कॅमेरा डोळ्यापुढे असला की समोर दिसेल त्याचं छायाचित्र काढता येतं, परंतु त्यामागे जर विचारी मन आणि संवेदनक्षम नजर असेल तर मात्र ते छायाचित्र वेगळीच उंची गाठतं. अशाच काही स्त्री छायाचित्रकार, हौसेचं रूपांतर त्यांनी व्यवसायात केलं. आणि सुरू झाला एक प्रवास, छाया-प्रकाशाच्या खेळाचा. त्यासाठी त्यांनी कधी आव्हानं स्वीकारली तर काही स्वीकारावी लागली. परंतु त्यातूनच त्या छायाचित्रापलीकडचा अर्थ शोधू लागल्या, त्याची कहाणी सांगत राहिल्या. नुकत्याच झालेल्या ‘जागतिक छायाचित्रण दिना’निमित्त काही स्त्री छायाचित्रकारांच्या प्रवासाविषयी…

छायाचित्रकार अस्मिता माने आपले अनुभव कथन करत असताना अचानक तिचं लक्ष टेबलावरच्या केळ्याच्या स्टँडवर जातं. त्यावर तीन छोटी वेलची केळी आहेत. एक कच्च हिरवंगार. त्याला लागून तजेलदार पिवळं केळं आणि त्याला चिकटून काळसर पडत चाललेलं अति पिकलेलं तिसरं केळं! न राहावून ती बॅगेतला कॅमेरा बाहेर काढते आणि त्या तीन केळ्यांचा फोटो टिपून त्या छायाचित्राला चार ओळींचं गोंदण जडवते, तिच्या विचारांचं! – ‘आपण सगळेच सुरुवातीला त्या हिरव्यागार केळ्याप्रमाणे अननुभवी अर्थात कच्चे असतो. काळाच्या ओघात परिपक्व सोनेरी होत जातो. आणि शेवटी आपल्या वयोमानानुसार शरीरावर उमटलेल्या वार्धक्याच्या खुणा आपली कहाणी सांगू लागतात. सौंदर्य म्हणजे कायम तरुण, तजेलदार राहणं नव्हे, तर आपण किती दूरचा प्रवास केला आहे हे दाखवणार्‍या त्या खुणांमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.

एका साध्या फोटोतून दृश्यमान झालेलं ते जीवनाचं एक अंतिम सत्य! छायाचित्रणाची नेमकी हीच किमया आहे. एखाद्या छायाचित्राला तरल, अर्थवाही करण्याची किमया साधली जाते, जेव्हा कॅमेराच्या मागे असतं तीव्र, संवेदनशील मन आणि खोल भावगर्भ नजर. अस्मिता माने ही अशीच एक संवेदनशील छायाचित्रकार! तिने ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स’ मधून छायाचित्रणाचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं. नंतर ठाण्यातील ‘फोटो सर्कल सोसायटी’मध्ये ती जाऊ लागली. तिथे समकालीन छायाचित्रकारांशी तिची ओळख झाली. ती अनेकांना त्यांच्या कामात मदत करू लागली, त्यातून तिनं फोटोग्राफीचं तंत्र अधिक विकसित केलं. आणि तिला पहिलं काम मिळालं, ते होतं नववर्ष स्वागत यात्रेच्या छायाचित्रणाचं! त्यानंतर तिने पंढरपूर वारीचं छायाचित्रण केलं, तो अनुभव विलक्षण होता. वारकर्‍यांचं भक्तीरसात तन्मय होणं आणि तिचं त्या तन्मयतेला छायाचित्रबद्ध करणं.  दोन वर्षं ‘सीकेपी फूड फेस्टिव्हल’चंही छायाचित्रण केलं. त्यातून मोठ्या समारंभाचे फोटो काढण्याचं तंत्र तिला अवगत झालं. हळूहळू तिला विवाह समारंभ,

प्री-वेडिंग शूट, वाढदिवसाच्या छायाचित्रणाचीही कामं मिळू लागली. अलीकडे अस्मिताने ट्रॅव्हल फोटोग्राफी अर्थात प्रवास छायाचित्रण करायला सुरुवात केली आहे. त्याचा अनुभवही खूप काही शिकवणारा आहे.

