श्रद्धा कुंभोजकर

इतिहास  राज्यशास्त्र. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.

in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…

इतिहास आपण समाजात ज्ञान वाढावं म्हणून लिहितोय की द्वेष वाढावा म्हणून- याचा विवेक इतिहासकाराच्या मनात जागृत हवा. ज्ञानाची आस असेल आणि पुरेसं प्रशिक्षण असेल, तर मग कोणताही पुरावा अस्वीकारार्ह न मानता, त्या पुराव्यांचा अभ्यासू अन्वयार्थ लावता येतो..

‘‘तुमचा मोबाइल फोन बंद पडलाय? चिंता करू नका- विसाव्या शतकात आपल्या थोर पूर्वजांनी वापरलेले एकूण सात फोन आहेत माझ्या संग्रहात. ‘नासा’च्या मते ते लवकरच दुर्मीळ होणार आहेत. असं करा; मी येत्या रविवारी ‘विसाव्या शतकातील दळणवळण क्रांती’ या विषयावर एक वेबिनार घेईन ते ऐका. तसं ऑनलाइन सर्टिफिकेटदेखील देईन तुम्हाला.  काय म्हणता? भाषण वगैरे नको – ताबडतोब फोन दुरुस्ती करणाऱ्या तंत्रज्ञाकडे नेताय? अरेरे- माझं या विषयावरचं पुस्तक येईल तेव्हाच तुम्हाला या विषयाचं महत्त्व कळेल!’’

हसू आलं? संपादकीय पानावर फार्स छापायला सुरुवात झाली असं वाटलं? पण आपल्या समाजात ज्ञान या गोष्टीची अशी काही शोकांतिका घडते आहे, की कदाचित थोडंसं हसं झालं तर उतारा मिळेल असं वाटतं.

आज आपल्या भवतालात ‘आय कान्ट ब्रीद- माझा श्वास घुसमटतोय’ असं सांगणाऱ्या भीषण घटना घडत आहेत, पण आपल्याला काय त्याचं? माणसं सक्तीनं मायदेशांतर करतात. जीव जाईपर्यंत आठ मिनिटं ४६ सेकंदांची तडफड करतात. जातीबाहेर प्रेम केलं म्हणून मारली जातात. तणावापायी जगणं थांबवतात. पण हे अंगावर कीटकनाशक फवारले गेलेले, देशात दोन वर्षांचा धान्यसाठा असतानाही भुकेनं जीव गेलेले लोक आपण नजरेआड करतो. आणि घरोघरी यीस्ट घालून आंबवलेल्या पदार्थाच्या फोटोंनी बीभत्स आंबटशौकीन लाइक्स मिळवतो. कारण आपल्या डोळ्यांदेखत देशोधडीला लागलेल्या, मरणाऱ्या जीवांकडे समाजाचं दुर्लक्ष व्हावं असं आपल्यातल्याच काहींना वाटतं. त्यासाठी कुणी नथ घातलेले फोटो अपलोड करण्याचं चॅलेंज देतात, तर कुणी जंगी वेबिनार सप्ताह लावून रिकामटेकडी बुबुळं आपल्याकडे खेचतात.. इतिहासाचं क्षेत्र यात मागं कसं राहील बरं?

अचूक भासणारे संदर्भ निवडकपणे चघळणे आणि जुन्या जखमा चिघळवणे यालाच इतिहास संशोधन मानणाऱ्या काही मंडळींनी वर्तमान आव्हानांकडे पाठ फिरवून वेगळ्या पाऊलखुणा उमटवायला सुरुवात केली आहे. अशा पळपुटय़ा सैनिकांच्या उद्योगांना ‘शिवछत्रपती इतिहास आणि चरित्र’ या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या प्रस्तावनेत य. दि. फडके यांनी ‘साक्षर ज्ञानशत्रूंचा किफायतशीर धंदा’ असं म्हटलं आहे.

