News Flash

करोनाच्या विळख्यात राज्यसंस्था

करोनाच्या उद्रेकाची माहिती सुरुवातीला चीनने आणि नंतर थायलंडने दडवली असा आरोप त्यांच्यावर केला जातो.

करोनाच्या विळख्यात राज्यसंस्था

राजेश्वरी देशपांडे

राज्यशास्त्र. इतिहास. समाजशास्त्र. अर्थशास्त्र.

ज्याप्रमाणे आम्हाला रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक सुधारता येत नाही म्हणून तुम्ही हेल्मेट घाला (आणि आपला जीव जमले तर वाचवा) असा बेपर्वा सल्ला आपली स्थानिक राज्यसंस्था आपल्याला देते; त्याचप्रमाणे करोनातून वाचायचे असेल तर प्रवास करू नका.. तोंडास रुमाल बांधा.. सारखे साबणाने हात धुवा..

इतके अगतिक, बेपर्वा आणि उद्धट सल्लेच आपल्या नागरिकांसाठी सध्याच्या राज्यसंस्थेकडे उपलब्ध आहेत..

करोनाच्या उद्रेकानंतर जग जणू काही एका अतक्र्य, अनाकलनीय (‘र्सीअल’ म्हणावे अशा) कालपर्वात प्रवेश करते आहे. जणू काही परग्रहवासीयांच्या पृथ्वीवरील आक्रमणाविषयीचा हॉलीवूडचा एखादा थरारपट आपल्यापुढे उलगडला जातो आहे. करोनानंतरच्या जगात विमाने चालत नाहीत; महानगरे ओस पडताहेत; विश्वसंचार हा जणू काही आपला मूलभूत अधिकार आहे असे आजवर मानणाऱ्या ‘व्हिसामुक्त’ देशांतल्या नागरिकांवर (भारतासारख्या गरीब देशात!) प्रवेशबंदीची नामुष्की ओढवली आहे. येत्या काही दिवसांत आपल्याला (हवे ते) अन्न मिळेल की नाही (आणि आपला अकरा की बारा की कितव्या तरी पिढीचा अद्ययावत आयफोन चालेल की नाही) या चिंतेने समृद्धीच्या शिखरावर असणाऱ्या देशांमधले नागरिक हवालदिल झाले आहेत. आजच्या जगातील बऱ्याचशा संपत्तीवर स्वार्थी दावा करणारे मूठभर कोटय़धीशदेखील करोनाच्या धास्तीने आणि नफ्याच्या दैनंदिन घसरणीने हैराण झाले आहेत आणि जागतिक भांडवलशाहीच्या दिग्विजयाचे जणू प्रतीक म्हणून मिरवणारे जगभरातले शेअर बाजार धडाक्याने कोलमडताहेत. अर्थातच या सर्व धास्तींचे रूपांतर हतबलतेत करणारी सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे जगभरात सर्वत्र करोनाच्या बळींची वाढत जाणारी संख्या. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत ८५ देशांत पसरलेला हा विषाणू इथून पुढच्या काळात आणखी किती बळी घेणार याविषयीचे आज निव्वळ भयावह कयास आपण बांधू शकतो आहोत आणि त्यामुळे धास्ती आणि हतबलता हा नव्या अतक्र्य कालपर्वातील जगाचा स्थायीभाव बनला आहे.

या हतबलतेत आधुनिक राज्यसंस्थेची आणि सार्वत्रिक उत्थानाची जबाबदारी शिरावर घेतलेल्या जागतिक भांडवलशाही व्यवस्थेचे अनेकपदरी पराभव दडलेले आढळतील. तसे म्हटले तर साथीचे रोग काही मानवजातीसाठी नवे नाहीत. ज्ञात आणि अज्ञात इतिहासात या रोगांनी घडवलेल्या उत्पातांचे किती तरी दाखले आढळतील. या उत्पातांमधून मानवी समाज बचावले आणि सावरले. त्या काळात बचावाची पुरेशी साधने आपल्याकडे उपलब्ध नव्हती आणि म्हणून अपरिहार्य असे नरसंहार घडले, असा युक्तिवाद करून कधी मानवजातीने स्वत:ला सावरले तर कधी अशा आपत्तीदेखील प्रगतीसाठी इष्टापत्ती कशा ठरल्या याची वर्णने वाचून जिवाचे समाधान करून घेतले. उदाहरणार्थ १४व्या शतकात युरोपमध्ये उद्भवलेला प्लेग. ‘काळा मृत्यू’ असेच त्याचे वर्णन केले गेले. या भयावह साथीत तेव्हाच्या युरोपमधील जवळपास एक तृतीयांश लोक  मृत्यू पावले असे मानले जाते. या दु:खावरील फुंकर म्हणून या साथीनंतर युरोपमध्ये श्रमाचे मूल्य कसे वाढले आणि औद्योगिक क्रांतीतून प्रगतीची नवी दारे खुली कशी झाली याविषयीचे ऐतिहासिक विश्लेषण पुष्कळदा केले जाते. आता करोनाच्या निमित्ताने जागतिक बाजारपेठेची पडझड झाल्यानंतरच्या काळात काही नव्या ‘खेळाडूं’ना जागतिक अर्थव्यवस्थेत नव्या संधी कोणत्या आणि कशा प्राप्त होतील याविषयीचे चर्वितचर्वण एकीकडे सुरू झालेच आहे.

