प्रसाद शिरगावकर

आनंदाची व्याख्या करायला सांगितलं तर पटकन काही सुचणार नाही.. शिवाय प्रत्येक जण आपापल्या परीनं वेगळी व्याख्या करेल.. परंतु खरोखरच अशी व्याख्या करण्याची आणि आनंदी होण्यासाठी ठरावीक टप्पे निश्चित करण्याची गरज आहे का?.. आनंदाचं गणित असं नाहीच! आयुष्यात प्रत्येक पावलावर आनंदनिधान गवसू शकेल.. कसं?.. नुकत्याच झालेल्या ‘जागतिक आनंद दिना’च्या (२० मार्च) निमित्तानं.

singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
7th March After 18 Years Budh Rahu Yuti In Meen Rashi These Five Zodiac Signs Kundali 360 degree Turn Can Become Crorepati
१८ वर्षांनी बुध-राहू युती बनल्याने एका झटक्यात ‘या’ ५ राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही होणार कोट्याधीश?
How Long Men & Women Shall Exercise in A week to Reduce Threat Of Death by 24 Percent New Study US Suggest How To Live Long
महिलांनी आठवड्यातून केवळ ‘इतकी’ मिनिटे व्यायाम केल्यास मृत्यूचा धोका होतो २४ टक्के कमी; तर पुरुषांना..
How to deal with a difficult boss
तुमचा बॉस निर्दयी स्वभावाचा आहे का? खडूस बॉसबरोबर कसे वागावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स….

आपल्या सगळय़ांच्या आयुष्यामध्ये आनंदी होण्याचे अनेक लहानमोठे प्रसंग आयुष्यभर घडत असतात. लहानपणी शाळेत एखादं छोटं बक्षीस मिळाल्याचा आनंद, परीक्षेत चांगलं यश मिळाल्याचा आनंद, मग नोकरी लागल्याचा, पहिल्या पगाराचा आनंद, प्रेमात पडल्याचा, आपल्या प्रेमाचा स्वीकार झाल्याचा आनंद, लग्न केल्याचा, संसार सुरू झाल्याचा आनंद.. पुढे स्वत:चं घर, स्वत:ची गाडी, नोकरीतली प्रगती, व्यवसायातलं यश या सगळय़ाचे आनंद.. मुलं-बाळं होणं, मग त्यांची प्रगती, त्यांचं यश, या सगळय़ानं आपल्याला होणारा आनंद.. आणि उतारवयात नोकरी-व्यवसायातून निवृत्त होऊन निवांतपणे आयुष्य जगू शकलो तर त्याचा आनंद. या यादीतल्या सर्व गोष्टी म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यातले सरधोपट असे मैलाचे दगड असतात! प्रत्येक मैलाचा दगड आपण गाठला की आनंद होतोच. यातले बहुसंख्य आनंदाचे क्षण हे बहुसंख्य लोकांना आयुष्यात कधी ना कधी मिळतातच. मात्र अनेक लोकांना यातले काही दगड कधीच मिळत नाहीत. जे मिळालं आहे त्याचा जसा आनंद असतो, तसंच जे मिळालं नाही किंवा मिळू शकणार नाही त्याची एक रुखरुख किंवा बोचरी वेदनादेखील आपल्या हृदयात कायम सलत असते.

आनंद आणि दु:ख यांच्या बाबतीतली एक गंमत अशी आहे, की आनंद हा क्षणभंगुर असतो. कितीही मोठय़ा यशामुळे किंवा प्रसंगामुळे आनंद झाला, तरी तो हातातून अलगदपणे निसटून जाणाऱ्या वाळूसारखा कधी निसटून जातो हे लक्षातही येत नाही. आनंदाच्या तुलनेत दु:ख मात्र जास्त बोचणारं आणि जास्त काळ आपल्या हृदयात ठाण मांडून बसणारं असतं. आनंद क्षणभंगुर असल्यानं आनंद मिळवण्याचा आपण सतत प्रयत्न करत राहतो. त्यातही, मोठय़ा गोष्टींमधून मिळणाऱ्या मोठय़ा आनंदाच्या मागे आपण आयुष्यभर धावत राहतो. अनेकदा असा मोठा आनंद आपल्याला मिळतोही, मात्र मिळालेला आनंद काही क्षणांत हातातून निसटून जातो आणि मग आपण पुन्हा एकदा दुसऱ्या एखाद्या मोठय़ा आनंदाच्या मागे धावायला लागतो. हे सगळं करताना, काही क्षण थांबून, खरंच सदैव मोठय़ा आनंदांच्या मागे धावत राहणं हे शहाणपणाचं आहे का? हा प्रश्नही आपण स्वत:ला विचारत नाही. फक्त मोठी सुखं, मोठे आनंद हे मिळवण्याऐवजी साध्या सोप्या पद्धतीनं साधे साधे आनंद मिळवत राहण्याचा काही शाश्वत असा मार्ग आहे का? याचाही आपण विचार करतोच असं नाही.