फोन दुरुस्त करणाऱ्या तंत्रज्ञानं जसं त्या कामाचं प्रशिक्षण घेतलेलं असतं, तसंच इतिहासकारांनी भूतकाळाचा अन्वयार्थ लावण्याचं प्रशिक्षण घेतलेलं असतं. ते दफ्तरखान्यांतल्या साधनसामग्रीच्या अंतरंग आणि बहिरंगाचं परीक्षण करणं  शिकतात. कोणते पुरावे ग्राह्य धरायचे, कोणते अविश्वासार्ह म्हणून बाजूला ठेवायचे, याचा विवेक ठेवून ते इतिहासाचं कथन करतात. ढीगभर फोन बाळगल्यामुळे जसं फोनला बोलतं करता येणार नाही, तद्वतच पुराव्यांची जंत्री बाळगली तरीही ससंदर्भ अन्वयार्थाशिवाय इतिहासाला बोलतं करता येत नाही. संत एकनाथ (१५३३-१५९९) म्हणतात, ‘‘वानर सकळ फळें खाय। परी

नारळातें अव्हेरूनी जाय। त्याचे अभ्यंतर नोहे । ठाउके तया॥ ’’

प्रशिक्षित इतिहासकारांची मती आणि कृती वानरांपेक्षा वेगळी असते. समजायला अवघड किंवा अव्हेरून टाकावेसे वाटणाऱ्या पुराव्यांतूनदेखील त्यांना योग्य इतिहास मांडता येतो. उदाहरणार्थ दखनी सुलतानांपैकी एका राजाची कथा ‘गुरुचरित्रा’च्या पन्नासाव्या अध्यायात आलेली आहे. ‘यवन जाती’चा आणि महाराष्ट्रधर्मानं वागणारा राजा आपल्याला त्रास देणार नाही अशी खात्री देताना नृसिंहसरस्वती म्हणतात,

‘‘ऐसा राव असतां। महाराष्ट्रधर्मी वरततां।

आपुला द्वेष तत्त्वतां। न करील जाण पां॥’’

तसंच दुसरं उदाहरण म्हणजे औरंगजेबाची आपल्या मनात करवून दिलेली प्रतिमा कितीही वाईट असेल, तरीही भारत इतिहास संशोधक मंडळानं प्रसिद्ध केलेल्या ऐतिहासिक फार्सी साहित्यात १६९१ या वर्षीची औरंगजेबाची राजाज्ञा दिलेली आहे, तिचा अर्थ असा – ‘‘..मठ उद्ध्वस्त करू नये, मत्ता जप्त करू नये.. जातीत्वाची हीन भाषा बोलू नये.’’ ज्यांना घाऊक द्वेषाची झापडं बांधलेला, संवेदनाहीन समाज हवा आहे, असे लोक कोणत्याही ऐतिहासिक घटनेच्या अशा वेगळ्या बाजूला अनुल्लेखानं घुसमटून टाकू पाहतात. तसंच दुसरीकडे आज बहुभार्याप्रतिबंधक कायदा आहे म्हणून गतकालात अनेक पत्नी असणाऱ्या माणसांना दोष देण्यासारख्या हास्यास्पद गोष्टीही घडतात. जुन्या काळातील व्यक्तींची थोरवी वर्णन करताना आधुनिक आदर्श त्यांच्यावर लादणारे अतिउत्साही लोकदेखील इतिहासाला आणि ज्ञानाच्या चिकित्सक परंपरेला हानी पोहोचवत असतात.

