‘आम्हा सर्वाना जोडणारा एकच दुवा, तो म्हणजे जर्मन भाषा. त्यानिमित्ताने गेली कित्येक वर्ष सातत्यानं जर्मनीला जाणं होतंय आणि त्यातून सापडलं ते समृद्ध करणारं कित्येकांचं मैत्र. वयाचं बंधन नसलेली ही मैत्री त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या पुढच्या पिढीलाही जोडत गेली आणि मला मिळाला तो मैत्रीचा अक्षय ठेवा.. रूढार्थानं पर्यटन नसलेल्या देशाटनातून..’  सांगताहेत जर्मन अभ्यासक आणि लेखिका नीती बडवे.

मला देशोदेशीचा प्रवास घडला तो कामाच्या निमित्तानं. या प्रवासानं मला भरभरून दिलं.. मुख्य म्हणजे खूप माणसं भेटली. अनेकांशी मैत्री झाली. मैत्रीहून मौल्यवान असं दुसरं काय असतं? याचा अनुभव या वर्षांनुवर्षांच्या देशाटनातूनच येत राहिला. हे रूढ अर्थानं ‘पर्यटन’ नसेलही.. पण मला नवा मुलुख, तिथली संस्कृती, माणसं, यांचं जे ज्ञान एरवी मिळालं नसतं, ते या भ्रमंतीत मिळत गेलं. सातत्यानं..

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

पहिली जर्मन मैत्रीण मला चाळीस वर्षांपूर्वी भेटली. तेव्हा मला जर्मन शिकवण्याचा डिप्लोमा करण्यासाठी म्यूनिकच्या ‘ग्योथं इन्स्टिटय़ूट’मध्ये एका वर्षांची विद्यावृत्ती मिळाली होती. मी म्यूनिकला जाणार असं कळल्यावर जर्मन शिकणाऱ्या एका गृहस्थानं म्यूनिकला राहणाऱ्या अन्जेलाचा फोन नंबर आणि तिच्यासाठी एक पत्र दिलं. ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही तिला नक्की भेटा.’’ मी म्यूनिकला पोहोचल्यावर काही दिवसांनी अन्जेलाला फोन केला. तिनं एका शनिवारी संध्याकाळी मला तिच्याकडे बोलावलं. तेव्हा ती म्यूनिक विद्यापीठामध्ये ‘विधि’ शाखेची विद्यार्थिनी होती आणि तिच्या बहिणीच्या- बेर्नाडेतच्या छोटय़ा घरात एकटीच राहात होती. आमच्या औपचारिक गप्पा कधी अनौपचारिक झाल्या कळलंच नाही. भारतीय संस्कृती, तिच्या पुण्याच्या मुक्कामातल्या काही आठवणी, मी जर्मन का शिकले, इत्यादी.. विषयांची तर कमी नव्हती आणि भाषेचीही अडचण नव्हती. गप्पा रंगत गेल्या आणि मध्यरात्र कधी उलटली कळलंच नाही. शेवटी मी हॉस्टेलला परत न जाता रात्री तिथेच राहिले. अन्जेलाशी अशी पहिल्याच भेटीत घट्ट मैत्री झाली. विशेष म्हणजे आजही आमची मैत्री तितकीच घट्ट आहे.  

हेही वाचा >>> कलावंतांचे आनंद पर्यटन : रस्ता गिळत.. अंग आदळत..

त्यानंतर थोडय़ाच दिवसांनी भेटली तिची बहीण- बेर्नाडेत. बेर्नाडेतशीही माझी छान गट्टी जमली. इतकी, की पुढच्या वेळी म्यूनिकला गेले तेव्हा तिच्या आग्रहामुळे उपनगरातल्या तिच्या मोठय़ा रो-हाऊसमध्ये चक्क दोन महिने राहिले! अन्जेलाला चार आणि बेर्नाडेतला पाच मुलं. ही दक्षिण जर्मनीतली कॅथॉलिक संस्कृती. या नऊंपैकी आठ मुलांचा जन्म आमची ओळख झाल्यानंतरचा. माझ्या वेळोवेळीच्या जर्मनीच्या प्रवासात मी त्यांना लहानाचं मोठं होताना अनुभवलं. त्यांचे खेळ, पुस्तकं.. आपल्यासाठी नावीन्यपूर्ण. त्यांचं शाळेसाठी तयार होणं, शिक्षण.. आता ही मुलं कुणी डॉक्टर, कुणी ‘बेकर’, कुणी संगीत शिक्षक वगैरे आहेत.

