वैशाली जोशी-नगरकर
आज लेकीच्या शाळेत कार्यक्रम होता नि त्याच वेळी ऑफिसमध्ये वरिष्ठांचं प्रेझेंटेशन. रेवतीची अवस्था द्विधा झाली. निघावं तर वेळ झाल्यावर निघूनही सवलत घेतल्याचा आरोप आणि न जावं तर मुलीचा हिरमुसलेला चेहरा समोर दिसायला लागला. दोन्ही बाबतींत तिच्या मनात अपराधभाव दाटून आला नि ती विचारात पडली… काय करावं?
रेवती आपल्या जागेवर येऊन लॅपटॉपसमोर डोळे मिटून काही क्षण शांतपणे बसून राहिली. अजूनही डोक्यामध्ये नुकतेच पाहिलेले आणि ऐकलेले केआरए, इम्परेटिव्ह, टार्गेट्स, इबिट्डा हेच घोळत होते. आतल्या आत कुठेतरी अपराधी वाटत होतं. आपण आपली नोकरी, पद, जबाबदारी याला योग्य न्याय देत आहोत ना? हे स्वत:च स्वत:शी पडताळून पाहणं, स्वत:ला पटवणं चालूच होतं.
शेवटी डोक्यातले विचार झटकून ती धावतच ऑफिसबाहेर पडली…उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावरची नोकरी, बढत्या, त्याबरोबरच प्रेमविवाह, २ वर्षांनी मूल, नवऱ्याची बदली, नवे शहर, नवे घर या सगळ्याबरोबर पळता पळता तिची तारांबळ उडत होती. रोज सकाळी मुलीला सोडून ऑफिसला येताना एकदम टिपिकल आईसारखं तिला भरून वगैरे यायचं. तरी रोहनसारखा आजकालच्या काळातला समंजस जोडीदार असल्यामुळे त्याची कायम साथ असायची. रोज तोच मनालीला बाईच्या मदतीनं तयार करून ‘डे केअर’मध्ये सोडायचा. संध्याकाळी रेवती सहापर्यंत तिथे पोचून तिला घरी आणायची.
पण तिकडे सहापर्यंत पोचण्यासाठी तिला कायमचं वेळापत्रक बदलून घ्यावं लागलं होतं; ज्याला कार्पोरेट भाषेत ‘कन्सेशन’ असं नाव होतं. त्याचा रेवतीला खूपच त्रास व्हायचा. तेव्हापासून स्वत:ला सिद्ध करण्याची तिची अखंड धडपड सुरू झाली होती. हे सिद्ध करण्याचा खटाटोप की, जरी मी लवकर, खरं तर वेळेनुसारच, निघाले तरी कामात कसलीही तडजोड केलेली नाही, ते अपेक्षेप्रमाणे पूर्ण केलेलं असतं. सहाच्या पुढे जरी ती घरी पोचली तरी परत ‘लॉग इन’ करण्याची घाई, हे दाखवायला की, ती जरी घरी गेलेले असले तरी कायम तयार असते कंपनीच्या कामाकरता. आता मनालीही अडीच वर्षांची झाली होती. त्यामुळे नुकतंच तिचं नर्सरी वगैरे सुरू झालं होतं. या सो कॉल्ड टायमिंग कन्सेशनमुळे यंदा रेवतीच्या बढतीच्या संधी कमी झाल्या होत्या. त्यामुळे रेवतीलाही नोकरी बदलावीशी वाटू लागली होती. तशीही इकडे चार वर्षं झाली होतीच, बदल हवाच होता.
