गणपतीच्या मिरवणुकीत प्रचलित भजन आहे.. ‘‘पायी हळूहळू चाला, मुखानं मोरया बोला!’’ अध्यात्म मार्गावरून जी वाटचाल करायची आहे तीही हळूहळू. या ‘हळूहळू’चा अर्थ आळसानं किंवा दिरंगाईनं मात्र नव्हे. तर अध्यात्मबोध सावकाश ग्रहण करायचा, आपल्या क्षमतेनुसार तो कृतीत उतरवायचा प्रयत्न करायचा. यात घिसाढघाई किंवा गोंधळ करायचा नाही. तेव्हा हे मार्गक्रमण सावकाश, काळजीपूर्वक करायचं आहे. त्याचबरोबर मुखानं ‘मोरया’ म्हणायचं आहे. म्हणजेच हा बोध अंगी पचवत असतानाच बोलण्यातून, वागण्यातून, कृतीतून, विचारातून जे व्यक्त होणं आहे ते सुसंगत, सकारात्मक, शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. ही वाटचाल करण्यासाठी तसंच ही वाटचाल कशी करावी, समाधानाची प्राप्ती कशी व्हावी, हे जाणून घेण्यासाठीही खरा सत्संग.. सज्जन सहवास लाभला पाहिजे. पण हा खरा सज्जन कोण असतो? आणि त्याचा सहवास म्हणजे नुसतं त्याच्याजवळ राहणंच का? समर्थ रामदास ‘दासबोधा’त म्हणतात की, ‘‘सर्वव्यापक वस्तु सद्य। पाविजे तें ज्ञान।।’’ सर्वव्यापक असा जो परमात्मा आहे त्याच्या अखंड, अक्षय प्राप्तीच्या मार्गाची अनुभवसिद्ध माहिती, हेच ज्ञान आहे आणि ज्याला असं ज्ञान आहे तोच सज्जन आहे. म्हणजे जे परमतत्त्व आहे त्याच्याशी जो एकरूप आहे, त्या ‘सद्’ला अनुसरून जो जगत आहे, ज्याच्या जगण्यातून सत्यनिष्ठेचाच प्रत्यय येत आहे, तोच खरा सज्जन आहे. मग समर्थ पुढे सांगतात, ‘‘तयापासीं समाधान । पुसिलें पाहिजे ।।’’ म्हणजे त्याच्याकडून समाधानाचा तो मार्ग जाणून घेतला पाहिजे! बघा, त्याच्याजवळच निव्वळ राहिलं पाहिजे, असं समर्थ सांगत नाहीत. एखादा काशीला जाऊन आला म्हणून नुसतं त्याच्यासोबत राहिल्यानं काशीला पोहोचलोच, असं होणार नाही. त्यासाठी  त्यानं सांगितलेल्या मार्गानं जावंच लागेल. पण बरेचदा होतं असं की जो काशीला कधी गेलेलाच नाही त्याच्याचवर आपण विसंबतो आणि त्यानं सांगितलेल्या मार्गानं काशीला जायचं ठरवतो आणि त्या काशीच्या दिशेनं थोडं चालूनही दमून परततो आणि वर काशीयात्रा केल्याचा ढिंढोरा पिटू लागतो! म्हणजे ज्याला परमतत्त्वाची ओळख झालेली नाही तोच अध्यात्माचा बाजार मांडतो आणि त्या परमतत्त्वाचं आकलन केवळ मीच करून देऊ  शकतो, असा प्रचार करू लागतो. त्याच्या प्रचाराला भुलून आपण त्याच्या सांगण्यानुसार थोडीफार साधना करतो. तीही तोडकीमोडकी होताच आपणही ‘ज्ञानी’ झाल्याचा ढिंढोरा पिटू लागतो. खरं तर ज्याचा देहभाव नष्ट झालाय तोच काशीला पोहोचलाय! ज्याचा देहभाव कायम आहे अर्थात संकुचित भाव कायम आहे, त्याला परमतत्त्वाचं आकलन कसं शक्य आहे? त्यामुळे अशाचा संग लाभूनही खरी आंतरिक वाटचाल होऊ  शकत नाही. जो अगणित अनंत रत्नांच्या खाणीत लोळतो आहे तो, ‘‘मला चार-दोन रत्नं दिसतात बरं का,’’ असा प्रचार करील का? असं सांगावंस वाटणं हे देहभावाचंच लक्षण!! वाटेत काय काय पाहिलं, हे सांगायला नदी कधी थांबते का? समुद्राला मिळेपर्यंत तिला थांबणं माहीत नाही.. आणि एकदा ती समुद्राला मिळाली की ती नदीपणानं उरतच नाही!  तसा जो खरा सज्जन आहे तो ‘मी’पणानं उरलाच नसतो. जो त्याच्या संगतीत राहतो त्याचंही जगणं तसंच बनलं पाहिजे ना? नदीसारखं अखंड प्रवाही आणि समुद्राला मिळेपर्यंत, अर्थात ध्येयपूर्तीपर्यंत न थांबणारं!

– चैतन्य प्रेम