 म्यूनिकमधल्या पुढच्या वास्तव्यातही बेर्नाडेतच्याच ओळखीनं राहायला जागा मिळत गेली. नंतर १९९३ मध्ये मी अमेरिकी मुलांसाठीचा ‘मराठी भाषा आणि संस्कृती’वरचा एक कोर्स संपवून म्यूनिकला गेले होते. तिथून मला लाइप्त्सिगला

(Leipzig) एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जायचं होतं. तेव्हा बेर्नाडेत म्हणाली, ‘‘माझ्या मैत्रिणीच्या- मोनिकाच्या मावशीचा मोठा फ्लॅट आहे आणि ती एकटीच राहते. तिच्याकडे तुला राहता येईल. फक्त तिला लसणीचा वास आवडत नाही. ते तुला ध्यानात ठेवावं लागेल!’’ बेर्नाडेत मला तिथे पोहोचवायला आली. मोनिकाची ही मावशी म्हणजे ‘फ्रीडल’. खरं नाव होतं ‘फ्रीडरीकं’. तिला सगळे ‘टांटा’ म्हणायचे.  फ्रीडलचं घर खरंच खूप मोठं होतं. घराच्या तिन्ही बाजूंनी चांगली १०-१२ फूट रुंद सलग जोडलेली मोठीच्या मोठी बाल्कनी होती. तिथे तिची सॅलडसाठी लागणाऱ्या मसाल्यांची (‘हब्र्ज’ची) झुडपं, टोमॅटो आणि फुलांची बाग होती. फ्रीडलचं आणि माझं छान सूत जमलं. इतकं, की त्यानंतर मला जर्मनीत किंवा युरोपमध्ये कुठेही काम असलं, तरी माझं विमानाचं तिकीट मुंबई-म्यूनिक-मुंबई असंच असायचं!  फ्रीडलच्या घराला लागून मोनिकाचं घर. एकच कंपाऊंडची भिंत मध्ये. त्यामुळे मी फ्रीडलकडे उतरले, तरी सामाईक आवडींमुळे मोनिका आणि तिचा नवरा गेर्हार्ड हे माझे समवयस्क दोस्त झाले.

 फ्रीडल एम.डी. डॉक्टर होती. आमची ओळख झाली तेव्हा, (१९९३ मध्ये)  ती साधारण सत्तर वर्षांची होती. पूर्वी ती म्यूनिकजवळच्या ‘डाखाऊ’ गावातल्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती आणि नंतर तिथेच तिचं क्लिनिकही होतं. आता ती जास्त काम करत नव्हती; पण ‘डाखाऊ’मधलं तिचं क्लिनिक आणि छोटं घर दाखवायला मला ती मुद्दाम घेऊन गेली होती. तेव्हा मी ‘डाखाऊ’ची कुप्रसिद्ध, मोठी छळछावणीही बघितली. तिथले फोटो, फिल्म्स या प्रत्यक्ष प्रत्यय देणाऱ्या आणि अतिशय अस्वस्थ करणाऱ्या होत्या. त्यामुळे मी नंतर कोणत्याही छळछावणीला भेट दिली नाही.

हेही वाचा >>> ‘‘हो, स्त्रियाही शिकारी होत्या..’’

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी फ्रीडल नुकती मेडिसिन शिकायला लागली होती. युद्धात तिला नर्स म्हणून काही दिवस काम करायला लागलं होतं. ती त्या वेळच्या काही आठवणी सांगत असे. त्यांच्या घराच्या शेजारी बखळीसारख्या मोकळय़ा जागेत बॉम्ब पडला होता; पण मनुष्यहानी झाली नव्हती. तसंच युद्ध संपतानाच्या काळात त्यांच्या घरात अमेरिकी सैनिक राहात होते. पण ते चांगलं वागायचे. मुलांना चॉकलेट द्यायचे, वगैरे. फ्रीडलला दोन भाऊही होते. दोघंही युद्ध संपायच्या आधीच्या महिन्यात पोलंडच्या सीमेवर कामी आले. त्यांचे फोटो आणि पत्रं तिनं जपून ठेवली होती, ती तिनं मला दाखवली. दोघंही वीस-पंचवीस वर्षांचे, उंचेपुरे आणि अतिशय देखणे! तिच्या एका भावाचं तर तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं आणि बायको गर्भार होती. तिच्याशी आणि तिच्या मुलीशी माझी ओळख झाली तेव्हा अस्वस्थ व्हायला झालंच. जर्मनीचा इतिहास मला असा जवळून ‘पाहता’ आला.    