पण खरा मुद्दा तो नाही. चौदाव्या शतकातल्या युरोपला वाटणारी साथीच्या रोगांची धास्ती; त्यातून निर्माण होणारी हतबलता; २०२० मधल्या- म्हणजे औद्योगिक क्रांती, दोन महायुद्धे, जागतिकीकरणाच्या ऐतिहासिक वळणवाटा हे सारे पार करून देदीप्यमान भांडवली विकासाच्या शिखरावर पोहोचलेल्या- युरोपमध्ये आणि अमेरिकेसारख्या त्याच्या भागीदार राष्ट्रांमध्ये तशीच आणि तितकीच कायम असेल, तर त्या हतबलतेचा अर्थ कसा लावायचा?

औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात; या क्रांतीच्या सहोदर संस्था म्हणून आधुनिक राज्यसंस्था आणि भांडवली बाजारपेठ या दोन महत्त्वपूर्ण यंत्रणांची उभारणी झाली. भांडवली बाजारपेठेच्या रूपाने जगाच्या आर्थिक विकासाचे आणि त्यातून ओघाओघाने येणाऱ्या लोककल्याणाचे सुरम्य स्वप्न उभे राहिले. या स्वप्नाची पाठराखण करण्याची त्यासाठी प्रसंगी भांडवली बाजारपेठेला आवश्यक तिथे वेसण घालण्याची जबाबदारी आधुनिक राज्यसंस्थेवर सोपवण्यात आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे या दोन संस्थांच्या एकत्रित वाटचालीत गेल्या चार-पाच शतकांच्या काळात त्यांना अनेक वळणवाटांना, खाचखळग्यांना तोंड द्यावे लागले. मात्र तरीदेखील विकास आणि जनकल्याणाचा आपला तोंडवळा शाबूत ठेवणे या दोन्ही संस्थांना कसेबसे जमले असे त्यांच्या आजवरच्या प्रदीर्घ इतिहासावरून म्हणता येईल.

करोनाच्या उद्रेकानंतरच्या काळात एकाएकी हा फुगा फुटला आहे. या जीवघेण्या विषाणूचा सामना करण्याविषयीच्या उपाययोजना तर सोडाच परंतु या विषाणूच्या ताकदीचा अंदाजदेखील बांधणे जगभरातील राज्यकर्त्यांना, नोकरशहांना, शास्त्रज्ञांना आणि आंतरराष्ट्रीय धोरणकर्त्यांना जमले नाही असे हतबल चित्र आज जगापुढे उभे ठाकले आहे. उलट या हतबलतेत वाढ करणाऱ्या अनेक विपरीतता करोनाच्या साथीच्या निमित्ताने प्रकर्षांने पुढे आल्या आहेत. या विपरीततांमधून राज्यसंस्थेचा आणि बाजारपेठ या दोन्हींच्या अपयशाची नांदी झडते आहे.

करोनाच्या उद्रेकाची माहिती सुरुवातीला चीनने आणि नंतर थायलंडने दडवली असा आरोप त्यांच्यावर केला जातो. ते खरेही असेल. पण अमेरिकेने वेगळे काय केले? सध्याच्या उथळ लोकानुरंजनवादी राजकारणाचा भाग म्हणून अमेरिकन राज्यकर्त्यांनी या साथीची दखल घेणेच नाकारले- उलट तिची खिल्ली उडवली. मात्र रोगाचा प्रसार जसजसा वाढत गेला तसतशी अमेरिकन आरोग्य व्यवस्थेची लक्तरे झपाटय़ाने वेशीवर टांगली जात आहेत. साथीचे रोग आटोक्यात ठेवण्यासाठी सक्षम सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आणि त्याचबरोबर अन्य क्षेत्रांतदेखील सक्षम सार्वजनिक, कल्याणकारी यंत्रणा अस्तित्वात असाव्या लागतील हे युगानुयुगांचे सत्य पुन्हा अधोरेखित झाले. अमेरिकेसारख्या दिमाखदार श्रीमंतीचे जागतिक प्रदर्शन मांडणाऱ्या देशातदेखील या यंत्रणा अजिबात अस्तित्वात नाहीत हे नागडे सत्यही करोनाच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