आज ‘लीडरशिप टीम’मधल्या दोन वरिष्ठांचं प्रेझेन्टेशन होतं काही ठरावीक लोकांसाठी. शंभरएक लोक असतील. पण वेळ जरा उशिराची होती, म्हणजे रेवतीच्या वेळेबाहेरची. आणि नेमकं आज मनालीच्या शाळेत तिच्या आईलाच बोलावलं होतं. कालच्या वहीत तसं लिहून आलं होतं. काहीतरी कार्यक्रम होता छोटासा. आईबरोबर मुलांना सहभागी होण्याचा. बहुधा गाणं, नाच किंवा एखादा खेळ असंच काहीतरी. रेवती घुटमळली… द्विधा मन:स्थिती झाली होती तिची. इथून लवकर निघणं म्हणजे परत ‘कन्सेशन’ घेणं आणि वेळेत शाळेत न पोचणं म्हणजे स्वत:च्या मनाविरुद्ध वागणं, कारण तिलाही आज मनालीबरोबर तिच्या शाळेच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. तिची सहकारी, अनन्याचा सल्ला तिला आठवला, ‘‘वेळेत निघून जा, अशा मीटिंग्स काय नेहमीच होत राहतात ऑफिसमध्ये.’’ रेवती तरीही विचारात गढली होती, काय करावं? खरं तर शाळेचा कार्यक्रमही काही इतका मोठा किंवा महत्त्वाचा बिलकूल नव्हता. असे काहीतरी नेहमीच होत असतं.
काही वेळा ती आणि रोहन हेसुद्धा म्हणायचे की, रिकाम्या लोकांचे उद्याोग आहेत नुसते. ज्यांना वेळ असतो ते अशा सगळ्या गोष्टींना हजर राहतात. पण हे असं म्हणणं स्वत:चं समर्थन करणं होतं का? अपराधगंड न येऊ देण्याकरता? पण खरंच कुठून आणायचा वेळ? स्वत:चं करिअर पुढे सुरू ठेवणं चुकीचं आहे का? करिअर आणि मूल दोन्ही एकत्र नाही का असू शकत? आपण जर इतरांइतका पगार घेतो तर कामालाही योग्य न्याय देणं चुकीचं आहे का? नक्की कोणत्या गोष्टींचा अपराधगंड योग्य आहे? हा आटापिटा आहे का ‘बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स’ साध्य करण्याचा? रेवती विचार करून थकली आणि वेळ झाल्यावर मीटिंगला येऊन बसली.
दोन्ही वरिष्ठांचं बोलणं अतिशय महत्त्वाचं आणि प्रभावी होतं. ती रंगून गेली त्या माहितीमध्ये, चमकदार प्रेझेन्टेशनमध्ये, प्रश्नोत्तारांमध्ये. आणि अचानक आठवण येऊन तिनं घड्याळ पाहिलं आणि ती सतर्क झाली, निघायला हवं म्हणत काहीशा अनिच्छेनेच ती त्या बैठकीतून बाहेर पडली. मग स्वत:च्या जागेवर येऊन तिने लॅपटॉप घेतला, पर्स घेतली, मॅनेजरला शोधून, ‘निघते’ असं कळवलं आणि ती निघाली. त्याच्या चेहऱ्यावरचे ‘हे हिचं नेहमीचंच’ हे भाव तिनं सहज वाचले आणि त्याकडे दुर्लक्ष केलं. तरी त्याला तिनं मनालीला डॉक्टरकडे न्यायचं आहे असं सांगितलंच. विचारांच्या आवर्तनात ती लिफ्टने खाली आली आणि पार्किंगमधली गाडी सफाईने बाहेर काढली. घड्याळात पाहून आता एक तासात पोचू बहुतेक असा मनाशी विचार केला. प्रत्यक्ष निघाल्यावर मात्र तिला हा खटाटोप अनाठायी वाटू लागला.
अशा किती कार्यक्रमांत आपण सहभागी होऊ शकणार आहोत? आणि का धावाधाव करायची? शाळांनाही माहीत आहे आजकाल दोघेही नोकरदार असतात तरीही असे कार्यक्रम ते का ठेवतात? मग तिला आठवली शाळेच्या सुरुवातीला सांगितलेली माहिती… ‘‘आम्ही असे काही कार्यक्रम आयोजित करतो ज्यामध्ये घरातल्यांचाही सहभाग अपेक्षित असतो, कारण ही मुले लहान असतात, त्यांचा घरातल्या व्यक्तीबरोबर जास्त सहवास असल्याने ते सहजपणे वागतात. शिवाय आम्हाला असंही वाटतं की, घरच्यांनीही मुलांकरता वेळ द्यावा, त्यांचे कार्यक्रम बघावेत, त्यांना प्रोत्साहन द्यावं, जसं पूर्वीचे पालक करायचे.’’