भाषा माणसांना पटकन जोडते. जर्मनमध्ये संभाषण करण्याची सोय असल्यामुळे फ्रीडलच्या मित्रमैत्रिणींच्या पंधराएक जणांच्या कंपूत त्यांनी मला सहज सामावून घेतलं होतं. त्यांना भारताबद्दल खूप उत्सुकता होती. भारतामध्ये इतकी गरिबी का आहे? दर वर्षी ब्रह्मपुत्रेच्या पुरात गावं वाहून का जातात आणि माणसं का दगावतात? भारतात इतक्या विविध भाषा बोलल्या जातात, तर दैनंदिन व्यवहार आणि संभाषण कसं शक्य होतं? गरिबीमुळे लोक शाकाहारी बनतात का? असे प्रश्न त्यांना पडायचे. या सगळय़ातून मीही आपल्या देशाकडे, भाषेकडे आणि स्वत:कडे परक्या नजरेतून बघायला शिकले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधू लागले. अंतर्मुख झाले.. 

फ्रीडल अशा असंख्य आठवणी मागे ठेवून गेली. तेव्हा शेजारीच राहणाऱ्या मोनिकानं लगेच आग्रहपूर्वक सांगितलं, की आता तू नेहमी आमच्याकडेच उतरायचं. आमची आधीपासून छान मैत्री होतीच. मोनिकाची डिग्री समाजशास्त्रातली. फ्रीडलपेक्षाही मोनिका अतिशय भाविक. सरळ, साधी. चर्चशी जोडलेली. मनोभावे लोकांना मदत करणारी. अगदी मरणासन्न लोकांना धीर देण्यापर्यंत अनेक कामं करणारी. तिचा नवरा गेर्हार्ड न्यायाधीश होता. आता सेवानिवृत्त. अतिशय हुशार आणि उत्तम ‘सेन्स ऑफ ह्यूमर’ असलेला. संगीत आणि नाटकप्रेमी, तसंच त्यातला जाणकारही. या दोघांबरोबर मी अनेक नाटकं आणि संगीताचे कार्यक्रम बघितले. आम्ही एकदा छोटय़ा थिएटरमध्ये ‘दि पेपस्टीन’ (द फीमेल पोप!) हा एक एकपात्री मस्त प्रयोग बघितला होता. त्यात ‘पोपबाई’ या संकल्पनेची काल्पनिक आणि उपहासात्मक मांडणी केली होती. आजच्या समान हक्कांसाठी चाललेल्या लढय़ाशी सुसंबद्ध अशी. त्याचं भाषांतर करायचं इतकं आतून वाटलं होतं, की खूप कष्ट पडले, पण अखेर मी त्याच्या संहितेची प्रत मिळवलीच. ते भाषांतर पूर्ण होईल तो सुदिन!

हेही वाचा >>> निसर्गकन्यकांचा गणेश!

मोनिका-गेर्हार्ड यांची ऑपेरा आणि नॅशनल थिएटरची वार्षिक वर्गणी भरलेलीच असायची. मलाही कधी त्यांच्याबरोबर जायची संधी मिळायची. सगळय़ात संस्मरणीय आठवण आहे, ती इटलीमध्ये ‘व्हेरोना’च्या जगप्रसिद्ध ओपन एअर ‘अरेना’मध्ये बघितलेल्या प्रसिद्ध इटालियन काम्पोजर ‘गीसेप व्हेर्दी’च्या ‘आईडा’ या ऑपेराची! हजारो लोक बसतील असा प्रचंड ‘अरेना’ आणि ‘आईडा’चा पुरातन इजिप्तचा अतिभव्य सेट. तो आजही डोळय़ांसमोर दिसतो. हा एक संपन्न अनुभव होता. आम्ही तिघांनी जर्मनी आणि युरोपमध्ये खूप प्रवास एकत्रित केला. बर्लिनमधलं ब्रेश्त थिएटर, ब्रान्डनबुर्ग हा पूर्व जर्मनीतला प्रांत- अगदी उत्तरेकडेचा, विरळ वस्तीचा, सपाट भूप्रदेशाचा आणि कडव्या उजव्यांचा प्रभाव असलेला, लीश्टनश्टाईन हा स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवरचा पिटुकला जर्मनभाषक देश, स्वित्झर्लंडमधला ‘लोकार्नो फिल्म फेस्टिवल’, व्हेरोना शहरातली रोमिओ-ज्युलियटची बाल्कनी, अशा गोष्टी मी मोनिका-गेर्हार्डमुळेच बघितल्या. त्या दोघांबरोबरचं मैत्र हा माझा मोठा सांस्कृतिक ठेवाच आहे.