  अशीच एक नेहा मिठबावकर ही छायाचित्रकार. मोठ मोठ्या नामांकित कंपन्यांचे सीईओ अथवा व्यवस्थापकीय संचालकांची किंवा सेलिब्रेटींची छायाचित्र ती काढते. तेव्हा तिला तांत्रिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावं लागतं. अर्थात प्रत्येक फोटोमागे एक कहाणी दडलेली असते. नेहा  सुरुवातीला एका मोठ्या

‘नेटवर्क’ च्या ३० ते ३५ मासिकांमधून विविध उत्पादनं, जाहिरात करणारे लोक असे विषय हाताळत होती. नेहा सांगते, ‘‘एकदा तिला ‘टाटा स्टील’चे व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन यांचे छायाचित्रण करायचं होतं. मात्र फोटोयोग्य जागा मिळेना. तीन वेळा जागा बदलली गेली. शेवटी तिसरी जागा मिळाली ते एक बंद कार्यालय होतं. तो करोना साथीचा काळ होता. त्या बंद कार्यालयाच्या भिंतीवर बुरशी होती. फर्निचर वेडंवाकडं रचलेलं होतं. एवढ्या दिग्गज व्यक्तीचं छायाचित्रण अशा ठिकाणी? इथे बॅकड्रॉप, सजावट सगळंच रंगहीन! मी संपूर्ण कार्यालयामध्ये चक्कर मारली. मला तिथे जमशेदजी टाटा यांच्या काळातलं एक जुनं घड्याळ दिसलं. जमशेदजी टाटांचा एक पुतळाही तिथे होता. मी त्यावरची धूळ झटकली आणि ते व्यवस्थित एका जागेवर लावलं. बस्स! एवढ्या तुटपुंज्या सामग्रीवर मस्त प्रकाशयोजना करून मी जो फोटो काढला तो ‘फोर्ब्स’ मासिकाने ‘अँटिक’ फोटो म्हणून त्याच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध केला. एरवी त्यासाठी केवढी तयारी करावी लागते. पण इथे कल्पकता कामी आली. मी बर्‍याच चित्रपट कलाकारांचं छायाचित्रण केलं आहे. आपल्याला वाटतं की, ते घमेंडखोर असतात. या मोठ्या कलाकारांसोबत काम करताना मनात संकोच असतो, भीती असते,

पण प्रियांका चोप्रा, मनीषा कोईराला यांनी तर स्वत:च सोफा, खुच्र्या हलवायलासुद्धा मला मदत केली आहे. याउलट नवीन कलाकारांचा तामझाम खूप असतो. त्यांची ‘पीआर टीम’ (जनसंपर्क सांभाळणारा चमू- वेशभूषाकार, रंगभूषाकार, स्टायलिस्ट) या सगळ्यांचं तंत्र सांभाळत करणं म्हणजे मोठी तारेवरची कसरत!

अशी तारेवरची कसरत फूड फोटोग्राफर स्त्रियांना नेहमीच करावी लागते. अमृता कर्णिक सांगते, ‘‘फूड फोटोग्राफी आणि फूड स्टायलिंग नेहमी एकत्र जातं. शेफ चवीसाठी खाद्यपदार्थ बनवतात. तर फूड फोटोग्राफर त्या पदार्थांचं नेत्रसुख मिळवून देतात. छायाचित्रातून तो पदार्थ आकर्षक दिसावा यासाठी आधी आम्हाला त्या पदार्थांचं ज्ञान हवं. त्याचा पोत योग्य पद्धतीने दाखवण्यासाठी योग्य प्रकाशयोजना करावी लागते. या कामासाठी कधी कधी आम्हाला २४ तास सेटवर हजर राहावं लागतं आणि काम करावं लागतं. मला या फूड फोटोग्राफीची इतकी आवड आहे की, महाविद्यालयीन काळात मला ‘मास्टर क्राफ्ट्समन’ पुरस्कार आणि ‘टॉपर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला होता. आजही अनेक हॉटेल्स आणि वेगवेगळ्या ब्रँडसाठी मी ‘फूड फोटोग्राफी’ करत असते.

