श्रुती तांबे (समाजशास्त्र. इतिहास. राज्यशास्त्र. अर्थशास्त्र.)

अजगराच्या डोळ्यातल्या स्वत:च्या प्रतिमेकडे न पाहता मोगली स्वत:कडे नजर वळवतो आणि त्या क्षणी पकड सलावते.. ज्याँ बॉद्रिलारनं जो ‘डेथ ऑफ द सोशल’चा धोका सांगितला, त्यावरही ‘अत्त दीप भव’ हे उत्तर असू शकेल..

जगण्यात नावीन्याची ओढ असते, जीवनमान उंचावण्याची आस तर असतेच. जगताना आपल्याला क्लिष्ट प्रश्न पडत असतात. पडणाऱ्या अवघड प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्रश्नच पुन:पुन्हा विचारावे लागतात किंवा मग समीकरणाचीच फेरमांडणी करावी लागते.

पण मेख अशी आहे, की सोयीच्या बिंदूवरचं सुखकर वाटणारं वर्तुळक्षेत्र आपण सहजी सोडू इच्छित नाही. भोवतालचं परिवर्तन, अचानक होणारे तीव्र सामाजिक बदल स्वीकारायला नकोसे वाटतात. वास्तव तुम्हाला सुखकर वर्तुळातून बाहेर काढू पाहात असतं. तिथं खरा झगडा आणि घर्षण व्हायला सुरुवात होते. आदिमानवाच्या कालापासून माणसानं हा झगडा, हे घर्षण स्वीकारलं होतं. त्यालाच जीवनसंघर्ष असं आपण म्हणत होतो.

सामाजिक परिवर्तन अटळ  आहे. अनेक हजार वर्ष तो मानवी जगाचा नियम आहे. सातत्य आणि परिवर्तन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हटलं जातं. परंतु एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत परिवर्तनाचा वेग विलक्षण वाढला. परिवर्तनाचं स्वरूपही बदललं. आता तंत्रज्ञानात परिवर्तन होतं असं म्हणायचं की तंत्रज्ञानच परिवर्तन घडवतं असं म्हणायचं- हा प्रश्न पडण्याइतकी परिस्थिती बदलली आहे.- इतकं तंत्रज्ञान मानवी जीवनाला सर्वव्यापी आणि सर्वसाक्षी झालेलं आहे.

१९८०च्या दशकात भारतात आलेलं संगणक हे यंत्र नक्की कोणते बदल घडवेल, याचा अदमास नव्हता. १९९० च्या दशकात भारतात विकसित झालेल्या अवकाश तंत्रज्ञानामुळे उपग्रह क्रांती घडली. सुमार प्रतीच्या मालिकांचं पेव फुटलं, दर्जा घसरत गेला तरी कोटय़वधी लोक या मालिका बघत राहिले. या मालिकांचं खरं यश होतं, ते उपग्रह तंत्रज्ञानाचं. स्वस्त आणि गुंगवत ठेवणारं मनोरंजन हा या नव्या दृक्-श्राव्य माध्यमाचा मंत्र झाला. मग साधारण १५ वर्षांपूर्वी सेल फोन आले आणि सामाजिक संबंधांत क्रांती झाली. सामाजिक माध्यमांमुळे तर उपग्रहक्रांतीनं सुरू केलेल्या परिवर्तनाचा पुढचा टप्पा गाठला गेला.

एका बाजूला या डिजिटल क्रांतीमुळे एकमेकांना अजिबात न ओळखणाऱ्या माणसात संवादाचे नवे पूल निर्माण झाले. नवे समुदाय तयार झाले. त्यात अगदी घनिष्ठ बंध तयार होऊ लागले. रक्तदान क्लब, पर्यावरण रक्षण करणारे, वन्यजीववर्धनासाठी झटणारे, विशिष्ट राजकीय विचार मांडणारे असे अनेक गट आज जगभर आंतरजालावरून निर्माण झालेले आहेत. तसेच  सर्वसामान्य स्त्री-पुरुष सामाजिक माध्यमांवरून भावना व्यक्त करत आहेत. या माध्यमामुळे नवे समुदाय तयार होत आहेत. तर दुसरीकडे याच संवादमाध्यमाने गेल्या दहा वर्षांत हळूहळू अगदी शेजारच्यांसोबतही सामाजिक सुसंवादाच्या शक्यताही संपवत आणल्या आहेत. ‘द ग्रेट हॅक’ या सुप्रसिद्ध स्फोटक माहितीपटात ब्रेग्झिटविषयीच्या सार्वमताचा निर्णय हा कोटय़वधी पाऊंड्स खर्चून, आंतरजालातून पद्धतशीरपणे गैरसमज पसरवून, मग रस्त्यावरच्या मोहिमा राबवून कसा फिरवला गेला, हे मांडलं आहे. हे धक्कादायक सत्य पुढे आणणाऱ्या मुलाखती सामाजिक माध्यमांच्या तथाकथित निरागसपणाचा बुरखा टराटरा फाडतात. राजकारण, अर्थकारण, समाजकारण यातल्या सीमारेषा माहिती तंत्रज्ञानाच्या सर्वव्यापी जगात कशा धूसर झाल्या आहेत, हे आता स्पष्ट झालं आहे.