जाऊ दे, आता निघालोच आहोत तर मजा तरी करू या, असं म्हणत रेवतीनं मनातले विचार बाजूला सारले आणि ती शाळेत येऊन पोचली. मनालीच्या वर्गाच्या दारातून ती आत डोकावून पाहू लागली. जवळपास सर्वच मुलांच्या आया आलेल्या होत्या. कोणता तरी खेळ चालला होता. एक गोंडस चिमुकला आईबरोबर लाजतबुजत बडबडगीत म्हणत होता. रेवती मनालीला शोधत होती. खेळणाऱ्या मुलांमध्ये ती नव्हती. तिने आणखी इकडे-तिकडे पाहिलं तर तिला अचानक ती दिसली. तिच्या शिक्षिकेच्या बाजूला बसलेली, शेजारी आणखी एक छोटा मुलगा, दोघेजण तोंडात बोट घालून उदास चेहऱ्यानं बसलेले, जणू कुणीतरी शिक्षा दिली आहे. तिला एकदम भरून आलं.
ती पुढे झाली… तेवढ्यात मनालीचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि अचानक तिला आलेलं बघून ती धावत आली. चेहरा एकदम हसरा, उत्साही, आश्चर्यचकित आणि प्रचंड आनंदी! रेवतीनं तिचा हात पकडला, त्याबरोबर मनाली धावत दुसऱ्या बाजूला तिला खेचत घेऊन गेली. शिक्षिकेच्या बाजूला बसलेला तो छोटा अधिकच हिरमुसून गेला. रेवती मनालीबरोबर खेळ खेळण्यात, कविता म्हणण्यात रमून गेली आणि मनाली तर इतकी आनंदी होती की, तिने रेवतीचा हात एक क्षणभरही सोडला नव्हता.
शाळा सुटली. मनालीला गाडीत बसवून रेवती घराकडे निघाली. अत्यंत समाधानी, आनंदी… आज वेळेत येऊन पोचल्याचं तिला सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. राहून राहून तिला शिक्षिकेच्या बाजूला बसलेल्या मुलाचा हिरमुसलेला चेहरा आठवत होता. आज जर मनालीच्या शाळेत पोचलो नसतो तर किती मोठी चूक करणार होतो आपण, असं तिला वाटून गेलं.
मनाली इतकी लहान आहे की तिला नेमकेपणाने हे सांगताही आलं नसतं की तिनं आईची किती किती वाट पहिली, तिला किती मिस केलं आणि ती नसल्यामुळेच तिला कसं बाजूला बसवलं होतं, कार्यक्रमात सहभागीही कसं होता आलं नव्हतं. या विचारांसरशी रेवतीच्या मनातला सगळा गोंधळ दूर झाला होता. आता कोणताही अपराधभाव नव्हता. खोटं बोलल्याचा व लवकर नव्हे वेळेवर निघाल्याचा, तिनं आज योग्यच केलं हा ठाम विश्वास तिला वाटत होता. घर आल्यावर रेवतीनं मनालीला उचलून घेतलं, मनालीनं हर्षभराने तिला मिठी मारली आणि दोघी आनंदातच घरात शिरल्या…
उतरवा तुमचं जग लघुकथेतून…
प्रत्येकाच्या मनात एक कथा दडलेली असते. कधी पाहिलेला प्रसंग, घेतलेला अनुभव मेंदूच्या कप्प्यात खोल रुतून बसलेला असतो. कधी तरी मग कल्पनेचा वारू उधळतो आणि मग अलगद उतरते ती कथा तुमच्या मनात. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तुमच्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अशाच पाठवत राहा तुमच्या नव्या कोऱ्या, भावपूर्ण, प्रवाही, आशयघन, आधुनिक लघुकथा. १२०० शब्दांपर्यंतच्या. उत्कृष्ट आणि शब्दमर्यादा पाळणाऱ्या कथेला मिळेल प्रसिद्धी ‘लोकसत्ता चतुरंग’मधून. या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. कथा फक्त आणि फक्त स्त्रियांनी पाठवायच्या आहेत. इमेल पाठवताना सब्जेक्ट मध्ये ‘लघुकथा २०२६’ असा उल्लेखआवश्यक तसेच ओपन किंवा वर्ड फाइल मध्ये यापैकी फक्त एकाच इमेलवर लघुकथा पाठवावी, इमेल chaturangexpressindia.com अथवा chaturang.loksatta@gmail.com
● v. y. joshi@gmail.com

