प्रियदर्शिनी कर्वे

पर्यावरण-विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, न्याय

speech fasting benefits if you stay silent for an entire day this is what happens to your body
तुम्ही पूर्ण दिवस न बोलता शांत राहिल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? जाणून घ्या ‘स्पीच फास्टिंग’चे फायदे
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
What Happens To Body By Drinking One Glass Milk Everyday
एक ग्लास दूध रोज प्यायल्याने तुमच्या शरीराला फायदा होतोय की त्रास, कसे ओळखाल? शरीराचं कसं ऐकाल?
shani surya yuti in kumbh rashi ended
शनि-सूर्याची युती संपली; या राशींचे लोक होतील मालामाल, मिळणार अमाप पैसै

जगप्रसिद्ध आविष्कार-उद्योजक एलॉन मस्क यांनी पुढील काही वर्षांत मंगळावर मानवी वसाहत उभी करण्याचा चंग बांधला आहे. अलीकडेच नासाचे ‘पर्सिव्हिअरन्स रोव्हर’ मंगळावर यशस्वीरीत्या उतरले आणि त्याने मंगळाच्या पृष्ठभागाची दृश्ये आणि माहिती पाठवायला सुरुवात केली. तेव्हापासून मंगळावर मानवी वस्ती या विषयावर उलटसुलट चर्चाना उधाण आले. मानवी तांत्रिक प्रगतीच्या प्रवासात इतर ग्रहांवर वसाहती हा स्वाभाविक पुढचा टप्पा आहे, असे मस्क-समर्थकांना वाटते. पण मंगळावर मानवी वसाहत करण्यासाठी मुळात पृथ्वीवरील मानवी वसाहतीचा पाया कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे, हे पाहायला हवे.

जगप्रसिद्ध आविष्कार-उद्योजक एलॉन मस्क यांनी पुढील काही वर्षांत मंगळावर मानवी वसाहत उभी करण्याचा चंग बांधला आहे. अलीकडेच नासाचे ‘पर्सिव्हिअरन्स रोव्हर’ मंगळावर यशस्वीरीत्या उतरले आणि त्याने मंगळाच्या पृष्ठभागाची दृश्ये आणि माहिती पाठवायला सुरुवात केली. तेव्हापासून मंगळावर मानवी वस्ती या विषयावर उलटसुलट चर्चाना उधाण आले. मानवी तांत्रिक प्रगतीच्या प्रवासात इतर ग्रहांवर वसाहती हा स्वाभाविक पुढचा टप्पा आहे, असे मस्क-समर्थकांना वाटते. पण मंगळावर मानवी वसाहत करण्यासाठी मुळात पृथ्वीवरील मानवी वसाहतीचा पाया कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे, हे पाहायला हवे.

पृथ्वीवर आज जी मानवी समाजव्यवस्था उभी आहे, त्यामागे सुमारे ४.५ अब्ज वर्षांचा इतिहास आहे. पण मानवाने गेल्या दहा-बारा हजार वर्षांच्या कालावधीत पृथ्वीच्या नैसर्गिक रचनेत मोठय़ा प्रमाणावर हस्तक्षेपही केला आहे. २००९ साली स्वीडिश वैज्ञानिक योहान रॉकस्ट्रम व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला. पृथ्वीवर मानवी अस्तित्व टिकून राहण्यासाठी आपण पृथ्वीवरील नऊ नैसर्गिक रचनांच्या मर्यादा पाळायला हव्यात, असे या वैज्ञानिकांनी दाखवून दिले. म्हणजेच मंगळावर कायमस्वरूपी मानवी वसाहत प्रस्थापित करायची असेल, तर या नऊ रचना किंवा त्यांचे काम करणाऱ्या पर्यायी व्यवस्था तिथे निर्माण कराव्या लागतील. यापैकी काही रचना आणि मंगळावर त्यांबाबत काय परिस्थिती असू शकते, ते पाहू या.

पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या जैववैविध्याच्या मदतीने आपल्या अन्न, वस्त्र, निवारा, ऊर्जा इ. गरजा भागवणे तर शक्य होतेच; पण आपल्या काही मूलभूत जीवनक्रिया इतर सजीवांवर अवलंबून आहेत. उदा.- आपल्या आतडय़ात विविध प्रकारचे जिवाणू राहातात. अन्नापासून पोषण मिळवण्याच्या प्रक्रियेत या जिवाणूंची भूमिका महत्त्वाची असते. हे जिवाणू पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या अगदी सुरुवातीच्या एकपेशीय सजीवांपैकी आहेत, तर आपण पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या अगदी अलीकडच्या सजीवांपैकी एक आहोत. ज्या ग्रहावर कोणतीच सजीव सृष्टी निसर्गत: निर्माण होऊ शकलेली नाही, अशा ग्रहावर इतर सजीवांच्या मदतीशिवाय पिढय़ान्पिढय़ा आपले एकांडे अस्तित्व टिकू शकेल का? कृत्रिमरीत्या काही प्रतिसृष्टी आपण निर्माण केली, तर तिचे संतुलन राखणे आपल्याला शक्य होईल का?

