01 December 2020

News Flash

राजकारण आलं चुलीत!

 कुटुंबाविषयीच्या या ‘निरागस’ आकलनाला राजकीय-सामाजिक सिद्धांतनांमध्ये सर्वप्रथम छेद दिला तो मार्क्‍सच्याही पूर्वी हेगेलने

संग्रहित छायाचित्र

 

राजेश्वरी देशपांडे

राज्यशास्त्र. इतिहास. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.

करोनाशी ‘महा’लढाई लढता-लढता ‘घरीच-सुरक्षित’ राहावे लागल्यानंतर; ऑफिस, शाळा घरातच आल्यावर घरोघरी नवे प्रश्नही उद्भवले. ‘घरातलं विश्व’ आणि ‘घराबाहेरचं जग’ यांविषयीच्या कल्पनांना मिळालेल्या या आव्हानाला दिले गेलेले प्रतिसाद गोंधळलेलेच, पण घरातील सत्ताकारण उघड करणारे ठरले..

आत्माराम सावंतांच्या एका जुन्या फार्सची आठवण करून देणारे लेखाचे हे शीर्षक वाचकांना काहीसे छचोर वाटले तरी लेख मात्र तसा नाही. (कदाचित जरा जास्तच गंभीर प्रकृतीचा आहे.) करोनानंतरच्या सध्याच्या काळात ‘घर’ नावाची जी एक नवी राजकीय रणभूमी अस्तित्वात आली आहे तिची सविस्तर दखल घेण्यासाठी म्हणून त्या नाटकाचे लक्षवेधी शीर्षक जरा मोडतोड करून इथे वापरले इतकेच.

करोनापूर्वीच्या काळात ‘हे विश्वचि माझे घर’ असे मानून त्रिखंडात संचार करणाऱ्या/ करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या सर्व वीरांना (आणि वीरांगनांना) करोनाने जमिनीवर आणले तेव्हा ‘घर हेच विश्व’ असे एक ‘नव नित्य’ (न्यू नॉर्मल) प्रस्थापित झाले. मात्र ‘घरी राहा, सुरक्षित राहा’च्या भानगडीत विश्व घरात एकवटल्याने काही अपेक्षित/ अनपेक्षित; नव्या-जुन्या राजकीय संघर्षांची नांदी झडून घराचे – घरगुती क्षेत्राचे (‘डोमेस्टिसिटी’ या अर्थाने) रूपांतर रणक्षेत्रात झाले आहे. एकीकडे करोनाविरोधातली ‘महा’लढाई लढत असताना घरोघरच्या सूक्ष्म लढायांचे काय करायचे याविषयी सध्या आपण पुरेसे बावचळलेले आहोत. त्या पार्श्वभूमीवरचा हा लेखप्रपंच.

आधुनिक समाजातली आणि प्रगत भांडवलशाही आर्थिक व्यवस्थेत वावरणारी एक सामाजिक संस्था म्हणून कुटुंबाची निर्मिती होत असली तरीदेखील त्याविषयीचे आपले एक (मध्यमवर्गीय) निरागस आकलन असते. खरे तर कायद्यातून कुटुंबाची निर्मिती होते, पण कौटुंबिक क्षेत्राचा विचार करताना मात्र करारांपेक्षा, रक्ताच्या नात्याची संकल्पना आणि धागे अधिक महत्त्वाचे मानले जातात. राजकीय घराणेशाहीची चर्चा आपल्या सार्वजनिक चर्चाविश्वामध्ये हिरिरीने चालते. ही घराणेशाही चूक की बरोबर हा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवला तरी कुटुंबाचे सत्ताकारणाशी असलेले नाते या चर्चेत अधोरेखित होते. मात्र केवळ राजकारणातल्या मातब्बर घराण्यांचेच नव्हे तर आपल्यातुपल्यासारख्या, राजकारणापासून मैलोगणती दूर असणाऱ्या/ आहोत असे मानणाऱ्या कोणत्याही कुटुंबाचेदेखील सत्ताकारणाशी एक गडद नाते जुळलेले राहाते, याविषयी मात्र आपण सहसा अनभिज्ञ राहातो.