आभासी जगाला ‘वास्तव’ समजणं..

‘द ग्रेट हॅक’ हा माहितीपट हा राक्षसी पसा ओतणाऱ्या कंपन्या अमेरिकन अध्यक्षाची निवडणूक, ब्रेग्झिटविषयीच्या सार्वमताचा निर्णय आणि इंग्लंडमधील मध्यावधी निवडणुकांसोबतच भारतासकट अनेक ठिकाणी फेसबुकवरील तुमची, माझी सर्व माहिती फेसबुकने काही कंपन्यांना खुलेआम विकली हे स्पष्टपणे दाखवतो. फेसबुकच्या मालक-चालकांना त्यांच्या लाखो वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा दुरुपयोग किती प्रकारे होत आहे, होऊ शकतो, याची पूर्ण कल्पना होती. तरीही त्यांनी ती माहिती केवळ नफ्यासाठी राक्षसी किंमतीला विकली. केंब्रिज अ‍ॅनालिटिकाशी संबंधित कन्सल्टन्ट्स हे त्यांच्या गुन्ह्य़ाची कबुली युरोपियन न्यायालयात देतात, हे या माहितीपटात दिसलं. तरीही आज ब्रेग्झिटचा निर्णय राबवला जातो आहे, हेच या स्मार्टफोन- फेसबुक- केंब्रिज अ‍ॅनालिटिकाप्रणीत कांडातून पुढे येतं. या माहितीपटात दाखवलेलं फेसबुक डेटाचोरीच्या गुन्ह्य़ाच्या शोधाचं प्रकरण हे खूप खूप खोल मुळं असणारं आहे. संपूर्ण युरोपात या प्रकरणानंतर विद्यापीठं, टेलिफोन कंपन्या, सरकारी आस्थापना यांनी कायद्याने गुप्ततेचं बंधन आणलं आहे. भारतातील निर्भया प्रकरणापासून ते सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत जनमत पद्धतशीरपणे बदललं गेलं. फेसबुक वापरकर्त्यांच्या खासगी माहितीची विक्री वारंवार झाल्याचे अंदाज अनेकदा वर्तवले गेले आहेत. मग प्रश्न पडतो, तो सामाजिक माध्यमं हा खरोखर मुक्तीचा लोकशाही मार्ग आहे का? सामाजिक माध्यमांचा वापर सध्या लोक मोठय़ा प्रमाणात फोटो, व्हिडीओमार्फत माहितीचे बधिर करणारे लोंढे पाठवायला करत आहेत.

ज्या समाजाला वास्तवातल्या भेदभावाचं, विषमतेचं भय वाटतं, तो समाज भेदभाव आणि विषमता आहे, हे नाकारण्याचे मार्ग शोधतो. गोड, भुलवणाऱ्या, रंजक गोष्टीच मग हव्याहव्याशा वाटू लागतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमं, समाजमाध्यमांतून आपल्या आयुष्यावर एक गोडगुलाबी रंजक चादर पसरवणाऱ्या अशा भ्रामक सावल्यांची, भास, आभासांची घाऊक निर्मिती केली जाते. सतत चकित व्हायला लावणारी रंगीबेरंगी सुखांची चादर. हे आभास म्हणजे प्रतिमा आणि चिन्हांचा वैश्विक खेळ. या आभासी भ्रामक प्रतिमासंचामुळे वास्तव केवळ झाकलंच जात नाही, तर गायबच केलं जातं. बातम्यांतून, वृत्तपत्रातल्या वार्ताकनांतून, टीव्हीवरच्या प्रतिमासृष्टीतून जळीत प्रकरणं, समूहाने केलेल्या हत्या दिसेनाशाच होतात. परंतु नटय़ांचे नवे कपडे, मोठय़ा नेत्यांचे झगमगते कार्यक्रम आणि नव्या जादूई करोडपती खेळाची क्षणचित्रं मात्र सतत दिसत राहतात. वास्तवाचा हा मृत्यूच. आभासी मोहमयी प्रतिमांच्या तीक्ष्ण हत्यारांनी घडवलेला खून. मग मागे उरतं ते अतिरेकी, अतिरंजित वास्तव- अतिवास्तव- हायपररिअ‍ॅलिटी. मोठे पडदे, मोठे जादूचे खेळ, मोठी क्रीडांगणं, भल्यामोठय़ा पडद्यावरच्या वेगवान प्रतिमा, संगणकीय करामतींनी घडवलेल्या चिन्हं/ प्रतिमांचे सरकते पट. हे आभासी जगच हळूहळू खरं वाटू लागतं. युद्ध, दैन्य, मृत्यू, उघड किंवा छुपी गुलामी, खुन्यांच्या झुंडींच्या टोळधाडी, दररोजची लुच्चेगिरी, लाचारांच्या फौजा हे केवळ लपत नाही, तर नाहीसंच होतं. खऱ्या माणसांच्या आयुष्याच्या या प्रतिमासंचातल्या भल्यामोठ्ठय़ा सावल्यांनाच ज्याँ बॉद्रिलारने काही दशकांपूर्वी ‘डेथ ऑफ द सोशल’ संबोधलं आहे.

