणि व्यक्तीला ‘ओळख’ देणाऱ्या कोणत्याच गोष्टीला त्यांच्या कामात मनाई नाही.
अशीच आणखी एक खंबीर स्त्री म्हणजे, द्वारका पवार. या जामखेडमधल्या; पारधी समाजाच्या. गावापासून लांब, पालावर राहायच्या. लहानपणापासून रोज आंघोळ करणं, स्वच्छ राहणं, चांगले कपडे घालणं या सवयी त्यांना होत्या. पण समूहाच्या जीवनपद्धतीत असं राहणं बसत नव्हतं. समूहामध्ये द्वारका यांच्या अशा सवयींकडे संशयानं पाहिलं जाई. त्यांचं एवढं सगळं ‘तयार होणं’ कुणासाठी आहे? हा प्रश्न! ‘याचा अर्थ तू देहविक्रय करण्याच्या धंद्यात आहेस वाटतं,’ असं काहीजण त्यांना थेटच विचारत. समूहाबाहेरच्या व्यक्तीशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून समाजानं द्वारकाबाईंना ‘इमान जाळायला’ लावलं. ‘इमान जाळणं’ हा त्यांच्या जात-पंचायतीचा दंड. तापवून लाल केलेलं कुऱ्हाडीचं लोखंडी पातं, पिंपळाच्या सात पानांवर ठेऊन ते हातात धरून विशिष्ट अंतर चालण्याची सक्ती द्वारकांना झाली. तेव्हा त्यांचं वय होतं १५ वर्ष! त्यांनी ते केलंही. नंतर मात्र आपल्या सामाजिक कामातून कणखर झालेल्या द्वारकांनी आपल्या समाजातील मैत्रिणींशी स्वच्छ राहणीमान, आरोग्य, बाहेरच्या जगातल्या लोकांशी जोडून घेणं आणि मुख्य म्हणजे आपल्याला वाटतं तसं राहणं, याबाबतीत संवाद सुरू केला. द्वारकांचा प्रवासही अचंबित करणारा. त्या दारू गाळण्याचं काम करायच्या. त्यांच्या जातीचं ते उपजीविकेचं एक साधनच आहे. त्या सांगतात, ‘‘खूप कमाई व्हायची. पैसा भरपूर. कधी कमी पडला नाही. पण काहीतरी कमतरता सतत जाणवायची.’’ अरुण जाधव या त्यांच्या लहानपणीच्या वर्गमित्रामुळे ‘ग्रामीण विकास केंद्र’ या अरुण यांनी सुरू केलेल्या संस्थेत काम करायला द्वारका यांनी सुरुवात केली. काम भटक्या-विमुक्त समूहाबरोबर होतं. मग ‘ग्रासरुट्स नेतृत्व विकास कार्यक्रमा’त त्या आल्या. महिना ३००० रुपये मानधन म्हणून मिळायचे. त्यांनी अक्षरश: हजारोंनी पैसे मिळवून देणारं दारूचं काम बंद केलं. द्वारका सांगतात, ‘‘या ३००० रुपयांत मिळणारा सन्मान त्या हजारो रुपयांत नाही! माझ्या डोळय़ांसमोर सगळं आहे.. माझ्या आयुष्यात पूर्वी मी काय काय सहन केलं.. भांडण, हल्ले, अन्याय, पाण्यासाठी संघर्ष, सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे आपण ‘क:पदार्थ’ असल्याची वागणूक. आमच्या माणसांना आमची काही किंमतच नाही असं वाटायचं.’’ संघटनेच्या कामातून मिळणारा सन्मान आणि वागणूक जाणवली आणि हेच काम करायला पाहिजे असं वाटायला लागलं.’’
द्वारका भटक्या-विमुक्त समूहाबरोबर महाराष्ट्रभर चाललेल्या कामात सहभागी आहेत. ‘इमान जाळण्या’च्या वेळी त्यांना समूहानं ‘धंदा करणारी’ असं म्हटल्यामुळे त्या दु:खी झाल्या होत्या, उसळून गेल्या होत्या. अलीकडे एकदा गप्पा मारताना म्हणाल्या, ‘‘आता मला धंदा करणारी म्हटलं तरी वाईट नाही वाटणार. बायकांच्या प्रश्नांबद्दल माहितीच काय होती मला तेव्हा?’’
माझ्या लहानपणी आमच्या चाळीत एक विधवा आजी राहायच्या. आम्ही कधीही त्यांना घराबाहेर पहिलं नाही. लाल रंगाच्या आलवणात कधी कधी दिसायच्या. त्यांच्या घरी बाकी कुणी नसताना मुद्दाम कडी वाजवून पळून जाण्याचे प्रकार केले जायचे. त्यांना त्रास द्यायचा, घाबरवायचा उद्देश. तेव्हा काही कळत नव्हतं आणि कुणी समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला नाही. ‘असं करू नका आणि का करू नका,’ हे कधी कळलंच नाही. आज तो खेळ भयानक क्रूर वाटतो. त्या आजी घरच्यांच्याही आणि दारच्यांच्याही खिजगणतीतच नव्हत्या!
हेही वाचा >>> शोध आठवणीतल्या चवींचा! : वैदर्भीय पदार्थाची नवलाई!
अनितांना समर्पणात गुंतवायचं किंवा या आजींना विद्रूप करून घराबाहेर जाऊ द्यायचं नाही किंवा चांगले कपडे घातले म्हणून द्वारकाला समाजानं ‘इमान जाळायला’ लावायचं.. हे सगळे प्रकार म्हणजे एकाच माळेचे मणी! कारण त्यांना बायकांच्या लैंगिकतेवर ‘ताबा’ मिळवायचा आहे.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. स्त्रियांच्या प्रत्येक बारीकसारीक व्यवहारावर समाजाची केवढी करडी नजर असते! आणि सगळय़ाची नीती-अनीतीमध्ये वर्गवारीही. पुरुषांबद्दल असं असतं का? बायको नसलेले पुरुष आपल्याला ओळखायला तरी येतात का? त्यांच्या संरक्षणाच्या काळजीनं कुणाची झोप उडते? उलट ‘आता हा बिचारा एकटा आयुष्य कसं घालवणार’ या विवंचनेत सगळी का असतात? त्याच्यासकट सगळा गोतावळा त्याचं पुन्हा लग्न होण्यासाठी का प्रयत्नशील असतात? आणि कुणाला त्यात वावगं का वाटत नाही? कारण पुरुष, स्त्री, पारिलगी हे सगळे ‘माणूस’ आहेत, पण या सगळय़ांच्या बाबतीतल्या लैंगिकतेच्या समाजाच्या मनातल्या ‘प्रमाणमान्यता’ वेगळय़ा, त्यांच्यातली क्रमवारी (hierarchy) वेगळी. नैतिक-अनैतिक, नैसर्गिक-अनैसर्गिक ठरवण्याची सगळी सूत्रं पुरुषांच्या हाती!
शरीरभान आणि शारीरभानाच्या नवजाणिवांचा स्पर्श आणि आकलन झालेल्या मैत्रिणी लैंगिकतेचा हा पट पलटवण्याची सुरुवात करतील. ना. धों. महानोर यांच्या शब्दांत तेव्हा ‘नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं, अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात’
असं त्यांना होईल का?
(या लेखासाठी नवायन संस्थेच्या शीतल साठे यांचे सहकार्य झाले आहे.)
coro.grassrootfeminism@gmail.com