पृथ्वीवर आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारी एक महत्त्वाची नैसर्गिक यंत्रणा म्हणजे पृथ्वीचे वातावरण. मानवाच्या पृथ्वीवरील दीर्घकालीन अस्तित्वासाठी वातावरणाशी संबंधित तीन गोष्टी अबाधित राहाणे आवश्यक आहे : वातावरणातील वायूंच्या मिश्रणाचा नाजूक समतोल, वातावरणाच्या सर्वात वरच्या भागातील ओझोनचा थर, आणि वातावरणाच्या आपला वावर असलेल्या खालच्या भागात हवेची शुद्धता.

गेल्या ४.५ अब्ज वर्षांमध्ये पृथ्वीच्या वातावरणात अनेक स्थित्यंतरे झाली. जीवसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात वातावरणात अत्यल्प प्रमाणात असणारा ऑक्सिजन प्रकाशसंश्लेषण करणाऱ्या जिवाणूंमुळे २१ टक्क्यांवर पोहोचला, आणि वातावरणाच्या बाह्य़ भागात ओझोनचा थरही तयार झाला. आत्ताचे वातावरण हे सध्या पृथ्वीवर असलेल्या सर्व जीवसृष्टीसाठी अनुकूल आहे, आणि जीवसृष्टीचा समतोल वातावरणाचे रासायनिक संतुलन कायम ठेवण्याचेही काम करत आला आहे. दशलक्षात काही शे भाग इतका कमी असूनही कार्बन डायॉक्साइड पृथ्वीचे तापमान आपल्याला जगण्यासाठी आवश्यक तितके राखतो आणि कार्बनचक्राद्वारे आपल्याला अन्न उपलब्ध करून देतो. वातावरणातील बाष्प पर्जन्यचक्र चालवण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला पाणी उपलब्ध होते. आणि अर्थातच ‘प्राणवायू’ ऑक्सिजनशिवाय आपले श्वास चालू राहाणे अशक्य आहे. वातावरणाचे संतुलन बिघडले की काय होते, याचा अनुभव आज आपण स्थानिक हवेच्या प्रदूषणापासून ते जागतिक तापमानवाढीपर्यंत विविध दुष्परिणामांतून घेतच आहोत. मंगळावर कृत्रिम वातावरणात फक्त माणूस हा एकमेव सजीव असेल तर वातावरणाची अनुकूल रासायनिक रचना तयार करून ती कायम ठेवण्यासाठी सातत्याने ऊर्जा खर्च करत राहावे लागेल.

आज आपल्या वातावरणाच्या सर्वात वरच्या भागातील ओझोनचा थर आपले सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. मंगळावर वातावरणच नाही, त्यामुळे सूर्यप्रकाशातील सर्व किरण कोणत्याही आडकाठीशिवाय थेट जमिनीवर पोहोचतात. मंगळावर वातावरण नाही, कारण मंगळाला चुंबकीय क्षेत्र नाही. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र वातावरण तर धरून ठेवतेच, पण आपल्याला वैश्विक किरणांच्या माऱ्यापासूनही वाचवत असते. म्हणजे मंगळावरील मानवांना सूर्याचे अतिनील किरण आणि वैश्विक किरण या दोन्हींपासून संरक्षणाची काही यंत्रणा निर्माण करावी लागेल. ती चालू ठेवण्यासाठीही ऊर्जेची गरज पडेल.

जाता जाता आणखी एक : पृथ्वीवरील वातावरणाच्या वजनाखाली आपली उत्क्रांती झाली आहे. वातावरणाचे आपल्या खांद्यावर असलेले ओझे हासुद्धा आपल्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. या ओझ्याच्या अभावामुळे दीर्घकाळ अंतराळात घालवलेल्या अंतराळयात्रींची हाडे ठिसूळ होतात, स्नायू कमकुवत होतात. या समस्येलाही मंगळवासी माणसांना तोंड द्यावे लागेल.

पृथ्वीवरील माणसांसाठी आवश्यक आणखी दोन गोष्टी पाण्याशी जोडलेल्या आहेत. पृथ्वीच्या बाल्यावस्थेत पृथ्वीवर येऊन आदळलेल्या अवकाशीय वस्तूंमधून पृथ्वीवर पाणी आले. पृथ्वीचा ७० टक्के भाग महासागरांनी व्यापलेला आहे. जीवसृष्टीचा उदय याच खाऱ्या पाण्यात झाला असला तरी, माणसाला पिण्यासाठी गोडे पाणीच लागते. पृथ्वीवर गोडे पाणी बरेचसे गोठलेल्या स्वरूपात आहे. नद्या, नाले, ओढे, तलाव, विहिरी आदींतून उपलब्ध असलेलेच पाणी फक्त आपण थेट वापरू शकतो. पर्जन्यचक्राद्वारे या स्रोतांचे पुनर्भरण होत असते. मंगळावर पाणीच नाही. म्हणजे आपल्याला तिथे रासायनिक प्रक्रियेद्वारे ऊर्जा खर्च करून पाणी निर्माण करावे लागेल व अत्यंत जपून वापरावे लागेल.

