अनघा देशपांडे

आमचं वय झालं आता, आम्हाला नाही जमत तुम्हा तरुणांच्या गोष्टी, असं म्हणत ‘स्मार्ट’ व्हायला नकार देणारी ज्येष्ठ मंडळी हळूहळू स्मार्टफोन वापरायला लागली आणि आता तर सिनेमा-नाटकांची तिकिटं बुक करणं, खाणं ऑर्डर करणं, मित्रमंडळीचे ग्रुप तयार करून चॅट करणं हमखास करू लागली. ते शिकणं किती आव्हानात्मक, पण समाधान देणारं आहे, हे सांगणारं वाचकांसाठीचं सदर ‘आणि आम्ही शिकलो!’ दर पंधरवडय़ाने.

peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!
another sort of freedom 2
काळाबरोबर वाहणं..
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

‘..आणि आम्ही शिकलो’ हे शीर्षक खरंच सार्थ आहे! आज माझं वय ७७ वर्ष आहे आणि अजूनही हळूहळू, एक-एक गोष्ट मी शिकत आहे. २००० पर्यंत साधा फोनसुद्धा हाताळायची संधी मला मिळाली नव्हती. २००० मध्ये टेलिफोन घरात आला. त्या वेळी लोकल, एसटीडी, लॉक, अनलॉक हे शब्द परिचित झाले. पेजर, मोबाइल हे शब्दही ऐकून माहीत झाले होते. पुढे ३-४ वर्षांनी मुलानं मोबाइल फोन घेतला. तो आताच्या तुलनेत साधाच होता, पण कुतूहल वाटणाऱ्या अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत होत्या. घडय़ाळ, त्याचा गजर, निरनिराळे रिंगटोन्स, पत्ते आणि इतर खेळ, निरनिराळी चलनं आणि परिमाणांचं रूपांतर, कॅल्क्युलेटर वगैरे गोष्टींचं नवल वाटत असे. ‘असा फोन आपण स्वत: कधीतरी वापरू?’ असं मात्र तेव्हा वाटलं नव्हतं. तेव्हा अजून एक नवलाची वाटलेली गोष्ट म्हणजे वाजलेला फोन घेतला नाही, तरी तो कुणाचा होता हे नंतर पाहिल्यावर समजतं!

वयाची साठी झाल्यावर माझ्याकडे स्वत:चा मोबाइल फोन आला. फोन करणं आणि आलेला फोन घेणं यापलीकडे उपयोग करता येतच नव्हता. पण वर उल्लेख केलेल्या बाबी मी हळूहळू मुलगा (पुष्कर) आणि सून (मनीषा) यांच्याकडून शिकले. पण हा मोबाइल फोनसुद्धा पूर्वीचा- साधा होता. नंतर पुष्कर दोन वर्षांसाठी सहकुटुंब कॅनडामध्ये गेला. त्या वेळी त्यानं लॅपटॉप आणून दिला, त्यावर फेसबुक अकाऊंट उघडून दिलं. तेव्हा फेसबुक परिचित झालं. ‘स्काइप’ चालू करून दिलं. ते कसं वापरायचं ते शिकवलं. त्यामुळे दूर असूनही माझ्या कुटुंबाशी माझा चांगला संपर्क राहिला. आता लॅपटॉपवर काही गोष्टी शिकणं चालू झालं.

फोनचं बिल, वीजबिल कसं भरायचं ते एका भावानं (सुरेश) सांगितलं. दुसऱ्या भावानं (सुहास) ते प्रत्यक्ष दाखवलं. मग ते शिकून घेऊन घरबसल्या बाहेरची कामं होऊ लागली. यूटय़ूबवर गाणी ऐकणं, पाहणं, एखादा सिनेमा बघणंही सुरू झालं. अनेक पाककृती अजमावता आल्या. बऱ्याच विषयांचं ज्ञान यूटय़ूबवर मिळतं हे कळलं. करोनाकाळात त्यावर बघून बघून मी मास्कसुद्धा शिवले! पत्त्यांचे डावही खेळायला लागले. अजूनही ते खेळायला आवडतं. एकूण ज्ञान आणि मनोरंजन लॅपटॉपवर भरपूर असतं, हे समजलं. 

