03 June 2020

News Flash

हर शख्स परेशानसा क्यों है?

बहिरंग परीक्षण हे आपल्यासमोर आलेल्या पुराव्याचा अस्सलपणा तपासतं, तर अंतरंग परीक्षणाद्वारे हा पुरावा खात्रीशीर आहे का, हे तपासलं जातं.

संग्रहित छायाचित्र

 

श्रद्धा कुंभोजकर

इतिहास  राज्यशास्त्र. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.

सत्याच्या मांडणीमध्ये पुरावे अतिशय महत्त्वाचे असतात. परंतु समोर येणाऱ्या पुराव्यांवर डोळे मिटून विश्वास न ठेवता त्यांचं परीक्षण करणं अत्यावश्यक असतं. कारण पुराव्यांची केलेली मोडतोड कधीच निरुपद्रवी नसते, हे इतिहासानं दाखवून दिलंच अन् वर्तमानही दाखवतं आहेच..

हजरत मुहम्मद पैगंबरांच्या पश्चात त्यांचे अनुयायी त्यांची वचनं लक्षात ठेवू लागले. या वचनांना ‘हदीस’ (पर्यायी उच्चार : ‘हदीथ’) असं म्हणतात. कालांतरानं या वचनांचा अस्सलपणा आणि विश्वासार्हता कितपत आहे, याची तपासणी करावी असं वाटून त्याबाबतचा अभ्यास सुरू झाला. अनेक स्त्री-पुरुष विचारवंतांनी या हदीस- वचनांच्या संग्रहाचा शास्त्रोक्त अभ्यास करून त्यांची बिनतोड (सही), चांगल्यापैकी (हसन) अथवा कमी विश्वासार्ह (दईफ) आहेत, अशी विश्वासार्हतेबाबतची वर्गवारी मांडली. धार्मिक वचनांची तपासणी करणारी आपापली विचारपद्धती प्राचीन काळातील सर्वच धर्माच्या अनुयायांनी विकसित केली होती. या निर्भीडपणे मांडल्या गेलेल्या धार्मिक वचनांच्या चिकित्साशास्त्रामध्ये आजच्या इतिहास लेखनशास्त्रामधील पुराव्यांच्या तपासणीची पाळंमुळं आहेत.

सत्याच्या मांडणीमध्ये पुरावे अतिशय महत्त्वाचे असतात. परंतु त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास न ठेवता त्यांचं परीक्षण करणं अत्यावश्यक असतं. रेल्वे वाहतूक खरोखर सुरू होणार का, याची शहानिशा न करता पसरवलेल्या बातम्या असोत अथवा इस्लाम धर्मीयांना रोगप्रसारासाठी कारणीभूत ठरवणारी खोटी दृक्मुद्रणं (व्हिडीओ) असोत; बोलभांड माध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या सर्वच पुराव्यांचं परीक्षण करणं हा आजच्या घडीला आपल्या जगण्यातला व इतिहास लेखनशास्त्राच्या अभ्यासातलाही अतिशय कळीचा घटक आहे. हे परीक्षण बहिरंग आणि अंतरंग अशा दोन प्रकारांत विभागलेलं असतं. बहिरंग परीक्षण हे आपल्यासमोर आलेल्या पुराव्याचा अस्सलपणा तपासतं, तर अंतरंग परीक्षणाद्वारे हा पुरावा खात्रीशीर आहे का, हे तपासलं जातं.