कौटुंबिक किंवा घरगुती क्षेत्राच्या आकलनासंबंधीचा आपला संकल्पनात्मक प्रवास सहसा सावंतांच्या ‘राजकारण गेलं चुलीत’ (जिथे राजकारणाविषयीच्या अपुऱ्या समजेतून येणारी तुच्छता काम करते) कडून बाळ कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’कडे होतो (जिथे घरगुती क्षेत्रातले सत्ताकारण उमाळ्यांच्या कढांखाली दडवले जाते) आणि त्यामुळे आपल्या आधुनिक जीवनाची आखणी करताना खासगी आणि सार्वजनिक, कौटुंबिक आणि सामाजिक किंवा आतले विरुद्ध बाहेरचे अशा द्वंद्वात्मक वर्गवाऱ्यांमध्ये त्याची कप्पेबंद विभागणी करण्याचा सातत्याने प्रयत्न घडतो. आधुनिक सार्वजनिकता आपल्याला सोयीनुसार हवीशी आणि नकोशीही असते. तिच्यातला नकोसा भाग टाळण्यासाठी म्हणून मग घरातले, कौटुंबिक, खासगी विश्व म्हणजे सच्चे, गाभ्याचे, कनवाळू, प्रेमळ विश्व; तर बाहेरचे सार्वजनिक- राजकीय जग म्हणजे आक्रमक, कृतक, निव्वळ करारांनी बांधलेले आणि म्हणून कोरडे, अपरिहार्य परंतु पळ काढावेसे वाटणारे अशी मांडणी कळत नकळत कुटुंबाच्या संकल्पनेभोवती साकार होत असते. आणि म्हणून घरगुती क्षेत्राची संकल्पनात्मक उभारणी करताना त्यात काही तरी निर्मळ, सात्त्विक, राजकारणाच्या दलदलीपासून वाचलेले असे काही अराजकीय वास्तव उभारण्याचा प्रयत्न होतो. करोनाविरोधातल्या ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ या मंत्रामागेसुद्धा घरगुती क्षेत्राविषयीची ही मूल्यसंकल्पनात्मक चौकट काम करताना दिसेल.

कुटुंबाविषयीच्या या ‘निरागस’ आकलनाला राजकीय-सामाजिक सिद्धांतनांमध्ये सर्वप्रथम छेद दिला तो मार्क्‍सच्याही पूर्वी हेगेलने. उभरत्या भांडवली आधुनिक समाजातल्या संस्थात्मक उभारणीत कुटुंबव्यवस्थेभोवती एका वैशिष्टय़पूर्ण सामाजिक-नैतिक विचारव्यूहाची जडणघडण कशी होते याविषयीचे विवेचन हेगेलने केले आहे. कुटुंबसंस्था ही नागरी समाज आणि राज्यसंस्था या दोन्ही आधुनिक संस्थांशी अपरिहार्यपणे जोडलेली असते आणि त्यामुळे त्यांच्यातील सत्ताकारणाचे, अन्यायांचे, विरोधाभासांचे प्रतिबिंब कुटुंबसंस्थेच्या कामकाजातही पडते. मात्र त्याच वेळेस या विरोधाभासांमधून कुटुंबातील सभासदांना वाचवणारा एक (मार्क्‍सवादी व स्त्रीवादी ज्याला कृतक म्हणतील असा) अवकाशही कुटुंबसंस्थेत तयार होतो. परिणामी घरगुती संघर्ष दबलेले राहतात आणि स्वत:च्या ‘पवित्र’ नात्यावर आधारलेल्या, सदैव गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या कुटुंबाची एक आश्वस्त प्रतिमा तयार होते. हेगेलच्या सिद्धांतनातले काही दुवे वापरून; तर काही पुरते उलटेपालटे करून मार्क्‍स – विशेषत: एंगल्सने कुटुंबात आणि विशेषत: कुटुंबसंस्थेमार्फत चालणारे सत्ताकारण सर्वप्रथम पुढे मांडले. नंतरच्या काळात या संदर्भातील राजकीय मांडणीत सर्वात जोरकस हस्तक्षेप अर्थातच स्त्रीवादय़ांनी केला. ‘व्यक्तिगत हेदेखील राजकीय’ का आणि कसे असते, याविषयीची स्त्रीवादातील (नाना छटांमधील) मांडणी प्रसिद्ध आहे. कुटुंबातील छुप्या सत्ताकारणात स्त्रियांचा शतकानुशतके बळी जात असल्याने स्त्रीवादय़ांच्या दृष्टीने ही मांडणी महत्त्वाची राहिली.

कुटुंबसंस्थेविषयीच्या या सामाजिक सिद्धांतांच्या धडय़ांचा डोस अचानक वाचकांना कशासाठी? करोनानंतरचे आपल्या कौटुंबिक आणि पर्यायाने सार्वजनिक जीवनातले काही पेचप्रसंग समजून घेण्यासाठी ही सिद्धांतने कदाचित उपयोगी ठरावीत.

करोनानंतरच्या जगात सर्वप्रथम ऑफिस घरात आले आणि मग पाठोपाठ शाळाही घरात आली. सुरुवातीला हे बदल अनोखे आणि हवेहवेसे वाटले तरी ते लवकरच घरातल्या सर्वाना जाचू लागले. शाळा आणि ऑफिसचा घरातला प्रवेश म्हणजे खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राची सरमिसळ आणि त्यातून अपरिहार्यपणे खासगी क्षेत्रावर झालेले आक्रमण. घरातून चालवल्या जाणाऱ्या कार्यालयीन बैठकांच्या काळात घरातल्या इतरांनी टीव्ही लावायचा की नाही इथपासून ते दशभुजा (आणि दहा मेंदूंचा रावण) बनून कार्यालयीन कामकाज आटोपतानाच चटपटीतपणे सर्वाचे चहा-खाणेही कसे काय आटपायचे? इथपर्यंतच्या छोटय़ामोठय़ा प्रश्नांमधून घरगुती आणि सार्वजनिक क्षेत्रांमधील सरमिसळ आणि संघर्ष करोनाने खुले केले. करोनाच्या निमित्ताने सार्वजनिक क्षेत्राने (आणि घराबाहेरच्या बरबटलेल्या जगाने) घरगुती क्षेत्रात घुसखोरी केली. घराविषयीची, कुटुंबाविषयीची जी एक आदर्श मांडणी विशेषत: मध्यमवर्गीय चौकटी काम करत असते, तिला करोनामुळे तडे गेले आणि राजकारण थेट चुलीत आले. या घुसखोरीचा सामना कसा करायचा, हे न समजल्याने आपलेतुपले मध्यमवर्गीय विचारविश्व सध्या गोंधळून गेले आहे.