एकदा मी बँकेत गेले होते. तिथल्या स्टाफपैकी एकजण- पवार यांनी मला ‘इंटरनेट बँकिंग’ सुरू करून दिलं. कारण काय, तर मला लहान लहान कामांसाठी बँकेत जावं लागू नये. मग मी ते शिकले. शिकताना येणाऱ्या अडचणी पवारसाहेबांनाच विचारत होते. एकूण लॅपटॉपच्या या वापरामुळे उन्हातले हेलपाटे वाचले. फोनवरून पैसे पाठवणं मला मनीषानं शिकवलं. दूध, भाजी, फळं या दुकानदारांचं बिल कोड स्कॅन करून कसं भरायचं हे पुष्करनं शिकवलं. त्याचा आनंद मला असा झाला, की आता रोख पैसे जवळ नसले तरी चालतं!

लॅपटॉपनंतर माझा पहिला साधा फोन बदलून स्मार्टफोन हातात आला. म्हणूनच वरील सर्व गोष्टी साध्य करता आल्या. स्मार्टफोन आणि लॅपटॉप वापरताना सतत अडचणी येतच होत्या. सुरुवातीला मुळात लॅपटॉप सुरूच होत नव्हता! त्याच्याकडे बघायला पुष्कर-मनीषा इथे नव्हते, कारण ते कॅनडाला गेल्यावरच त्यांनी ऑर्डर केलेला लॅपटॉप मला मिळाला होता. तेव्हा माझा भाचा- राहुल मदतीला आला.

 आता नाती- श्रीया आणि ईशा मोठय़ा झाल्या आहेत. त्यांची मला खूप मदत होते. अडचण सांगितली की दोघींपैकी कुणीही ती दूर करतं. आताचंच पाहा, हा लेख टाइप करतानासुद्धा आदल्या दिवशी थोडा टाइप केला आणि दुसऱ्या दिवशी त्यापुढचा लेख लिहायला बसले, तेव्हा मराठी की-बोर्ड येतच नव्हता! तो कसा आणायचा हे ईशानंच शिकवलं. लेख मोबाइलवर कुठे आणि कसा टाइप करायचा हेपण तिनंच दाखवलं.

अशा तऱ्हेनं हळूहळू एक एक गोष्ट मी शिकत गेले. मी मिळवलेलं हे ज्ञान उपलब्ध माहिती आणि तंत्रज्ञानाच्या ५-६ टक्केच असेल कदाचित! पण अजून शिकणं कुठे संपलं आहे? ते अखंड चालूच राहणार. गरज जशी निर्माण होईल तेव्हा ती गोष्ट आत्मसात केली जाईल. हा लेख पाठवायला मी मनीषाची मदत घेते आहे, हेही शिकणंच आहे! 

हे सर्व मी माझ्या आवडीनं शिकले. शिकताना खूप मजा तर आलीच, पण या साधनांमुळे आणि ज्ञानामुळे घरी बसून काम होतं म्हणून जास्तच उत्साह आला!

‘अ‍ॅट द क्लिक ऑफ अ माऊस’

