मानसी होळेहोन्नूर

स्त्रियांच्या कुस्तीबद्दल समज-गैरसमजच जास्त आहेत. कधी या खेळाकडे धार्मिक दृष्टीने बघून हा खेळ थेट धर्मबाह्य़ समजला जातो. तर कधी याला फक्त पुरुषांचा खेळ म्हटलं जातं. पण फोगट भगिनींनी खेळाच्या मदानातून या सगळ्या धारणांना मोडीत काढले. ‘दंगल’ चित्रपटाने हा संदेश अधिकच प्रभावीपणे दूरवर पोचवला. कुस्ती हा ताकदीचा उपयोग करावा लागणारा खेळ समजला जातो. त्यामुळे स्त्रिया या खेळापासून लांबच असतात, असा एक सोयीस्कर समज सगळीकडेच आहे.

मलेशिया हा देश तरी त्याला कसा अपवाद ठरेल? पण याच मलेशियात नूर फिनिक्स डायना तिचे वडील आणि भावाबरोबर कुस्तीचे सामने बघायची. हा खेळ तिला आवडायला लागला आणि त्याहूनही जास्त तिला तो खेळावासा वाटला. शालेय शिक्षण संपल्यानंतर तिने थेट कुस्तीच्या प्रशिक्षण केंद्राचा रस्ता धरला. या निर्णयात तिला वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता. तिच्या आईची नापसंती होती पण तरीही तिने लेकीवर विश्वास ठेवला. दोन महिन्यांतच डायनाने तिचा निर्णय योग्य होता हे दाखवून दिले. ती हिजाब घालून कुस्ती खेळणारी मलेशियातली आणि कदाचित जगातलीसुद्धा पहिलीच स्त्री ठरली. या खेळाचे प्रशिक्षण घेतानासुद्धा तिने ‘हिजाब ठेवूनच प्रशिक्षण घेणार’ हे ठामपणे सांगितले होते. सुरुवातीला तिचे प्रशिक्षकदेखील साशंक होते. पण तिने पहिलाच सामना जिंकून त्यांना चकित केले. अवघ्या एकोणीसाव्या वर्षी केवळ चार वर्षांच्या प्रशिक्षणातून तिची झालेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे.

नूर फिनिक्स डायनाच्या मते, तिचे स्त्री असणे किंवा आस्तिक असणे तिच्या खेळण्याच्या इच्छेआड येऊ शकत नाही. या दोन्हीसुद्धा तिच्याच निवडी आहेत आणि त्या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. ‘हिजाब घालूनच सराव केलेला असल्याने मला खेळताना हिजाब घालूनच खेळणे सोपे वाटते,’ असे ती सांगते. लोकांनी माझ्या खेळाकडे बघावे. केवळ ‘हिजाब घालून खेळणारी कुस्तीपटू’ अशी माझी ओळख न राहता एक चांगली कुस्तीपटू म्हणून मला ओळखले जावे अशी तिची इच्छा आहे. हिजाब घालून खेळते, इस्लाम धर्माविरुद्ध आचरण करते म्हणूनही तिच्यावर बरीच टीका झाली, पण ती सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपले काम करते आहे. एक दिवस ‘वर्ल्ड रेसिलग एण्टरटेनमेंट’ (डब्ल्यूडब्ल्यूई) मध्ये साशा बँक या प्रसिद्ध अमेरिकन कुस्तीपटू विरुद्ध खेळण्याचे तिचे स्वप्न आहे. ‘इतरांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, ज्यातून स्वत:ला आनंद मिळतो अशी गोष्ट करा,’ हे सांगणारी नूर फिनिक्स डायना नव्या पिढीची खरी प्रतिनिधी वाटते.