आयुष्यात मोठय़ा घटनांमुळे, मोठय़ा यशामुळे जसे आनंद मिळतात तसेच छोटय़ा छोटय़ा गोष्टींमुळे आणि साध्या साध्या घटनांमुळेही आनंद मिळू शकतात. हेही तात्पुरते किंवा क्षणभंगुरच असू शकतात, मात्र हे रोजच्या आयुष्यात अन् अक्षरश: रोजच्या रोज मिळू शकतात. असे आनंद कोणते आणि ते आपण कसे मिळवू शकतो?..

आस्वादातला आनंद
कडकडून भूक लागलेली असताना समोर आलेला गरमगरम वरणभात खाताना होणारा आनंद आपण सगळय़ांनी कधी ना कधी अनुभवलेला असतो. किंवा कधी लांबून प्रवासाहून आल्यावर, रात्री-अपरात्री भूक भागवण्याकरता खाल्लेली ‘मॅगी’ स्वर्गसुख देऊन गेलेली असते. सणासुदीचं गोडधोड जेवण आपल्याला आवडतंच आणि वेगवेगळय़ा हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळय़ा प्रकारचे पदार्थ चाखणंही आपल्याला आवडतं. जेवणाच्या आस्वादाचा आनंद हा प्रत्येकच व्यक्तीला अगदी सहजपणे साध्य होणारा आनंद असतो. प्रत्येकाला दिवसातून किमान दोनदा तरी जेवावंच लागतं. हे जेवण फक्त ‘जाणिजे यज्ञकर्म’ म्हणून करण्याऐवजी समोर जे आहे ते मनापासून आस्वाद घेत खाणं हे आपण सगळे जण करू शकतो. हा रोज दोन वेळा अत्यंत शाश्वत आनंद मिळवण्याचा मार्ग असतो. अर्थात, आस्वाद हा पण फक्त अन्नाचाच घेतो असं नाही, तर कलाकृतींचाही घेऊ शकतो. एखादी सुंदर कविता, सुरेल गाणं, खिळवून ठेवणारी कादंबरी, रोमांचक सिनेमा, अशा कोणत्याही लिखित अथवा दृश्य माध्यमातून आपल्यासमोर आलेल्या कलाकृतीचा मनमुराद आस्वाद घेऊन त्यातून अगदी साधा, सोपा आणि सहज मिळणारा आनंद आपण सगळेच घेऊ शकतो.

निर्मितीतला आनंद
आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंपासून आपल्या हातांनी नवीन काही तरी तयार करणं ही एक विलक्षण आनंद देणारी गोष्ट असते. अगदी साधं कागदापासून केलेलं विमान असो किंवा स्वयंपाकघरात केलेला एखादा नवा पदार्थ. दिवाळीतला आकाशकंदिल असो किंवा पुठ्ठय़ापासून केलेलं चिमण्यांसाठीचं घरटं. अशा कोणत्याही आपण निर्माण केलेल्या गोष्टीनं आपल्याला आनंद होतो. निर्मितीतला आनंद मिळवण्यासाठी काही तरी भव्यदिव्य प्रचंड मोठं प्रोजेक्टच करावं लागतं असं नाही, तर रोजच्या आयुष्यात अनेक साध्या साध्या, छोटय़ा छोटय़ा गोष्टी आपण तयार करत राहू शकतो. आपलं घर छोटंसं असेल अन् त्याला छोटीशीच टेरेस असेल, तरी त्यात चार कुंडय़ा ठेवून आपण बाग तयार करू शकतो. घरातल्या ओल्या कचऱ्याचं घरातल्या घरातच कंपोस्ट खत करू शकतो, साधे टी-शर्ट रंगवून ‘डिझायनर’ टी-शर्ट करू शकतो. जुन्या पडद्यांच्या किंवा चादरींच्या पिशव्या करू शकतो. स्वयंपाकघरात तर आपण अनंत नव्या नव्या गोष्टी सतत तयार करत राहू शकतो. ही प्रत्येक गोष्ट तयार करताना आनंद वाटतो, तयार झाल्यावर आनंद वाटतो आणि तयार झाल्यानंतर तिचा आस्वाद घेताना किंवा तिच्याकडे नुसतं बघतानाही, ‘हे कसलं भारी काही तरी केलंय मी माझ्या हातांनी!’ असं स्वत:ला सांगून तो आनंद पुन्हा पुन्हा अनुभवता येऊ शकतो! निर्मितीच्या आनंदातला एक उप-आनंद म्हणजे ‘दुरुस्तीचा आनंद’. घरातल्या कोणत्याही छोटय़ा-मोठय़ा गोष्टी बिघडल्या किंवा तुटल्या, तर त्या जोडणं किंवा दुरुस्त करणं, हीदेखील अतिशय समाधान देणारी गोष्ट असते.