कोणत्याही भाषेतून, कोणत्याही स्वरूपात आपल्या हाती येणाऱ्या अस्सल पुराव्याचा वगळ न मानता समतोल इतिहास लिहिता येणं शक्य आहे. त्यासाठी हा इतिहास आपण समाजात ज्ञान वाढावं म्हणून निर्माण करतोय की द्वेष वाढावा म्हणून – याचा विवेक इतिहासकाराच्या मनात जागृत हवा. विवेक जागृत असलेले इतिहासकार साधनांचा सर्वंकष अभ्यास करून ऐतिहासिक घटनांना कोणत्या संदर्भातून समजून घ्यायचं याचा वस्तुपाठच देतात. उदाहरणार्थ ‘शिवछत्रपती इतिहास आणि चरित्र’ या मराठा मंदिर नावाच्या संस्थेने प्रकाशित केलेल्या उपरोक्त ग्रंथात बहामनी राज्याबाबत फिरिश्ता, तबातबा अशा समकालीन तवारिखांच्या लेखकांनी केलेल्या अतिरंजित वर्णनांची उत्तम चिकित्सा आढळते. ‘‘दोन लक्ष हिंदूंना सुलतानाने यमसदनाला पाठवले असेल तर मग त्यांच्या प्रेतांची विल्हेवाट त्याने कशी व कोठे लावली?’’ अशा साध्या परंतु मूलभूत प्रश्नांनी सत्यान्वेषणाची वाट इतिहासकार चोखाळत असतात.

मग प्रश्न असा येतो, की इतकं सुंदर प्रशिक्षण घेतलेले इतिहासकार समाजाला इतिहासविषयक आकलनाची गरज असते, तेव्हाच टाळेबंदीमधल्या धार्मिक स्थळांसारखे शांत का राहतात? त्यामुळेच तर कामचलाऊ व्याख्यात्यांकडे गर्दी लोटते ना? याचं उत्तर असं की समाजापर्यंत ज्ञान पोहोचवण्याची माध्यमं बदलली आहेत हे समजून घेण्यासाठी चष्मे काढून विद्यापीठीय मनोऱ्यांच्या बाहेर डोकावावं लागतं. विद्वान मंडळींसमोर परिषदांतून आणि नियतकालिकांमध्ये परिभाषा वापरून आपले विचार मांडण्याइतकंच प्राधान्य सामान्य माणसासोबत समदृष्टीनं आणि सोप्या भाषेत विचारांची देवाणघेवाण करण्याला द्यावं लागतं. भारत इतिहास संशोधक मंडळ, मराठा मंदिर अशा व्यक्तिगत प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या संस्था असोत, किंवा सामाजिक स्मृती जपणाऱ्या धर्मग्रंथांसारखे अलक्षित ऐतिहासिक पुरावे असोत- बुद्धिजीवी म्हणवणाऱ्या संशोधकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा ज्ञाननिर्मितीसाठी हातात हात देऊन प्रयत्न करण्याऐवजी एकमेकांच्या पायात पाय घालून कार्यनाश आणि समाजाचं नुकसान होण्याचा धोका वाढतो.

शेवटी कोणत्याही वेबिनारमध्ये मिळणार नाही अशी विसाव्या शतकातील दळणवळण क्रांतीबाबतची एक सामाजिक स्मृती- १९७९ मध्ये अंतराळातून स्कायलॅब नावाची अमेरिकेची प्रयोगशाळा पृथ्वीवर आदळणार हे सगळ्यांना कळलं होतं. जवळजवळ आजच्यासारख्याच अनिश्चित आणि भीतिदायक प्रसंगात माणसं कशी वागत होती? माझे सहकारी प्राध्यापक बाबासाहेब दूधभाते यांच्या आठवणीनुसार मराठवाडय़ातल्या गावांमध्ये लोकांनी घरातल्या पापड-कुरडया तळून खाण्याचा सपाटा लावला होता. का? तर स्कायलॅब पडली तर ती वाळवणं वाया जायला नकोत म्हणून! जागतिक घटनांचे मानसिक पडसाद उमटून

माणसं काय करू शकतात याचं हे उद्बोधक उदाहरण समाजाचा विचार करून ज्ञान निर्माण

करू पाहणाऱ्या सर्वच माणसांना महत्त्वाचं वाटायला हवं.

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त

इतिहासाचे अध्यापन करतात.

ईमेल : shraddhakumbhojkar@gmail.com