बहिरंग परीक्षण

आपल्या समोर येणाऱ्या पुराव्याचं बहिरंग परीक्षण करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर त्याला प्रश्न विचारायचे. हा पुरावा कुणी सादर केला? कधी? कुठं? कशासाठी? कशा पद्धतीनं? इतिहासाच्या अभ्यासातलं सुप्रसिद्ध उदाहरण यासंदर्भात पाहता येईल. झा आणि राजाराम या (वीकेंडपुरते) इतिहासतज्ज्ञ बनलेल्या जोडगोळीनं हडप्पा संस्कृतीमध्ये आजतागायत न सापडलेली अशी एक घोडय़ाच्या चित्राची मुद्रा ‘सापडवून’ तिचं छायाचित्र छापलं; आणि एकूणच हडप्पा संस्कृतीतील लिपी आणि भाषा आपल्याला कळल्याचा दावा एका पुस्तकातून केला. या तथाकथित संशोधकांनी कधी हडप्पाला भेट दिली नाही किंवा त्या संस्कृतीच्या अभ्यासासाठी लागणारं भाषेचं, पुरातत्त्वाचं, इतिहासाचं ज्ञान कष्टांनी मिळवलं नाही, तसेच या क्षेत्रात त्यांनी आधीपासून कामही केलेलं नव्हतं. संस्कृत बोलणाऱ्या वैदिक लोकांनी (अर्थात त्यांच्या मते, आजच्या हिंदू धर्माच्या पूर्वजांनीच) हडप्पा संस्कृती निर्माण केल्याचा खोटा आणि कालविसंगत दावा करण्यासाठी एकशिंग्या युनिकॉर्न प्राण्याच्या मुद्रेचं फोटोशॉप करून ही घोडय़ाची प्रतिमा ‘बनवलेली’ होती. बहिरंग परीक्षण केल्यावर त्यांचे पुरावे अस्सल नसल्याचं उघडकीला आलं.

अंतरंग परीक्षण

केवळ बहिरंग परीक्षणातून तावूनसुलाखून अस्सल ठरला म्हणून कोणताही पुरावा विश्वासार्ह ठरत नाही. अंतरंग परीक्षण करून, म्हणजेच  पुराव्याच्या आत शिरून त्यात जे म्हणणं मांडलेलं आहे, तेही तपासून मगच त्याची विश्वासार्हता ठरवता येते. हे तपासताना असे प्रश्न विचारावे लागतात – पुरावा देणाऱ्यानं प्रत्यक्ष घटना पाहिली की ऐकीव माहिती दिली आहे? यातून लेखकाला काय फायदा मिळणार आहे? लेखकाला अभिप्रेत अर्थ काय आहे? दिलेली माहिती याच घटनेबाबतच्या इतर पुराव्यांशी सुसंगत आहे का? एकूण संदर्भचौकटीशी हा पुरावा विसंगत नाही ना? इत्यादी.

आधी पशुपालन, मग शेती, मग व्यापार असे संस्कृतीच्या वाटचालीचे टप्पे सर्वमान्य आहेत. तरीही व्यापारावर आधारलेली हडप्पातील शहरी संस्कृती ही त्या प्रदेशात मागाहून चारपाचशे वर्षांनी आलेल्या ‘वैदिक संस्कृतीमधल्या गायी पाळणाऱ्या, घोडेस्वारी करणाऱ्या लोकांनीच निर्माण केली’ या  दाव्याला अंतरंग परीक्षणाचे प्रश्न विचारल्यावर मात्र त्याचं पितळ उघडं पडलं. मजा म्हणजे, या पुस्तकातले दावे खरे ठरवून एक हजार डॉलर्सचं बक्षीस घेऊन जाण्याची विट्झेल आणि फार्मर या संशोधकांनी दिलेली ‘ऑफर’ आजतागायत कुणीच स्वीकारली नाही!

पण गंभीर मुद्दा असा की, इतिहासाच्या पुराव्यांची मोडतोड कधीच निरुपद्रवी नसते. आमचा धर्म, देश, संस्कृती, जात हेच बाकी सगळ्यांपेक्षा पुरातन आणि म्हणून सर्वश्रेष्ठ आहे; इतर सगळे ते परके, उपरे आहेत, असं सांगण्याचे अप्रामाणिक आणि द्वेषभक्तीचे प्रयत्न भारतातच नव्हे, तर ता’हद-ए-नजर – म्हणजे दृष्टी पोहोचेल तिथवर, जगभरात होत असतात. कधी लिंगभावानुसार, कधी धर्म-जातीनुसार समाजाला भेगाळून टाकणारा हा द्वेषाणू  माणसांना एकलकोंडीत पकडतो. हे ‘हर शख्स परेशानसा क्यूं है?’ या असहाय प्रश्नाचं उत्तर आहे. आज आपापल्या घरात, परिसरात कैद झालेल्या आपण सगळ्यांनी आपल्यातल्याच काही लोकांना परकं ठरवण्याच्या प्रयत्नांना खीळ घातली पाहिजे.