शिकण्यातला आनंद
कोणतीही नवीन गोष्ट शिकणं ही अत्यंत आनंददायी प्रक्रिया असू शकते हे आपल्याला कुणीही कधीही शिकवलेलं नसतं! नवी माहिती, नवं ज्ञान मिळवणं, आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं किंवा काही नवं कौशल्य विकसित करणं, या फक्त विद्यार्थिदशेतच करायच्या गोष्टी नसून, त्या आयुष्यभर कधीही कोणत्याही वयात आपण करू शकतो आणि करायला हव्यात. एखादी नवी माहिती मिळाल्यानंतर वाटणारं, ‘अरेच्चा
हे असं आहे होय!’ किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर वाटणारं, ‘अरे, हे इतके दिवस कसं माहीत नव्हतं मला?’ किंवा एखादं नवं कौशल्य विकसित केल्यानंतर, ‘भारी, मला हेही जमू शकतं!’ हे असं वाटण्यामध्ये निखळ आनंद असतो. आपण सध्या अनुभवत असलेल्या तंत्रज्ञान आणि माहिती क्रांतीमुळे अनंत प्रकारच्या विषयांचं ज्ञान घेणं किंवा जे करावंसं वाटतं ते कौशल्य विकसित करणं हे खूप सहजसाध्य झालं आहे. मनात पडलेला कोणताही प्रश्न गूगल करणं, त्याविषयी इंटरनेटवरचे रिसोर्सेस वाचून, बघून, त्यातून त्या प्रश्नाची माहिती घेणं किंवा आपल्या उत्सुकतेचं शमन करणं कुणालाही करता येणं शक्य आहे. अगदी स्वयंपाकापासून ते कोणत्याही प्रकारचं वाद्य वाजवण्यापर्यंत आणि ओरिगामीपासून ते सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग करण्यापर्यंत असंख्य प्रकारची कौशल्यं शिकवणारे व्हिडीओज् यूटय़ूबवर अगदी सहज मिळू शकतात. मला नवं काही तरी शिकायचं आहे, अशी इच्छा असलेल्या कुठल्याही व्यक्तीला ते शिक्षण घेण्यापासून कुणीही आणि काहीही आता थांबवू शकत नाही. अशा प्रकारे जे शिकावंसं वाटतं ते शिकल्यानंतर मिळणारा आनंद कुणी हिरावूनही घेऊ शकत नाही.

सर्जनशील अभिव्यक्तीमधला आनंद
कोणत्याही प्रकारच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याची वृत्ती, स्वत:च्या हातानं आपल्या आयुष्यात नवं काही निर्माण करण्याची क्षमता आणि सातत्यानं नवनवीन काही शिकण्याची ओढ, या तिन्हीचा वापर करून आपण सर्जनशील अभिव्यक्ती करू शकतो. ‘सर्जनशील अभिव्यक्ती’ हा फार मोठा शब्द वाटतो. हे करायचं म्हणजे काही तरी भव्यदिव्य, महाकाव्य वगैरे आपण लिहावं की काय, असं वाटू शकतं. पण ते तसं नसतं! अगदी सोप्या शब्दांत सांगायचं, तर आपलं रोजचं आयुष्य खूप साध्या साध्या गोष्टींनी आणि कल्पकतेनं सतत सुंदर बनवत राहणं म्हणजे सर्जनशील अभिव्यक्ती. हे आपण निश्चितच करू शकतो. दारात काढलेल्या अत्यंत रेखीव रांगोळीपासून ते सोशल मीडियावर आपण लिहीत असलेल्या ‘स्टेटस अपडेटस्’पर्यंत अनेक ठिकाणी आपल्याला व्यक्त होण्याची संधी असते अन् आपण व्यक्त होत असतो. हे व्यक्त होताना आपण सर्जनशीलही राहू शकतो. या सर्जनशील किंवा कल्पक अभिव्यक्तीची भट्टी जेव्हा जमते नीट, तेव्हा त्याचा निखळ आनंद आपल्याला होऊ शकतो. गंमत अशी आहे, की सर्जनशील अभिव्यक्तीचा आनंद हा तिच्या निर्मात्याला होतोच, पण ती अभिव्यक्ती बघणाऱ्या, वाचणाऱ्या अन् तिचा आस्वाद घेणाऱ्या व्यक्तींनाही त्याचा आनंद होऊ होतो. वरच्या यादीतले पहिले तीन आनंद व्यक्तिगत आनंद आहेत. हे आनंद ते घेणाऱ्या व्यक्तीपुरते मर्यादित राहतात. मात्र सर्जनानं निर्माण होणारे आनंद हे मात्र संसर्गजन्य असतात! ते निर्माण करणाऱ्या व्यक्तीबरोबरच त्याचा आस्वाद घेणाऱ्या व्यक्तींपर्यंतही पोहोचत राहतात.

