एकटेपणावर मात संवादाची

आत्महत्या ही एका अर्थाने तथाकथित संस्कृती आणि प्रगतीच्या स्पर्धेची जीवघेणी देणगी.

डॉ नंदू मुलमुले nmmulmule@gmail.com
दरवर्षी जगभरात आत्महत्येच्या सुमारे आठ लाख घटना घडतात. त्यातील १७ टक्के – म्हणजे १,३५,००० आत्महत्या एकटय़ा भारतात घडून येतात. येथे दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो, तर दर अडीच तासाला एक शेतकरी. यातले ८० टक्के  नैराश्य या मनोविकाराचे बळी असतात. आत्महत्या या विषयावर आतापर्यंत खूप संशोधन व अभ्यास झाला आहे, निष्कर्ष काढले गेले आहेत. काय आहेत ते, याचा उहापोह कालच्या (१० सप्टेंबर) आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या निमित्ताने.

जिच्याबद्दल सर्वाधिक चर्चा ‘ती’ व्यक्ती हे जग सोडून गेल्यावरच होते अशी आत्महत्या ही मानसशास्त्रातील एकमेव समस्या! खरेतर प्रत्येकाच्या मनात कधीतरी वैतागाने ‘जीव नकोसा झालाय’ असा विचार येणे ही सहजसामान्य गोष्ट.  माणूस जन्माला येतो, तोच मुळी जगण्याच्या जिगीषेबरोबर मरण्याचे अनोखे आकर्षण घेऊनच. सर्व सर्जनशील कला या जीवनेच्छेची रूपे, तर बेछूट वर्तन, हिंसा आणि युद्धखोरी ही मरणेच्छेची रूपे. ती कमीअधिक प्रमाणात प्रत्येकात असतात.

जगातल्या मृत्यूच्या दहा सर्वोच्च कारणांमध्ये आत्महत्येचा समावेश होतो. ‘स्युसाइड’ शब्दाचा अर्थ स्वत:चा खून. समोरच्या व्यक्तीवर रोखलेले पिस्तुल एकशेऐंशी कोनात फिरवून स्वत:वर चालवणे म्हणजे खूनच, त्यामुळे प्रसिद्ध मनोविश्लेषक फ्रॉइडच्या मते आत्महत्या म्हणजे ‘मर्डर इन १८० डिग्रीज’. मात्र जगात प्रत्यक्ष हत्यांपेक्षा आत्महत्या अधिक प्रमाणात होतात. दरवर्षी जगभरात आत्महत्येच्या सुमारे आठ लाख घटना घडतात. त्यातील १७ टक्के- म्हणजे १,३५,००० आत्महत्या एकटय़ा भारतात घडून येतात. येथे दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो, तर दर अडीच तासाला एक शेतकरी. म्हणजे फक्त शारीरिक विकारच नाही, तर स्वत:चे मनही माणसाचा बळी घेते.

आत्महत्या ही एका अर्थाने तथाकथित संस्कृती आणि प्रगतीच्या स्पर्धेची जीवघेणी देणगी. प्राणी आत्महत्या करीत नाहीत. संस्कृतीने समाज जन्माला घातला, आणि समाजाने असमानता आणि मनोविकार!