खरं तर म्यूनिकमधली माझी पहिली मैत्रीण अन्जेलाच. तिच्यामुळेच माझा तिथल्या मित्रपरिवाराचा आणि विविध अनुभवांचा परीघ विस्तारत गेला. जर्मनीच्या प्रवासांमध्ये अनेक गोष्टींचा पहिला अनुभव मी तिच्याबरोबरच घेतला. स्की-स्टेशन आणि बर्फाची मजा, डान्स इव्हििनग्ज, कार्निव्हल, ऑक्टोबर फेस्टिवल, ख्रिसमस, चर्च, तिथले समारंभ, इतकंच काय, पण सेमेटरी आणि तिच्या एका नातेवाईकाचं दफन, अशा गोष्टींचाही! मी माझ्या म्यूनिकदौऱ्यांमध्ये कधी कधी अन्जेलाच्या आईवडिलांच्या छोटय़ाशा खेडय़ातल्या घरीही गेले. चाळीस वर्षांपूर्वी मी तिथे पहिल्यांदा मशीननं गाईचं दूध काढताना बघितलं. पहिल्यांदा ताज्या चेरी झाडावरून तोडून खाल्ल्या. अनेकदा त्यांच्याकडे जेवलेही. पण जर्मनीत मलाही बऱ्याचदा सगळय़ांसाठी स्वयंपाक करावा लागायचा, कारण त्यांना भारतीय जेवण आवडायचं. एकदा अन्जेलाच्या आईवडिलांकडे मी ‘एग करी’ करणार होते. त्यासाठी मी मुद्दाम एका दुकानातून नारळ आणला होता. तो घेऊन त्यांच्याकडे गेले, तेव्हा अन्जेलाच्या वडिलांनी नारळ फोडण्यासाठी त्यांची करवत काढून ठेवली होती! मग मी त्यांच्या बागेत जाऊन, एका मोठय़ा दगडाच्या कडेवर नारळ आपटून त्यांना नारळ फोडण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं. गमतीची गोष्ट म्हणजे, नारळाचं पाणी किती छान लागतं, ते त्यांनी तेव्हा पहिल्यांदाच अनुभवलं! 

हेही वाचा >>> शोध आठवणीतल्या चवींचा! : वैदर्भीय पदार्थाची नवलाई!

अन्जेलाच्या मैत्रीच्या संदर्भात मला एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. ही गोष्ट इथे नमूद करण्याचा उद्देश एवढाच, की प्रवासाच्या निमित्तानं भेटणारी मैत्री पुढे जीवनात किती प्रकारे योगदान देत राहते ते सांगणं. १९८५ ते १९८७ या काळात मी पुण्याच्या ‘मॅक्स म्युलर भवन’मध्ये काम करणाऱ्या एका जर्मन गृहस्थाबरोबर मराठी-जर्मन शब्दकोशावर सलग दोन वर्ष झपाटून काम केलं. त्या गृहस्थाला मराठीचा गंधही नव्हता आणि मराठी शिकण्याची इच्छाही नव्हती. त्यांच्या लॅपटॉपवर ते देवनागरी आणि जर्मन सलग टंकीत करू शकत होते, ही तेव्हा नवलाई होती. म्हणून त्यांना असा द्विभाषाकोश करण्यामध्ये रस होता. जर्मनचे एम.ए.चे वर्ग सांभाळून मी रोज कमीतकमी चार तास हे काम करत होते. शब्दांची निवड करून त्याचा अर्थ आणि व्याकरण मी त्यांना सांगत होते. ते ही माहिती त्यांच्या लॅपटॉपमध्ये भरत होते. या कोशात साधारण १७ हजार ५०० शब्द होते. मी त्याची प्रूफंही तपासत होते आणि एके दिवशी निघताना ते अचानक म्हणाले, ‘हे काम आता संपलं आहे.’ मला आश्चर्यच वाटलं! ते गेल्यावर माझ्या लक्षात आलं, की माझ्या टेबलावरची सगळी प्रूफं ते बरोबर घेऊन गेले होते. माझ्याकडे एकही कागद, एकही नोंद शिल्लक राहिली नव्हती. मग दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटून असं पटवलं, की अजून एकदा प्रूफं तपासायला पाहिजेत. त्यावर त्यांनी मला काही प्रूफं तपासायला दिली. 