छायाचित्रकारांना नेहमीच वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं.  कीर्ती सुर्वे या वृत्तपत्र छायाचित्रकाराच्या आव्हानांची सुरुवात एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी रात्रीचे इव्हेंट्स आणि पाट्र्याचं छायाचित्रण करत असतानाच झाली. वीस वर्षांपूर्वी रात्री-बेरात्री पार्टी शूट करणारी ती अपवादात्मक स्त्री छायाचित्रकार होती. ती म्हणते, ‘‘त्या काळात मी मुद्दामच खूप तटस्थ व अलिप्तपणे वागायची. त्यामुळे मला खडूस, आगाऊ, जादा अतिशहाणी असे टॅग मिळायचे खरे! पण त्याचमुळे मला माणसं ओळखणं व हाताळणं जमायला लागलं.एकदा एका सेलिब्रेटींच्या पार्टीच्या छायाचित्रणासाठी मला पाठवलं गेलं. तिथे सेलिब्रेटी नव्हतेच. मात्र ड्रग्जचा दुर्गंध सर्वत्र पसरला होता! लोकांचं वर्तनही अत्यंत स्वैर होतं. मला संभाव्य धोक्याची जाणीव झाली. मी कसंबसं काम उरकलं आणि तिथून काढता पाय घेतला. परिस्थितीच्या दबावामुळे कधी तरी अशा प्रसंगातूनही जावं लागतं. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर तिथे पोहोचणं, तिथे जे घडतंय ते अचूक कॅमेरात टिपणं हे खूप महत्त्वाचं असतं. मध्यंतरी मुंबईत मोनो रेल अडकली तेव्हा मुसळधार पावसात मी तिथे धावत पळत पोहोचले. माणसांनी भरलेली मोनो रेल पूर्ण कललेली. लोक अडकलेले. मदतीसाठी ओरडताहेत. अग्निशमन दलाचे जवान दरवाजे तोडून त्यांना बाहेर काढतायत. त्या घटनेचं प्रत्यक्षदर्शी म्हणून छायाचित्रं काढण्याचा अनुभव विलक्षण होता. अशा अनेक छायाचित्रांसाठी मी अक्षरश: जीव धोक्यात घातलाय. एकदा मी श्रीनगरला गेले होते. एका चाळीस वर्षांच्या भारतीय मुस्लीम पुरुषाचा विवाह एका अठरा वर्षांच्या पाकिस्तानी मुलीबरोबर होणार होता. त्या बातमीसाठी आम्ही श्रीनगरला गेलो होतो. ती सर्व तिथली राजकारणी मंडळी होती. आम्हीही त्या मुस्लीम समाजात आमच्या परीने मिसळलो. लग्न समारंभाचे फोटो काढले. पण अनेक जण आमच्यावर पाळत ठेवून आहेत असं जाणवत होतं. इतक्या अवघड परिस्थितीत अशा लग्नाची छायाचित्रं घेणं खूपच आव्हानात्मक होतं. पण ते पार पडलं. पूर्वी एकदा मी गडचिरोलीतल्या नक्षलवाद्यांच्या तळावर जाऊन छायाचित्रण केलं आहे. तिथले पोलीस करीत असलेल्या कामासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. ते नक्षलवादी आमच्यावर नजर ठेवून होते. पण तिथूनही आम्ही सुखरूप परतलो. त्यानंतरचा बीडमधला दुष्काळग्रस्त भागातला दौरा. ते करताना मात्र खूप वाईट वाटलं! तिथे भेटलेली खंगलेली माणसं, अक्षरश: आमटीच्या पाण्यात भाकरी बुडवून ती पोटात ढकलणारी चिल्लीपिल्ली मी बघितली. ही सगळी दृश्य माणूस म्हणून आपल्याला हादरवून टाकतात. आपला अहंकार पार मोडून टाकतात.’’

छायाचित्रण करताना अशी अनेक अवघड आव्हानं या स्त्रिया सहजगत्या पेलतात. विशेषत: वन्यप्राणी, पक्षी अथवा छोटे कीटक यांच्या फोटोग्राफीसाठी नित्य जंगलात जाणारी वेदवती पडवळ बिर्जे तर नेहमीच अशा अनुभवांतून जात असते. ती आपला अनुभव सांगते, ‘‘वन्य प्राण्यांचे छायाचित्रण करणार्‍यांकडे प्रचंड संयम असावा लागतो. दिवसभर अथवा रात्रीसुद्धा पाणवठ्यावर, मचाणावर अथवा जीपमध्ये तासनतास बसावं लागतं. आम्हाला साप, फुलपाखरू, बेडूक, मधमाशा यांचं छायाचित्रण करण्यासाठी जंगलात पायीच फिरावं लागतं. त्यासाठी जंगलातील केवळ पक्षी, कीटक यांचाच नव्हे, तर वृक्षराजींचाही अभ्यास करावा लागतो. कोणत्या झाडावर कोणत्या प्रजातीच्या फुलपाखरांच्या अळ्या असतील, कोष असतील हे ठाऊक असेल, तरच मी ते झाड नेमकं शोधून त्या अळ्यांचे फोटो काढू शकेन! नाकतोडे अथवा छोटे कीटक यांचं छायाचित्रण करण्यासाठी त्यांच्या अत्यंत जवळ जावं लागतं. त्यासाठी आपली देहबोली अतिशय सावध असावी लागते. सापापासून सुरक्षित अंतरावरून त्याचे अचूक फोटो काढणं खूप कौशल्याचं असतं. झाडांवरील पक्ष्यांचे फोटो काढताना ढोलीतल्या सापावर, खोडावरील विंचवावरही बारीक लक्ष ठेवावं लागतं. विशेषत: जंगलातल्या झाडांची माहिती नीट हवी. कारण काही झाडं अथवा कीटक यांना स्पर्श करताच खाज सुटते. पुरळ येतं. जंगलात फिरणार्‍या आम्हा सर्वच स्त्री छायाचित्रकारांची एकच अडचण असते. राहण्याची चांगली सोय नसते आणि प्रसाधनगृहांचीही.’’