कथा ‘राजकीय’ फोटोची

आपल्याकडे लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. सगळ्या पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रचाराचा सगळा नूर आता बदललेला दिसतो. पूर्वी घरोघरी फिरून प्रचार व्हायचा. त्यापेक्षा आता समाजमाध्यमांवरून कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. किंबहुना सोशल मीडिया हे प्रचाराचे एक मुख्य साधन झाले आहे. यात आपल्या उमेदवाराची प्रतिमा तयार करणे, जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही प्रतिमा पोहोचविण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा अनेक माध्यमांचा वापर केला जातो. अनेकवेळा फोटोशॉपमध्ये फोटो एडिट वा संपादित केले जातात. एखाद्या छायाचित्रामध्ये नसलेल्या गोष्टी त्यात घालणे किंवा छायाचित्रातल्या गोष्टी, माणसे बदलणे हे प्रकार सर्रास होतात. जशी एखाद्याची प्रतिमा बनवली जाते तशीच एखाद्याची प्रतिमा खराबसुद्धा केली जाते. असे एडिटिंग करणारे अनेक अ‍ॅप्स आज उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने हे इतके बेमालूमपणे केले जातात, की काय खरे काय खोटे हे अनेकवेळा साध्या डोळ्यांना कळत नाही.

कॅनडामध्ये २१ ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत. ‘ग्रीन पार्टी’च्या एलिझाबेथ मे या निवडणुकीत उमेदवार आहेत. मे या ‘ग्रीन पार्टी’च्या सगळ्यात लोकप्रिय नेत्या आहेत. त्यांनी याआधीची निवडणूकदेखील जिंकली होती. त्यामुळे या निवडणुकीतदेखील त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. काही दिवसांपूर्वी मे यांचे एक छायाचित्र पक्षाच्या संकेतस्थळावर होते. त्यात त्यांच्या हातात एक ‘रिसायकलेबल कप (पण प्लास्टीकचा)’, ज्यावर ‘ग्रीन पार्टी’चे बोधचिन्ह (सिम्बल) होते आणि त्यात एक मेटल स्ट्रॉ दाखवला होता. हे छायाचित्र प्रसिद्ध केल्यावर काही काळातच तो फोटोशॉपमध्ये केलेला आहे, हे लोकांनी दाखवून दिले. मूळ छायाचित्रामध्ये मे यांच्या हातात डिस्पोजेबल पेपर कप होता. जेव्हा यावरून टीका व्हायला लागली तेव्हा मे यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली. आपले छायाचित्र असे ‘संपादित’ केले जाईल, याची आपल्याला कल्पना नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, ‘‘मुळात हे आमच्याच पक्षाच्या कोणाचे तरी काम आहे. मात्र त्याने हे कोणत्या भूमिकेतून आणि का केले हे मला माहीत नाही. मी स्वत: पुनर्वापर न होऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्या विरोधात आहे. त्यामुळे मी ते शक्य तेवढे टाळते. कधीही प्लास्टिकची पाण्याची बाटली वापरण्याऐवजी मी पाण्याचा मग घेऊन फिरते. विमानातून जाताना माझी ताटली, चमचा घेऊन फिरते. त्यामुळे माझे ते छायाचित्र फोटोशॉप करायचे काहीच कारण नव्हते.

मे स्वत:ची मूल्ये खासगी आणि सार्वजनिक जीवनातही जपत असल्यामुळे त्यांच्या ‘फोटोशॉप’मध्ये एडिट केलेल्या त्या छायाचित्राबद्दल स्पष्ट बोलू शकल्या. अनेकदा काही जण मात्र सारवासारवी करतात किंवा भलतीच कारणे पुढे आणतात. मे यांच्या पक्षाची पर्यावरणपूरक तत्त्वे आहेत आणि त्या त्याचा हिरिरीने प्रचार करतात. त्याचाच एक भाग म्हणून मे यांनी काही दिवसांपूर्वी विमानाऐवजी रेल्वेने प्रवास केला होता. तत्त्वांसाठी आपल्याच पक्षातल्या लोकांवर टीका करणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने कमी होते आहे. आपल्याकडे तर ती अगदी बोटावर मोजण्याइतकी राहिलीय. अशा वेळी जगाच्या एका कोपऱ्यात एखादी स्त्री ठामपणे आपली तत्त्वे सांभाळत, आपल्याच पक्षाने केलेल्या घोटाळ्याचे समर्थन न करता त्याचा विरोध करते तेव्हा जगात अजूनही मूल्याधारित राजकारण कुठे तरी अस्तित्वात आहे याचा आनंद होतो.