वैद्यकीय क्षेत्रातल्या खासगी गुंतवणुकीची गतही यापेक्षा काही वेगळी नाही. सार्स, इबोला, करोना अशा अंतराअंतराने येणाऱ्या वावटळींमध्ये तगून राहण्यासाठी सुरक्षित लशींची निर्मिती ‘नोबेल’मंडितांनी नटलेल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या बाजारपेठेने अद्याप का केली नाही? याचे रोखठोक उत्तर म्हणजे या लशींमधून भरघोस नफ्याची अपेक्षा या बाजारपेठेला ठेवता येत नाही हेच आहे. साथीचे रोग ‘कधी तरी’च येतात आणि विरून जातात आणि त्यामुळे रोगप्रतिबंधक लशींच्या निर्मितीत भांडवली गुंतवणूक करणे बडय़ा वैद्यकीय कंपन्यांच्या हिताचे ठरत नाही हे अघोरी सत्य आहे. आणि या सत्यात जागतिकीकरणानंतरच्या भांडवली बाजारपेठेचे सपशेल अपयश दडले आहे.

म्हणूनच आज; करोनाच्या वावटळीत जग सापडलेले असताना बाजारपेठ आणि राज्यसंस्था या दोन्ही ‘तारणहार’ संस्थांनी जगातल्या नागरिकांना मृत्यूच्या दारात- वाऱ्यावर सोडले आहे. भांडवली बाजारपेठ ही बोलूनचालून नफ्याच्या आशेवर चालणारी एक आशाळभूत यंत्रणा. परंतु तिच्या स्वार्थी प्रेरणांवर लक्ष ठेवून तिला लोककल्याणाकडे वळवण्याचे काम राज्यसंस्थेचे. आधुनिक राज्यसंस्थेने जी विविध प्रकारची कामे करायची असतात त्यामध्ये नियमनाबरोबरच नागरिकांना सुरक्षा पुरवण्याचे; (कर) वसुली करण्याबरोबरच सार्वजनिक विकास घडवण्याचेही काम करणे अपेक्षित असते.

करोनाच्या साथीला जगभरातील शासनसंस्थांनी दिलेल्या प्रतिसादात मात्र उलटे चित्र दिसते. ज्याप्रमाणे आम्हाला रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक सुधारता येत नाही म्हणून तुम्ही हेल्मेट घाला (आणि आपला जीव जमले तर वाचवा) असा बेपर्वा सल्ला आपली स्थानिक राज्यसंस्था आपल्याला देते; त्याचप्रमाणे करोनातून वाचायचे असेल तर प्रवास करू नका, बाजारात जाऊ नका, नाकावर रुमाल लावा (वैद्यकीय मास्क मागू नका कारण ते संपले आहेत!) आणि गेलाबाजार सारखे साबणाने हात धुवा इतके अगतिक, बेपर्वा आणि उद्धट सल्लेच आपल्या नागरिकांसाठी सध्याच्या राज्यसंस्थेकडे उपलब्ध आहेत. ही हतबलता म्हणायची की बाजारपेठ आणि राज्यसंस्था यांच्या संगनमतातून घडलेला कावेबाजपणा?

अपराधीपणाच्या भावनेतून लेडी मॅक्बेथ आपले रक्ताळलेले हात सतत धूत असे अशी प्रतिमा आपल्या ओळखीची आहे. तिच्या नावाने बाजारपेठेत आलेला ‘लेडी मॅक्बेथ सॅनिटायझर’ आता करोनाच्या साथीत केव्हाच संपून गेला आहे. या घटनाक्रमातले किती विरोधाभास आपण कसे शोधायचे?

लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. लेखातील मते वैयक्तिक.

ईमेल : rajeshwari.deshpande@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 4:23 am

Web Title: tips for precaution against corona coronavirus from maharashtra government zws 70
Next Stories
1 आपण बुद्धिजीवींचा समाज?
2 आम्हांसी आपुले नावडे संचित
3 बिकट वाट वहिवाट नसावी..
Just Now!
X