समदृष्टीचे महत्त्व

गौतम बुद्धांनी ‘धम्मपदा’मध्ये सांगितलंय की, जर आपल्या हाताला जखम नसेल, तर आपण हातात विष घेतलं तरी ते बाधत नाही. ‘समदिठ्ठिसमादाना’ म्हणजे समाजाच्या सगळ्या घटकांकडे सारख्या नजरेनं पाहण्याची सवय आपण अंगीकारली, तर कुणीच समाजाच्या एकसंधपणाला बाधा आणू शकणार नाही.

असत्याची विषारी शृंखला

पाऊणशे वर्षांपूर्वी द्वेषाणूची शिकार झालेल्या आणि आज करोनाच्या साथीतही आपल्या दोन पावलं पुढं असणाऱ्या युरोपच्या इतिहासातून आपण काही शिकू शकतो. आधुनिक युरोपात ज्यू समाजाच्या प्रथा-परंपरांना उपऱ्या, घाणेरडय़ा, दुष्ट ठरवून त्यांना आधी पद्धतशीरपणे सामान्य लोकांच्या दृष्टीनं परकं करून टाकलं गेलं. ज्यू धर्मीयांची माणसांत गणनाच करणं सोडून दिल्यामुळं लक्षावधी ज्यूंचं शिरकाण झालं तरी महायुद्धाच्या हिंस्र परिणामांनी गांजलेल्या युरोपातल्या मानवतावादी आणि राष्ट्रभक्त समाजांना ‘परदु:ख शीतल’ वाटलं असावं. भारतातलं करोनायुद्ध चालू असतानाच पद्धतशीरपणे परक्या ठरवल्या गेलेल्या मुस्लीम समाजाबद्दल सामान्य लोकांच्या मनात निर्माण केली गेलेली घृणास्पद प्रतिमा ही पुराव्यांच्या मोडतोडीच्या पायावरच उभी आहे. त्याचा प्रतिकार करायचा तर आपल्या स्क्रीनवर न सांगतासवरता येऊन घोंघावणारा माहितीचा प्रत्येक कण हा करोनाचा विषाणूच असल्यासारखं आपण सावध राहायला हवं. सत्याचं परीक्षण करण्यासाठी सतत हात धुऊन मागं लागायला हवं. असत्याची विषारी शृंखला तोडायला हवी. हेच ‘छिनन्तु सर्वे अनृतं वदन्तं य: सत्यवादी अति तं सृजन्तु’ अशा शब्दांत ‘अथर्ववेदा’त सांगितलं आहे.

लेखाच्या सुरुवातीला सर्वधर्मीय विचारवंतांनी सत्यान्वेषणासाठी विचार मांडल्याचा उल्लेख केला आहे. तर शेवटी ज्यू धर्मीय हिल्लेल नावाच्या विचारवंताचा किस्सा सांगावासा वाटतो. ‘‘धर्मग्रंथांचं विवेचन ऐकायला मला वेळ नाही. मला एका पायावर जितका वेळ उभं राहता येईल, तितक्या वेळात तू धर्माचा खरा विचार मला सांग,’’ असं आजच्या मिलेनिअल पिढीला साजेसं आव्हान दोन हजार वर्षांपूर्वी एकानं हिल्लेलला दिलं. त्यावर हिल्लेलनं सांगितलं, ‘‘तुला जी वागणूक घृणास्पद वाटेल, ती दुसऱ्याला कधीही देऊ नको. हेच सगळ्या धर्माचं सार आहे. पळ, अभ्यास कर.’’ आपल्याला उभ्या घाईनं रिअ‍ॅक्ट करायला, प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त करणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना हिल्लेलची आठवण ठेवणंही पुरेसं आहे!

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त इतिहासाचे अध्यापन करतात.

ईमेल : shraddhakumbhojkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 12:01 am

Web Title: article on huge crowd at bandra station lockdown demand about train abn 97
Next Stories
1 ‘कोविड- १९’ आणि धट्टीकट्टी श्रीमंती
2 मुक्ती कोन पथे?
3 असहाय सूत्रधार आणि आशेचा सोपान
Just Now!
X