आधुनिक जगात आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढच होते आहे. भारतात ‘एनसीआरबी’ म्हणजे ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरो’ने १९६७ पासून आत्महत्येच्या आकडेवारीचा अभ्यास सुरू केला. त्यानुसार भारतात दर लाखामागे साधारण सहा लोक आत्महत्या करीत, ते प्रमाण वाढून दुप्पट म्हणजे बारा वर गेले आहे. सर्वसाधारणपणे दोनशे लोकांच्या मनात आत्महत्येचे तीव्र विचार घोळत असतील तर त्यातले पंचवीस प्रयत्न करतात आणि त्यातला एक आपल्या कृत्यात सफल होतो. आत्महत्येचा साक्षरतेशी जवळचा संबंध, कारण भारतात ८० टक्के आत्महत्या साक्षर लोकच करतात. आत्मघाताचा वैवाहिक स्थितीशी जवळचा संबंध. अविवाहित, घटस्फोटित किंवा विधुर पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाण विवाहित पुरुषांपेक्षा दुपटीने अधिक, मात्र विवाहित स्त्रियांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अविवाहित किंवा घटस्फोटित स्त्रियांपेक्षा अधिक. (म्हणजे विवाहाने पुरुषांना आत्महत्येपासून संरक्षण लाभत असले, तरी स्त्रियांसाठी ते मारक!) पौगंडावस्थेपूर्वी आत्महत्या नाहीत, मात्र पंधरा वर्षांवरील वयोगटापासून थेट नव्वद वर्षांपर्यंत माणसे आत्महत्या करताना दिसतात. त्यात पुरुषांमध्ये चाळिशीच्या आसपास अधिक, मग पुढे थोडे कमी होऊन सत्तरीनंतर प्रमाण पुन्हा वाढताना दिसते. स्त्रियांमध्ये १८ ते ३० वयोगटात वैवाहिक ताण, कौटुंबिक हिंसा, हुंडाबळी आणि बिघडलेले नातेसंबंध ही प्रामुख्याने महत्त्वाची कारणे, मात्र त्यानंतर आत्महत्येचे प्रमाण कमी होत जाते. मात्र तरीही, जगाच्या तुलनेत भारतीय स्त्रियांची स्थिती वाईटच, कारण स्त्री आत्महत्यांमध्ये जगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो.

माणूस आत्महत्या का करतो?- हा मागे राहिलेल्यांना छळणारा प्रश्न, तसा तो संशोधकांनाही. आत्महत्या करणारे ९५ टक्के  लोक हे मानसिक समस्याग्रस्त असतात, त्यातले ८०टक्के  नैराश्य या मनोविकाराचे बळी. मात्र या नैराश्याची कारणे काय, हा प्रश्न उरतोच.

१८९७ मध्ये एमिल डुर्खिम या फ्रें च तज्ज्ञाने मांडलेली सामाजिक कारणे आजही महत्त्वाची मानली जातात. त्याच्या मते, आत्महत्या ही समाजसापेक्ष घटना असते, माणसाचे सामाजिक पर्यावरण आणि परस्परसंबंध बिघडल्याची परिणती. त्यात समाजापासून एकाकी पडणे, किंवा समाजाच्या हिताला वाहून जीव पणाला लावणे, अशी भिन्न कारणे आहेत. समाज हुकुमशाही राजवटीत, जाचक शिस्तीत बांधला गेला असेल किंवा दिशाहीन असेल, तरीही आत्महत्येचे प्रमाण वाढते.

१९९० मध्ये बॉमिस्टर या मानसतज्ज्ञाने आत्महत्येचा ‘मुक्ती’ वा ‘सुटका’ सिद्धांत मांडला. त्याच्या मते, आत्महत्या हा माणसाने स्वत: निर्माण केलेल्या समस्येपासून काढलेला पलायनाचा मार्ग आहे. त्यात आयुष्यात अतिरंजित यशाचे मापदंड वापरणे आणि ते पुरे न करता येण्याचे शल्य उरात बाळगणे, स्वत:ची घृणा, तिरस्कार, वैचारिक कोंडी अनुभवणे, स्वत:चे अपयश मनात पुन:पुन्हा उगाळणे, बेदरकार वागणे, सारासार विचारांचा अभाव, इथून सुरुवात होऊन अखेर भावनिक सुन्नपणा किंवा बधिरपणा येणे, ही आत्महत्येची अखेरची पायरी समजायला हरकत नाही.

एडविन श्नीडमन या तज्ज्ञाने ‘स्युसायडॉलॉजी’ म्हणजे आत्महत्येच्या अभ्यासाला वाहून घेतले. त्याच्या मते, आत्महत्या करणाऱ्याला मरायची इच्छा नसते, त्याच्या लेखी फक्त मनोवेदना कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे आत्महत्या. श्नीडमनने हेडेक (डोकेदुखी) सारखा ‘सायकेक’ (मनोवेदना) हा शब्द रूढ केला. एखाद्याची प्रेमप्राप्ती, व्यक्ती म्हणून मिळालेला स्वीकार, आनंददायक नातेसंबंध, या माणसाच्या मूलभूत मानसिक गरजा. जेव्हा प्रेमात विफलता येते, आप्तसंबंधितांनी वाळीत टाकल्याची भावना होते, स्व-प्रतिमेला तडा जातो आणि अखेर एका अटळ हताशेने माणूस घेरला जातो, त्या वेळी निर्माण झालेली तीव्र मनोवेदना कमी करण्यासाठी शोधलेला मार्ग म्हणजे आत्महत्या. ही मनोवेदना सहन करण्याची प्रत्येकाची शक्ती वेगळी, त्यामुळे तुम्हाला जी समस्या वाटत नाही, ती इतरांना वाटू शकते, हे समजून घेणेही महत्त्वाचे.