घरातल्या बायकांचे काय करायचे? हा काही मध्यमवर्गीय पुरुषांना एरवी गोंधळवून टाकणारा प्रश्न नाही. पण लॉकडाऊनच्या काळात स्त्री आणि पुरुष यांच्यामधली, घरगुती आणि सार्वजनिक भूमिकांमधली नीटस वाटणी कोलमडली. कुटुंबातले सत्ताकारण चव्हाटय़ावर आले. त्याने गोंधळून जाऊन पुरुषांनी दोन टोकांच्या प्रतिक्रिया दिल्या. एकीकडे, लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात अगदी पुरोगामी म्हणवणाऱ्या पुरुषांनीदेखील हौसेने आपले घरकाम करतानाचे फोटो/ अनुभव वर्तमानपत्रांत छापूनबिपून आणले. (बायका घरकाम करतानाचे असे फोटो पाहिले आहेत का हो कधी तुम्ही?) दुसऱ्या टोकाला, सार्वजनिक स्वातंत्र्याचा तोकडाही अवकाश नाकारला गेलेल्या आणि लॉकडाऊनमुळे नाइलाजाने घरातच अडकून पडलेल्या स्त्रियांवर ‘त्यांच्या’ पुरुषांनी जगभर वाढते अत्याचार केले ज्याची दखल संयुक्त राष्ट्र संघटनेलाही घ्यावी लागली.

शहरातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये एरवीही त्यांचे खासगीपण (आणि बागा, पोहण्याचा तलाव, टेनिस कोर्टासहचे घरगुती सुखकर विश्व) जपणारा कडेकोट बंदोबस्त असतोच. त्या बंदोबस्तात एरवी घरकामगारांसारख्या काही ‘उपऱ्यां’ना निवडक, कामापुरता, स्वार्थी प्रवेश दिला जात असे. पण करोनाने त्या मर्यादित प्रवेशापुरतादेखील एक भलताच पेचप्रसंग घरगुती क्षेत्रात निर्माण केला. (पुन्हा, मध्यमवर्गीय घरांतल्या (पुरुषांच्या) सोयीस्कर श्रमविभागणीमुळे हा पेचप्रसंग बराच काळ तटवला गेला.) तरीदेखील बाहेरगावाहून किंवा परदेशातून परत येणाऱ्या आपल्याच ‘वर्ग’बांधव-भगिनींचे काय करायचे? ते आपल्या मनातल्या व्यापक विश्वकुटुंबाचे भाग असले, तरी त्यांना वास्तविक कुटुंबात सहभागी कसे करून घ्यायचे? किंवा सार्वजनिक क्षेत्रातल्या करोनाविरोधी लढाईत ज्यांनी बिनीचे शिलेदार म्हणून काम केले (आणि ज्यांच्यासाठी आपण इमानेइतबारे टाळ्याबिळ्या वाजवल्या) त्यांना आपल्या गृहनिर्माण संस्थेच्या खासगी कोटात प्रवेश द्यायचा की नाही? याविषयीचा बाका प्रसंग बऱ्याच वेळा करोनाने निर्माण केला. घरगुती क्षेत्रांविषयीच्या या नव्या पेचप्रसंगाने आपण गोंधळून गेल्याचेच चित्र आहे.

सामाजिक सिद्धांतनांकडेच परत जायचे तर भांडवली समाजातील मध्यमवर्गाच्या ‘विसंगतीपूर्ण वर्गीय स्थाना’संबंधी अलीकडच्या मार्क्‍सवादय़ांनी बरेच विवेचन केले आहे. करोनानंतरच्या काळात घरवाले आणि बाहरवाले यांच्यामधल्या छोटय़ामोठय़ा लढाया म्हणजे याच विसंगतींचे उदाहरण नाही काय?

लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात

राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. लेखातील मते वैयक्तिक.

ईमेल : rajeshwari.deshpande@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 12:03 am

Web Title: article on revealed the power of the house due to fighting battle with corona abn 97
Next Stories
1 महाराष्ट्रधर्माचा खळाळता प्रवाह
2 साक्षर ज्ञानशत्रूंचा किफायतशीर धंदा
3 ‘अर्थ’ असेल तर जीव वाचेल  
Just Now!
X