त्यानंतर मला लगेच तीन आठवडय़ांसाठी जर्मनीला जायचं होतं. तिथे असताना मी एकदा एका प्रसिद्ध प्रकाशनाचा नवीन पुस्तकांचा कॅटलॉग बघत होते. त्यात मला ‘लवकरच येत आहेत’ या मथळय़ाखाली त्या गृहस्थाच्या नावावर मराठी-जर्मन कोशाचा उल्लेख दिसला आणि मी हादरून गेले! प्रकाशकांशी संपर्क साधल्यावर त्यांनी मला सांगितलं, की या गृहस्थानं आमच्याशी तसा करार केला आहे! मग मी म्यूनिकमध्ये ‘ग्योथं इन्स्टिटय़ूट’च्या मुख्य कार्यालयात जाऊन अध्यक्षांना ही गोष्ट सांगितली. पुण्याला परत आल्यावर वकिलांतर्फे त्या गृहस्थांना आणि प्रकाशनसंस्थेला नोटीस पाठवली. पण तिचा फार परिणाम झाला नाही.

हेही वाचा >>> पाहायलाच हवेत : शिक्षणातून नवा दृष्टिकोन!

अन्जेला तेव्हा वकील झालेली होती. तिनं जर्मन ‘लॉ’खाली जर्मन भाषेत ‘ग्योथं इन्स्टिटय़ूट’च्या अध्यक्षांना, प्रकाशकांना आणि त्या गृहस्थांना ‘लीगल नोटीस’ पाठवली. त्याचा मात्र तात्काळ परिणाम झाला. ‘ग्योथं इन्स्टिटय़ूट’नं त्या गृहस्थाला लगेच जर्मनीला परत बोलावलं. प्रकाशकांनी कळवलं, की ‘आम्ही त्यांचा जुना करार रद्द केला आहे. तुम्ही दोघं मिळून जेव्हा याल आणि नवा करार कराल, तेव्हाच आम्ही हा कोश प्रसिद्ध करू.’ तेव्हा मी एक नि:श्वास सोडला. प्रकाशकांनी म्हटलं तसा नवीन करार होऊ शकला नाही आणि तो कोश कधी प्रसिद्ध झाला नाही, मात्र हा कोश त्यांच्या एकटय़ाच्या नावावर प्रसिद्ध झाला नाही याचं सर्व श्रेय अन्जेलाचं! तिनं आपणहून पुढाकार घेऊन एका पैशाचीही अपेक्षा न करता मला न्याय मिळवून दिला. कसे आभार मानावेत?

देशाटनातून मला अनेक मित्रमैत्रिणी मिळाल्या. महाराष्ट्रात पहिल्या बायोगॅस प्रकल्पांसाठी ब्रेमनहून आलेले लुडविग जास्सं, माझी पहिली शिक्षिका आणि प्रिय मैत्रीण मोनिका, उर्सुला आणि माईनहार्ड हे डॉक्टर पतीपत्नी, हॉलंडमधल्या स्काऊटकँपवर भेटलेली नॉर्वेची बिगी, फिनलंडमध्ये भेटलेली शिक्षिका ब्रिगिटं, पहिल्या होस्टेलमध्ये भेटलेली इटालियन मैत्रीण लॉरा आणि इतरही बरेच जण. या सर्वामुळे माझी त्यांच्या संस्कृतीशी आणि अनेक सामाजिक पैलूंशी जवळून ओळख झाली. अनेकांच्या अशा निव्र्याज मैत्रीनं मी भरून पावले. आता या सगळय़ाचा एकत्रित विचार करताना आणि हे लिहिताना वाटतंय, खरंच, मैत्री आपल्याला किती समृद्ध करते. हे शक्य झालं ते रूढार्थानं न केलेल्या पर्यटनामुळेच! 

neetibadwe@gmail.com

Story img Loader