लौकिक जीवनातील यशस्वितेचे कितीही उच्च शिखर गाठलेले असो, आत्मघात माणसाचे अपरिहार्य माणूसपण अधोरेखित करते. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींमधील हे टोकाचे वैविध्य हेरूनच अंतून लीनार्स या तज्ज्ञाने या प्रश्नाच्या मुळाशी जाणारे बहुविध पैलूंचे एक तथ्याधारित प्रारूप (मॉडेल) मांडले. या लीनार्सचा ‘सायकॉलॉजिकल पोस्टमॉर्टम’- म्हणजे मृत्यूपश्चात मनोविच्छेदनाचा दांडगा अभ्यास. त्याने हजारो ‘स्युसाइड नोट्स’चा अभ्यास केला, तसेच आत्महत्या केलेल्यांच्या असंख्य नातेवाईकांच्या मुलाखती घेतल्या. त्याच्या मते, आत्महत्येमागे जैविक (मेंदू), जैवरासायनिक, मानसिक, तात्त्विक, कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक घटकांचा प्रभाव असतो.

थॉमस जॉईनर यांनी विशेष अभ्यास के ला तो वृद्धापकाळी होणाऱ्या आणि प्रदीर्घकाळ असाध्य रोगाने पीडित लोकांच्या आत्महत्यांचा. त्यात वृद्धापकाळी एकटेपणा, नव्या पिढीला आपण नकोसे झाल्याची आणि आपण ‘भुईला भार’ झाल्याची भावना, हे आत्महत्येचे मुख्य कारण, तर प्रदीर्घकाळ आजाराशी झगडणाऱ्या माणसांमध्ये आत्महत्येचे बळ त्या आजारामुळेच येते हे त्यांचे निरीक्षण, कारण खूप वेदना सहन करणाऱ्या माणसाला तुलनेने आत्महत्येची वेदना सुस वाटू लागते.

अ‍ॅरॉन बेक हा नैराश्यग्रस्तांवरील प्रसिद्ध विचार-वर्तनोपचार पद्धतीचा उद्गाता. १९७० च्या आसपास त्याने आत्महत्येचा अभ्यास मांडला, त्यात प्रामुख्याने हताशा आणि असहाय्यतेच्या भावनेचा परिपाक म्हणजे आत्महत्या हा विचार होता. बेक याने एखाद्या रुग्णाच्या मनातली आत्महत्येच्या विचारांची तीव्रता मोजणारी ‘स्युसाइड इंटेंट स्केल’ ही कसोटीही तयार केली. त्याच्या मते, मानसोपचारतज्ज्ञाने रुग्णाची हताशा कमी करण्यावर भर दिला पाहिजे.

या सगळ्या मतमतांतरात मार्शा लिनेहान या स्त्री-मानसतज्ज्ञाचे काम सगळ्यात महत्त्वाचे. तिने ‘अनियंत्रित भावना’(इमोशनल डिसरेग्युलेशन) हे आत्महत्येचे महत्त्वाचे कारण मानले. क्षुल्लक कारणाने एकदम खचून जाणे, अनावश्यक तीव्र निराशा वाटणे, हे भावनांवरील ताबा सुटल्याचे लक्षण. त्यावर तिने ‘द्वंद्वात्मक वर्तनोपचार पद्धती’ विकसित केली. या पद्धतीत तिने वर्तनोपचाराबरोबरच बुद्धप्रणीत सचेतन मनोवस्था आणि ‘माइन्डफुलनेस’चा अंतर्भाव केला. तिच्या मते, अनियंत्रित भावनिक हेलकावे (अतिप्रचंड क्षोभ किंवा पराकोटीचा अपराधी भाव) तसेच अतिसंवेदनशीलता हे आत्महत्या करणाऱ्यांचे व्यवच्छेदक लक्षण. अशा लोकांना द्वंद्वात्मक पद्धतीने भावनिक व्यवस्थापन आणि नियंत्रण शिकवणे गरजेचे.