व्याख्याच कालबा? 

पाश्चात्त्य जगातल्या खोटय़ा अतिरंजित जीवनानुभवाविषयीची ‘डेथ ऑफ द सोशल’ ही संकल्पना आता भारतातही आपण अनुभवू लागलो आहोत. समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे ही विशेषत: भारतात वारंवार वापरली जाणारी व्याख्या आज भारतातही कालबा झाली आहे. सेलफोन वापरणारे दोन, चार, शंभर.. अगदी हजारभर लोक आसपास, एकत्र असले, तरी या नव्या अतिरंजित वास्तवात खऱ्या साक्षात सामाजिक संबंधांची खुमारी अनुभवता येत नाही. मग अनेक विरोधाभास पुढे येत राहतात. भेटणं, बोलणं, एकमेकांसाठी काही तयार करणं- मग एखादी कलाकृती असो की खाण्याचा विशेष पदार्थ किंवा देहबोलीतून नातेसंबंध घडवणं हे या डिजिटल युगात लुप्त होत चाललं आहे. प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट असा हा काळ आहे. प्रत्यक्ष जे आहे ते असंबद्ध झालं आहे. फोटोशॉप, स्नॅपचॅट फिल्टर्स, मीम्स, अ‍ॅनिमे यातून आता चित्रपटदृश्यं आणि सामान्यांच्या आयुष्याच्या दृश्यप्रतिमा यातले भेद जवळजवळ संपत आले आहेत. वास्तव, भास, आभास यातून वास्तवाची एक अतिरंजित, अतिरेकी अशी पुनव्र्याख्या पुढे येते आहे. ही व्याख्या सिद्धांतातून, जड ग्रंथांतून बाहेर पडून विशेषत: आजच्या नव्या पिढीच्या जगण्याचा भाग झाली आहे. इतकी की, खरं काय नि खोटं काय; वास्तव काय आणि अवास्तव काय, हे आता कूटप्रश्न बनले आहेत.

मुळात जन्म आणि मृत्यू यातील अनिश्चित काळ म्हणजे मानवी आयुष्य हे गृहीतकच आता रद्दबातल करावं लागणार की काय, अशी वेळ आली आहे. गुणसूत्रांत बदल करून घडवलेल्या नव्या डिझायनर बेबीज या जगात येऊ घातल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या वापरातून मृत्यू लांबवण्याच्या अनेक परी आता हाती लागल्या आहेत. तसेच त्वचा, डोळे, हृदय, यकृत, किडनी रोपणाखेरीज एखाद्याचा आवाज हा संगणकामार्फत सतत दुसऱ्याच्या आवाजाऐवजी ऐकवता येईल, असं तंत्रज्ञान आता हाती आलं आहे. निसर्ग, नियती, परमेश्वर यांची सर्व कामं मग आता माणूसच करू लागला आहे. अशा या नव्या जगात माणसानं सांत्वनासाठी कोणाकडे बघायचं, धीर कोणाला आणि कसा मागायचा? असे प्रश्न आहेत. आणि त्याच वेळी आधाराला हात हवा असतो, संकटात पाठीवर थोपटायला कोणी तरी लागतं, कौतुकाचे केवळ शब्द पुरत नाहीत, डोळ्यातून दाद मिळावी लागते, असा या आधुनिकतेपलीकडे गेलेल्या आधुनिकोत्तर जगातला संभ्रम आहे.

अखेरीस किपिलगच्या जंगलबुक या कादंबरीतला प्रसंग आठवतो. लहानग्या मोगलीला ‘का’ नावाचा अजगर नजरबंदीनं भुलवून वेटाळू पाहतो त्या वेळी त्याच्या डोळ्यातल्या स्वत:च्या प्रतिमेकडे न पाहता मोगली स्वत:कडे नजर वळवतो आणि त्या क्षणी अजगराची पकड सलावते. आपल्याकडे आदिवासी परंपरांमध्ये आपल्या बाहेरच्या प्रतिमांमध्ये न गुंतता आत वळून स्वत:कडे पाहाणं होतं. प्रतिमांच्या छळछावणीतून सुटका मिळण्याचा असा एक मार्ग असू शकतो. हा ‘अत्त दीप भव’चा संदेशच संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग ठरू शकेल. तसं व्हावं.

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त समाजशास्त्राचे अध्यापन करतात. ईमेल  : shruti.tambe@gmail.com