राधिका गोडबोले
‘निसर्गापासून प्रेरित, हवामानासाठी, आपल्या भविष्यासाठी…!’ हे कालच झालेल्या ‘जागतिक पर्यावरण दिना’चं (५ जून) पर्यायाने यंदाचं घोषवाक्य आहे. सतत परदेशाशी तुलना करायची गरज नाही; परंतु सर्वाधिक लोकसंख्येच्या आपल्या देशात प्रदूषण होणारच असा नकारार्थी विचार न करता या लोकसंख्येचाच वापर करून निसर्ग सर्वांगाने आपल्याला जे देत असतो ते सांभाळण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला तर आपणही पर्यावरण दिन आनंदाने साजरा करू…

‘‘बांबूचे घर, बांबूचे दार, बांबूची जमीन पिवळीशार. बांबूच्या वनात वार्‍याचा सूर, जिवाला नेतो भुलवुनी दूर…’’प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचं हे गाणं कॅनडातल्या व्हँकुव्हरच्या ट्रेक, ट्रेल्स आणि इथल्या मुलांच्या छोट्या छोट्या खेळण्याच्या बागा बघून नेहमी आठवतं. सगळीकडे बांबू नाही, पण लाकडाचा भरपूर वापर दिसतो. इथं जिने, छोटे पूल, मुलांची खेळणी, बागेत अथवा इतरत्र बसायला बाकाच्या आकाराचे सुबक कापलेले ओंडके, त्यातही साध्या, पण कल्पक उपायांनी कमी-जास्त उंची करून विविध आकार देऊन आणलेलं सौंदर्य दिसतं. बरं, यासाठी झाडांची कत्तल वगैरे होत नाही, हे महत्वाचं.

भारतासारखी सुपीक जमीन इथं नसली तरी इथं सर्वत्र मुबलक, उंचीची स्पर्धा करणारी, अवाढव्य झाडं आहेत. आणि यात भर म्हणून बरीचशी झाडं लावली जातात. वादळाने इथल्या असंख्य पायवाटेतली (ट्रेल्स)मधली झाडं उन्मळून पडतात तरी ती चालण्याच्या मार्गातून फक्त बाजूला करून ठेवली जातात, नैसर्गिकरीत्या त्यांची माती, खत व्हावं म्हणून. अशाच काही झाडांपासून सिमेंट, प्लास्टिक याला पर्याय म्हणून विजेचे खांब, बाक, जिने, खेळणी बनवली जातात. इथं बैठी घरं, बंगले यांचं घनदाट जैविक कुंपण ‘इस्टर्न रेड सिडर’, ‘व्हाइट स्प्रूस’ आणि ‘सायप्रस’ अशा झाडांचंच असतं. मात्र इतर बाबतीत पदोपदी प्लास्टिकचा वापर पर्यावरणप्रेमींना अस्वस्थ करतो. असं असलं तरी रस्त्यावर किंवा कुठंही प्लास्टिकचा कचरा दिसत नाही, त्यामुळे त्याचा पुनर्वापर होत असावा एवढं समाधान या देशात नक्कीच आहे.

केवळ पर्यावरणदिनीच नव्हे, तर झाडं लावण्याचं आणि जपण्याचं काम इथं नेहमीच होतं. थंडी, वारा, सतत अधूनमधून रिमझिम पाऊस यातही निसर्गप्रेमी मोटार, सायकल अथवा पळत भटकायला जातात. तंबू टाकून रानावनात राहतात. मात्र त्यांच्या मुक्कामी कितीही मुबलक लाकडं, फांद्या एवढंच नव्हे हजारोंनी पडलेले कोन असले तरी ते शेकोटीत, चुलीत न जाळता तिथं मिळणारी ‘खास’ लाकडंच जाळण्याचा प्रामाणिकपणा इथं पाहायला मिळतो.

पर्यावरणीय समस्या आता इथंही जाणवू लागल्या आहेत. भारतात ते प्रमाण अर्थातच जास्त आहे. या वर्षी खूपच उन्हाळा आहे, असं दरवर्षीच म्हटलं जातंय, त्यावरून ‘रस्त्यावर पापड भाजण्यासारखे’ विनोदही केले जातात. मात्र पर्यावरण रक्षणासाठी साधे उपाय नागरिक स्वत: करत नाहीत. ‘सरकारने काही केलं पाहिजे…’ हे जणू प्रत्येक समस्येचं घोषवाक्य आहे.

जगभरात १९७२ पासून ‘पर्यावरण दिन’ साजरा केला जातो, ‘इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट, फॉर फ्युचर…’ अर्थात ‘निसर्गापासून प्रेरित, हवामानासाठी, आपल्या भविष्यासाठी…!’ हे या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाचं, अर्थात वर्षाचं घोषवाक्य आहे. हवामान संरक्षणासाठी निसर्गाचं जतन, संवर्धन करणं ही काळाची गरज आहे.