 विनोद द. मुळे

मी जी घटना पुढे सांगणार आहे, ती वाचून कुणीही असा गैरसमज करून घेऊ नये, की मी फार मोठा विद्वान वा माहिती तंत्रज्ञानाचा जाणकार आहे किंवा आत्मप्रशंसा करतोय. तर त्याचं झालं असं, की एकदा माझी मोठी बहीण- वय वर्षे त्र्याहत्तर, मला सांगू लागली, ‘‘अरे, आजकाल आमचा बाळा ना (हे माझ्या भाच्याचं घरचं नाव. तो नोकरीनिमित्तानं भारताच्या बाहेरच असतो.) तिथूनच बसल्या-बसल्या मोबाइलवरून आमची प्रवासाची तिकिटं, नाटक-चित्रपटांची तिकिटं बुक करून देतो. आम्हाला काहीच करावं लागत नाही. इतकंच काय, परवाच आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यानं आमच्या आवडीचे खाद्यपदार्थसुध्दा ऑनलाइन बुक करून घरी पाठवले!’’ माझी अगदी सख्खी बहीण असूनदेखील तिच्या या सांगण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, मला कळेना. मी विचार केला, त्या बोलण्यात भाच्याचं कौतुक जरी दिसत असलं, तरी तिची तर पडती बाजूच दिसत नव्हती का?  मी मलाच प्रश्न केला, तिनं का बरं असल्या लहानसहान गोष्टी शिकू नये?

या घटनेपर्यंत माझंही कॉम्प्युटर आणि मोबाइलचं ज्ञान अगदी थातूरमातूरच होतं. पण का कुणास ठाऊक, त्याच क्षणी मी निर्धार केला, की मी या सर्व गोष्टी स्वत:च शिकणार आणि जी काही कामं- जसं की प्रवासाची किंवा नाटक-सिनेमाची तिकिटं बुक करणं, पैशांची देवाणघेवाण, मित्रांना मेल करणं, बँकेची कामं इत्यादी. (यादी फार मोठी आहे.) मी कॉम्प्युटर आणि मोबाइलवरच करणार! अन् मी कामाला लागलो. 

या ‘लर्निग प्रोसेस’मध्ये एक (सुवर्ण) संधी स्वत:हूनच चालून आली. एक दिवस माझ्या मुलीचा व जावयाचा मला अमेरिकेहून फोन आला, ‘‘बाबा, तुम्ही दोघं (मी आणि पत्नी) आमच्याकडे न्यूयॉर्कला काही दिवसांसाठी या. तुमचे डीटेल्स पाठवा, आम्ही तुमचा व्हिसा अर्ज इथूनच प्रोसेस करतो. तुम्हाला ते काही जमणार नाही.’’ ‘तुम्हाला ते काही जमणार नाही’ हे वाक्य मला टोमणा मारल्यासारखं वाटलं, अन् ते आव्हान मी स्वीकारलं! मी त्यांना चक्क सांगून टाकलं, ‘‘ते माझं काम मीच करणार. तुम्ही केलं तर आम्ही अमेरिकेला येणारच नाही!’’ त्या दोघांनाही माझा स्वभाव माहीत होता. त्यांनी त्यांची शस्त्रं खाली ठेवली आणि मी कामाला लागलो.

लगेच कॉम्प्युटरवर बसून ‘यू.एस. कॉन्सुलेट’ची साइट उघडली. व्हिसा अर्ज कसा करावा ही माहिती काढली, अर्ज भरला, कॉम्प्युटरवरच फोटो काढला आणि तो ‘अपलोड’ही केला, माऊस ड्रॅग करून ‘सबमिट’ विंडोवर नेला अन् क्लिक केलं. ‘अ‍ॅप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली’चा मेसेज आला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर ‘इंटरनेट बँकिंग’नं फी भरली, स्लॉट घेतला, मोबाइलवरच रेल्वेचं ऑनलाइन तिकीटही बुक केलं आणि आम्ही दोघंही मुंबईला जाऊन (आम्ही इंदोरचे आहोत.) व्हिसा इंटरव्ह्यू देऊन आलो. वेगळं सांगायला नकोच, की व्हिसा मिळाला आणि आम्ही अमेरिकेलाही जाऊन आलो.