आनंद मिळवण्यातले अडथळे
तुलना करण्याची सवय किंवा वृत्ती हा आनंद मिळवण्यातला आणि आनंदी होण्यातला सगळय़ांत मोठा अडथळा. तुलना करणं याचा दोन वेगवेगळय़ा पद्धतीनं आनंदावर परिणाम होऊ शकतो. आपल्याला कोणत्याही प्रकारचं यश मिळाल्यानंतर किंवा आयुष्यात एखादा महत्त्वाचा मैलाचा दगड गाठल्यावर होणाऱ्या आनंदाच्या वेळी जर ‘इतरांच्या तुलनेत माझं यश’ असा विचार केला, तर आपला आनंद क्षणार्धात नाहीसा होऊ शकतो. परीक्षांमधले गुण, नोकऱ्यांमधले पगार, व्यवसायातलं यश, यांच्या प्रचंड मोठय़ा उतरंडी असतात जगात. त्या उतरंडींवर आपण निव्वळ माथ्यावर असण्याची शक्यता खूप कमी असते. आपल्या यशाची तुलना त्या उतरंडीत आपल्या वरचढ असणाऱ्या लोकांच्या यशाशी केली तर आपलं यश हे अत्यंत किरकोळ वाटून त्याचा आनंद नाहीसा होतो. आपल्या यशाची तुलना इतर कुणाच्या यशाशी न करता, स्वत:च्याच भूतकाळाशी केल्यास आणि इतर कुणाशी स्पर्धा न करता, स्वत:शीच करत राहिल्यास हा अडथळा दूर करता येऊ शकतो.

तुलनेचा दुसरा परिणाम आस्वाद, निर्मिती, शिकणं, सर्जन इत्यादी जे वैयक्तिक अथवा अ-स्पर्धात्मक आनंद आहेत त्यांच्याबाबतीतही होऊ शकतो. इथे आपल्याला आपल्या एखाद्या निर्मितीतून आनंद होत असताना, ‘माझा आनंद इतरांच्या तुलनेत कमी आहे का? इतर कुणी या गोष्टी करून, किंवा न करताही माझ्यापेक्षा जास्त आनंदी होतो आहे का?’ असे विचार मनात येत असतील तर त्यानंही आपल्याला होत असलेला निखळ आनंद नाहीसा होत राहतो. आनंद ही आपली व्यक्तिगत भावना आणि आंतरिक अवस्था असते, तिचं मोजमापही करता येत नाही आणि इतर कुणाशी तुलनाही करता येत नाही. करूही नये.

आनंदाच्या गावाला जाणारे अनंत रस्ते आपल्यासमोर हात जोडून उभे असतात. त्यातले एक वा अनेक मार्ग निवडत राहणं आणि निवडलेले बदलत राहणंही शक्य असतं. हे छोटय़ा छोटय़ा आनंदांचे रस्ते घेऊन त्यावर चालत राहायला धमाल येते! असं मार्गक्रमण करत असताना ‘मी कुठे तरी पोहोचल्यावरच आनंदी होईन’ असाही हट्ट न करता या अनंत रस्त्यांवरच्या प्रवासातला आनंद घेता येणं शक्य असतं. आणि फक्त उद्दिष्ट गाठण्यातलाच नाही, तर कोणत्याही प्रवासातलाही आनंद घेता येऊ शकणं हा आनंदी होण्याचा खरोखर शाश्वत मार्ग असतो.
prasad@aadii.net