जंगलातल्या ‘मोबाइल कॅम्पिंग’चा चित्तथरारक अनुभव ऋता कळमणकर सांगतात, ‘‘जंगलात तंबू टाकलेले होते. तंबूचा कपडा पातळ. तंबूमध्ये एक बसायचे टेबल एक मोडका पलंग आणि फक्त एक बादलीभर पाणी. ‘बाहेर खड्ड्यात नैसर्गिक विधीसाठी बसताना वर बघायला विसरू नका. झाडावर बिबट्या असू शकतो,’ असं गाईडनं आधीच सांगितलं होतं. त्या जंगलात ‘नेटवर्क’ नव्हतं. प्रकाशयोजना नव्हती. फोन लागत नव्हते. आम्ही रात्री झोपलो आणि थोड्याच वेळात पाच-सहा सिंहाच्या डरकाळ्यांनी जंगलाचा परिसर दणाणून गेला. त्या फाटक्या तंबू बाहेरून येणार्‍या त्या डरकाळ्यांनी मी अक्षरश: घामाघूम  झाले. आम्हाला सक्त ताकीद होती की, काहीही झालं तरी बाहेर यायचं नाही. कशी तरी ती रात्र घालवली. सकाळी त्या जंगलातील निसर्ग आणि वन्य प्राणी पाहून आम्हाला हायसं वाटलं. आमची भीती पार पळाली. मी भारतातली सर्व जंगलं आणि परदेशातील आफ्रिका, कोलंबिया, आलास्का, कोस्टारिका, ॲमेझॉन, ब्राझील इथल्या जंगलांमधून वन्य प्राण्यांचे छायाचित्रण केलेले आहे. अनेक वृत्तपत्रांतून वन्य प्राण्यांच्या छायाचित्रणाच्या संदर्भातील सदरेही लिहिली आहेत.’’

ऋता कळमणकर आपला एक अविस्मरणीय प्रसंग सांगतात, ‘‘उत्तर ध्रुवावर वालरस या अजस्र माशाचे छायाचित्रण करायला गेले होते. हवेच्या झोडीयाक बोटीने तलावात गेलो. तिथे असंख्य छोटेमोठे वालरस मासे होते. ते इतके अजस्र होते की त्यांचे सुळे दोन फुटांचे! बोटीचा नाविक माघारी फिरण्यासाठी आम्हाला घाई करायला लागला. तरी आम्ही आपले वालरसचे फोटो काढण्यात दंग! थोड्याच वेळात ते अजस्र वालरस रोरावत आमच्यावर चाल करून आले. त्यांनी बोटीला चहूबाजूने घेरलं. आमच्या नावाड्याने अक्षरश: दोन वालरसच्या मधून वेगाने बोट बाहेर काढली. त्या बोटीला त्यांचे सुळे लागले असते तर एक तर आम्ही त्या बर्फाच्या पाण्यात बुडून मेलो असतो किंवा वालरसचे भक्ष्य झालो असतो. पण असे धोके पत्करूनसुद्धा  छायाचित्रणासाठी पुन:पुन्हा जंगलात जावंसं वाटतं. छायाचित्रण करताना कधी कधी मृत्यूच्या जबड्यातून अशी सुखरूप सुटका होते, त्या क्षणी जगण्याची खरी किंमत कळते. अशा अनुभवांतूनच आम्हा छायाचित्रकारांचं व्यक्तिमत्त्व संपन्न होतं.’’

अनेक क्षेत्रात आव्हानं असतात, पण काहींना ती आव्हानं झेलण्यातच मजा येते. अशाच या स्त्री छायाचित्रकार, आपल्या संवेदनक्षम मनानं मानवी भावभावनांचा खेळ आपल्या कॅमेर्‍यात टिपतानाच निसर्गातील अद्भुतालाही छायाचित्रबद्ध करणार्‍या म्हणूनच  १९ ऑगस्टच्या ‘जागतिक छायाचित्र दिनानिमित्ता’ने यांच्यासारख्या अनेक स्त्री छायाचित्रकारांना शुभेच्छा.

madhuri.m.tamhane@gmail.com