या वर्षी पर्यावरण दिनाचं यजमानपद अझरबैजान या देशाकडे आहे. जैवविविधता असलेला हा देश. अझरबैजानने संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेचं आयोजन करून जागतिक हवामान बदलाच्या मुद्द्यावर आर्थिक निधी उभारणी, मिथेन उत्सर्जन कमी करणं आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोतांचा (Renewable energy) प्रसार यावर भर दिला आहे. अझरबैजानच्या राष्ट्रीय मोहिमेत हवामान बदल आणि परिसंस्थेची हानी थांबवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं असून निसर्गावर आधारित उपायांचा वापर करून पर्यावरण प्रदूषणविरहित कसं करता येईल, हे अधोरेखित केलं आहे. प्रत्येक देशाने हरित ऊर्जा वाढवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं अशा योजना आखल्या पाहिजेत. हवामान बदलाच्या समस्यांचा उपाय निसर्गच आपल्याला दाखवत असतो. वाढती जंगलतोड, धूर ओकणारे, नद्यांमध्ये रासायनिक घटक असलेलं पाणी सोडणारे कारखाने, वाढती लोकसंख्या, वाहने आणि प्लास्टिकचा महाप्रचंड कचरा अशा कारणांनी हवामान दूषित होत आहे, याच्या सूचना-इशारे निसर्गाकडूनच मिळत आहेत. वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, वितळणार्‍या हिमनद्या, बर्फाच्या टोप्या, समुद्राची वाढती पातळी, अकाली पाऊस, पूर, दुष्काळ, जंगलातले वणवे हे सगळे सावधानतेचे इशारेच आहेत.

अनेक देशांमधून प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॅनडात व्हँकुव्हरमध्ये एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक पिशव्या आणि स्ट्रॉ यांसारख्या वस्तूंवर बंदी आहे. इथं पुनर्वापर प्रणालीने प्रक्रिया करून नवीन वस्तू बनवल्या जातात. इथं नळाद्वारे येणारं पाणी घरातल्या फिल्टरशिवाय थेट पिण्यायोग्यच असतं, इतकं ते नितळ आणि शुद्ध असतं. बर्फाचं वितळलेलं पाणी वापरून, त्यातून वीज निर्माण करून, संपूर्ण शहर चालू शकते हे इथल्या ‘बीसी हायड्रो’ या कंपनीने दाखवून दिलं आहे. कारखान्यांचं पाणी, सांडपाणी थेट नैसर्गिक जलस्रोतात मिसळू नयेत यासाठी इथं कडक कायदे आहेत. बहुतेक ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते जलस्रोतात सोडलं जातं. कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी करण्यासाठी आधुनिक प्रणाली वापरली जाते, विद्युत आणि हायब्रीड (इंधन आणि विजेवर चालणारी दुहेरी) वाहने वापरण्यास प्रोत्साहन दिलं जातं. वाहनांचा धूर नियंत्रित करण्यासाठी ‘कॅटॅलिक कन्व्हर्टर’चा वापर केला जातो. इथं वायू गुणवत्ता सूचकांक साधारणपणे ५ ते ४० असतो.

भारतातल्या शहरात तो साधारणपणे १५० ते ४०० असतो. केवढी ही तफावत! जमीन आणि लोकसंख्या याचं प्रमाण इथं भारतापेक्षा उलटं आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी आपल्याला हे मोठं आव्हान आहे, पण नागरिकांनी ठरवलं तर लोकसंख्याच आपलं बळ ठरू शकतं. ‘मेरे देश की धरती सोना उगले’ अभिमानानं म्हणायचं असेल तर धूर ओकणारी वाहनं, कारखाने यावर उपाय करायला हवा. धरतीवर पडणारं प्लास्टिक थांबायला हवं. एका प्लास्टिकच्या पिशवीनं काय होतंय, पापणी लवताच दारात प्लास्टिकच्या वेष्टनात बांधलेले हवे ते पदार्थ देणार्‍या अनेक सेवा येताएत! मग मागवा ऑनलाइन, कोण जाईल दुकानात? वाहनाची ‘टाकी फुल’ करून उगाच लांबवर चक्कर मारून येऊ, कचरा जाळून टाकू, हे आणि असं असंख्य प्रकारचं प्रदूषण टाळलंच पाहिजे. पेट्रोल, गॅस महाग म्हणून तरी कमी वापरा हेही सांगावं लागतं, गाडी लावताना सावली शोधतो, मग सावली देणारी झाडंही लावली पाहिजेत. पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात नवं झाड लावून फोटो काढण्यापेक्षा त्याचं मोठं झालेलं रोपटं बघण्यातही आनंद मिळतो,
तो अनुभवावा.

आपल्याकडेही आता अनेक नागरिक छतावर सोलर लावून अपारंपरिक ऊर्जेचा वापर करीत आहेत, सायकल वापरण्याकडे कल वाढतो आहे, प्लास्टिक अथवा इतर प्रदूषण टाळत आहेत. अनेक समूह वृक्षारोपण करतात, प्लास्टिक कचरा उचलून स्वच्छता राखतात, कोणी झाडवेडा रस्त्यावरची झाडं दत्तक घेतल्यासारखी उन्हातान्हात बाटली-किटलीनं त्यांना पाणी घालतो. हे खारीचे प्रयत्न लक्षात घेऊन त्यांच्या पाठीवर हात फिरवण्याबरोबरच त्यांचं अनुकरण मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. असं झालं तर पर्यावरण दिन आनंदाने साजरा करता येईल, निराशेने नाही. पुढच्या पिढ्यांना स्वच्छ हवेत मोकळा श्वास घेता यावा यासाठी आता निसर्गाचं ऐकायलाच हवं.

radhikargodbole@gmail.com