भविष्यासाठी तरुणाईची साद

सध्या सगळ्याच माध्यमांवर एक नाव गाजते आहे, ग्रेटा थंबर्ग! एका सोळा वर्षांच्या मुलीने सगळ्या जगाला, राष्ट्रप्रमुखांना प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. मात्र वातावरण बदलाच्या या प्रश्नावर ती काही एकटीच लढत नाहीय. तिने शाळेबाहेर शुक्रवारी सुरू केलेल्या सत्याग्रहाला एक वर्ष उलटून गेले आहे आणि तिच्या ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ किंवा ‘फ्रायडे फॉर अ‍ॅन अवर’ या संकल्पनेला जगभरातून प्रतिसाद मिळालेला आहे. ‘दर शुक्रवारी एक तास सत्याग्रह’ ही संकल्पना अनेक शाळकरी मुलांनी उचलून धरलीय. त्यातल्या अनेकांनी त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे उपाय सुचवलेत. मागील महिन्यात जेव्हा ग्रेटा थंबर्ग अमेरिकेत यूनायटेड नेशनच्या हवामान बदलाच्या परिषदेत सहभागी झाली होती तेव्हा तिच्याबरोबर इतर काही देशांमधील प्रतिनिधीसुद्धा होते. ग्रेटाबद्दल खूप लिहिले जाते आहे. कौतुकाबरोबरच तिच्यावर टीकादेखील होत आहे. मात्र तिच्या कामामुळे प्रेरित झालेल्या लोकांची संख्यादेखील कमी नाही. त्यातल्याच या सात खंद्या आंदोलक.

एला आणि कॅटलिन मॅक्वन या यूके (युनायटेड किंग्डम)मधील दोन बहिणींनी ‘मॅकडोनल्ड’ या प्रसिद्ध फूड चेनला एक पत्र लिहिले आणि विचारले, ‘‘तुमच्या ‘हॅपी मिल’मधून छोटी छोटी प्लास्टिकची खेळणी का देता? त्याऐवजी पर्यावरणपूरक गोष्टी द्या.’’ त्यांच्या या मोहिमेला लाखो लोकांचा पाठिंबा मिळाला. ही चर्चा इतकी गाजली, की टीव्हीवरसुद्धा याबाबत कार्यक्रम सादर केला गेला. यानंतर ‘मॅकडोनल्ड’नेदेखील सकारात्मक प्रतिसाद देत, ‘आम्ही पुढच्या काही महिन्यांमध्ये प्लास्टिक खेळण्यांऐवजी पुस्तके, बोर्ड गेम, सॉफ्ट टॉइज असे पर्याय मुलांना उपलब्ध करून देऊ,’ असे जाहीर केले. तर ‘बर्गर किंग’ या फूड चेनने देखील विषयाचे गांभीर्य समजून घेत जेवणासोबत खेळणी न देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्याचबरोबर त्यांनी सांगितले, की मुलांनी त्यांची जुनी खेळणी आणली तर ते त्याचा उपयोग रिसायकल करण्यासाठी करतील. त्यांच्या रेस्तराँमधून दिल्या जाणाऱ्या ‘टेक अवे’चे पॅकिंगसुद्धा प्लास्टिकऐवजी कार्डबोर्डमध्ये केले जाईल.