वर्तनोपचार पद्धतीचा उगम १९५३ मध्येच सुरू झाला होता. मानसिक विकारांचा औषधाव्यतिरिक्त मुकाबला करण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्यात वर्तनोपचार महत्त्वाचा. या पद्धतीत मनात सखोल दडलेल्या जाणिवांपेक्षा प्रत्यक्ष वर्तनात बदल घडवून आणण्यावर भर जास्त, कारण त्यात घडलेले परिवर्तन दिसते आणि मोजताही येते. त्या पद्धतीत तत्त्वज्ञानातील काही सिद्धांताची भर टाकून १९९० मध्ये मार्शा लिनेहानने ही पद्धती विकसित केली.

कुठल्याही द्वंद्वात्मक चर्चेत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, मग त्याविरुद्ध मताचा दुसरा सिद्धांत लक्षात घेऊन, अखेर दोन्हीमधील काही समान गोष्टींचे समन्वय घडवून एक सर्वसमावेशक, सर्वमान्य आणि सारासार मध्यममार्ग स्वीकारला जातो. प्रत्यक्ष जीवनातही सत्य दोन टोकांच्या कुठेतरी मध्येच असते! ‘मला परीक्षेत अपेक्षेइतके यश मिळाले नाही’, यावर ‘मी माझ्या जीवनात पूर्णत: अपयशी ठरलो आहे, मी जगण्यास नालायक आहे’ हे एक मत (थेसिस), तर ‘परीक्षकांनी पक्षपात केला, सारे जग माझ्या विरुद्ध आहे’ हे दुसऱ्या टोकाचे मत (अँटीथेसिस). सत्य कुठेतरी मधोमध आहे, याची जाणीव रुग्णाला करून देणे म्हणजे ‘सिंथेसिस’. अशा प्रकारे आपल्या विचारातील दोन टोकांचे द्वंद्व मांडून वाद, प्रतिवाद आणि त्यातून संवाद, असा त्यांचा समन्वय साधला जातो.

याव्यतिरिक्त आपल्या भावनांचे तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे, त्यांचे स्वरूप ओळखणे (मी रागावलो आहे, मी भ्यायलो आहे, मी निराश झालो आहे, वगैरे), त्यांचा स्वीकार, आणि अखेर त्यांचे नियंत्रण हे टप्प्याटप्प्याने शिकवले जाते. ‘अशीच समस्या असलेली व्यक्ती तुझ्याकडे सल्ला मागण्यासाठी आली तर तू काय सांगशील?’ अशा आव्हानात्मक प्रश्नांतून रुग्णात एक साक्षीभाव जागवण्यात येतो.  यात मानसोपचार तज्ज्ञांचा एक गट असतो, त्यांची आपापसात चर्चा होते. या सर्व प्रक्रियांमध्ये सतत आत्मघाताच्या विचारांची साखळी तोडण्यासाठी बुद्धप्रणीत ‘वर्तमानाची सचेतन जागरूकता’ (माइंडफुलनेस) या पद्धतीचाही उपयोग केला जातो. सोबतच ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यावर मुख्य भर असतो.

बहुतांश मानसोपचार पद्धती या संथगतीने काम करतात, आणि ते साहजिकही आहे. मात्र द्वंद्वात्मक पद्धतीत, मनात आत्मघाताच्या विचारांचा क्षोभ उसळलेल्या रुग्णांसाठी वेगवान उपचारही आहे. त्यात आत्महत्येच्या विचारांपासून मन वळविण्यासाठी तोंडावर बर्फाळ पाण्याचे सपकारे मारणे, किमान वीस मिनिटे अतिकष्टदायक व्यायाम करणे, तसेच हातापायाचे स्नायू आलटून पालटून कमाल ताठ आणि किमान शिथिल करणे, श्वास स्थिर करणे असे उपाय आहेत, जे अतिशय लोकप्रिय झाले आहेत.