काळाच्या बरोबरीनं चालून आनंदी आणि आजच्या भाषेत बोलायचं तर ‘स्मार्ट’ होण्याच्या माझ्या या ‘प्रोसेस’बद्दलचा एक आणखीन प्रसंग इथे आवर्जून नमूद करावासा वाटतोय. एक-दोन वर्षांपूर्वीच मी इंदोरच्या मराठी माध्यमिक शाळेत माझ्याबरोबरच १९६७-६८ मध्ये- म्हणजेच ५५ वर्षांपूर्वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधून-शोधून गोळा केलं आणि त्यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ‘आपली संस्था क्र. १६’ या नावानं तयार केला. (आमची ही शाळा इंदोरलाच काय, पण संपूर्ण मध्य प्रदेशात याच नावानं प्रसिद्ध आहे.)  इंदोरचा प्रत्येक मराठी माणूस जो आज त्याच्या वयाच्या सातव्या दशकात आहे, या शाळेशी परिचित आहे, मग तो जगाच्या पाठीवर कुठेही का असे ना! आम्ही जेव्हा या ग्रुपचा पहिला वार्षिक स्नेहमेळावा साजरा केला, तेव्हा मी स्वत: इंदोरला असलेल्या प्रत्येक मित्राकडे स्कुटीवरून जाऊन वर्गणी गोळा केली होती.

मात्र मागच्या वर्षी याच स्नेहमेळाव्याची वर्गणी ‘ऑनलाइन’च भरायचा आग्रह प्रत्येक मित्राला केला. अर्थातच वेगवेगळय़ा सबबी पुढे आल्या, पण शेवट गोडच झाला! जवळजवळ सर्वानीच आपली वर्गणी ऑनलाइन- इंटरनेट बँकिंग वा इतर ‘पेमेंट मोड’नं जमा केली. आजतागायतच्या माझ्या अनेक आनंदांच्या बकेटमध्ये याही आनंदाची भर पडली आहे.

आज मी ‘गूगल’ उघडून ज्या-ज्या देशांमध्ये माझी भ्रमंती करण्याची इच्छा आहे, त्या-त्या देशांची माहिती गोळा करतो, ‘गूगल मॅप’वर जाऊन तिथल्या रस्त्यांवर फिरतो आणि तत्संबंधीचं अ‍ॅप उघडून तिथल्या हॉटेल्सचं टेरिफही बघत असतो. हे सर्व करत असतानाच मला माझ्या आयुष्यातलं १९८६ चं वर्ष हमखास आठवतं. त्या वर्षी मी माझ्या एका मित्राबरोबर संपूर्ण दक्षिण भारताच्या मोटारसायकल यात्रेवर गेलो होतो. मी मोठमोठे रस्त्यांचे नकाशे बघून आम्ही जिथे जिथे जाणार, त्या त्या गावांची यादी अंतरासह केली होती आणि आमच्या सर्व ओळखीच्यांना दोन महिने आधीच पंधरा पैशांचं पोस्टकार्ड पाठवून आम्ही येणार हे कळवलं होतं! त्या वेळी कॉम्प्युटर होता, पण आजच्यासारखा, इतका घरोघरी नव्हता. माहिती तंत्रज्ञानाचं जाळंही इतकं पसरलं नव्हतं. मोठमोठय़ा नकाशांपासून गूगल मॅपपर्यंतचा माझा हा प्रवास बघून मला माझीच पाठ थोपटावीशी वाटते!

आज मी ‘अ‍ॅट द क्लिक ऑफ अ माऊस’ माझ्या जीवनाची संध्याकाळ आनंदात घालवतोय आणि यात माझ्या मित्रांचा, त्या बहिणीचा, माझ्या मुलीचा, जावयाचा, मुलाचा आणि सुनेचाही सिंहाचा वाटा आहे. कारण कुठे अडलं, की मी त्यांचीच मदत घेतो. घ्यावीच लागते, कारण शिकण्याची प्रक्रिया अविरत सुरूच ठेवायची आहे.. अगदी याही वयात. जर मी अविरत शिकलो नाही आणि स्वत:ला ‘अपडेट’ ठेवलं नाही, तर ‘आऊट ऑफ डेट’ व्हायची भीती आहे ना!