अमेरिकेतील चौदा वर्षीय अलेक्झांड्रीया वेलन्सॉर दर शुक्रवारी शाळा बुडवून यूएनच्या बाहेर निदर्शने करते. त्याचबरोबर ‘फ्रायडे फॉर फ्युचर’साठी ती लोकांकडून निधीसुद्धा गोळा करते. लेह नेमगुर्वा ही युगांडामधील चौदावर्षीय मुलगीदेखील युगांडामध्ये ‘फ्रायडे फॉर फ्युचर’साठी आंदोलने करते. फेब्रुवारीपासून दर शुक्रवारी ती ही निदर्शने करते आहे. ‘‘माझ्या या आंदोलनामुळे तरी आमच्या सरकारने पर्यावरणपूरक निर्णय घ्यावेत हीच माझी अपेक्षा आहे,’’ असे ती म्हणते.

लिली प्लाट ही ब्रिटनमध्ये जन्मलेली पण आता नेदरलॅण्ड्समध्ये राहणारी अकरा वर्षांची आंदोलक. तीदेखील शाळेकडून परवानगी घेऊन दर शुक्रवारी तिच्या गावात आंदोलन करते. त्याचबरोबर गेल्या चार वर्षांपासून ती ‘लिलीज प्लास्टिक पिक अप’ या संस्थेच्या माध्यमातून गावात इतरत्र पडलेला प्लास्टिकचा कचरा उचलते. हॉली गीलीब्रंड ही स्कॉटलंडच्या फोर्ट विल्यम गावात राहणारी चौदा वर्षांची आंदोलक आहे. तीदेखील दर शुक्रवारी आंदोलन करते. ती म्हणते, ‘‘स्कॉटिश सरकारने आमचे भविष्य जपण्यासाठी आता तरी योग्य ती पावले उचलावीत. या पंचकन्यांबरोबरच दोन तरुण मुलग्यांनीही या लढय़ाला साथ दिलीय. लेझेन मुतुनकेई या केनियातल्या पंधरावर्षीय मुलाचे वैशिष्टय़ म्हणजे हा फुटबॉल खेळणारा मुलगा त्याने केलेल्या प्रत्येक गोलनंतर एक झाड लावतो. त्याचबरोबर तो त्याच्या आजूबाजूच्या परिसरात, शाळांमध्ये जाऊन त्यांनी पर्यावरणपूरक निर्णय घेतले पाहिजे यासाठी सतत प्रयत्नरत असतो. सोबत आपल्याच भारतातला दिल्लीमध्ये राहणारा चौदा वर्षांचा आदित्य मुखर्जीदेखील हॉटेलमध्ये जाऊन प्लास्टिक चमचे, स्ट्रॉ वा इतर ‘सिंगल युज प्लास्टिक’ वापरू नका ही मोहीम चालवतो. तो फक्त ‘हे वापरू नका’ एवढेच सांगत नाही तर याऐवजी काय वापरता येईल याचीसुद्धा माहिती देतो.

हे सगळे जण केवळ काही प्रतिनिधी आहेत ज्यांच्या कामाची नोंद घेतली गेली आहे, पण याव्यतिरिक्त आपल्या आजूबाजूलादेखील असे अनेक छोटे शिपाई नक्कीच असतील जे पर्यावरणबदलाच्या या मोठय़ा लढाईतले पाईक असतील. त्यांचे कार्य कदाचित या सगळ्यांहून मोठे असूनही त्याची नोंदही घेतली गेली नसेल. अर्थात, म्हणून ते काही कमी महत्त्वाचे ठरत नाही. अशा अनेक लढवय्यांचे अनुभव वाचून आपण आपल्या आयुष्यात छोटे-छोटे बदल केले तरी ते त्यांच्या प्रयत्नांचे यशच म्हणावे लागेल. ते लढत असलेली लढाई फक्त त्यांची नसून आपल्या सर्वाच्याच भविष्याची आहे. तेव्हा आपणही छोटे पर्यावरणपूरक बदल करत या लढाईला हातभार नक्कीच लावू शकतो.

(सदरातील माहिती व छायाचित्र स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळं)

manasi.holehonnur@gmail.com

chaturang@expressindia.com