आत्महत्येत हत्या अनुस्युत आहे. जीव घेणे आणि देणे यात जीव, कोणाचा का असेना, महत्त्वाचा. आत्महत्या करणारा आपल्याच मनात दडलेल्या निराश, असहाय्य माणसाचा जीव घेत असतो. म्हणजे जीव घेणाऱ्या मनाचं बळ जीव नकोसा झालेल्या मनापेक्षा वाढलेलं असतं.

उत्क्रांतीच्या वाटचालीत आत्महत्येचे स्थान कुठे आहे? डार्विनच्या ‘नैसर्गिक निवडी’च्या तत्त्वानुसार माणूस स्वत:च्या जीवाला घातक ठरेल असा कुठलाही बदल घडवून आणणार नाही. मग ‘सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ (योग्यतमांचा टिकाव) हा सिद्धांत माणसाच्या स्वत:च्याच जिवावर उठतो का? उत्क्रांतीचा मूळ उद्देश जनुकांचा प्रसार आहे, वंशसातत्याचा आहे, तो एका प्राण्यापुरता नाही. त्यातही प्राण्यांमध्ये आत्महत्या नाहीत. (मात्र प्रजातीच्या प्रसारासाठी मृत्यू ओढवून घेण्याची कृती काही कीटकांमध्ये दिसते).

आत्महत्या ही प्रगत मानवी मेंदूची देणगी. मानवी मेंदूने जशी प्रगतीची दारे उघडली, तशी काही प्रमाणात आत्मघातकी वृत्तीही. त्यात भर पडली मनोविकृतींची. खरेतर मानवी जीवनामध्ये मनोविकृती ही आत्मघाताचे टोक गाठण्यापूर्वीची मनाची अखेरची संरक्षक भिंत. नैराश्य ही आत्मघाताकडे नेणारी मनोवस्था समजली जाते, पण मूलत: ती मदतीची हाक आहे. आत्मघातापासून दूर राहण्याची धडपडही, कारण नैराश्य माणसाचे कुठलीही कृती करण्याचे बळ शोषून घेते, म्हणजेच आत्मघात करण्याचेही. त्यामुळेच नैराश्याचा उपचार सुरू झाल्याबरोबर आत्महत्येचे प्रमाण वाढते, कारण रुग्णाला आत्मघाताचे पाऊल उचलायचे बळ प्राप्त होते. त्यामुळेच नैराश्याचा अर्धवट उपचार हा उपचार न करण्यापेक्षा अधिक घातक.

त्यात भर मनोविकारांबद्दल असलेल्या अज्ञानाची. ‘एवढी सुबत्ता असताना तुला काय झालं निराश व्हायला? नैराश्य वगैरे हे मनाचे खेळ आहेत नुसते!’ हे वाक्य याच अज्ञानाचे निदर्शक, कारण मनाचे हे ‘खेळ’ मेंदू-रसायने खेळतात, त्यात सुबत्ता असण्या-नसण्याचा काही संबंध नाही. सेलेब्रिटींच्या आत्महत्या अधिक चर्चेत येतात ते याच कारणांमुळे.

त्यात निराश मन:स्थितीच्या कार्यकारणभावाचा घोळ. ‘याला किती म्हटलं, लोकांमध्ये मिसळत जा, बोलत जा, पण हा ऐकत नाही. मग निराशा येणार नाही तर काय?’ ही नातेवाईकांची नेहमीची तक्रार. नैराश्यग्रस्त अवस्थेमुळे माणूस एकटा पडू लागतो, तो एकटा राहू लागल्याने निराश होतो असे नव्हे.

आत्महत्या ही एक जैव-सामाजिक घटना आहे. भोवतालचे ताणतणाव कितपत मनावर घ्यायचे हे आपल्या मनावर आणि मानण्यावर अवलंबून आहे. हे एकदा ध्यानात घेतले, की आत्महत्येचा प्राथमिक प्रतिबंध आपल्या मनाचे आरोग्य राखण्यावर असेल हे उघड आहे. त्यासाठी संवाद होत राहणे जरुरी. वाद चालेल, विसंवाद चालेल, पण व्यक्त होत राहण्याने भावनांचा निचरा होतो, एकटेपणाची भावनाही कमी होते.

जरा आवाज देते रहना, हमसफिरो

मैं आवाज दूं, तुम भी आवाज देते रहना.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: World suicide prevention day 2021 suicide cases in india student suicides in india zws

ताज्या बातम्या