 

महासागरांच्या पाण्यामध्ये वाढत चाललेले नायट्रोजन आणि फॉस्फरसचे प्रमाण आणि त्यामुळे वाढती आम्लता यामुळे सागरी सजीव सृष्टीचे संतुलन बिघडते आहेच; पण याचा अप्रत्यक्ष परिणाम पृथ्वीवरील हवामान-चक्रावरही होतो आहे. या प्रदूषणाला मुख्यत: आपल्या अन्न उत्पादनात होणारा नायट्रोजन व फॉस्फरसयुक्त रसायनांचा अतिरिक्त वापर कारणीभूत आहे. पाण्यावाटे शेवटी ही सारी रसायने समुद्रामध्ये जातात. प्रदूषण होऊ न देता सर्व माणसांना पुरेल इतके अन्न उत्पादन करणे आपल्याला अजून जमलेले नाही. मंगळावर शेती करणे आणि त्यातून सातत्यपूर्ण उत्पादन काढणे, हे त्याहून जास्त आव्हानात्मक आणि ऊर्जेच्या बाबतीत खर्चीक असणार आहे.

मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या नैसर्गिक परिसंस्था आपल्या अस्तित्वासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यांनी व्यापलेली जागा कमी होत गेली, शेती, पशुपालन, खाणी, उद्योगधंदे, शहरे, इ.साठी वापरली गेली, की नैसर्गिक परिसंस्थांकडून विनामूल्य मिळणाऱ्या सेवांना आपण मुकतो. उदा. वस्तीजवळ वाहती नदी असेल, तर जुजबी प्रक्रिया केलेले घरगुती सांडपाणी त्यात सोडून दिले तरी काही बिघडत नाही. यातील जैव पदार्थ नदीतील सजीवांना खाद्यही पुरवतात. पण एकीकडे लोकवस्तीची घनता वाढली, प्रदूषणकारी उद्योगधंदे उभे राहिले, आणि दुसरीकडे धरणांमुळे नदीचा प्रवाह रोडावला, तर सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळ्या यंत्रणा उभ्या कराव्या लागतात. आपण तयार केलेले अनेक कृत्रिम पदार्थ कचरा बनून (उदा. प्लास्टिक) आता निसर्गात पसरत आहेत. यांमुळेही नैसर्गिक परिसंस्थांवर दूरगामी परिणाम होत आहेत आणि त्यांचाही फटका काही स्वरूपात आपल्याला बसतो. मंगळावर सांडपाण्यातील आणि कचऱ्यातील पदार्थ पुन्हा वापरात आणणे अत्यावश्यक असेल, आणि हेही ऊर्जेच्या बाबतीत खर्चीक ठरणार आहे.

मंगळवासी माणसांसाठी सूर्य हा एकमेव ऊर्जास्रोत उपलब्ध आहे. पृथ्वीवरील तंत्रज्ञानाच्या विकासात कोळसा आणि पेट्रोलियमची भूमिका महत्त्वाची होती. मृत सजीवांची कलेवरे जमिनीच्या पृष्ठभागाखाली गाडली जाऊन ही अतिशय उच्च ऊर्जाघनता असलेली खनिज इंधने इथे तयार झाली. मंगळावर जीवसृष्टी नाही, त्यामुळे तिथे खनिज इंधनेही नाहीत.

थोडक्यात म्हणजे माणसांचे जगणे आणि तगणे आपल्या या सुजलाम सुफलाम ग्रहाच्या प्रत्येक पैलूबरोबर जोडलेले आहे. हे गुंतागुंतीचे नाते आपल्याला अजून पुरते आकळलेलेही नाही. वातावरण बदल आणि जैववैविध्याचा ऱ्हास आत्ताच थोपवले नाहीत, तर काही दशकांत पृथ्वीवरचे मानवी जीवनही खडतर होईल. जिथे जीवसृष्टीला आधार मिळेल अशी कोणतीच गोष्ट नैसर्गिकरीत्या उपलब्ध नाही, अशा मंगळावर कायमस्वरूपी वसाहती उभारणे आणि टिकवून ठेवणे, हा त्याहून फार लांबचा पल्ला आहे.

करीत्या उपलब्ध नाही, अशा मंगळावर कायमस्वरूपी वसाहती उभारणे आणि टिकवून ठेवणे, हा त्याहून फार लांबचा पल्ला आहे.

लेखिका पर्यावरणनिष्ठ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असून ‘समुचित एन्व्हायरो-टेक’च्या संस्थापक आहेत.

ईमेल : pkarve@samuchit.com